Brand India IT Sector | जागतिक आयटी क्षेत्रातला ‘ब्रँड इंडिया’

Brand India IT Sector |
Brand India IT Sector | जागतिक आयटी क्षेत्रातला ‘ब्रँड इंडिया’
Published on
Updated on

महेश कोळी, संगणक अभियंता

डोनाल्ड ट्रम्प यांचे तुघलकी निर्णय, एआयचा भस्मासूर आणि कोव्हिडोत्तर काळातील बदललेली रचना यामुळे भारतातील आयटी उद्योगाच्या भवितव्याबाबत सातत्याने चिंता व्यक्त केली जात होती; परंतु ‘ब्रँड फायनान्स’च्या ताज्या अहवालानुसार जगातील अव्वल 25 आयटी कंपन्यांमध्ये अमेरिकेच्या बरोबरीने भारताच्याही 8 कंपन्यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. एकेकाळी केवळ पाश्चात्त्य तंत्रज्ञानाचे सहायक केंद्र म्हणून ओळखला जाणारा हा देश आता जागतिक तंत्रज्ञानाची दिशा ठरवणारा मुख्य केंद्रबिंदू बनला आहे.

जागतिक अर्थकारणाच्या पटावर माहिती-तंत्रज्ञान अर्थात संगणकीय सेवा क्षेत्रातील भारताची घोडदौड आता एका ऐतिहासिक टप्प्यावर येऊन ठेपली आहे. 2026 मधील ब्रँड फायनान्सच्या ताज्या अहवालाने या वस्तुस्थितीवर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे की, जगभरातील अव्वल 25 आयटी सेवा कंपन्यांमध्ये आता भारत आणि अमेरिका हे दोन देश समसमान ताकदीने उभे आहेत. एकेकाळी केवळ पाश्चात्त्य तंत्रज्ञानाचे सहायक केंद्र म्हणून ओळखला जाणारा हा देश आता जागतिक तंत्रज्ञानाची दिशा ठरवणारा मुख्य केंद्रबिंदू बनला आहे. या यादीत दोन्ही देशांच्या प्रत्येकी 8 कंपन्यांचा समावेश असणे, हे जागतिक सत्ता संतुलनात झालेल्या आमूलाग्र बदलाचे द्योतक आहे.

विसाव्या शतकाच्या अखेरीस जेव्हा भारतीय आयटी क्षेत्राचा उदय झाला, तेव्हा कोणालाही वाटले नव्हते की, हा देश एके दिवशी अमेरिकेसारख्या महासत्तेला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात बरोबरीचे आव्हान देईल; पण भारतीय कंपन्यांनी जागतिक बाजारपेठेत प्रवेश तर केलाच, शिवाय तिथल्या प्रस्थापित नियमांना बदलून आपली स्वतःची नवी ओळख निर्माण केली आहे. सुरुवातीच्या काळात भारतीय कंपन्यांसमोर सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे जागतिक स्तरावरील अविश्वासाचे. पाश्चात्य देशांमधील मोठ्या कंपन्यांना भारताकडे पाहण्याचा द़ृष्टिकोन हा केवळ स्वस्त मनुष्यबळ पुरवणारा देश असा होता. तांत्रिकद़ृष्ट्या प्रगत आणि गुंतागुंतीची कामे भारतीय अभियंते करू शकतील का, याबद्दल जगभरात साशंकता होती. अमेरिकेच्या आयबीएम आणि एक्सेंचर यांसारख्या बलाढ्य संस्थांचा तेव्हा जागतिक बाजारपेठेवर पूर्ण पगडा होता. अशा स्थितीत भारतीय कंपन्यांना स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी केवळ कमी दरात काम करून चालणार नव्हते, तर त्यांना जागतिक दर्जाची गुणवत्ताही सिद्ध करावी लागणार होती. ही गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी भारतीय कंपन्यांनी आपली कार्यपद्धती जागतिक मानकांनुसार तयार केली.

दुसरे मोठे आव्हान हे तंत्रज्ञानातील सततच्या बदलांचे होते. माहिती-तंत्रज्ञान हे क्षेत्र दर पाच वर्षांनी पूर्णपणे बदलते. सुरुवातीला सॉफ्टवेअरनिर्मिती आणि देखभाल यावर लक्ष केंद्रित करणार्‍या भारतीय कंपन्यांना 2000 च्या दशकात इंटरनेट क्रांतीशी जुळवून घ्यावे लागले. त्यानंतर क्लाऊड कॉम्प्युटिंग आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या लाटा आल्या. प्रत्येक वेळी जेव्हा तंत्रज्ञान बदलले, तेव्हा टीकाकारांनी भारतीय आयटी क्षेत्राचा अंत जवळ आला असल्याचे भाकित वर्तवले; मात्र भारतीय कंपन्यांनी या आव्हानाचे रूपांतर संधीत केले. त्यांनी आपल्या हजारो कर्मचार्‍यांना सातत्याने पुनर्कौशल्य प्रदान करण्याची यंत्रणा उभी केली. आज 2026 मध्ये जेव्हा जगातील दिग्गज आयटी कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या लाटेत सावरण्याचा प्रयत्न करत आहेत, तेव्हा इन्फोसिस आणि टीसीएस सारख्या कंपन्यांनी आधीच आपल्या 90 टक्क्यांहून अधिक कर्मचार्‍यांना या नव्या तंत्रज्ञानात पारंगत केले आहे. जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक राहण्यासाठी भारतीय कंपन्यांनी ‘ग्लोबल डिलिव्हरी मॉडेल’ विकसित केले. हे मॉडेल भारतीय आयटी क्षेत्राची सर्वात मोठी ताकद ठरले. यामुळे ग्राहकांना जगाच्या कोणत्याही कोपर्‍यातून 24 तास अखंड सेवा देणे शक्य झाले. या मॉडेलमुळे खर्च कमी झाला आणि कामाचा वेग वाढला. यामुळे पाश्चात्त्य कंपन्यांना भारतीय कंपन्यांशी स्पर्धा करणे कठीण झाले.

