

कर्नल अभय पटवर्धन
रशिया आणि चीनसह अमेरिकेकडूनही उघड आणि गुप्त अशा दोन्ही प्रकारच्या मदतीच्या जोरावर पाकिस्तानचे सेनाध्यक्ष फिल्ड मार्शल असीम मुनीर हे भारताविरुद्ध बहुआयामी आणि बहुस्तरीय रणनीती आखत आहेत, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. त्यामुळे दक्षिण आशियातील दोन अण्वस्त्रधारी देशांमधील सामरिक तणाव वाढत चालला आहे.
रशिया आणि चीनसह अमेरिकेकडूनही उघड आणि गुप्त अशा दोन्ही प्रकारच्या मदतीच्या जोरावर पाकिस्तानचे सेनाध्यक्ष फिल्ड मार्शल असीम मुनीर हे भारताविरुद्ध सातत्याने गरळ ओकत आहेत. अलीकडेच अमेरिकेच्या भूमीवरून त्यांनी भारताला थेट अण्वस्त्र हल्ला करण्याची धमकी देण्याचे दुःसाहस केले. त्यांच्या या भेकड धमक्यांमुळे दक्षिण आशियातील दोन अण्वस्त्रधारी देशांमधील सामरिक तणाव वाढत चालला आहे. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानने कधी अमेरिकेच्या, कधी रशियाच्या आणि आता चीनच्या पाठिंब्यावर भारतविरोधात असंख्य मोहिमा चालवल्या; पण भारताने त्या प्रत्येक वेळी हाणून पाडत पाकिस्तानला धडा शिकवला. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे याचे ताजे उदाहरण. तथापि, अमेरिका-चीन-रशिया-पाकिस्तान यांच्यातील परस्पर संबंधांचा आढावा घेतल्यास असीम मुनीर कोणत्या दिशेने पुढे जात आहेत, याचा अंदाज सहज येतो.
अमेरिका आणि पाकिस्तान यांचे सामरिक व आर्थिक संबंध 1953 पासून घट्ट आहेत. त्या काळात कोरियामध्ये युद्ध थांबवण्यासाठी भारतीय शांतिसेनेने अमेरिकेला झुकते माप देण्यास नकार दिला होता. त्याच सुमारास रशियाविरुद्ध भारतीय भूमीचा वापर करण्याची परवानगी भारताने नाकारली; मात्र पाकिस्तानने ती दिली. तेव्हापासून अमेरिकेने पाकिस्तानला विशेष महत्त्व द्यायला सुरुवात केली. 1965 मध्ये जनरल अयुब खान यांना पॅटन टँक आणि एफ-4 विमान देण्यात आले. 1971 मध्ये पूर्व पाकिस्तानमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी आण्विक पाणबुड्या पाठवण्यात आल्या. 1978-80 दरम्यान अफगाणिस्तानातील मुजाहिदींना शस्त्रे पुरवण्यासाठी पाकिस्तानला मोठी मदत मिळाली. 1984 मध्ये स्वतंत्र खालिस्तान निर्माण करण्यासाठी अमृतसरवर हल्ला करण्यास पाकिस्तानला प्रोत्साहन दिले. 1998 मध्ये भारताने अणुस्फोट केल्यावर भारतावर मोठी बंधने घालण्यात आली; पण पाकिस्तानवर तशी कडक कारवाई झाली नाही. 1999 मध्ये कारगिल युद्धात एलओसी ओलांडू नये म्हणून अमेरिकेनेच भारतावर दबाव आणला. आता असीम मुनीरच्या भारतविरोधी धोरणाला अमेरिकेने उघडपणे पाठिंबा दिला आहे. नवीन अमेरिकन टॅरिफ धोरणात पाकिस्तानला सूट देत दक्षिण आशियातील इतर देशांवर जास्तीत जास्त 20 टक्के कर, तर भारतावर थेट 50 टक्के कर लावण्यात आला. भारताने या निर्णयाला अनफॉर्च्युनेट, अनरिझनेबल अँड अनजस्टिफाईड म्हणजेच दुर्दैवी, अकारण आणि असमर्थनीय असे म्हणत त्याचा आर्थिक परिणाम होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प आपल्या पहिल्या कार्यकाळात सातत्याने पाकिस्तानविरोधी विधाने करताना दिसून आले. पाकिस्तानने आम्हाला खोटेपणा आणि फसवणुकीशिवाय काही दिलेले नाही. अफगाणिस्तानातील ‘ऑपरेशन सायक्लोन’दरम्यान त्यांनी आमच्या नेत्यांची फसवणूक केली. आम्ही शोधत असलेल्या दहशतवाद्यांना ते सुरक्षित आश्रय देतात. हे आता चालणार नाही, असे ट्रम्प वारंवार म्हणायचे; मात्र आता हेच ट्रम्प चालू महिन्याच्या शेवटी असीम मुनीरसाठी पायघड्या घालणार आहेत. पाकिस्तान-अमेरिका व्यापार करारानंतर होणार्या या भेटीत पाकिस्तानला प्राधान्य शुल्क दर मिळवून देणे आणि तेथील तेलसाठ्यांचा शोध घेण्यात मदत करणे, या मुद्द्यांवर स्वाक्षर्या होण्याची शक्यता आहे. भारतासाठी हा मोठा धक्का आहे.
