

डॉ. व्ही. एन. शिंदे
मानवाचे निसर्गाशी नाते तुटत गेले असले, तरी झाडे, पशू आणि पक्षी यांना पावसाचे संकेत कळतात. ते जे सांगतात, ते समजून घेणे गरजेचे आहे. पावसाचे ठोकताळ्याने वागणे निसर्ग संकेतानुसार अचूक असते. निसर्गातील पशू, पक्षी, सरपटणारे प्राणी आणि वनस्पती यांच्याकडून पावसाचे संकेत मिळतात. यंदाचे पावसाबाबत असणारे संकेत आनंददायी असले, तरी शेतकर्यांसाठी काळजीचे आहेत.
भारतीय हवामान विभागाकडून यंदा देशात सरासरीच्या 92 टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. स्कायमेट ही खासगी संस्थाही भारतातील पावसाचा अंदाज व्यक्त करते. स्कायमेटचा प्राथमिक अंदाज सांगतो की, 2026 मध्ये सरासरीच्या 94 टक्के म्हणजेच 89 ते 99 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतातील पाऊस हा अल निनोच्या प्रभावाखाली असतो. यावर्षी अल निनो भारतातील पर्जन्यमानास अनुकूल नाही, असे देश-विदेशातील अनेक संस्थांचे मत आहे. हा अंदाज जून ते सप्टेंबर या चार महिन्यांकरिता सांगण्यात येतो. यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे भारतातील मान्सूनवर नकारात्मक परिणाम होण्याची दाट शक्यता असल्याचे जगभरातील संस्थांचा अंदाज आहे.
पॅसिफिक महासागरातील तापमान वाढीमुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अल निनोमुळे पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळा सुरू झाल्यानंतरही तापमान मोठ्या प्रमाणात वाढू शकते. जून-जुलैमध्ये पाऊस असा-तसाच राहील; मात्र परतीचा पाऊस उशिराने सुरू होईल. देशातील काही भागांत दुष्काळही पडू शकतो. पावसाची वाट पाहत पेरणीला उशीर होऊ शकतो. तसेच मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात येणार्या खंडामुळे पिके धोक्यात येऊ शकतात. महाराष्ट्र आणि मध्य भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल. पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्येही पाऊस कमी पडेल. ईशान्य भारतात मात्र पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडेल असे हवामानतज्ज्ञांचे मत आहे. मात्र, याबाबत सुपर अल निनो एवढा धोकादायक असणार काय, हा खरा प्रश्न आहे. इंडियन ओशन डायपोल सकारात्मक असेल, तर अल निनोचा प्रभा कमी होतो; मात्र सध्या तरी हा घटक तटस्थ भूमिका दाखवत आहे; मात्र यासंदर्भातील निसर्ग संकेत अल निनोचा प्रभाव पाहिजे तसा असणार नाही, असे सांगत आहेत.
हवामान खाते वातावरणातील परिस्थितीचे निरीक्षण करून गणितीय मॉडेलनुसार अंदाज व्यक्त करतात. ही मॉडेल्स तर्कावर आधारित अंदाज व्यक्त करतात. मॉडेलच्या काही मर्यादा असतात. त्यामुळे अपवादाने अंदाज अचूक ठरत नाही. त्याचे उत्तम उदाहरण 2023चा पाऊस. 2023 मध्ये हवामान खात्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस पडणार होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून अंदमान निकोबार, केरळ, गोवा आणि मुंबईपर्यंत अगदी नियोजित वेळेत आलाय; मात्र अरबी समुद्रात अचानक आलेल्या बिपरजॉय वादळामुळे महाराष्ट्रात न पसरता पाऊस उत्तर भारताकडे सरकला. उत्तर भारतात महापुराची परिस्थिती उद्भवली. महाराष्ट्र मात्र अवर्षणसद़ृश परिस्थितीत अडकला. त्यावर्षी 25 जूनच्या याच बहार पुरवणीत ‘पावसाचे निसर्ग संकेत’ या लेखातून पाऊस महाराष्ट्रात उशिरा आणि अल्प प्रमाणात येणार असल्याचे प्रसिद्ध झाले होते. जागतिक तापमानवाढीच्या परिणामात पावसाचे वागणे समजून घेणे कठीण होत असताना एकूण पाऊस कसा असेल, याबद्दल निसर्गाचे संकेत अचूक असतात.
