

योगेश मिश्र, ज्येष्ठ पत्रकार, विश्लेषक, स्तंभलेखक
बिहारचा विजय हा भाजपचा राष्ट्रीय करिष्मा आणि मोदी यांची अबाधित लोकप्रियता, अचूक नियोजन, नितीशबाबूंवरचा मतदारांचा विश्वास, भाजपचे इलेक्शन मॅनेजमेंट आणि मुख्य म्हणजे जातीपातींच्या राजकारणाला बाजूला सारत विकासाच्या मुद्द्याला बिहारी मतदारांनी दिलेले महत्त्व यांचा आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालेले घवघवीत यश अभूतपूर्व आणि ऐतिहासिक आहे. बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांमधून बिहारी मतदारांचा कल स्पष्ट झाल्यामुळे हा निकाल काहीसा अपेक्षितच होता; परंतु तो रालोआसाठी अगदी महाराष्ट्रासारखा ‘लँडस्लाईड व्हिक्ट्री’ ठरेल आणि विरोधकांची इतकी वाताहात होईल, अशा शक्यता दिसत नव्हत्या. विशेषतः ‘मॅक्स इंडिया’चा एक्झिट पोल आल्यानंतर विरोधकांच्या इंडिया आघाडीचे मनोबल उंचावले होते; परंतु बिहारी मतदारांनी विशेषतः महिला मतदारांनी आपल्या मतांचे भरभरून दान सत्ताधारी पक्षांच्या पदरात घातल्याचे निकालांनी स्पष्ट केले आहे. 243 जागांपैकी 200 हून अधिक जागा मिळाल्यामुळे एनडीएने मागील काही उच्चांकासमीप झेप घेतली आहे.
बिहारमध्ये 1952 मध्ये म्हणजेच स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने 330/330 पैकी 239 जागा जिंकल्या होत्या. स्वतंत्र भारताच्या पहिल्या शासनाचा उत्साह, काँग्रेसची राजकीय भूमिका आणि संघटनात्मक ताकद या सर्व गोष्टींचा मोठा वाटा होता. 1962 च्या निवडणुकीत काँग्रेसने 318 पैकी 185 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर 1977 मध्ये जनता पक्षाने 324 पैकी 214 जागा मिळवून प्रचंड विजय नोंदवला होता. हा विजय राष्ट्रीय व राज्यस्तरीय आणीबाणीच्या विरोधातील प्रतिक्रियांचा होता. 1985 मध्ये पुन्हा काँग्रेसने 324 पैकी 196 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले होते; परंतु मंडलीकरणाचे राजकारण सुरू झाले आणि बिहारमधील काँग्रेसचा जनाधार घटण्यास सुरुवात झाली. मध्यंतरीच्या काळात लालूराज आले; परंतु 2010 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एनडीएने (मुख्यत्वे जेडीयू आणि भाजप एकत्रित) 243 पैकी 206 जागांपर्यंत मजल मारत बिहारमध्ये भक्कम बहुमत मिळवले होते. आज 15 वर्षांनंतर पुन्हा एकदा तितकेच दमदार यश मिळवल्यामुळे हा विजय ऐतिहासिक म्हणावा लागेल. त्याचे दुसरे कारण म्हणजे नितीशबाबूंचा सत्ताकाळ. तब्बल 9 वेळा मुख्यमंत्रिपदी राहूनही एखाद्या नेत्याच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा इतका मोठा विजय मिळणे, ही भारतीय राजकारणातील दुर्मीळ बाब ठरते.
