

डॉ. सुकृत खांडेकर
‘नमाज पढनी है तो तय जगह पर पढिए. संख्या जादा है, तो शिफ्ट में पढ लिजिए. हम नमाज को नहीं रोकेंगे, लेकिन सडक पर अराजकता नहीं होने देंगे. सडकें नमाज पढने या किसी तरह की भीड जुटाने के लिए नहीं हैं, अशा कठोर शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुस्लीम समाजाला ठणकावले आहे. देशातील कोणत्याही राज्याच्या प्रमुखाने अशी कडक भूमिका घेतली नव्हती. मुस्लीम व्होट बँकेचे राजकारण आपण कधी केले नाही व करणार नाही, हेच योगी यांनी रोखठोक शब्दांत बजावले आहे.
बकरी इदच्या अगोदरच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रस्त्यावर नमाज पढायला मनाई आहे, हे जाहीर करून टाकले आहे. रस्ते हे वाहतुकीसाठी आहेत. नमाज पढण्यासाठी नाहीत. रस्त्यावर कोंडी करून वाहतुकीचा खोळंबा होणार असेल, तर आम्ही आजिबात खपवून घेणार नाही. आम्ही प्रेमाने सांगतो ते ऐका. ऐकणार नसाल तर आम्हाला सरकार म्हणून वेगळा विचार करावा लागेल, असा सज्जड दमही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. मुस्लीम समाजाच्या लोकांनी मुख्यमंत्र्यांना विचारले, आता आमचे कसे होणार? आमची संख्या खूप मोठी आहे. तेव्हा योगीजी त्यांना म्हणाले, तुमच्या घरात जागा नाही, तर संख्या नियंत्रित करा. सर्वांनाच कायदे कानून नियम पाळावे लागतील.
मुस्लिमांची मोठी लोकसंख्या असलेले उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. उत्तर प्रदेशची लोकसंख्या एकवीस ते बावीस कोटी असावी. त्यात साडेचार कोटींपेक्षा जास्त मुस्लीम असावेत. त्यामुळे मुस्लिमांना टाळून तेथे राजकारण वा समाजकारण होऊ शकत नाही. मुरादाबाद, रामपूर, बिजनौर, सहारनपूर, मुजफ्फरनगर, अमरोहा या जिल्ह्यात मुस्लिमांची लोकसंख्या 40 ते 45 टक्के आहे. राज्यात बेकायदा मशिदी-मदरसे खूप आहेत. लखनौ, देवबंद, अलिगढ, बरेली, वाराणसी, मुरादाबाद, या शहरांमधे मोठी इस्लामिक धार्मिक केंद्रे आहेत. उत्तर प्रदेशात एकूण 403 विधानसभा मतदारसंघ असून 130 मतदारसंघांत मुस्लीम मतदार प्रभावी आहेत. 50 ते 60 मतदारसंघांत मुस्लीम मते निर्णायक ठरू शकतात. 2014 मध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजप सत्तेवर आल्यापासून राज्यातील मुस्लीम आमदार व खासदारांची संख्या खूप घटली आहे. हिंदू मतदार भाजपच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.
उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री झाल्यापासून गुंडाराज संपुष्टात आले आहे. अनेक माफिया आणि गँगस्टर राज्याबाहेर पळाले आहे. महिलांच्या सुरक्षिततेवर योगींनी भर दिला आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडेल व महिलांना त्रास होईल तिथे पोलीस व प्रशासनातील अधिकार्यांना जबाबदार धरले जाईल अशा त्यांच्या सूचना आहेत. त्यामुळे पोलीस व प्रशासनातील अधिकारी डोळ्यांत तेल घालून काम करताना दिसतात. गेल्या वर्षी सप्टेंबर 2025 मध्ये बरेली मध्ये ‘आय लव्ह मोहम्मद’वरून वादंग पेटला होता. बरेलीतील मुस्लीम नेता मौलाना तौकीर रजाने नमाजानंतर धरणे आंदोलन सुरू केले होते. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा दंगल उसळली. पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्यानंतर योगी सरकारने दंगलखोरांच्या विरोधात कठोर पावले उचलली. दहा-बारा वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात बिहारसारखी परिस्थिती होती. महिलांना एकटे बाहेर पडायला भिती वाटत असे. आता महिला नोकरीवर नाईट शिफ्टमधेही ड्युटी करताना दिसतात. रस्त्यावरून जाणार्या मुलींची टिंगल टवाळी करण्याची कोणी हिम्मत करू शकत नाही. यूपी आता बिमारू राज्य नाही, तर गेली सहा वर्षे राज्याचा शिलकी अर्थसंकल्प सादर होतो आहे. पूर्वी यूपीची ओळख कट्टा व बॉम्ब अशी होती. आज यूपीमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती होत आहे. पूर्वी प्रत्येक जिल्ह्यात एक माफिया असे. आता प्रत्येक जिल्ह्यात वेगळे उत्पादन होत आहे. राज्यात भांडवल गुंतवणूक व रोजगार वाढत असताना रस्त्यावर नमाज पढायाला देऊन अराजकाला आमंत्रण का द्यायचे, असा विचार मुख्यमंत्री योगींनी केला व रस्त्यावर नमाजाला बंदी घालण्याचा धाडसी निर्णय घेतला.
