मराठीची ‘कान्स’वारी

कान्स फिल्म फेस्टिव्हल येत्या 13 मेपासून सुरू होतोय
cannes-film-festival-2025-begins-on-may-13
कान्स फिल्म फेस्टिव्हलPudhari File Photo
Published on
Updated on
प्रथमेश हळंदे

कान्स फिल्म फेस्टिव्हल येत्या 13 मेपासून सुरू होतोय. याच कालावधीत ‘माशे दु फिल्म’ अर्थात फिल्म मार्केट नावाचा एक महत्त्वाचा इव्हेंटही कान्समध्ये घडत असतो. यावर्षी ‘स्थळ’, ‘स्नो फ्लॉवर’ आणि ‘खालिद का शिवाजी’ या तीन मराठी सिनेमांची निवड या मार्केटसाठी झाली असून, ‘जुनं फर्निचर’ या मराठी सिनेमाचंही एक विशेष स्क्रीनिंग आयोजित केलं गेलंय.

गेल्या काही दशकांपासून ‘ऑस्कर’ आणि ‘कान्स’ या दोन सिनेक्षेत्राशी संबंधित असलेल्या सोहळ्यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालंय. झगमगाटी स्वरूपाच्या आणि व्यावसायिक धाटणीच्या सिनेमांना जागतिक स्तरावर चमकण्याची संधी सहजपणे मिळत असताना अनेक प्रायोगिक, वेगळ्या धाटणीच्या सिनेकृती त्या प्रसिद्धीपासून आणि परिणामी आर्थिक लाभापासूनही वंचित राहतात. अशा सिनेमांसाठी ‘ऑस्कर’ आणि ‘कान्स’सारखे सोहळे एकप्रकारची संजीवनीच असतात.

दरवर्षीप्रमाणे येत्या मेमध्ये कान्स सिनेमहोत्सव पार पडतोय. त्याचबरोबर जगभरातील सिनेव्यावसायिकांसाठी महत्त्वाचा मानला जाणारा ‘माशे दु फिल्म’ अर्थात फिल्म मार्केटचा सोहळाही याच दिवसांत आयोजित केला गेलाय. या सोहळ्याला ‘सिनेक्षेत्राचं हृदय असंही समजलं जातं. नुकतीच या कान्स फिल्म मार्केटसाठी ‘स्थळ’, ‘स्नो फ्लॉवर’, ‘खालिद का शिवाजी’ आणि ‘जुनं फर्निचर’ या चार मराठी सिनेमांची निवड केली गेलीय.

दबदबा कान्स फिल्म मार्केटचा!

दरवर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पाम डोर आणि ग्रान प्रीसारखे मानाचे सिनेपुरस्कार घोषित केले जातात. हे पुरस्कार मिळवणार्‍या सिनेमांनी जणू जगभरातल्या आगामी महत्त्वाच्या सिनेपुरस्कारांवर आपला हक्क सांगितलाय, असंच समजलं जातं. गेल्यावर्षीचा पाम डोर मिळवणारा ‘नोरा’ हा नुकताच ऑस्कर विजेता ठरलाय, हे याचं ताजं उदाहरण! गेली आठ दशकं हा सिनेमहोत्सव तमाम सिनेप्रेमी आणि सिनेअभ्यासकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलाय.

1959 मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलसोबत कान्स फिल्म मार्केटचीही सुरुवात करण्यात आली. सिनेक्षेत्रातील वेगवेगळ्या नामांकित व्यावसायिक, तंत्रज्ञ आणि स्टुडिओंनी एकाच छताखाली एकत्र यावं, आपली सिनेकृती तिथं सादर करावी आणि त्यातून सिनेव्यवसायाशी संबंधित असलेल्या वितरण, अर्थसहाय्य, सहनिर्मिती अशा विविध घटकांवर चर्चा व्हावी, त्यातून अर्थपूर्ण भागीदारीला बळ मिळावं हा या मार्केटचा हेतू असतो.

या मार्केटमध्ये सहभागी होणार्‍या सिनेमांना मुख्य कान्स सिनेमहोत्सवात प्रवेश मिळतोच, असं नाही; पण असं असलं, तरी या मार्केटमध्ये जाणं हेही कुठल्या बहुमानापेक्षा कमी नसतं. राज्याच्या सांस्कृतिक विभागावर असलेल्या अनेक जबाबदार्‍यांपैकी एक म्हणजे मराठी सिनेसृष्टीला जमेल तितकं प्रोत्साहन देणं. याचाच एक भाग म्हणून गेल्या काही वर्षांपासून सरकारकडून निवडक सिनेमांना कान्स फिल्म मार्केटमध्ये पाठवलं जातं.

या फिल्म मार्केटमध्ये पाठवण्यात आलेल्या चार सिनेमांपैकी ‘स्थळ’ आणि ‘जुनं फर्निचर’ या सिनेमांचं भारतात प्रदर्शन झालेलं आहे, तर ‘खालिद का शिवाजी’ आणि ‘स्नो फ्लॉवर’ या सिनेमांना मात्र अजून थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याची संधी लाभलेली नाही; पण कान्स फिल्म मार्केटमध्ये प्रवेश मिळाल्याच्या निमित्ताने लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याच्या त्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत, असंच म्हणता येईल.

