कंटेंट क्रिएटरांच्या देशा...

केंद्र सरकारने ‘क्रिएटर इकॉनॉमी’च्या विकासासाठी एक अब्ज डॉलर्सचा निधी जाहीर केला
कंटेंट क्रिएटरांच्या देशा...
Pudhari File Photo
Published on
Updated on
राजीव मुळ्ये

इंटरनेटच्या सुलभ आणि स्वस्त उपलब्धतेमुळे देशात सोशल मीडियावरील कंटेंट क्रिएटर्सची संख्या झपाट्याने वाढत आहे. केंद्र सरकारने ‘क्रिएटर इकॉनॉमी’च्या विकासासाठी एक अब्ज डॉलर्सचा निधी जाहीर केला आहे. हा निधी सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर उभारला जाणार आहे. सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर्स केवळ मनोरंजनापुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर ते आजच्या डिजिटल युगातील प्रभावी मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा भाग बनले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘क्रिएटर इकॉनॉमी’ला फाईव्ह ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करण्यासाठी नवचैतन्य मिळवून देणारी शक्ती म्हणून संबोधले आहे.

माहिती-तंत्रज्ञानाचा आणि खासकरून सोशल मीडियाचा प्रसार वेगाने होऊ लागल्यानंतर सबंध जगभरात एक अभूतपूर्व क्रांती घडून आली असून तिचा प्रवास अद्यापही सुरू आहे. ही क्रांती विशिष्टांगी नसून बहुआयामी आहे. जीवनाच्या सर्व अंगांंना स्पर्श करणारी आहे. म्हणजे असे की, आज सामान्य गृहिणी रोजचा मेन्यू काय असावा याबाबत यूट्यूब, इन्स्टा, व्हॉटस्अप, फेसबुक यांचा आधार घेताना दिसत आहे; तर योगा, ध्यानधारणा, आध्यात्मिकता, मंत्र जप इथपासून शेअर बाजार, एआय, वित्तीय व्यवस्थापन यांबाबतचे मौलिक ज्ञानही सोशल मीडियावरून उपलब्ध झाले आहे. त्यातील गुणात्मकतेबाबत अनेकदा नकारात्मक बोलले जात असले तरी सगळेच टाकाऊ आहे, अशी स्थिती निश्चितच नाही. कोट्यवधी लोकांना या माध्यमामध्ये खिळवून ठेवण्यामध्ये कंटेंट क्रिएटर नावाच्या घटकाची सर्वांत मोठी भूमिका आहे.

कंटेंट क्रिएटर हा असा कोणीही व्यक्ती असतो, जो ऑनलाईन माध्यमांवर विशिष्ट प्रेक्षकांसाठी प्रभावी कंटेंट तयार करतो. सध्या कंटेंट मोनेटायझेशनच्या नव्या संधींमुळे अनेक लोक पूर्णवेळ किंवा अर्धवेळ कंटेंट क्रिएटर म्हणून आपला उदरनिर्वाह करू लागले आहेत. ते त्यांच्या समुदायावर प्रभाव टाकण्याची क्षमता ठेवतात आणि मूळ कंटेंटच्या माध्यमातून लोकांना एखादी गोष्ट खरेदी करायला, वापरायला किंवा अधिक जाणून घ्यायला प्रवृत्त करतात. ब्रँड आणि कंटेंट क्रिएटर्स यांच्यातील थेट नातेसंबंध प्रेक्षकांचा विश्वास निर्माण करतो. एखाद्या कंटेंट क्रिएटरने आपल्या आवडत्या उत्पादनाचा सहज, नैसर्गिक वापर करत एक पोस्ट तयार करणे पुरेसे ठरते. कारण प्रेक्षक त्या क्रिएटरच्या शिफारशीवर विश्वास ठेवतात आणि त्या उत्पादनाच्या खरेदीसाठी पुढे सरसावतात.