‘ब्रँड फायनान्स’च्या ताज्या यादीत टाटा समूहाच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने आपली विश्वासार्हता आणि सातत्य यांच्या बळावर जगातील दुसर्‍या क्रमांकाचे स्थान सलग पाचव्या वर्षी अढळ राखले आहे. सुमारे 21.2 अब्ज डॉलरचे ब्रँड मूल्य लाभलेली ही संस्था जागतिक उद्योगांचा एक अविभाज्य आणि विश्वासार्ह भागीदार बनली आहे. टीसीएसच्या या यशाचे रहस्य त्यांच्या दीर्घकालीन ग्राहक संबंधांमध्ये आणि तंत्रज्ञानातील बदलांशी जुळवून घेण्याच्या अफाट क्षमतेमध्ये दडलेले आहे. त्याचप्रमाणे इन्फोसिसने गेल्या सहा वर्षांत दाखवलेली 15 टक्के वार्षिक चक्रवाढ वृद्धी ही जागतिक स्तरावर अभूतपूर्व मानली जात आहे. 16.4 अब्ज डॉलरच्या मूल्यांसह जगातील तिसरी सर्वात मजबूत ब्रँड म्हणून इन्फोसिसने मारलेली झेप ही भारतीय बुद्धिमत्तेच्या आणि व्यवस्थापन कौशल्याच्या विजयाची मोहोर आहे. केवळ दिग्गज कंपन्याच नव्हे, तर मध्यम आकाराच्या भारतीय कंपन्यांनीही या जागतिक महाकुंभात आपली जागा निर्माण केली आहे. एचसीएल टेक आणि विप्रो यांसारख्या कंपन्यांनी पहिल्या 10 मध्ये स्थान मिळवून भारताची पकड अधिक घट्ट केली आहे. टेक महिंद्रा, एलटीआय माइंडट्री, पर्सिस्टंट सिस्टम्स आणि हेक्सावेअर यांसारख्या संस्थांनी ज्या प्रकारे पहिल्या 25 मध्ये प्रवेश मिळवला आहे. यावरून भारताची ही प्रगती केवळ काही मोजक्या कंपन्यांपुरती मर्यादित नसून ती एक व्यापक औद्योगिक क्रांती आहे, ही बाब स्पष्ट होते. विशेषतः पर्सिस्टंट सिस्टम्सने तंत्रज्ञान क्षेत्रातील नवनवीन प्रयोगांच्या जोरावर साधलेली प्रगती ही भविष्यकाळातील बदलांची नांदी मानली जात आहे.

आजच्या घडीला जागतिक स्तरावर माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र हे केवळ संगणकीय प्रणालींच्या निर्मितीपुरते मर्यादित राहिलेले नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वयंचलित कार्यप्रणाली आणि डिजिटल परिवर्तन या त्रिसूत्रीवर संपूर्ण जगाचा डोलारा उभा आहे. भारतीय कंपन्यांनी या बदलांचा वेध अत्यंत चाणाक्षपणे घेतला आहे. अमेरिकेच्या एक्सेंचरने 42.2 अब्ज डॉलरच्या मूल्यांसह अव्वल स्थान टिकवून धरले असले, तरी भारतीय कंपन्यांनी त्यांना दिलेली स्पर्धा ही विशेष उल्लेखनीय आहे. एक्सेंचरची ताकद त्यांच्या सल्लागार क्षेत्रातील प्रभावात आहे, तर भारतीय कंपन्यांची ताकद त्यांच्या अंमलबजावणीतील अचूकता आणि नावीन्यपूर्ण प्रयोगांमध्ये आहे.

भारतीय कंपन्यांनी पाश्चात्त्य देशांमधील कंपन्यांना विकत घेऊन तिथल्या स्थानिक बाजारपेठेत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. लंडन असो वा न्यूयॉर्क, भारतीय आयटी कंपन्यांच्या कार्यालयांनी तिथल्या स्थानिक समुदायांमध्ये आपली विश्वासार्हता निर्माण केली आहे. जागतिक स्तरावर होणार्‍या मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन आणि विविध सामाजिक प्रकल्पांमधील सहभाग यामुळे भारतीय आयटी ब्रँडस् आता परदेशातील घराघरात पोहोचले आहेत. या ब्रँड व्हिजिबिलिटीमुळेच टीसीएस आणि इन्फोसिससारख्या कंपन्यांना उच्च दर्जाच्या जागतिक सल्लागार क्षेत्रातही प्रवेश करणे सोपे झाले आहे.

या संपूर्ण प्रक्रियेत भारतीय कंपन्यांनी आपली ओळख केवळ स्वस्त सेवा देणारे केंद्र अशी न ठेवता एक उच्च दर्जाचे आणि जागतिक दर्जाचे समाधान देणारे केंद्र अशी निर्माण केली आहे. युरोप आणि अमेरिकेच्या बाजारपेठांमध्ये भारतीय ब्रँडची वाढलेली पत ही भारतीय कार्यसंस्कृती आणि गुणवत्तेला मिळालेली जागतिक मान्यता आहे. जागतिक मंदीचे सावट आणि भूराजकीय अस्थिरता असतानाही भारतीय आयटी क्षेत्राची ही कामगिरी देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी आहे. आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात भारतीय कंपन्यांचा हा दबदबा असाच कायम राहील आणि भारत या क्षेत्रातील जागतिक महासत्ता म्हणून अधिक प्रबळ होईल, यात शंका नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news