

नीती मेहेंदळे
लेणी हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर आपल्या देशाचेच एक वैभव आहे. लेण्यांचे वैभव म्हणजे ‘लयनवैभव’. महाराष्ट्रातील भाजे येथील लेणी ही लेणी संस्कृतीची मुहूर्तमेढ आहे, असे मानले जाते. या लेण्यांच्या परिचयापासून हे नवे पाक्षिक सदर सुरू करीत आहोत.
पुणे जिल्ह्यात मळवली गावाजवळ डोंगरांचा एक मोठा समूह आहे. त्यात बरंच काही सामावलेलं आहे. तिथे लोहगड, विसापूर दुर्गद्वयी आहेत, तशी भाजे, बेडसे लेणी पण आहेत. पायातळीचं खुणेचं भाजे गाव लहानसं आणि इतिहास जपणारं आहे. गावातलं शिवमंदिर पेशवेकाळात जीर्णोद्धार झालेलं आहे. लेण्यांच्या इतकाच काळ पाहिलेलं आहे हे गाव. भाजे लेण्यांची वास्तुरचना कार्ले लेण्यांच्या वास्तुरचनेशी बर्याच अंशी मिळतेजुळती आहे. महाराष्ट्रातल्या सर्वात प्राचीन लेण्यांचा मान लाभतो तो भाजे लेण्यांना. दुर्गांवर पाण्याची टाकी खोदणं हे त्यांचं एक स्थापत्य वैशिष्ट्य. ते इथेही आढळून येतं. अरबी समुद्रापासून पूर्वेकडे दख्खनच्या पठारापर्यंत जाणार्या चौल-पैठण या एका महत्त्वाच्या प्राचीन व्यापारी मार्गावर वसलेली आहेत. बेडसे लेणीही याच डोंगरात खोदलेली आहेत. या गुंफा प्रामुख्याने इसवी सन पूर्व दुसर्या शतकात बौद्ध धर्माच्या सुरुवातीच्या हीनयान (किंवा थेरिवाद) टप्प्यात खोदल्या गेल्या, जेव्हा बुद्धांची मानवी रूपात नव्हे, तर स्तुपांच्या माध्यमातून प्रतीकात्मक पूजा केली जात असे. महाराष्ट्रात तेव्हा सातवाहन राजवट रूढ होती; पण या गुहा एकाच शासकाने कोरल्या नसून, बौद्ध भिक्षू, व्यापारी आणि सामान्य भक्तांच्या देणग्यांमधून त्या हळूहळू विकसित झाल्या, याची पुष्टी त्या स्थळावरील सुरुवातीच्या शिलालेखांवरून होते. कार्यद़ृष्ट्या या संकुलाने भिक्षूंचे निवासस्थान (विहार), प्रार्थना केंद्र (चैत्य), पावसाळ्यातील चातुर्मास काळात भिक्षूंना आश्रय देणारे ठिकाण आणि स्तुपाच्या पूजनासाठीचे पवित्र स्थळ म्हणून कार्य केलं आहे.
बेडसेच्या पर्वताचं नाव मारकुट होतं असा प्राचीन दस्तावेजांवरून तर्क करता येतो. तसं भाज्याचं मूळ नाव काही ज्ञात नाही. या लेणीसमूहात सुमारे 26 लेणी आहेत. येथील सर्वात प्रमुख आणि भव्य निर्मिती समजलं जाणारं बारा क्रमांकाचे लेणं, ‘चैत्य’ लेणी प्रकारातील सर्वात प्राचीन चैत्यगृहांपैकी एक मानलं जातं. हे चैत्यगृह लेणीसमूहात शिरता समोरच आहे. लाकडी वास्तुकलेपासून लेण्यांच्या शैलीचा विकास कसा झाला, याचं एक उत्तम उदाहरण म्हणता येईल असं हे लेणं असून त्याचं छत गजपृष्ठाकृती आहे. चैत्यात, मुख्य सभागृह आणि बाजूच्या दालनांमधून आतल्या बाजूला किंचित निमुळते होत जाणारे 27 अष्टकोनी स्तंभ आहेत. भिंती मौर्य शैलीत चकचकीत