सामान्यतः कंटेंट क्रिएटर्ससाठी फॉलोअर्सची संख्या आणि त्यांच्या पोस्टवरील सहभाग (एंगेजमेंट) महत्त्वाचा निकष असतो. बहुतांश प्रभावशाली कंटेंट क्रिएटर्सच्या मुख्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर किमान 1,000 फॉलोअर्स असतात. तसेच ज्या ब्लॉगर्सच्या वेबसाईटस्ना दर महिना हजारो वाचक भेट देतात, त्यांनाही कंटेंट क्रिएटर म्हणून गणले जाते. हे ब्लॉगर्स त्यांच्या सोशल मीडिया चॅनेल्सचा वापर स्वतःच्या ब्लॉगच्या प्रचारासाठी आणि वाचकांशी जोडले जाण्यासाठी करतात. इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, भारतात 2023 मध्ये सुमारे 9.3 लाखांहून अधिक कंटेंट क्रिएटर्स कार्यरत होते. यामध्ये 10,000 पेक्षा कमी फॉलोअर्स असलेले नॅनो इन्फ्लुएन्सर सुमारे 20 लाख आहेत; तर 10,000 ते 50,000 फॉलोअर्स असलेले 50,000 हून अधिक मायक्रो इन्फ्लुएंसर आहेत.

प्रतिभावंतांची, प्रज्ञावंतांची, सर्जनशीलांची, अफाट बुद्धिमत्ता आणि कल्पनाशक्ती असणार्‍यांची खाण असणार्‍या भारतात इंटरनेटच्या सुलभ आणि स्वस्त उपलब्धतेमुळे कंटेंट क्रिएटर्सची संख्या झपाट्याने वाढत आहे. लाखो तरुण यूट्यूबसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली कलात्मकता दाखवत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ‘क्रिएटर इकॉनॉमी’च्या विकासासाठी एक अब्ज डॉलर्सचा निधी जाहीर केला आहे. नुकतीच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वर्ल्ड ऑडिओ-व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट अर्थात वेव्हज् 2025 दरम्यान यासंदर्भात घोषणा केली. हा निधी सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर उभारला जाणार असून, त्याचे तपशील लवकरच जाहीर केले जातील. सरकारने मुंबईच्या फिल्म सिटी, गोरेगाव येथे ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ स्थापनेसाठी 391 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आयआयटीच्या धर्तीवर ही संस्था क्रिएटिव्ह आणि डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रातील कौशल्यवृद्धीला चालना देणार आहे. यामुळे भारतातील युवा निर्मात्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जागतिक स्तरावर पोहोचण्याची संधी मिळेल.

एक ते चार मे 2025 दरम्यान मुंबईत वेव्हज् 2025 समिट आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाद्वारे डिजिटल कंटेंट निर्मात्यांना वित्तपुरवठा, कौशल्य विकास आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत संधी मिळवण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जाणार आहे. या समिटमध्ये 100 हून अधिक देशांतील प्रसारमाध्यमे, तंत्रज्ञान आणि मनोरंजन उद्योगातील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे या समिटअंतर्गत घेण्यात येणार्‍या ‘क्रिएटर चॅलेंज प्रोग्रॅम’मध्ये 25 लाखांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला असून, त्यातील 80,000 स्पर्धकांनी आपला कंटेंट सादर केला आहे. त्यातून 1,000 सर्वोत्तम क्रिएटर्स निवडले जातील आणि त्यांना प्रोत्साहन दिले जाईल. सोशल मीडिया क्रिएटर्स केवळ मनोरंजनापुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर ते आजच्या डिजिटल युगातील प्रभावी मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा भाग बनले आहेत. देश-विदेशातील ब्रँडस् त्यांच्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी क्रिएटर्सवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘क्रिएटर इकॉनॉमी’ला फाईव्ह ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करण्यासाठी नवचैतन्य मिळवून देणारी शक्ती म्हणून संबोधले आहे. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीने जसा भारताच्या ‘सॉफ्ट पॉवर’चा विकास केला, त्याचप्रमाणे कंटेंट क्रिएटर्स भारताची संस्कृती आणि पारंपरिक ज्ञान जागतिक स्तरावर पोहोचवू शकतात, असे मत व्यक्त केले आहे.

