

विनिता शाह
नोकरीच्या ठिकाणी जुळणारी मने ही नवीन गोष्ट नाही; परंतु जेव्हा ही मने अधिकार, जबाबदारी आणि संस्थेच्या धोरणात्मक मर्यादा ओलांडतात तेव्हा प्रश्न केवळ वैयक्तिक आयुष्याचा राहत नाही. अलीकडेच अँडी बायरन या अमेरिकन कंपनीच्या सीईओच्या राजीनाम्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा ‘वर्कप्लेस रोमान्स’चा विषय चर्चेत आला आहे. या नाजूक विषयाचे विविध पदर जाणून घेणे गरजेचे आहे.
अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका व्हिडीओमुळे संपूर्ण कॉर्पोरेट जगतात खळबळ उडाली आहे. ‘कोल्ड प्ले’ या प्रसिद्ध म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अॅस्ट्रोनॉमर या कंपनीचे माजी सीईओ अँडी बायरन आणि त्यांच्या मानव संसाधन विभागाच्या प्रमुख (एचआर हेड) यांच्यातील अतिजवळीक आणि खासगी क्षणाचा प्रसंग समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आणि हा व्हिडीओ तब्बल 10 कोटींपेक्षा जास्त लोकांनी पाहिला. ही घटना केवळ त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावरच नव्हे, तर त्या कंपनीच्या प्रतिष्ठेवर आणि व्यापकपणे कॉर्पोरेट संस्कृतीवरही गंभीर प्रश्न उपस्थित करणारी ठरली. असे म्हणतात की, ‘दोन ‘पी’ कधी एकत्र करू नयेत’. एक म्हणजे पर्सनल लाईफ आणि दुसरा पी म्हणजे प्रोफेशनल लाईफ. तथापि, मॉडर्न, आधुनिक आणि मुक्त वातावरण असणार्या जगात खासगी आयुष्य व व्यावसायिक मर्यादा यामधील रेषा केवळ पुसट होत चालल्या नसून, त्या संस्थात्मक नियमनालाच आव्हान देऊ लागल्या आहेत.
एका सर्वेक्षणानुसार, 44 टक्के ते 85 टक्के पर्यंत बाह्यसंबंध हे कार्यालयात सुरू होतात. ही टक्केवारी निश्चितच धक्कादायक आहे. अॅशली मॅडिसन या विवाहबाह्य संबंधांसाठी प्रसिद्ध डेटिंग संकेतस्थळाचे मुख्य धोरण अधिकारी पॉल किबल म्हणतात की, ऑफिसमध्ये लोक आपला सर्वाधिक वेळ घालवतात; पण तिथेच नेमकी नात्यांची सीमारेषा धूसर होते आणि आकर्षण निर्माण होते. मानसशास्त्रज्ञदेखील याला दुजोरा देतात. ‘मिअर एक्स्पोजर इफेक्ट’ नावाच्या संकल्पनेनुसार, एखाद्या व्यक्तीला जितक्या अधिक वेळा आपण भेटतो, तितकं त्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाढत जातं. सतत संपर्कात राहणं, सहकार्य, विनोद किंवा भावनिक पाठबळ यामुळे साहजिकच एक प्रकारचं जिव्हाळ्याचं नातं तयार होतं. कार्यस्थळी अनेक तास एकत्र घालवताना लोक केवळ प्रोफेशनल राहत नाहीत. ते एकमेकांचा स्वभाव, आवडी-निवडी, वैयक्तिक अडचणी इत्यादी अनेक गोष्टी जाणून घेतात. यामध्ये कधी कधी साहचर्य निर्माण होतं, कधी सहानुभूती, तर कधी मानसिक समजूत. ही समजूत हळूहळू भावनिक गुंतवणुकीकडे नेते.