केलेल्या आहेत. स्तंभावर सांबरशिंग व हार, कणीस, सौरचिन्ह, कमळ अशी प्रतीकं कोरली आहेत. अर्धवर्तुळाकार घुमट, अर्धगोलाकार छत आणि खडकात कोरलेली दुहेरी हर्मिका असलेला स्तूप आतल्या भागात आहे, ज्याचा मूळ स्तंभ आता अस्तित्वात नाही. या लेण्यांमधील कोरीव कामावरून, तत्कालीन लोकांना लाकडी वास्तुकलेचे सखोल ज्ञान होतं, याचे संकेत मिळतात. या वैशिष्ट्यामुळेच भाजे लेणी विशेषत्वाने ओळखली जातात. या चैत्याचं मुखदर्शन पूर्णतः लाकडात होतं. काळाच्या ओघात त्याचा काही भाग तुटला आहे. कमानीदार दरवाजाच्या वर एक मोठी घोड्याच्या नालेच्या आकाराची खिडकी, चैत्य-खिडकी बसवलेली होती. तिचीही पडझड झाली आहे; पण आतल्या छताला असलेल्या लाकडी तुळया मात्र शिल्लक आहेत. त्याचं कारण म्हणजे आतल्या बाजूला चैत्यात अजिबात पावसाचं पाणी गळत नाही. त्यातल्या एका तुळईवर धमभागस पसादो म्हणजे ‘धर्मभाग याने दिलेला प्रासाद’ असा अर्थ असावा. दुसर्या एका तुळईवर ‘श्री धारसेन’ अशी अक्षरं ब्राम्ही लिपीत कोरलेली आढळतात. येथील लेण्यांमध्ये मध्यवर्ती दालन आणि दोन्ही बाजूंना मार्गिका असून, मागील बाजूस एक भरीव स्तूप आहे. ही मार्गिका स्तुपाभोवती वर्तुळाकार फिरत असल्याने त्यावरून प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग आपोआप उपलब्ध होतो. 200 माणसांना बसता येईल इतके भव्य हे चैत्यगृह आहे. उपासकांनी स्तुपाची पूजा करणं अपेक्षित होतं. त्यायोगे उपासकांसाठी हे बांधले आहे. सुरुवातीच्या बौद्ध धर्माचे वैशिष्ट्य म्हणजे, सुरुवातीला गुहांमध्ये बुद्धाचे प्रतीकात्मक चित्रण (स्तूप) होते.
दुसरं म्हणजे, लेण्यांचा एक रक्षक यक्ष किंवा यक्षी असते. तशी वृक्षी यक्षी इथेही आहे. या चैत्यगृहाच्या मुखदर्शनावर तिचं भग्नावस्थेतलं शिल्प दिसतं. त्याच्या वरच्या बाजूस ब्राम्ही लिपीत प्राकृतात वड (किंवा वेड..) असं नाव कोरलेलं दिसतं. संशोधकांनी या लेखाचा काळ इ.स. पू. 2 रे शतक असा सांगितला आहे. चैत्यात दगडी कामात लाकडाचा भरपूर वापर, अष्टकोनी स्तंभ, शिलालेखांची शैली आदी लक्षणांवरून हा निष्कर्ष काढला आहे. सहाव्या लेण्यात बाहेरच्या भिंतीवर ‘बाधा’ नावाच्या शेतकर्याच्या पत्नीने दान दिल्याची माहिती मिळते. बहुतेक लेण्यांमध्ये विहार आहेत. त्यांच्या बाहेरच्या बाजूस दोन्ही बाजूंना बसायला कक्षासने दिसतात. आणखी एक महत्त्वाचा शिलालेख आहे, तो म्हणजे 19 क्रमांकाच्या लेण्यातला पाण्याच्या टाक्यावर कोरलेला. ‘महारठीस कोसिकीपुतस विणहुदतस देयधम पोढी’ म्हणजे ‘महारठी राजा कौशिकीपुत्र विणहुदत याने धर्मासाठी दान दिलेलं टाकं’ असा आहे. बाराव्या लेण्याच्या म्हणजे चैत्यगृहाच्या डाव्या बाजूला पहिल्या मजल्यावर दोन विहार लेणी आहेत.