दशकभरापूर्वीपर्यंत भारतीय राजकारणामध्ये ‘अँटिइन्कम्बसी’ हा फॅक्टर प्राधान्याने दिसून येत होता; परंतु 2019 पासून ‘प्रो-इन्कम्बसी’ फॅक्टरची चर्चा देशात होऊ लागली. स्वतः पंतप्रधान मोदींनी याचा उल्लेख आपल्या अनेक सभांमध्ये केला आहे. स्वतः मोदी गुजरातमध्ये सलग 2001 ते 2012 असे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत. तो मान्य केला तरीही सलग 20 वर्षे मुख्यमंत्रिपदावर राहूनही नितीशकुमारांचा बिहारच्या राजकारणातील करिष्मा आजही कायम आहे, हे या निकालांनी दाखवून दिले असून ही बाब अनन्यसाधारण आहे. या दोन दशकांमध्ये त्यांनी विविध गठबंधने केली. अलीकडील काळात त्यांच्या वयाबद्दलही बरीच चर्चा होऊ लागली होती. यंदाच्या विधानसभा निवडणूक प्रचारात विरोधकांकडूनही त्यांच्या वयाचे, आजारपणाचे मुद्दे वारंवार उपस्थित केले गेले. नितीशकुमार यांची काही भाषणांतील विसंगती या प्रश्नांना अधिक बळकटी देणारी ठरली होती. तसेच त्यांची लोकप्रियताही घटत चालल्याची चर्चा झाली. तथापि, एक्झिट पोलमध्ये एनडीएला मोठा विजय मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आल्यानंतर जेडीयू कार्यालयाबाहेर नितीशकुमार यांच्या प्रतिमेसह ‘टायगर अभी जिंदा हैं’ अशी घोषणा असलेले पोस्टर झळकले. दलित, महादलित, मागास आणि अल्पसंख्याक या सर्व समाजघटकांचे संरक्षक म्हणून नितीशकुमार यांची प्रतिमा अधोरेखित करणार्या या पोस्टरने जनतेचे लक्ष वेधले होते. आज निकालानंतर ही घोषणा प्रत्यक्षात उतरली आहे. त्याच वेळी भाजपची राष्ट्रीय पातळीवरील लोकप्रियता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा एनडीएचा मुख्य आधार ठरली आहे.
यावेळी भाजप आणि जेडीयूमध्ये 101-101 अशी जागांची समान विभागणी झाली होती. या समीकरणात नितीशकुमार ‘ज्युनिअर पार्टनर’ झाल्यासारखे भासत होते; परंतु थकवा, वय, राजकीय कोलांटउड्या, निर्णयक्षमता असे सगळे आक्षेप बाजूला सारत नितीशकुमारांनी या विजयाने आपली प्रतिमा उजळवली आहे. एनडीएच्या या अभूतपूर्व विजयामध्ये ज्या महिला मतदारांचा मोठा वाटा आहे, त्या बिहारच्या महिलांमध्ये नितीशबाबूंची लोकप्रियता आजही कायम आहे, हा संदेश या निकालाने दिला आहे. यंदाच्या निवडणुकीत ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’ (एमएमआरवाय) हा महत्त्वाचा घटक ठरला. या रोख योजनेमुळे महिलांना अधिक संख्येने मतदान करण्यास प्रोत्साहन मिळाले. बिहारमध्ये राज्यात 35.1 दशलक्ष महिला मतदार आहेत. यावेळी पुरुष मतदारांचे मतदान 62.98 टक्के होते, तर महिला मतदारांचे मतदान 71.78 टक्के होते.
यंदाच्या निवडणुकांमध्ये लालूप्रसादांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांचे नाव महागठबंधनकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित करण्यात आले होते. ही घोषणा काँग्रेसचे राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली होती. तथापि, हे तेजस्वींचे ब्लॅकमेलिंग असल्याचे स्पष्ट झाले होते; पण काँग्रेसचा नाईलाज होता. निवडणुकांपूर्वीच्या काळात राहुल आणि तेजस्वी या द्वयीने ‘व्होट चोरी यात्रा’ काढून बिहारी मतदारांमध्ये निवडणूक आयोग व भाजपविरोधात रान उठवले होते; पण त्याचा शून्य परिणाम बिहारी मतदारांवर झाल्याचे दिसून आले. काँग्रेसला अवघी एक जागा मिळणे, हे राहुल गांधी यांच्याबाबत आजही मतदारांमध्ये विश्वासार्हता नसल्याचे स्पष्ट करणारे आहे. तेजस्वी यादवांना तर त्यांना स्वतःच्या जागेवरच संघर्ष करावा लागला. राजदंच्या पराभवाची जी अनेक कारणे आहेत, त्यातील एक कारण म्हणजे तेजस्वी यादव यांनी केलेली एक टिप्पणी. निवडणूक प्रचारादरम्यान तेजस्वी यादव यांनी एका पॉडकास्टमध्ये एआयएमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना अतिरेकी म्हटले. या टिप्पणीनंतर असदुद्दीन ओवैसी यांनी तेजस्वी यादव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मुस्लीम आणि यादव हे राजदचे मूळ मतपेढी मानले जातात. बिहारच्या