यावर्षीचे निसर्ग संकेत एप्रिलपासून मिळू लागले. यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत पाऊस उशिरा येईल, तरीही तो जून महिन्यात सुरू होईल, असे निसर्ग संकेत सूचवतात. या निसर्ग संकेतांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास झालेला नाही. त्यामुळे कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही; मात्र पावसाच्या ठोकताळ्याने वागणे निसर्ग संकेतानुसार अचूक असते. निसर्गातील पशू, पक्षी, सरपटणारे प्राणी आणि वनस्पती यांच्याकडून पावसाचे संकेत मिळतात. यावर्षी पावसाबाबत असणारे संकेत आनंददायी असले तरी, शेतकर्यांसाठी काळजीचे आहेत. यावर्षी बहावा झाडाचे फुलणे मार्चपासून सुरू झाले; मात्र सुरुवातीला फुलणारी झाडे मनसोक्तफुलली नव्हती. पुढे मात्र त्याचे फुलणे त्याच्या लौकिकास साजेसे होते. पिवळ्याधमक पाकळ्यांमध्ये हिरवा कोवळा शेंगांचा दांडा घेऊन दिवसा जागोजागी लावलेले निसर्गाचे हे झुंबर अधिकच खुललेले होते. बहावाचे असे सुरुवातीला दबकत फुलणे आणि पुढे मनसोक्त फुलणे सुरुवातीचा म्हणजे जूनमध्ये पाऊस कमी असणार आणि पुढे जोरदार पडणार असल्याचे संकेत देतात. यावर्षी बहावाच्या फुलण्याइतकाच भरपूर पाऊस पडणार असल्याचे संकेत आहेत.
धामण आणि पांढरफळी ही इतर दोन झाडे आपल्या फुलण्यातून पावसाबाबत आपले संकेत देतात. धामणीची झाडे पाऊस लवकर येणार की उशिरा एवढेच सांगतात. अर्थात, ती भरपूर फुलांनी सजली तर पाऊस चांगला पडतो, असे बुजुर्ग सांगतात. धामणीच्या फुलांना आणि फळांना खाणारी तोंडे जास्त असल्याने कळ्या, फुले यांचे सूक्ष्म निरीक्षण केल्यासच पाऊस कसा असेल याचा अंदाज येतो. झाड कधी फुलते, यावरून पाऊस कधी येणार, हे सांगता येते. यावर्षी धामणही एप्रिलच्या शेवटी फुलू लागली. पाऊस जूनच्या शेवटी येणार असल्याचे सूचवते.
पांढरफळीची झाडे बहावाच्या मार्गाने जातात. पांढरफळीच्या फुलांकडे सहज लक्ष जाण्याचे कारण नसते. लहान फुलांचा रंगही पांढरट असतो. फुलांना फार सुगंधही नसतो; मात्र या फुलांवर येणारे कीटक आणि मधमाश्या इतका दंगा करतात की, सहज त्यांच्याकडे लक्ष जाते. यावर्षी पांढरफळीची झाडे एप्रिलपासून फुलू लागली. यावर्षी आलेला झाडांचा बहर हा नजर लागण्याइतका जोरात आला आहे. बहर सर्व झुडुपांना एकाचवेळी आलेला नाही. टप्प्याटप्प्याने झाडे फुलली; मात्र बहर जोरात आलेला होता आणि आहे. या झुडुपातील काहीची फळे आता पक्व झाली आहेत. म्हणजेच पाऊस भरपूर पडेल. आठ दिवसांचा पाऊस दोन दिवसांत पडेल आणि पुढे उघडीपसुद्धा मिळेल. कमी दिवसांत जास्त पाऊस असे यावर्षीचे वैशिष्ट्य असेल. या काळात पिकाची काळजी घेणे शेतकर्यांसमोरील मोठे आव्हान असणार आहे. सुरुवातीस फुललेली चिंचेची झाडे आणि नंतर फुललेली झाडे यांचे फुलोरे वेगवेगळे आहेत. त्यातूनही सुरुवातीच्या काळात कमी पाऊस दिसतो. बिबा, खैर आणि शमीच्या झाडांना कमी फुले आली आहेत. यांचे कमी फुलणे जास्त पावसाचे संकेत देतात. आंब्याला मोठ्या प्रमाणात मोहोर आला, तरी आंब्याचे प्रमाण नेहमीपेक्षा कमी आहे. पाऊस जास्त, असेच आंब्यालाही सांगायचे आहे.