दुसरीकडे चीनचे उदाहरण घेतल्यास ‘भारताचा शत्रू तो माझा मित्र’ या नीतीनुसार 1963 पासून चीन आणि पाकिस्तानची जवळीक सुरू झाली. 1962 च्या भारत-चीन युद्धानंतर ‘पाकिस्तानने पीओकेमधील गिलगिट—बाल्टिस्तानमधील 6500 चौरस मैल काराकोरम ट्रॅक्ट चीनला आंदण म्हणून दिला. 1965 आणि 1971 च्या युद्धात रशियाच्या दबावामुळे चीनने भारत-पाक सीमेवर शांतता राखली. 1971 मध्ये निक्सन यांचे सल्लागार हेन्री किसिंजर यांच्या चीन भेटीसाठी पाकिस्तानने सहकार्य केले. चीनच्या बॉर्डर रोड इनिशिएटिव्ह प्रकल्पात पाकिस्तान अग्रणी होता. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्पाला मान्यता देऊन ग्वादार बंदर आणि विमानतळ चीनच्या हवाली करण्यात आले. पाकिस्तानने चीनकडून क्षेपणास्त्रे, विमाने, जहाजे, ड्रोन आणि शस्त्रास्त्रे मोठ्या प्रमाणात घेतली. चीनच्या उपकाराखाली दबले गेल्यामुळेच असीम मुनीर फिल्ड मार्शल झाल्यावर प्रथम चीनला गेले आणि त्यानंतर अमेरिकेला गेले.
1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर रशियाने मध्यस्थी करून युद्धविराम घडवून आणला आणि रशिया-पाकिस्तान यांच्यातील जवळीक वाढली; मात्र 1971 मध्ये भारत आणि रशिया यांच्यात 20 वर्षांचा मैत्री करार झाल्यानंतर या मैत्रीपर्वाचे बंध क्षीण होऊ लागले. तथापि, 2014 मध्ये झालेल्या संरक्षण सहकार्य कराराअंतर्गत रशिया-पाकिस्तान संबंध पुन्हा वाढले. दोन्ही देशांमध्ये संयुक्त लष्करी सराव सुरू झाले. यावर्षीच्या सरावात असीम मुनीर हजर राहणार असल्याची चर्चा आहे. ते पाकिस्तानी सेनाध्यक्ष झाल्यापासून रशियात पाकिस्तानी भाडोत्री सैनिक असल्याची अफवा आहे; पण अधिकृत पुष्टी नाही. युक्रेन युद्धाच्या सुरुवातीला असीम मुनीर रशियात ब्लादिमीर पुतीन यांना भेटले होते. भारताविरुद्ध जिहादी दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर रशिया-पाकिस्तानची जवळीक भारतासाठी चिंताजनक आहे.
जुलै 25 मध्ये ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या मेजवानीनंतर असीम मुनीरची प्रतिमा उंचावली. अमेरिकेने पाकिस्तानला पुन्हा शस्त्रास्त्रे व आर्थिक मदत मंजूर केली आहे. या नव्या पाठिंब्यामुळे पाकिस्तान व बांगला देशने भारताच्या ईशान्येकडे लक्ष केंद्रित करणारी योजना आखली आहे. याअंतर्गत चीन डोकलाममार्गे ‘चिकन नेक’ म्हणजेच सिलीगुडी कॉरिडॉरकडे, तर बांगला देश दक्षिणेकडून पुढे सरकण्याचा प्रयत्न करणार आहे. दुसरीकडे पाकिस्तान पश्चिमेकडून काश्मीर व पंजाबवर हल्ला करण्याची योजना आखत आहे. यादरम्यान भारतातील स्लीपर सेल्स देशात धार्मिक संघर्ष पेटवतील आणि चीनसमर्थित नक्षलवादी गोंधळ माजवतील अशी योजना आखली जात आहे. यामुळे असीम मुनीर आणि चीन एक नवीन धोकादायक आघाडी निर्माण करत आहेत.
बांगला देशात सत्ताबदलानंतर परिस्थिती बदलली आहे. शेख हसीना यांच्या काळात भारताशी सामरिक, राजकीय आणि आर्थिक संबंध चांगले होते. कट्टर इस्लामी गटांविरोधात बांगला देश भारताचा विश्वासार्ह भागीदार होता; पण ऑगस्ट 2024 मध्ये शेख हसीना हकालपट्टी झाल्यापासून तेथे कट्टरपंथीय गट वरचढ झाले. नव्या नेतृत्वाने पाकिस्तानच्या आयएसआय व इतर गुप्तचर संस्थांशी सक्रिय संबंध प्रस्थापित केले. शस्त्रास्त्र तस्करी, मदरशांची वाढ, सीमावर्ती भागात भारतविरोधी दहशतवाद्यांना प्रशिक्षण अशा क्रियांमुळे पाकिस्तान-बांगला देश कट्टर युती मजबूत झाली. असीम मुनीर या परिस्थितीचा फायदा घेऊन भारताला आश्चर्यचकित करण्याची तयारी करत आहेत. 2024- 25 मध्ये असीम मुनीर यांनी जागतिक राजकारणात पाकिस्तानची स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न केला.
