

रशिद किडवई, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक
बिहारमधील भाजपचा गड असणार्या बांकीपूरमध्ये जनसुराज पक्षाच्या प्रशांत किशोर यांनी मिळवलेला विजय अनेकार्थांनी महत्त्वपूर्ण आहे. इतिहासाने हाती दिलेल्या संधीचे रूपांतर ते दीर्घकालीन राजकीय चळवळीत करतात की तो केवळ एका पोटनिवडणुकीपुरता चर्चेचा विषय ठरतो, हे भविष्यात दिसून येईलच; मात्र बिहारच्या द्विध्रुवीय राजकारणाला या विजयाने छेद दिला आहे. काही वेळा एखादा मतदारसंघ संपूर्ण राजकीय बदलाचे प्रतीक ठरतो.
निवडणुकांचे महत्त्व अनेकदा त्यांच्या व्याप्तीवरून ठरवले जाते. लोकसभा निवडणुकीचा निकाल ऐतिहासिक मानला जातो, तर पोटनिवडणुकीकडे केवळ स्थानिक घटना म्हणून पाहिले जाते; मात्र राजकारण नेहमी मतदारसंख्येच्या प्रमाणात घडत नाही. काही वेळा एखादा मतदारसंघ संपूर्ण राजकीय बदलाचे प्रतीक ठरतो. बिहारमधील बांकीपूर हा असाच एक मतदारसंघ ठरू शकतो. सोमवारी झालेल्या पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांनी सुमारे १९,००० हून अधिक मतांच्या आघाडीने मिळवलेला विजय बिहार विधानसभेतील सत्तासमीकरण बदलणारा नाही. या एका जागेच्या निकालावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्ष किंवा विरोधकांच्या भवितव्याबाबत व्यापक निष्कर्ष काढणेही योग्य ठरणार नाही, तरीही या निकालाचे राजकीय संकेत अत्यंत महत्त्वाचे आहेत. मध्य प्रदेशातील दतिया पोटनिवडणुकीच्या निकालासह पाहिल्यास हिंदी पट्ट्यात भाजपला हा स्पष्ट धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे, हा धक्का केवळ पक्षालाच नव्हे, तर नरेंद्र मोदी, अमित शहा आणि नितीन नवीन यांच्या नेतृत्वालाही मानला जात आहे. दतियाचा भौगोलिक संबंध उत्तर प्रदेशशी असल्यामुळे आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही हा निकाल महत्त्वाचा संकेत देणारा आहे. भाजपला हा पराभव केवळ अंतर्गत गटबाजीवर ढकलता येणार नाही. कारण, काँग्रेसलाही तेथे अंतर्गत मतभेदांचा सामना करावा लागला होता.
बांकिपूरच्या निकालाचा परिणाम बांकीपूरच्या निकालाचा सर्वात मोठा परिणाम प्रशांत किशोर यांच्या राजकीय प्रतिमेवर झाला आहे. आतापर्यंत ते इतरांना निवडणुका जिंकून देणारे रणनीतिकार म्हणून ओळखले जात होते. प्रचाराची आखणी, घोषणांची रचना, उमेदवारांची निवड, जातीय समीकरणे आणि मतदारांच्या मानसिकतेचा अभ्यास यात त्यांचा हातखंडा होता. कोण जिंकले आणि का जिंकले, याचे विश्लेषण ते अचूकपणे करत; पण मतदार स्वतः त्यांनाच निवडून देतील, हे त्यांनी यापूर्वी सिद्ध केले नव्हते. हीच खरी रेषा आता त्यांनी ओलांडली आहे. सल्लागार आणि निवडून आलेला लोकप्रतिनिधी यांच्यातील मूलभूत फरक त्यांनी पुसून टाकला आहे. बांकीपूरने त्यांना आमदारकी देताना स्वतंत्र राजकीय वैधताही दिली आहे.