काही लोक या आकर्षणावर नियंत्रण ठेवतात, तर काही जण नकळत त्यात गुरफटत जातात. मध्यंतरी सोसायटी फॉर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, 50 टक्क्यांहून अधिक कर्मचार्यांनी त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीत कधी ना कधी ऑफिसमध्ये प्रेमसंबंध ठेवले होते. विशेष म्हणजे, संस्थांनी ऑफिसमधील संबंधांवर बंदी घातली, तर अनेक वेळा याचा उलट परिणाम होतो. मानसशास्त्रानुसार, एखादी गोष्ट बंदिस्त असेल, तर ती अधिक आकर्षक वाटू लागते. ही संकल्पना ‘फॉरबिडन फ्रूट इफेक्ट’ म्हणून ओळखली जाते. समाज, धर्म, संस्था यामुळे विवाहबाह्य संबंध निषिद्ध मानले जातात; पण अशा अडचणीच्या किंवा निषिद्ध गोष्टींकडेच काही लोक आकर्षित होतात. कार्यस्थळी निर्माण होणारे प्रेमसंबंध किंवा विवाहबाह्य संबंध हे एकवेळ संयमपूर्वक हाताळले जाऊ शकतात; पण हे संबंध गुप्त ठेवले जातात, तेव्हा ते संस्थेसाठी धोका ठरतात. 2024 मध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार, फक्त 22 टक्के कर्मचारीच त्यांच्या प्रेमसंबंधांबाबत व्यवस्थापनाला माहिती देतात. उरलेले 78 टक्के हे संबंध गुप्त ठेवतात. विशेषत: जेव्हा वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्यात संबंध असतो, तेव्हा ही गुप्तता अधिक ठळकपणे दिसून येते. कारण, अशा प्रकारच्या संबंधांकडे कामाच्या जागी संशयाने पाहिले जाते.
अन्य एका सर्वेक्षणानुसार, 1965-1980 या काळात जन्मलेल्या पिढीत 86 टक्के प्रेमसंबंध हे गुप्त ठेवले गेले. दुसरीकडे, 1997 नंतर जन्मलेल्यांमध्येदेखील हे प्रमाण चिंताजनक आहे. रेझ्युमे जीनियस या संस्थेच्या अहवालानुसार, 11 टक्के जेन-झेड कर्मचारी आपल्या कनिष्ठाशी प्रेमसंबंधात होते, तर 11 टक्के जण आपल्या वरिष्ठांशी संबंधात होते. हे आकडे कंपन्यांसाठी धोक्याचा इशारा ठरणारे आहेत. कारण, अशा संबंधामुळे कामात पक्षपातीपणा, नैतिकतेचा प्रश्न आणि टीममधील विसंवाद निर्माण होतो.‘अॅस्ट्रोनॉमर’ कंपनीच्या घटनेत एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. मानव संसाधन विभागाचा प्रमुख स्वतःच व्यावसायिक मर्यादा ओलांडत असेल, तर इतर कर्मचार्यांनी नियम पाळावे अशी अपेक्षा कितपत वाजवी आहे?
नोव्हेंबर 2019 मध्ये मॅकडोनाल्डस्च्या संचालक मंडळाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत स्टीव्ह ईस्टरब्रूक यांना मुख्य कार्यकारी अधिकारीपदावरून हटवले होते. कारण, त्यांनी कंपनीतील एका महिला कर्मचार्यासोबत व्यक्तिगत संबंध ठेवले होते. हे संबंध दोघांच्या संमतीने असले, तरीही ते कंपनीच्या आचारसंहितेचा भंग करणारे होते. ऑगस्ट 2020 मध्ये मॅकडोनाल्डस्ने ईस्टरब्रूक यांच्यावर थेट फौजदारी स्वरूपाचा दावा दाखल केला. कंपनीचा आरोप होता की, ईस्टरब्रूक यांनी आपल्या संबंधांची खरी माहिती लपवली आणि कंपनीला चुकीच्या गोष्टी सांगितल्या. या नव्या तपासणीत असे निष्पन्न झाले की, त्यांचे तीन वेगवेगळ्या कनिष्ठ महिला सहकार्यांशी लैंगिक संबंध होते आणि त्यापैकी एका महिलेला शेकडो हजारो डॉलर्सच्या स्टॉकचे वाटप त्यांनी केले होते. तसेच, त्यांनी कंपनीच्या अधिकृत ई-मेल खात्याचा वापर करून अश्लील फोटो आणि व्हिडीओ पाठवले आणि स्वीकारले, असाही गंभीर आरोपही करण्यात आला. या सर्व आरोपांमुळे मॅकडोनाल्डस्ने त्यांच्या बडतर्फीच्या कारणामध्ये बदल करून ‘टर्मिनेशन फॉर कॉज’ म्हणून नोंद करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून कंपनी त्यांच्याकडून 40 मिलियन डॉलर्सहून अधिक रकमेचा सेवांत लाभ परत घेऊ शकेल.