2025 मध्ये अमेरिकेने सकारात्मक प्रतिसाद दिला. जून महिन्यात ट्रम्पसोबतचे जेवण, अमेरिकन सेंटकॉम प्रमुखाला दिलेला सर्वोच्च पाकिस्तानी नागरी पुरस्कार आणि ट्रम्पना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन, यामुळे अमेरिका-पाकिस्तान धोरणात्मक जवळीक वाढल्याचे दिसते. अमेरिका पाकिस्तानला दहशतवादाविरोधी लढ्यातील महत्त्वाचा भागीदार मानतो.
इराण-इस्रायल युद्धानंतर मध्यपूर्वेत शांतता राखण्यासाठी इराणमध्ये सत्तापालट किंवा आयातुल्ला खामेनेई यांची हत्या हेच दोन पर्याय असल्याचे ट्रम्प व इस्रायलचे मत आहे. असीम मुनीरच्या अमेरिकाभेटीनंतर पाकिस्तानी आयएसआय आणि इस्रायली मोसाद एकत्र आले आहेत. मोसाद आयएसआयच्या माध्यमातून इराणमध्ये शस्त्रास्त्रे पाठवत आहे. बलुचिस्तानमधून आलेला मोठा अमेरिकन शस्त्रसाठा इराणमध्ये जप्त झाला असून इराणने मोसादवर आरोप केला आहे. मे 25 च्या भारत-पाक संघर्षात ट्रम्पने मी युद्धविराम घडवून आणला हे किमान 25 ते 30 वेळा सांगितले; पण भारताने त्यांचा प्रस्ताव फेटाळल्यावर ते संतापले आणि 50 टक्के टॅरिफ शुल्क लादले. 15 ऑगस्ट 2025 रोजी भारतासोबतची व्यापारवार्ता रद्द केली. इम्रान खानला तुरुंगात ठेवण्याचे आश्वासन आणि इराणशी संवादासाठी पाकिस्तानची मदत यामुळे ट्रम्पच्या द़ृष्टीने असीम मुनीर अधिक महत्त्वाचे ठरले.
1953 पासून पाकिस्तान अमेरिकेच्या छत्राखाली आहे. आता चीनही त्याला पाठिंबा देतोय. त्यामुळे असीम मुनीर दक्षिण आशियातील महत्त्वाचा खेळाडू बनले आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताने तांत्रिक श्रेेष्ठता दाखवली; पण पाकिस्तानने त्याचा अर्थ इशारा म्हणून घेतला आणि युद्धाचा मार्ग स्वीकारला. आता बांगला देशमार्गे भारताविरोधी छद्मयुद्ध चालवून दोन आघाड्यांवर भारतीय लष्कराला विभागणे हा मुनीरचा उद्देश आहे. पाकिस्तानची पश्चिम बंगाल, आसाम आणि त्रिपुराशी सांस्कृतिक व भाषिक जवळीक आहे. स्लीपर सेल्स, जिहादी नेटवर्क आणि सायबर हल्ल्यांद्वारे अस्थिरता निर्माण करणे त्यांच्यासाठी सोपे आहे. हे लक्षात घेता येणार्या काळात भारताने अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे. त्याद़ृष्टीने भारताने काही पावले टाकण्यास सुरुवातही केली आहे. आसाम व मेघालयात सतर्कता वाढवण्यात आली आहे. आसियान व मध्यपूर्वेतील देशांशी संबंध मजबूत करून पाकिस्तानला व्यापक इस्लामी पाठिंबा मिळू नये, यासाठी पावले उचलली जात आहेत.
ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये शी जिनपिंग, नरेंद्र मोदी आणि पुतीन यांची भेट होणार आहे. ट्रम्प असीम मुनीरच्या पाठीशी उभे राहिले, तर भारत-चीन-रशिया युती होऊ शकते. युरोपियन युनियन, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आधीच अमेरिकेपासून दूर आहेत. तशातच आता भारतही अमेरिकेपासून विभक्त झाल्यास ही महासत्ता एकटी पडेल. हिंद महासागर, चीनचा सागर आणि रशिया जवळच पॅसिफिक महासागर क्षेत्र अमेरिकेसाठी स्वप्नवत होईल. जागतिक पटलावरील भूराजकीय संतुलन वेगाने बदलत आहे, हे ट्रम्प जितक्या लवकर ओळखतील तितके त्यांच्यासाठी फायद्याचे सिद्ध होईल. एकट्या पडलेल्या महासत्तेशी संधान साधून पाकिस्तान भारताविरुद्ध बहुआघाडीची रणनीती आखत आहे. यावर मात करण्यासाठी भारताने धोरणात्मक दूरद़ृष्टी, एकात्मिक गुप्तचर कारवाई आणि पूर्वेकडे पुनर्संचयित संरक्षण धोरण अवलंबणे आवश्यक आहे.