बांकीपूरचा राजकीय इतिहास : या विजयाचे महत्त्व समजून घेण्यासाठी बांकीपूरचा राजकीय इतिहास लक्षात घ्यावा लागतो. १९९५ पासून हा शहरी मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. पूर्वीच्या पटना पश्चिम मतदारसंघापासून विकसित झालेल्या या भागात भाजपने सलग विजय मिळवले आहेत. २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत नितीन नवीन यांनी ९८,२९९ मते मिळवत राष्ट्रीय जनता दलाच्या रेखा कुमारी यांचा ५१,९३६ मतांनी पराभव केला होता. त्यावेळी जनसुराजच्या वंदना कुमारी यांना केवळ ७,७१७ मते मिळाली होती. त्यापूर्वीच्या निवडणुकांतही चित्र फारसे वेगळे नव्हते. २०२० मध्ये नितीन नवीन यांनी ८३,०६८ मते मिळवत काँग्रेसचे लव्ह सिन्हा यांचा ३९,०३६ मतांनी पराभव केला होता. २०१५ मध्येही त्यांनी ८६,७५९ मते मिळवत काँग्रेसचे कुमार आशिष यांना ३९,७६७ मतांनी हरवले होते. हे विजय विरोधी मतांच्या विभागणीमुळे मिळालेले नव्हते, तर भाजप आणि शहरी मध्यमवर्गीय मतदारांमधील मजबूत नात्याचे द्योतक होते. अशा मतदारसंघात केवळ ९ महिन्यांत प्रशांत किशोर यांनी संपूर्ण राजकीय समीकरण उलटवले आहे, हे विशेष ठरते.
‘जनसुराज’ची पूर्वीची कामगिरी : कारण २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांच्या जनसुराज पक्षाने २३८ जागांवर उमेदवार उभे केले; पण एकही जागा जिंकता आली नाही. संपूर्ण राज्यात पक्षाला केवळ ३.४४ टक्के मते मिळाली. तब्बल ६८ मतदारसंघांत जनसुराजला ‘नोटा’पेक्षाही कमी मते मिळाली होती. त्या पराभवानंतर प्रशांत किशोर यांनी संपूर्ण जबाबदारी स्वतः स्वीकारली होती. ती भूमिका प्रामाणिक वाटली; पण अनेकांना त्यातून त्यांच्या राजकीय प्रवासाचा शेवटच दिसू लागला. जनसुराज हा आणखी एक आदर्शवादी, सुशिक्षित, आर्थिकदृष्ट्या सक्षम; पण प्रत्यक्ष राजकारणात अपयशी ठरलेला प्रयोग ठरेल, असे चित्र निर्माण झाले होते. बिहारचे जातीय राजकारण, पारंपरिक पक्षांची मुळे आणि केवळ चांगल्या कल्पना किंवा पदयात्रा यांवर सत्ता मिळत नाही, अशीच धारणा तयार झाली होती; मात्र बांकीपूरने एका रात्रीत हे संपूर्ण कथानक बदलून टाकले.
अर्थात, या विजयाचे विश्लेषण करताना काही बाबी लक्षात घ्याव्या लागतील. या पोटनिवडणुकीत मतदानाची टक्केवारी केवळ ३४.३ टक्के होती, तर २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत ती ४१.४५ टक्के होती. कमी मतदानाच्या निवडणुकांत संघटनशक्ती, समर्पित कार्यकर्ते आणि उमेदवाराची वैयक्तिक प्रतिमा अधिक प्रभावी ठरते. याशिवाय भाजपला यावेळी नितीन नवीन यांच्या अनुपस्थितीत निवडणूक लढवावी लागली. अनेक वर्षे त्यांनी उभे केलेले स्थानिक जाळे आणि जनसंपर्क यावेळी पक्षाला उपलब्ध नव्हता. उमेदवार बदलण्याचा निर्णयही अचानक झाला. त्यामुळे भाजपचे उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांना ना नितीन नवीन यांच्यासारखी स्थानिक ओळख होती, ना प्रशांत किशोर यांच्यासारखी राष्ट्रीय प्रसिद्धी. यामुळे बांकीपूरचा निकाल केवळ एका जागेवरील विजय म्हणून न पाहता एका रणनीतिकाराने स्वतःच्या राजकीय क्षमतेची दिलेली पहिली ठोस परीक्षा म्हणून पाहावा लागेल; मात्र याच क्षणापासून त्यांच्या पुढील राजकीय प्रवासावर अधिक कठोर मोजमापही लागू होणार आहे.