भाजे लेण्यांमध्ये उजव्या बाजूला नवीन विहार म्हणून ओळखल्या जाणार्या 22 क्रमांकाच्या लेण्यात पूजा करण्याची जागा व विहार एकत्र दिसतात. या विहारात समोर दोन खोल्या, उजवीकडे दोन खोल्या आणि डाव्या बाजूला एक लांबलचक दगडी बाक आहे. त्याला तीन कोनाडे केले आहेत. मधल्या कोनाड्यात देवता ठेवली जात असावी. भारतात फक्त भाजे लेण्यांमध्येच अशी रचना आहे असे अभ्यासक सांगतात. या विहाराच्या व्हरांड्यात अनेक शिल्पं भिंतीत कोरली आहेत. त्यात ग्रीक संकल्पनेतील पेगासीस (उडत घोडा), भारवाहक यक्ष वगैरे आहेतच; पण उजव्या भिंतीवर 2 कथनशिल्पे आहेत, ती महत्त्वाची. या शिल्पांच्या अंकनावरून बरीच मतमतांतरे आहेत. एका शिल्पात 4 घोड्यांचा रथ आहे. काहींच्या मते ग्रीक परंपरेत सूर्याचा 4 घोड्यांचा रथ असतो. त्यांनी या लेण्याला सूर्य लेणंही संबोधलं आहे. दुसरे शिल्प हत्तीवर बसलेला इंद्र आहे, असे काही अभ्यासकांचे मत आहे; पण या शक्यता कमी वाटतात. काही अभ्यासक हा ‘मांधंत जातका’तला प्रसंग आहे असं मानतात. एक राजपुरुष चार घोड्यांनी ओढल्या जाणार्या रथातून प्रवास करत आहे. त्याच्या सेवेसाठी दोन स्त्रिया आणि घोड्यांवर स्वार झालेले सेवक सोबत आहेत. हा रथ एका विकृत राक्षसाला किंवा आसुरी आकृतीला चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे सार्वभौम सम्राट मांधंत, बलाढ्य शत्रूंना नमवून, आपली न्याय्य सार्वभौमसत्ता प्रस्थापित करतो आहे, असा प्रेरित अर्थ होतो. पायाखाली तुडवण्याची संकल्पना आणि राजसत्तेचे नाट्यमय प्रदर्शन या बाबी, बोधिसत्त्वाला त्याच्या पूर्वजन्मी ‘चक्रवर्ती’ म्हणून चित्रित करणार्या जातक कथांच्या कथन-परंपरांशी सुसंगत ठरतात. दुसर्या द़ृश्यात मुळासकट उखडलेला वृक्ष हे कदाचित प्रतिस्पर्धी किंवा शत्रूंवर मिळवलेल्या विजयाचे लाक्षणिक प्रतिनिधित्व करत असावा. या शिल्पात एक अश्वमुखी मानवाचे शिल्प आहे, ते विचार करायला लावणारे आहे. बौद्ध परंपरेत पादपुसलमानव जातक आहे असेही काही अभ्यासकांचे मत पडते. त्यात एक अश्वमुखी प्रतिमा आहे. असे अनेक तर्कवितर्क या शिल्पांबद्दल सापडतात; परंतु त्याखाली तबला-डग्गासारखी वाद्ये दिसतात. ती वाजवण्याची पद्धतही आता असते तशीच आहे. हा तबला, डग्ग्याचा सर्वात प्राचीन संदर्भ निश्चितच म्हणता येईल. यामुळे तबला हे वाद्य भारतात परकीयांनी किंवा तुर्क-अरब प्रदेशातून आणले गेले, या अनेक शतकांपासून चालत आलेल्या प्रवादाचं इथे खंडन करता येतं. शिल्पांमध्ये विस्तृत शिरोभूषणे, पुष्पहार आणि दागिने आढळतात. ती मुळात चमकदार रंगांनी रंगवलेली असावीत; परंतु कालौघात प्लास्टरखाली झाकली गेली आहेत.
भाजे लेण्यांचा अजून एक उल्लेखनीय भाग म्हणजे 14 स्तुपांचा समूह असलेलं लेणं, ज्यापैकी पाच स्तूप आत आणि नऊ बाहेर आहेत. हे स्तूप भाजे येथे निधन पावलेल्या रहिवासी भिक्षूंचे अवशेष आहेत आणि त्यावर अंपिकिणका, धम्मगिरी आणि संघदिना या तीन भिक्षूंच्या नावांसह शिलालेख आहेत. स्तुपाच्या तपशिलात भिक्षूंची नावे आणि त्यांच्या संबंधित पदव्या दर्शविल्या आहेत. हे स्तूप अतिशय कलात्मकतेने कोरलेले आहेत आणि त्यापैकी दोन स्तुपांच्या वरच्या बाजूला हर्मिका आहे. भिक्षूंच्या नावांना ‘थेर’ या उपाधी दिल्याचं या शिलालेखांवरून दिसतं. या सगळ्या 24 उपलब्ध लेण्यांव्यतिरिक्त उजव्या बाजूच्या धबधब्याच्या खाली दोन अजून लेणी आहेत. तिथे एक मोठा विहार आणि एक स्तूप आहे. लेण्यांच्या परिसरात असलेली शांतता पाहता इथे लेणी का खोदली, त्याचं उत्तर सापडतं.