‘जुनं फर्निचर’ आणि ‘स्नो फ्लॉवर’

महेश मांजरेकर लिखित-दिग्दर्शित आणि अभिनित ‘जुनं फर्निचर’ हा सिनेमा विशेष निवड म्हणून कान्स फिल्म मार्केटमध्ये पाठवण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांची होणारी परवड, घुसमट आणि अस्वस्थतेवर भाष्य करणारा सिनेमा म्हणून ‘जुनं फर्निचर’कडे पाहिलं जातं. या सिनेमात प्रमुख भूमिकेत महेश मांजरेकर असून भूषण प्रधान, समीर धर्माधिकारी, मेधा मांजरेकर, अनुषा दांडेकर, विजय निकम, गिरीश ओक इत्यादी कलाकारांनीही आपापल्या भूमिका समर्थपणे वठवल्या आहेत.

‘स्नो फ्लॉवर’ हा मराठीतले प्रथितयश दिग्दर्शक गजेंद्र अहिरेंचा नवा सिनेमा. खास गजेंद्र अहिरे स्टाईलच्या, चाकोरीबाहेरच्या कथा मांडणारं आशयसंपन्न सिनेमांचं नवं ‘शुभ्र काही’ पान ‘स्नो फ्लॉवर’च्या निमित्ताने लिहलं गेलंय. कोकणातली उबदार, लालबुंद माती आणि रशियाच्या हाडं गोठवणार्‍या, पांढर्‍या शुभ्र बर्फाचं नातं उलगडून सांगणारा हा सिनेमा नुकत्याच पार पडलेल्या पिफमध्ये लक्षवेधी ठरला होता. सिनेमातल्या अप्रतिम भूमिकेसाठी छाया कदम यांना पिफमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळालाय. त्याचबरोबर वैभव मांगले, विठ्ठल अहिरे आणि सरफराज आलम सफू या सहकलाकारांचंही काम तितकंच प्रभावी झालंय.

‘स्थळ’

सचिन पिळगावकर प्रस्तुत ‘स्थळ’ दिग्दर्शित केलाय तो जयंत सोमलकर या नवख्या दिग्दर्शकाने. हा सिनेमा घडतो विदर्भातल्या चंद्रपूर जिल्ह्यात. एखादं साधारण खेडेगाव असतं तसं डोंगरगाव नावाचं हे गाव. तिथं आपल्या दोन-तीन एकरांच्या तुकड्यात कपाशी कसणार्‍या शेतकरी कुटुंबाची ही गोष्ट. त्या कुटुंबातल्या मुलीला पाहायला येणार्‍या एकेका स्थळांसोबत हा सिनेमा पुढे सरकत राहतो. विवाह संस्था, शेती, बेरोजगारी, व्यसनाधीनता, बाजारभाव, हुंडा प्रथा अशा अनेक विषयांवर मार्मिक टिप्पणी करणारा हा सिनेमा थिएटरमध्ये अपेक्षित गर्दी खेचून आणू शकला नाही, हे दुर्दैव! वधू परीक्षेच्या नावाखाली वारंवार विचारले जाणारे तेच तेच प्रश्न, तीच तीच तयारी आणि त्याच त्याच कारणांना वैतागलेल्या कुटुंबीयांची चरफड पडद्यावर प्रभावीपणे दाखवण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरलाय.

या सिनेमाला थिएटरमध्ये कमी प्रतिसाद मिळाला असला, तरी कान्स फिल्म मार्केट या सिनेमाच्या आर्थिक भवितव्यासाठी आशादायी ठरेल, असं सिनेमाच्या आशयावरून नक्कीच म्हणता येतं.

‘खालिद का शिवाजी’

राज मोरे दिग्दर्शित ‘खालिद का शिवाजी’ या सिनेमाचं कान्स फिल्म मार्केटसाठी निवडलं जाणं हा एक सुखद धक्काच म्हणावा लागेल. सिनेमाचा आशय आणि विशेषतः सिनेमाचं नाव पाहता या सिनेमाची सध्याच्या राज्य सरकारकडून कान्ससाठी शिफारस होणं, हे स्वप्नवतच आहे. ‘छावा’नंतर महाराष्ट्रात वाढलेली धार्मिक तेढ अजूनही धुमसत असताना ‘खालिद का शिवाजी’ची कान्स मार्केटसाठी शिफारस केली जाणं यासाठी परीक्षक समिती आणि राज्य सांस्कृतिक विकास महामंडळाचे आभारच!

खालिदला त्याच्या शाळेतल्या मुलांकडून अफजलखान म्हणून चिडवलं जातं आणि हीनतेची वागणूक दिली जाते, तेव्हा तो अस्वस्थ होतो. यामागचं कारण शोधण्याचा त्याचा प्रवास शिवछत्रपतींपाशी येऊन थांबतो. त्याची आजी, आई, वडील आणि शिक्षकांच्या मदतीने खालिद शिवरायांचा शोध घेतो. कधी

खळखळून हसवणारा, तर कधी चटकन अंतर्मुख करणारा हा प्रवास प्रेरणादायी आहेच; पण सद्यस्थितीत तो मनाला अधिकच भावतो. शिवछत्रपतींचं सम्यक चित्रण

दिग्दर्शक राज मोरे यांनी पडद्यावर प्रभावीपणे उतरवलंय. अशा सिनेमाचं कान्स फिल्म मार्केटसाठी निवडलं

जाणं, हे कोणत्याही सुजाण सिनेरसिकासाठी आनंददायीच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news