

संगणक क्षेत्राच्या आज दिसणार्या विस्मयकारी क्रांतीचे बीजारोपण पाच दशकांपूर्वी मायक्रोसॉफ्टच्या रूपातून झाले. अमेरिकेतील एका गावातील गॅरेजपासून सुरू झालेला मायक्रोसॉफ्टचा प्रवास आज महाकाय माहिती-तंत्रज्ञानाच्या जाळ्यापर्यंत पोहोचला आहे. मायक्रोसॉफ्टने केवळ संगणकाच्या इतिहासातच नाही, तर मानवाच्या जीवनशैलीतही आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत.
मानवी इतिहासात आजवर झालेल्या क्रांतीमध्ये संगणक क्रांतीचा वेग आणि व्यापकता ही अतिप्रचंड आहे. आज संपूर्ण जग ज्या माहिती-तंत्रज्ञानाच्या लाटेवर स्वार आहे, त्याचा संगणक हा पाया आहे. त्यामुळे संगणकाशिवाय जगाची कल्पनाच करणे अशक्य! आर्टिफिशियल इंटेलिजन्सने आज मानवी जीवन व्यापून टाकले आहे; पण त्याच्या कार्यामध्येही महासंगणक, परमसंगणक यांची भूमिका मूलभूत आहे. संगणकाच्या या क्रांतिकारी रूपाचे बीजारोपण पाच दशकांपूर्वी मायक्रोसॉफ्टच्या रूपातून झाले होते. जागतिक महासत्ता असणार्या अमेरिकेतील एका गावातील गॅरेजपासून सुरू झालेला मायक्रोसॉफ्टचा प्रवास आश्चर्यकारक आणि थक्क करणारा तर आहेच; शिवाय जगाच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरला आहे.
वैयक्तिक संगणक ते क्लाऊड सर्व्हिसपर्यंत व्यापलेल्या मायक्रोसॉफ्टने मानवी जीवनाच्या कामकाजाच्या शैलीत आमूलाग्र बदल केला. कार्यालय असो, वर्ग असो किंवा शेतशिवार असो, आज मायक्रोसॉफ्टची दस्तक आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसते. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमच्या माध्यमातून संगणकाच्या जगात क्रांती झाली आणि घराघरात पर्सनल कॉम्प्युटर पोहोचले. मायक्रोसॉफ्ट ऑफिसने (वर्ड, एक्सल, पॉवरपॉईंट) संगणकसज्ज कार्यालयातील महत्त्वाची जागा पटकावली. कोरोना काळात तर मायक्रोसॉफ्टच्या ‘टीम्स’शिवाय कोणाचे पानही हलत नव्हते. उद्योग क्षेत्र असो किंवा शाळा, महाविद्यालयाचे वर्ग सर्वजण सकाळी जागे झाल्यावर ‘टिम्स’समोर येऊन बसायचे. कोरोना लाटेतही जगाला सक्रिय ठेवण्यात ‘टिम्स’चे योगदान मोठे आहे. आज या प्लॅटफॉर्मवर दररोज 32 कोटींपेक्षा अधिक नागरिक असतात. जगाचे दळणवळण क्षेत्र ‘सजीव’ ठेवण्याचे काम करणार्या मायक्रोसॉफ्टने अमेरिकेतील रेडमंड येथे नुकताच आपला 50 वा वाढदिवस साजरा केला.
मायक्रोसॉफ्टचा प्रवास 1975 मध्ये न्यू मेक्सिकोच्या अल्बुकर्कमध्ये एका लहानशा गॅरेजमध्ये सुरू झाला. महाविद्यालयातील दोन मित्र आणि प्रोग्रामर बिल गेटस् (वय 19) आणि पॉल एलन (वय 22) या जोडीने संगणकाला घराघरांत पोहोचविण्याचे स्वप्न पाहिले. कंपनीला सर्वात मोठी संधी 1980च्या दशकात मिळाली. आयबीएमचे सहकार्य लाभल्याने त्यांच्या स्वप्नांना आणखीच बळ मिळाले. या करारामुळे पर्सनल कॉम्प्युटरला मायक्रोसॉफ्टची ‘एमएस डॉस’ ही ऑपरेटिंग सिस्टीम लाभली. काही वर्षांनंतर विंडोज लाँच झाले आणि याच विंडोजने सॉफ्टवेअर बाजारात मायक्रोसॉफ्टच्या भविष्याची दिशा निश्चित केली.