विजयाची रणनीती : प्रशांत किशोर यांच्या संपूर्ण व्यावसायिक प्रवासाची सर्वात मोठी ताकद म्हणजे निवडणुकीच्या केंद्रस्थानी असलेली मतदारांची मानसिकता अचूक ओळखण्याची त्यांची क्षमता. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांची मोहीम केवळ भाजपची राहू नये, तर ती राष्ट्रीय परिवर्तनाचे प्रतीक बनावी, यासाठी त्यांनी रणनीती आखली. २०१५ मध्ये बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला त्यांनी प्रादेशिक अस्मितेचा प्रभावी चेहरा दिला. त्यानंतर त्यांनी अमरिंदर सिंग, वाय. एस. जगनमोहन रेड्डी, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी आणि एम. के. स्टॅलिन यांच्यासारख्या परस्परविरोधी विचारसरणीच्या नेत्यांसोबतही काम केले. या सर्व मोहिमांमध्ये एक समान धागा होता. लोकांच्या मनात सर्वाधिक तीव्र असलेली चिंता कोणती आहे, हे शोधणे, त्या भावनेला प्रभावी शब्द देणे आणि तिच्याभोवती सक्षम संघटन उभे करणे. विचारसरणीपेक्षा मतदारांच्या भावनांना समजून घेण्यावर त्यांनी अधिक भर दिला; मात्र दुसर्यांसाठी रणनीती आखणे आणि स्वतः जनतेसमोर उमेदवार म्हणून उभे राहणे यात मोठा फरक असतो. बांकीपूरचा विजय म्हणूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील मोठे समर्थन आहे; पण त्याच वेळी तो त्यांच्या सर्व सबबींचाही शेवट आहे.
पुढील आव्हाने : आजपर्यंत जनसुराजच्या अपयशामागे अनेक कारणे सांगता येत होती. पक्षाकडे प्रभावी उमेदवार नव्हते, आर्थिक व संघटनात्मक मर्यादा होत्या, बिहारमधील जातीय समीकरणे अत्यंत मजबूत होती किंवा एका सामाजिक चळवळीचे राजकीय पक्षात रूपांतर करणे सोपे नव्हते, असे अनेक युक्तिवाद करता येत होते. (पान ३ वर)
पण आता स्वतः प्रशांत किशोर यांनी ज्या मतदारसंघात पक्षाला काही महिन्यांपूर्वी अत्यल्प मते मिळाली होती, त्याच ठिकाणी विजय मिळवला आहे. यामुळे पुढे जनसुराजचे इतर उमेदवार स्वाभाविकपणे प्रश्न विचारतील की, संस्थापकाला मिळालेली रणनीती, संघटनशक्ती आणि नेतृत्व आम्हालाही का मिळत नाही? जर पक्षाची ताकद केवळ प्रशांत किशोर यांच्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून राहिली, तर तो व्यापक राजकीय पर्याय बनू शकणार नाही.
बांकीपूरची सामाजिक रचना
बांकीपूरच्या निकालाचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्या मतदारसंघाची सामाजिक रचना. सुमारे 3.79 लाख मतदारांपैकी जवळपास 1/3 मतदारांचे वय 18 ते 29 वर्षांच्या दरम्यान आहे. विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक, पहिल्या नोकरीच्या शोधात असलेले तरुण, निम्न मध्यमवर्गीय कुटुंबे आणि नव्याने रोजगाराच्या शोधात असलेले व्यावसायिक अशा मोठ्या वर्गाचा या मतदारसंघात समावेश आहे. हे असे नागरिक आहेत, जे शासनाच्या केंद्राजवळ राहतात; पण शासनाच्या संधींपासून स्वतःला दूर असल्याची भावना त्यांच्यात आहे. युवकांमधील ही नाराजी अधिकृत आकडेवारीतही दिसून येते. देशातील युवकांचा बेरोजगारी दर 9.9% पर्यंत पोहोचला असून, तो एकूण बेरोजगारी दरापेक्षा तब्बल 3 पट अधिक आहे. या आकड्यांमागे प्रश्नपत्रिका फुटणे, भरती प्रक्रिया वारंवार पुढे ढकलली जाणे, सरकारी नोकर्यांमधील घट, महागडी प्रशिक्षण केंद्रे, अस्थिर खासगी रोजगार आणि स्पर्धा परीक्षांसाठी कुटुंबांनी केलेला प्रचंड आर्थिक खर्च अशी अनेक वास्तव आहेत. गेल्या काही महिन्यांत विविध युवक आंदोलनांनी या असंतोषाला स्पष्ट राजकीय स्वरूप दिले आहे. त्यामुळे रोजगार, शिक्षण आणि प्रशासनातील कार्यक्षमता हे प्रश्न आता केवळ आर्थिक न राहता राजकीय बनले आहेत. याच ठिकाणी प्रशांत किशोर यांची संधी आहे. ते जातीय ध्रुवीकरणापेक्षा सुशासन, शिक्षण, रोजगार, स्थलांतर आणि प्रशासनाच्या गुणवत्तेबद्दल बोलतात. हिंदू-मुस्लीम, यादव-कुर्मी, दलित-सवर्ण अशा पारंपरिक विभागणीत अडकण्याऐवजी विकासाच्या मुद्यांवर मतदारांना एकत्र आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. परंतु, त्यांच्यासमोर आव्हानही तेवढेच मोठे आहे. आजचा तरुण केवळ आकर्षक घोषणा ऐकून समाधानी राहत नाही. त्याला प्रत्यक्ष परिणाम अपेक्षित असतात. त्यामुळे युवकांच्या असंतोषाला राजकीय दिशा देताना त्यांचा विश्वास जिंकणे ही प्रशांत किशोर यांची खरी परीक्षा ठरणार आहे.