पक्ष्यांमध्ये पावसाचे अचूक अंदाज सांगणारे काक महाशय वेळीच सावध झाले आहेत. त्यांनी आपले घरटे जाड फांद्यांच्या बेचक्यात बांधली आहेत. खालच्या बाजूस जाड फांद्यांच्या बेचक्यातील घरटी जास्त पावसाचे संकेत देतात. कावळा साधारण पाऊस येण्याचा काळ जवळ आला की, घरटे बांधतात. यावर्षी त्यांनी घरे बांधायला सुरुवात केली आहे. अर्थात, पावसाळा जवळ आला आहे. पावसाबद्दल सर्वाधिक अचूकता सांगणारा पक्षी म्हणजे टिटवी. यावर्षी टिटवीने आपली घरटी बांधून त्यातून पिल्लांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम पूर्ण करत आणले आहे. यावर्षी सर्वच घरट्यांत चार अंडी आढळली. चार अंडी म्हणजे भरपूर पाऊस पडणार आहे. टिटवीची अंडी मागील वर्षी शेताच्या बांधावर, तळ्याच्या बंधार्यावर होती. यावर्षी ती मध्यम उंचीवर आहेत. मात्र ती पात्रात किंवा बांधावर नाहीत. पाऊस जास्त पडणार असला, तरी सुरुवातीचा पाऊस यथातथाच असणार आहे. तळी, तलाव उशिराने भरतील. तित्तर पक्षी मोठमोठ्याने आवाज करत पाऊस जवळ आल्याचे सांगत आहेत.
तातडीचा पावसाचा अंदाज मुंग्या आणि पाकोळ्या देतात. काळ्या मुंग्यांचा समूह तोंडात अंडी घेऊन स्थलांतर करू लागले की, लवकरच मोठा पाऊस पडतो. वाळवीला पंख फुटून ती हवेत उडताना दिसल्यास लवकरच पाऊस पडतो. तसेच पाऊस जोरात येणार असल्यास सरपटणारे प्राणी सुरक्षित जागी जातात. चिमण्या धुळीत अंग घुसळताना दिसल्या की दोन-तीन दिवसांत पाऊस पडतो. हे सर्व संकेत दिसू लागले आहेत.
जागतिक तापमानवाढीचा मोठा परिणाम जलचक्रावर झाला आहे. उन्हाचा तडाखा वाढून पाण्यांच्या साठ्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे. हवेची स्वत:ची बाष्प साठवण्याची एक क्षमता असते. हवेत त्यापेक्षा जास्त वाफ येत असल्यास पाऊस पडणार, हे निश्चित आहे. त्यानुसार पर्जन्यचक्रामध्ये अनपेक्षित आणि मोठे बदल होत आहेत. कमी काळामध्ये जास्त पाऊस, काही ठिकाणी अवर्षण, तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा धोका आहेच. यावर्षी नेहमीच्यावेळी पावसाला सुरुवात होईल. तो पुढे वाढत जाईल. कमी काळात जास्त पाऊस पडून काही भागांत पूरसद़ृश परिस्थिती उद्भवेल. पिकांवर ताण येण्याइतकी उघडीप असेल. शेतकर्यांना फार सावध राहण्याची गरज असेल. मानवाचे निसर्गाशी नाते तुटत गेले असले, तरी झाडे, पशू आणि पक्षी यांना पावसाचे संकेत कळतात. ते जे सांगतात, ते समजून घेणे गरजेचे आहे. म्हणूनच निसर्ग जपायला, समजून घ्यायला हवा.