बिल गेटस् आणि पॉल एलन या जोडगोळीने 1975 मध्ये आल्टेर 8800 या पहिल्या मायक्रो-कॉम्प्युटरसाठी बेसिक भाषेचे एक इंटरप्रिटर तयार करून ही कंपनी स्थापन केली. मायक्रोकॉम्प्युटर आणि सॉफ्टवेअर या दोन शब्दांपासून मायक्रोसॉफ्ट हे नाव तयार झाले होते, तेव्हा संगणक हे केवळ प्रयोगशाळांमध्ये वापरले जाणारे उपकरण होते; परंतु मायक्रोसॉफ्टने वैयक्तिक संगणकासाठी ऑपरेटिंग सिस्टीम तयार करून सर्वसामान्य नागरिकांच्याही आयुष्यात संगणक पोहोचवण्याचा प्रयत्न केला. 1985 मध्ये कंपनीने विंडोज1.0 नावाची ग्राफिकल यूझर इंटरफेस आधारित ऑपरेटिंग सिस्टीम लाँच केली. पुढील दशकात विंडोजच्या अनेक यशस्वी आवृत्त्यांची मालिका आली. 1995 मध्ये इंटरनेट एक्सप्लोअररच्या माध्यमातून मायक्रोसॉफ्टने वेब ब्राऊझर स्पर्धेत प्रवेश केला. गेल्या पाच दशकांत मायक्रोसॉफ्टने स्वत:ला अपग्रेड केले आणि विस्तार केला. मायक्रोसॉफ्ट हे केवळ एका सॉफ्टवेअर कंपनीचे नाव राहिले नसून ती एक ग्लोबल टेक्नॉलाजीची अधिपती आहे. मायक्रोसॉफ्टचे अस्तित्व प्रत्येक ठिकाणी आहे. मार्च 2025 पर्यंतचे आकडे पाहिले, तर मायक्रोसॉफ्ट ही जगातील सर्वाधिक भांडवल असलेली तिसर्या क्रमाकांची कंपनी असून, पहिल्या क्रमांकावर अॅपल आणि दुसर्या क्रमांकावर चिप तयार करणारी एनवीडिया कंपनी आहे.
आज जगभरातील अनेक उद्योग आणि सरकारे मायक्रोसॉफ्टशिवाय काम करू शकत नाहीत. ग्लोबल डेटा प्रोव्हायडर स्टॅटिस्टाच्या मते, केवळ जर्मनीत 96 टक्के सरकारी संस्था मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअर वापरतात आणि 69 टक्के संस्था त्याच्या डेटा सेंटरवर अवलंबून आहेत. अनेक कंपन्या मायक्रोसॉफ्टच्या क्लाऊड सर्व्हिस, सिक्युरिटी टूल्स आणि एआय आधारित टूल्सवर अवलंबून असताना सरकारी संस्थादेखील आपला संवेदनशील डेटा मायक्रोसॉफ्टच्या डेटा सेंटरवर संग्रही ठेवतात.
प्रशासकीय कार्यासाठीदेखील याच सॉफ्टवेअरचा वापर करतात. मायक्रोसॉफ्टच्या मते, जगभरात किमान 1.4 अब्ज पीसी आणि लॅपटॉप विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतात. एवढ्या प्रमाणावरचे अवलंबित्व पाहिल्यास आता मायक्रोसॉफ्टपासून आपण वेगळे होणे खूपच कठीण कार्य मानावे लागेल; मात्र क्रुगरसारखे तज्ज्ञ अशाप्रकारच्या स्थितीचे आकलन करताना ‘लॉक इन इफेक्ट’चा इशारा देतात. याचा अर्थ जेव्हा एखादी संस्था पूर्णपणे मायक्रोसॉफ्टच्या सिस्टीमचा स्वीकार करते, तेव्हा प्लॅटफॉर्म बदलणे खूपच कठीण आणि महागडे ठरते. अशाप्रकारची स्थिती ही मायक्रोसॉफ्टला बाजारात आणखीच महत्त्वाचे स्थान देणारी ठरते. स्पर्धकांना हे आव्हान पेलणे कठीण होऊन बसते.