सरकारने वेव्हज् 2025 समिटच्या अनुषंगाने ‘वेव्हज् बाजार’ हा जागतिक ई-मार्केटप्लेस सुरू केला आहे. यामध्ये भारतीय क्रिएटर्सना आंतरराष्ट्रीय संधी मिळवण्यासाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जाईल. यामुळे निर्माते, खरेदीदार आणि ब्रँडस् एकत्र येऊन सहकार्य करू शकतील. विशेषतः चित्रपट, संगीत, गेमिंग, अ‍ॅनिमेशन आणि इतर डिजिटल कंटेंट निर्मिती करणार्‍यांना याचा मोठा फायदा होईल. आजच्या घडीला डिजिटल कंटेंट निर्मिती हा केवळ छंद राहिलेला नाही, तर त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत आहे. फॅशन, ट्रॅव्हल, फिटनेस, फूड आणि फायनान्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये प्रभावी कंटेंटमुळे व्यवसाय संधी निर्माण होत आहेत. सोशल मीडिया कॉमर्सची व्याप्ती आज आपल्या कल्पनेपेक्षाही मोठी आहे. अवघ्या एका दशकात कंटेंट क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सर मार्केटिंगसाठी महत्त्वाचे असलेले इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्म जवळपास 4 कोटी वापरकर्त्यांपर्यंत पोहोचले. यामध्ये प्रत्येकाकडे किमान 1,000 सक्रिय फॉलोअर्स आहेत. यावरून या व्याप्तीचा अंदाज येतो. क्रिएटर इकॉनॉमी भारताच्या जीडीपीमध्ये अंदाजे 2.5 टक्के योगदान देते आणि सुमारे 8 टक्के लोकांना रोजगार देते. भारतामध्ये 92 टक्के कंटेंट क्रिएटर्स कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपली कार्यक्षमता वाढवत आहेत, ज्यामुळे त्यांच्या उत्पादन क्षमतेत दुपटीने वाढ झाली आहे. सोशल मीडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने हे क्षेत्र भविष्यात आणखी विकसित होणार आहे. त्यामुळे डिजिटल कंटेंट क्रिएटर्ससाठी नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. परिणामी भारताची ‘क्रिएटर इकॉनॉमी’ आता जागतिक स्तरावर एक प्रमुख आर्थिक क्षेत्र म्हणून उदयास येत आहे. सरकारच्या मदतीने आणि सोशल मीडियावरील वाढत्या लोकप्रियतेमुळे येत्या काळात ‘क्रिएटर इकॉनॉमी’ ही आर्थिक विकासाचा एक मजबूत आधारस्तंभ ठरणार आहे.

वाढती इन्फ्लूएन्सर इकॉनॉमी

एका अहवालानुसार, भारतातील ‘इन्फ्लूएन्सर इकॉनॉमी’ झपाट्याने वाढत असून, 2024 पर्यंत 40 लाखांहून अधिक इन्फ्लूएन्सर्स उदयास आले आहेत. गेमिंग, ट्रॅव्हल, फॅशन, टेक, फूड आणि फायनान्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर कंटेंट तयार केला जात आहे. येणार्‍या काळात फॅशन, कला आणि गेमिंग हे प्रमुख प्रभावशाली क्षेत्र राहतील, अशी शक्यता आहे. सध्या भारतातील 12 टक्के कंटेंट क्रिएटर्स दरमहा एक ते 10 लाख रुपये कमावत आहेत. अंदाजे 47 टक्के ब्रँडस् ‘नॅनो’ आणि ‘मायक्रो इन्फ्लूएन्सर्स’ना पसंती देत आहेत. कारण ते तुलनेने कमी खर्चात जास्त प्रभावी ठरत आहेत. दुसरीकडे मोठे ब्रँडस् मोठ्या ‘मेगा इन्फ्लूएन्सर्स’सोबत काम करतात, तर नवीन ब्रँडस् ‘मायक्रो’ आणि ‘नॅनो’ इन्फ्लूएन्सर्सच्या मदतीने आपली ओळख निर्माण करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news