लोकसंख्येच्या सुमारे 18 टक्के मुस्लीम समुदाय आहे; पण तेजस्वींच्या टिप्पण्यांमुळे हा समाज नाराज झाला आणि त्यांनी राजदला धडा शिकवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हनुमान म्हणून ओळखले जाणारे चिराग पासवान हे बिहारच्या निकालानंतर सर्वाधिक चर्चेत आलेले व्यक्तिमत्त्व ठरले आहे. कारण, त्यांच्या लोकजनशक्ती पार्टीच्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. विशेष म्हणजे, मागील निवडणुकीत एनडीएची कामगिरी निराशाजनक होती अशा काही जागांसह लोजपने विजयासाठी कठीण मानल्या जाणार्या जागांवर निवडणूक लढवली होती. असे असूनही त्यांनी 29 जागांपैकी 19 जागांवर विजय मिळवला असून त्यांचा स्ट्राईक रेट 70 टक्क्यांहून अधिक आहे. या अभूतपूर्व विजयाने एनडीएला लक्षणीयरीत्या बळकटी दिली. गेल्या वेळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये चिराग पासवान यांच्या पक्षाने बंडखोरी केली आणि एकट्याने निवडणूक लढवली होती आणि फक्त एकच जागा जिंकली होती. तथापि, त्यांच्या उमेदवारांमुळे इतर अनेक जागांवर जेडीयूला फटका बसला होता. यावेळी जेव्हा त्यांनी एनडीएसोबत युती करून निवडणूक लढवली, तेव्हा त्यांच्या मतांची टक्केवारी आणि जागा दोन्हींमध्ये घवघवीत वाढ झाली आहे. चिराग पासवान यांच्या पक्षाला पासवान आणि इतर अत्यंत मागासवर्गीय (ईबीसी) वर्गाकडून सर्वाधिक मते मिळतात. रामविलास पासवानांच्या पश्चातही चिराग यांनी पक्षाची ही मतपेढी कायम ठेवली आहे. सुगौली, गोविंदगंज, कसबा, बलरामपूर, बोचाहा आणि नाथनगर ही अशा जागा आहेत जिथे एलजेपीचे उमेदवार सातत्याने 10,000 पेक्षा जास्त मताधिक्य मिळवतात. गेल्या विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान बंडखोर म्हणून बिहारी मतदारांपुढे गेले होते; परंतु यावेळी त्यांनी स्वतःला तरुण बिहारी नेता म्हणून स्थापित केले. त्यांचा ‘बिहारी फर्स्ट’ हा नारा प्रचंड गाजला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचा फायदाही त्यांना झाला. परिणामी, बिहार निवडणुकीत ते सर्वात मोठा ‘एक्स फॅक्टर’ ठरले.
बिहारच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर अनेक विश्लेषकांनी या निवडणुकीमध्ये परिवर्तनाच्या दिशेने मतदार जातील, असे म्हणत प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाची भलामण सुरू केली होती. तथापि, बिहारी मतदारांनी पीकेंना साफ नाकारले आहे. याचे कारण, केवळ संगणकाच्या पडद्यावरील आकडेमोड, आदर्शवादी विचारसरणी यांच्या जोरावर निवडणुका लढता येत नाहीत. निवडणूक व्यवस्थापनाचे शास्त्र शिकूनही त्या जिंकता येत नाहीत. त्यासाठी केडर असावे लागतात, पक्षासाठी झटणारे कार्यकर्ते असावे लागतात. तसेच विश्वासार्ह आणि कार्यक्षमता सिद्ध केलेले अथवा करू शकणारे नेतृत्व असावे लागते. या सर्वच घटकांवर पीकेंची बाजू उणी होती. त्यामुळेच त्यांच्या स्वप्नांचा फुगा फुटला.
बिहारमधील एनडीएच्या विजयाला महाराष्ट्राचाही एक पैलू आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या निवडणुकीमध्ये बिहारमधील 61 मतदारसंघांत जाऊन प्रचार केला होता. त्यापैकी जवळपास 50 मतदारसंघांत एनडीएचे उमेदवार विजयी झाले आहेत. सारन, सीवान, पाटणा, सहरसा , समस्तीपूर, खगडिया आणि अन्य मतदारसंघांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या. 2020 मध्ये भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने त्यावेळी महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते असणार्या फडणवीसांची बिहारचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली होती. त्या निवडणुकीतही एनडीएने विजयश्री मिळवत सत्ता स्थापन केली होती. फडणवीस हे भाषाप्रभू म्हणून ओळखले जातात. त्यांची दमदार भाषणशैली मतदारांवर कशा प्रकारे प्रभाव टाकते, हे महाराष्ट्रात आपण पाहिले आहे; पण आता बिहारी मतदारांवरही त्यांचा करिष्मा दिसून येत आहे, ही बाब या निकालांनी दाखवून दिली आहे.