द्विध्रुवीय राजकारणाला तडा
अनेक वर्षांपासून राज्याचे राजकारण दोन प्रमुख गटांभोवती फिरत आले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर नाराज असलेले मतदार राष्ट्रीय जनता दलाकडे जातात, तर राष्ट्रीय जनता दलाविषयी साशंक असलेले मतदार भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीसोबत राहतात. नितीश कुमार यांनी वेळोवेळी आघाड्या बदलल्या; मात्र राजकीय संघर्षाची चौकट बदलली नाही. बांकीपूरचा निकाल या चौकटीत तिसरा पर्याय निर्माण होण्याची शक्यता दर्शवतो. विशेषतः शहरी आणि युवा मतदार आता भाजप किंवा राष्ट्रीय जनता दल यांपैकी एकाची निवड करण्यापुरते मर्यादित राहणार नाहीत, असा संदेश या निकालातून मिळतो. यामुळे भाजपइतकाच राष्ट्रीय जनता दलही अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे.
काँग्रेससमोरही नव्या राजकीय समीकरणाचा पर्याय निर्माण झाला आहे. भविष्यात बिहारमध्ये काँग्रेस आणि जनसुराज यांच्यात सहकार्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. भाजपसाठी हा इशारा अधिक गंभीर आहे. कारण बांकीपूर हा पक्षाचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जात होता. शहरी, मध्यमवर्गीय, सुशिक्षित आणि संघटनात्मकदृष्ट्या मजबूत असा हा मतदारसंघ भाजपसाठी सुरक्षित समजला जात होता. केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आजही पक्षाची मोठी ताकद आहे. मात्र, उच्चशिक्षित असूनही रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या युवकांच्या नाराजीचे उत्तर केवळ लोकप्रियतेतून देता येणार नाही.
विरोधकांचा अतिउत्साह धोक्याचा
दुसरीकडे विरोधकांसाठीही हा निकाल अतिउत्साहाचे कारण ठरू नये. प्रशांत किशोर यांनी रणनीतीकार म्हणून अनेक पक्षांसोबत काम केले आहे. त्यांच्या या वैचारिक लवचिकतेमुळे त्यांना यश मिळाले; पण तीच त्यांची राजकीय मर्यादाही ठरू शकते. बिहारमध्ये ते कोणाच्या विरोधात आहेत, हे मतदारांना स्पष्ट दिसते; परंतु राष्ट्रीय स्तरावरील अनेक प्रश्नांवर त्यांची ठाम वैचारिक भूमिका काय असेल, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. त्याच वेळी, विरोधी आघाडीला विविध प्रादेशिक पक्षांमध्ये समन्वय साधणारा आणि राजकीय संवाद घडवून आणणारा नेता म्हणून प्रशांत किशोर पुढे येऊ शकतात. मात्र, त्यासाठी त्यांना केवळ निवडणूक रणनीतीकार म्हणून नव्हे, तर सातत्यपूर्ण राजकीय नेतृत्व सिद्ध करावे लागेल. याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांनी जनसुराजला स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाच्या पलीकडे नेले पाहिजे. कोणत्याही सक्षम राजकीय पक्षासाठी दुसर्या फळीचे नेतृत्व, स्थानिक पातळीवरील विश्वासार्ह कार्यकर्ते, अंतर्गत समन्वय आणि संस्थापकाच्या अनुपस्थितीतही काम करणारी संघटनात्मक रचना आवश्यक असते. प्रत्येक उमेदवाराला स्वतः प्रशांत किशोर यांची उपस्थिती लागणार असेल, तर जनसुराज बिहारमध्ये दीर्घकालीन पर्याय ठरणार नाही. बांकीपूरने इतके मात्र निश्चित सिद्ध केले आहे की, एक यशस्वी रणनीतीकार निवडणूक जिंकू शकतो. परंतु, तो शेकडो सक्षम लोकनेते घडवू शकतो का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.