डिसेंबर 2021 मध्ये मॅकडोनाल्डस्ने जाहीर केले की, स्टीव्ह ईस्टरब्रूक यांनी तब्बल 105 मिलियन डॉलर्स किंमतीचे रोखे आणि स्टॉक्स कंपनीला परत केले. ही रक्कम कार्पोरेट अमेरिकेतील सर्वात मोठ्या ‘क्लॉबॅक’पैकी एक मानली गेली. 2023 मध्ये एसईसीने ईस्टरब्रूक यांच्यावर औपचारिक कारवाई केली तेव्हा या प्रकरणावर अंतिम शिक्कामोर्तब झाले. याअंतर्गत त्यांना 4 लाख डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला. जगप्रसिद्ध अब्जाधीश आणि मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा असणार्या बिल गेटस् यांनी 2000च्या सुमारास एका सहकार्यासोबत संबंध ठेवले होते. यामुळे कंपनीच्या बोर्डाने 2020 मध्ये त्यांच्याशी चौकशी सुरू केली आणि त्याआधीच त्यांनी बोर्डमधून राजीनामा दिला. संस्थेच्या संस्थापकानेही वर्तणुकीसंदर्भातील नियम पाळावेत, हा संदेश यातून मिळतो.
भारताचा विचार करता अशा प्रकारच्या संबंधांची खुलेआम चर्चा होत नसली, तरी पडद्यामागे अशा संबंधांचे प्रमाण इथेही मोठे आहे. काही वेळा ही प्रकरणे दीर्घकाळ चालतात आणि विवाहांमध्ये परावर्तीत होतात, तर काही वेळा या प्रकरणांचा शेवट हाणामारी, खून, हत्या यातून होतो किंवा काही वेळा भांडणाअंती परस्पर समझोत्याने ते खंडित होतात. विवाह न झालेल्या तरुण-तरुणींमध्ये ऑफिसमधील सहवासातून प्रेम निर्माण होऊन विवाह झाल्याची, तर शेकडो उदाहरणे आपल्याकडे आहेत. त्याबद्दल फार आक्षेप घेतले जात नाहीत; पण तेही एका मर्यादेपर्यंत. या संबंधांचा ऑफिसमधील परफॉर्मन्सवर परिणाम होऊ लागला, तर सक्त ताकीद दिली जाते किंवा कामावरून काढून टाकले जाते.
वास्तविक पाहता हा विषय जितका संवेदनशील आणि नाजूक असतो, तितकाच तो नियमांशीही निगडित आहे. त्यामुळे ऑफिसमधील प्रेमसंबंधाबाबत स्पष्टपणे ‘डिस्क्लोजर पॉलिसी’ असणे आवश्यक आहे, असे काहींचे म्हणणे आहे. यामध्ये समान स्तरावरील कर्मचारी संबंध ठेवू शकतात; पण त्यांनी व्यवस्थापनाला कळवणे बंधनकारक आहे, अशाप्रकारची अट घातली जाऊ शकते. त्याचबरोबर संबंध संपल्यानंतर कामाच्या ठिकाणी द्वेष, बदला, मानसिक त्रास इ. रोखण्यासाठी ‘नॉनरिटॅलिएशन पॉलिसी’ असायला हवी, असे काही जण सुचवतात. याचे कारण बहुतेकदा अशा प्रकरणांमध्ये महिलांचे शोषण केले जाते. कारण, पुरुषप्रधान व्यवस्थेत महिलांना अशा संबंधांचा त्रास तुलनेने अधिक होतो.
1997 मध्ये सुप्रीम कोर्टाने ‘विशाखा विरुद्ध राजस्थान सरकार’ या खटल्यात ऐतिहासिक निर्णय दिला. भंवरी देवी या सामाजिक कार्यकर्तीसोबत झालेल्या अत्याचारानंतर कोर्टाने महिलांच्या कार्यस्थळी संरक्षणासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. ही तत्त्वे ‘विशाखा गाईडलाईन्स’ म्हणून प्रसिद्ध झाली. या निर्णयानंतर 16 वर्षांनी 2013 मध्ये केंद्र सरकारने ‘कार्यस्थळी महिलांच्या लैंगिक छळवणुकीपासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, 2013’ हा कायदा पारित केला. हा कायदा 9 डिसेंबर 2013 पासून अमलात आला. या कायद्यामुळे कार्यस्थळी होणार्या लैंगिक शोषणाचा सामना करण्यासाठी महिलांना एक कवच प्राप्त झाले. कायदे-नियम या पलीकडे जाऊन नीतिमत्तेचे पालन करणे आणि व्यावसायिक जगात काम करताना आवश्यक असणारे कर्तव्यपालनाचे व जबाबदारीचे भान ठेवणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे.