Water conservation awareness | पाण्याच्या वापराची जाणीव

Water conservation awareness |
Water conservation awareness | पाण्याच्या वापराची जाणीव
Published on
Updated on

डॉ. मंगेश कश्यप

आज पाणीटंचाई ही केवळ ग्रामीण भागाची समस्या नाही. ती शहरांचीही वास्तवता झाली आहे. अशा वेळी जलपद चिन्ह (Water Footprint) ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची ठरते. जलपद चिन्ह म्हणजे एखाद्या व्यक्तीने, कुटुंबाने, उद्योगाने किंवा देशाने थेट आणि अप्रत्यक्षरीत्या किती पाणी वापरले याचे एकूण मोजमाप. ही संकल्पना प्रामुख्याने Arjen Hoekstra यांनी विकसित केली आणि नंतर Water Footprint Network या संस्थेमार्फत जगभर प्रसारित झाली.

जलपद चिन्ह म्हणजे काय?

आपण नळातून वापरतो ते पाणी हा फक्त थेट वापर आहे; पण आपण जे अन्न खातो, कपडे घालतो, मोबाईल वापरतो, त्या वस्तू तयार करण्यासाठीही मोठ्या प्रमाणात पाणी लागते. हा अप्रत्यक्ष (Virtual) पाणी वापर आपल्या जलपद चिन्हात समाविष्ट होतो.

उदाहरणे :

1 किलो तांदूळ पिकवण्यासाठी सुमारे 3500-4000 लिटर पाणी लागते.

1 कप कॉफीसाठी सुमारे 140 लिटर पाणी लागते.

1 कॉटन शर्ट तयार करण्यासाठी जवळपास 2500-3000 लिटर पाणी खर्च होते.

एक कप चहा तयार होण्यासाठी साधारण 30-35 लिटर पाणी लागते (चहाची शेती + साखर + दूध).

एक किलो चॉकलेट बनवण्यासाठी सुमारे 12000लिटर पाणी लागते.

अशी अनेक उदाहरणे देता येतील. म्हणजेच, आपण रोज जे खातो-पितो-परिधान करतो त्यामागे हजारो लिटर पाणी दडलेले असते.

आपण किती पाणी वाया घालवतो?

भारतात शहरी भागात दरडोई दररोज सुमारे 135 ते 150 लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यातील किमान 20-30 टक्के पाणी गळती, निष्काळजीपणा आणि अकार्यक्षम वापरामुळे वाया जाते. 1,000 लिटर पाण्याचा उत्पादन व शुद्धीकरण खर्च साधारण 10 ते 20 रुपये धरला, तर एका कुटुंबाकडून महिन्याला शेकडो रुपयांचे पाणी वाया जाऊ शकते; पण खरी हानी पैशात नाही, ती समृद्धीची आहे. कारण, 6 हजार लिटर पाण्यात एक लहान शेतकरी अर्धा एकर भाजीपाला पिकवू शकतो. म्हणजे आपण नकळत अन्नसुरक्षा, आरोग्य आणि आर्थिक उत्पन्नाची संधी गमावतो. देशपातळीवर विचार केला, तर ही रक्कम कोट्यवधी रुपयांपर्यंत जाते. हीच रक्कम शेती, आरोग्य, शिक्षण किंवा जलसंधारण प्रकल्पांमध्ये गुंतवली गेली असती, तर पाण्यामुळे निर्माण होणारी समृद्धी अधिक व्यापक झाली असती.

पाणी म्हणजे समृद्धी

पाणी केवळ संसाधन नाही, ते आर्थिक विकासाचे, आरोग्याचे आणि सामाजिक स्थैर्याचे मूळ आहे. जिथे पाणी सुरक्षित आणि मुबलक उपलब्ध आहे, तिथे शेती, उद्योग आणि पर्यटन वाढते. जिथे पाणी नाही, तिथे स्थलांतर, दारिद्य्र आणि संघर्ष वाढतो.

जलपद चिन्ह समजून घेणे म्हणजे केवळ आकडे समजणे नाही, तर आपल्या जीवनशैलीचा पुनर्विचार करणे आहे. आपण प्रत्येकाने आपले जलपद चिन्ह कमी करण्याचा संकल्प केला, तर जलसंपन्न आणि समृद्ध भारताची निर्मिती शक्य आहे.

आपण काय करू शकतो?

1. जाणीवपूर्वक वापर

नळ उघडा ठेवणे, गाडी धुण्यासाठी पाईप वापरणे टाळणे. बादलीचा वापर अधिक परिणामकारक ठरतो.

2. पावसाचे पाणी साठवण (Rainwater Harvesting)

घरगुती पातळीवर पावसाचे पाणी साठवून भूजल पुनर्भरण करणे

3. अन्न वाया जाऊ न देणे

अन्न वाया म्हणजे अप्रत्यक्ष पाणी वाया. थाळीत उरलेले अन्न म्हणजे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय.

4. स्थानिक व हंगामी पिकांना प्राधान्य

ज्या पिकांना कमी पाणी लागते त्यांचा वापर वाढवणे. स्थानिक शेतीला प्रोत्साहन देणे.

5. गळती त्वरित दुरुस्त करणे

नळाची एक थेंब-थेंब गळती वर्षाला हजारो लिटर पाणी वाया घालवते.

जलपद चिन्हाचे पर्यावरणीय व सामाजिक पैलू

जलपद चिन्हाचा विचार करताना केवळ पाण्याचे प्रमाण नव्हे, तर त्याचा पर्यावरणावर होणारा परिणामदेखील महत्त्वाचा असतो. जलपद चिन्ह तीन प्रकारचे मानले जाते, निळे (Blue Water), हिरवे (Green Water) आणि राखाडी (Grey Water). निळे पाणी म्हणजे नद्या, तलाव व भूजलातील पाणी. हिरवे पाणी म्हणजे पावसातून जमिनीत साठणारे व पिकांना मिळणारे पाणी, तर राखाडी पाणी म्हणजे प्रदूषण शुद्ध करण्यासाठी लागणारे पाणी. उद्योग, रासायनिक शेती व अतिउपसा यामुळे राखाडी जलपद चिन्ह वाढते. म्हणजेच आपण केवळ पाणी वापरत नाही, तर ते प्रदूषितही करतो. याचा परिणाम गरीब व ग्रामीण समाजावर अधिक होतो. त्यामुळे जलपद चिन्ह कमी करणे म्हणजे केवळ बचत नव्हे, तर पर्यावरण न्याय (Environmental Justice) प्रस्थापित करणे होय.

एक जबाबदार नागरिक म्हणून आपण किती पाणी वापरतो? याबरोबरच किती पाणी स्वच्छ ठेवतो, हाही प्रश्न आपल्याला विचारणे आवश्यक आहे. पाण्याची किमत ओळखणे आणि प्रत्येक थेंबाला जबाबदारीने जपणे म्हणजेच विकसित भारतासाठी योगदान देणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news