सरकारसाठी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एखाद्या कंपनीकडे एवढ्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील माहितीचे नियंत्रण असावे का? धोरणकर्त्यांनी प्रामुख्याने युरोपिय संघाने म्हटल्यानुसार, कंपनीवर कडक देखरेख ठेवावी किंवा एकाच तंत्रज्ञान कंपनीवर अवलंबून राहण्यापेक्षा अनेक कंपन्यांत कामकाजाचे विभाजन करावे. या प्रयत्नातून मायक्रोसॉफ्टची अनिवार्यता कमी करता येऊ शकेल; परंतु मायक्रोसॉफ्टचा सामना करणारे पर्याय कमी आहेत. कु्रगर यांच्या मते, केवळ नियम करून भागणार नाही, तर ‘ईयू’ने आता स्वत:च युरोपिय एआय सॉफ्टवेअर चॅम्पियन तयार करण्यासाठी सज्ज राहायला हवे. आपण तंत्रज्ञानाच्या बाबतीत सक्षम आहोत. त्यामुळे भविष्यात युरोपने स्वत:चे एआय मॉडेल विकसित केले नाही, तर जागतिक तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत ते फारसा ठसा उमटवू शकणार नाहीत.
सर्वत्र दबदबा असतानाही मायक्रोसॉफ्ट अजूनही एआयच्या प्रारंभिक टप्प्यात आहे. कंपनी सध्या संशोधन, महाकाय डेटा सेंटर आणि स्वत:ची एआय चिप तयार करण्यासाठी अब्जावधीची गुंतवणूक करत आहे. या बदलाची कमान भारतीय वंशाचे सीईओ सत्या नाडेला सांभाळत आहेत. त्यांनी 2014 मध्ये कंपनीची धुरा सांभाळली आणि दोन महत्त्वाचे निर्णय घेतले. हे निर्णय मायक्रोसॉफ्टचे भविष्य बदलून टाकणारे ठरले. पहिले म्हणजे, कंपनीचा फोकस क्लाऊड कम्प्युटिंगवर शिफ्ट केला आणि दुसरे म्हणजे एआयमध्ये असणारी संधी पाहता त्यांनी एआयला भविष्यवेधी धोरणाचा केंद्रबिंदू म्हणून निश्चित केला. मायक्रोसॉफ्टचे एआयआधारित टूल्स जसे को-पायलट, ई-मेल ड्राफ्ट करणे, डेटा अॅनालाईज आणि क्रिएटिव्ह कंटेंट तयार करणे यासारख्या गोष्टी करत असताना आता कंपनीचे एआयसंदर्भातील ध्येय लोकांचे काम करण्याबरोबरच संवाद वाढविणे आणि नवोन्मेष करण्याच्या पद्धतीला आणखी बूस्ट करण्याचे आहे. अर्थात, मायक्रोसॉफ्ट हे एआयला मूल्य वाढविणार्या टूलप्रमाणे पाहते; पण टीकाकारांच्या मते, एआयचा वापर वाढविल्यास हजारो लोकांच्या नोकरीवर टांगती तलवार राहू शकते. शिवाय, डेटा प्रायव्हसी आणि खोटी माहिती पुरविणे यासारखे मुद्देही चिंता वाढविणारे आहेत. ‘जर्मन रिसर्च सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटिलिजन्स’चे सीईओ अॅन्टानिओ क्रुगर म्हणतात, आता एआय हे कंपनीच्या व्हॅल्यू क्रिएशनवर थेट परिणाम करत आहे. क्रुगर यांनी म्हटल्यानुसार, मायक्रोसॉफ्टसारखी मोठी टेक कंपनी एआय क्षेत्रात आपली जागा पक्की करण्यासाठी धडपडत आहे आणि हा बदल केवळ पारंपरिक पद्धतीने कामकाज करणार्या कार्यालयावर नाही, तर युरोपातील प्रमुख उद्योग आणि आर्थिक क्षेत्रावरही परिणाम करणारा आहे.
मायक्रोसॉफ्ट जागतिक पातळीवर आणखी व्यापकपणे विस्तार करत आहे. आगामी काळात मायक्रोसॉफ्ट स्वत:ची एआय क्षमता आणखी मजबूत करणार आहे. त्यांच्या योजनेनुसार एआय मॉडेल्स अॅप्सला जोडणे आणि दुसरीकडे क्लाऊड सेवादेखील सक्षम करण्याचे नियोजन आहे. मायक्रोसॉफ्टने फेब्रुवारीत नवी ‘मजोरना वन चिप’ लाँच केली. मायक्रोसॉफ्टच्या दाव्यानुसार
मजोरना वन चिप ही जगातील पहिली क्वांटम चिप असून, ती आगामी काळात क्वांटम कॉम्प्युटरला वर्षानुवर्षे नाही, तर अनेक दशकांपर्यंत उद्योग पातळीवरच्या समस्यांचा निपटारा करण्यात सक्षम ठेवेल.