पश्चिम बंगालमधे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी भाजपच्या उमेदवारांकडून सर्वाधिक मागणी योगी आदित्यनाथ यांना होती. मुस्लिमांना खूश ठेवण्यासाठी पश्चिम बंगालमधे रस्त्यावर नमाज पढायला दीदी परवानगी देते आणि हिंदूच्या मिरवणुकांना बंदी घालते, असे योगी सभांमधून सांगत असत. यूपीमधे रस्त्यावर नमाजाला बंदी आहे, असे ते आवर्जून सांगत. आता यूपीमधे दंगल होत नाही आणि संचारबंदी लावण्याची वेळच येत नाही, असेही ते अभिमानाने सांगतात. पश्चिम बंगालमध्ये भाजपला सत्तेवर येण्याचा जनादेश मिळाला. पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका आहेत म्हणून त्या राज्यात रस्त्यावर नमाज पढण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ‘सडक नमाजघर नहीं, कानून सबसें बडा धर्म है’ हाच संदेश योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे.
हैदराबादमधील एक मुस्लीम उपदेशक सैयद अयुब यांनी काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील मुस्लिमांना भडकविण्याचे काम केले. रस्त्यावर नमाज बंदी करणार्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाच त्याने आव्हान दिले. त्यांच्या भाषणाचे व्हिडीओ सर्वत्र फिरत होते. मशिदीत जागा कमी पडत असेल, तर लोक रस्त्यावर नमाज पढू शकतात असे तो सांगतो. रस्त्यावर नमाज पढणार्या मुस्लिमांना हिम्मत असेल, तर योगी सरकारने रोखून दाखवावे, असेही त्याने आव्हान दिले. त्यांच्या व्हिडीओनंतर पोलीस व प्रशासन मात्र सतर्क झाले. सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बिघडविणार्या कोणत्याही गोष्टी सरकार खपवून घेणार नाही, हे योगींनी स्पष्ट केले. ईद उल फित्र व अन्य धार्मिक कारणानिमित्ताने हजारो मुस्लीम रस्त्यावर आले होते; पण त्यासाठी त्यांनी कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. त्यानंतर रस्त्यावर नमाज बंदीची पुन्हा आठवण करून देण्यात आली. मशिदींवरील अनियंत्रित लाऊडस्पीकरच्या वापरावरही लगाम घालण्याचे पोलिसांना आदेश आहेत. योगी सरकारच्या सक्त आदेशानंतर सतरा हजार प्रमुख मशिदींवरील लाऊडस्पीकरचे आवाज कमी झाले. सव्वाशे मशिदींवरील लाऊडस्पीकर हटविण्यात आले. 2023 मध्ये 61 हजार 399 मशिदींवरील लाऊडस्पीकरची तपासणी झाली. त्यानंतर ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सक्त नियम लागू करण्यात आले. विविध धार्मिक स्थळांवरून तेथील लोकांनी आपणहून लाऊडस्पीकर हटविले. नेपाळच्या सीमेलगत असलेल्या श्रावस्ती, बहराईच, सिद्धार्थनगर, महाराजगंज, पिलिभित, बलरामपूर, लखीमपूर खेरी आदी जिल्ह्यांतील अनेक बेकायदा मशिदी, मदारों, इदगाह, मदरसे हटवले गेले.
योगी आदित्यनाथ लखनौ येथे बोलताना म्हणाले, रस्त्यावर नमाज बंदी आहे म्हणून काही लोक संताप प्रकट करीत आहेत. त्यांनी हिंदू अनुशासन शिकावे. प्रयागराज येथे महाकुंभला सहासष्ट कोटी भाविक आले; पण कुठेही दंगा धोपा किंवा लूटमार झाली नाही. नमाज पढण्यासाठी मशीद किंवा इदगाह या जागा आहेत. रस्ते बंद होता कामा नयेत. नियम पाळायचे नसतील, तर त्यांनी घरीच बसावे. दोन वर्षांपूर्वीच रस्त्यावर नमाज पढायला योगी सरकारने बंदी जाहीर केली; पण सरकारला पुन्हा आव्हान देण्याची भाषा सुरू झाल्यामुळे योगींना कठोर भूमिका घ्यावी लागली.