Ancient Viruses Resurrected | बर्फातील ‘दैत्य’

Ancient Viruses Resurrected
Ancient Viruses Resurrected | बर्फातील ‘दैत्य’
Published on
Updated on

डॉ. संजय वर्मा, ज्येष्ठ विचारवंत, अभ्यासक

ग्लेशियरमध्ये अस्तित्वात असलेले जीवाणू आणि विषाणू हे जीवनाचे सूचक मानले जातात; मात्र याच सूक्ष्मजीवांमुळे आजार आणि महामारीचे संकट निर्माण होण्याचा धोकादेखील मोठा आहे. हवामानातील बदल किंवा मानवी हस्तक्षेपामुळे हे हिमकडे वितळले, तर त्यात कैद असलेले हे जीव अनुकूल वातावरण मिळाल्यास पुन्हा सक्रिय किंवा सजीव होऊ शकतात. अलास्कामधील हजारो वर्षांपूर्वीचा हिमनग वितळवल्यानंतर काही विषाणू पुन्हा जिवंत झाल्याचे संशोधनातून समोर आले आहे.

पृथ्वीव्यतिरिक्त विश्वात इतरत्र जीवन आहे की नाही, हे आपल्याला आजतागायत ठाऊक नाही; मात्र विविध उपग्रह, अंतराळ वेधशाळा आणि रेडिओ सिग्नल्सच्या माध्यमातून शोध घेतल्यानंतर शास्त्रज्ञांचे असे मत बनले आहे की, मंगळासारख्या ग्रहांवर सूक्ष्मजीवांच्या स्वरूपात जीवनाची शक्यता असू शकते. ज्या ग्रहांवर पाणी किंवा बर्फाचा अंश अस्तित्वात आहे, तेथे अशा सूक्ष्मजीवांचे अस्तित्व असू शकते आणि ते जीवसृष्टीला पोषक ठरू शकतात. ओलावा, उष्णता आणि वातावरणातील प्राणवायू हेच घटक जीवन निर्मितीसाठी आवश्यक असतात. हे सूक्ष्मजीव पृथ्वीबाहेर कुठेतरी असतील, तर त्यांना सक्रिय करण्याची आवश्यकता आहे; परंतु पृथ्वीवरील जीवनाला गती देणार्‍या जीवाणू व विषाणूंच्या स्वरूपातील या सूक्ष्मजीवांची आणखी एक भूमिका आहे ती म्हणजे, रोग आणि महामारींचा उगम घडविण्याची.

सूक्ष्मजीवांच्या पुनर्जीवनातील धोके

पाणी, हवा आणि जमीन या द़ृश्य माध्यमांपलीकडे पृथ्वीच्या उदरात, बर्फाच्या गुहांमध्ये आणि खडकांच्या भेगांमध्ये असंख्य सूक्ष्मजीव सुप्त अवस्थेत अस्तित्वात आहेत. त्यांना पुन्हा सक्रिय होण्याची संधी मिळाली, तर ते संपूर्ण पर्यावरणाची रचना पालटू शकतात. कोव्हिडच्या काळानंतर या भीतीने पुन्हा डोके वर काढले आहे. अलीकडे अमेरिकेतील कोलोराडो बौल्डर विद्यापीठातील संशोधकांनी अलास्कामधील सुमारे 40 हजार वर्षांपूर्वीच्या ‘पर्माफ्रॉस्ट’ (म्हणजेच बर्फ, माती आणि खडकांचे मिश्रण) नमुने वितळवले, तेव्हा त्यांनी पाहिले की, हजारो वर्षांपासून गोठलेले सूक्ष्मजीव हळूहळू पुन्हा सजीव झाले. हे द़ृश्य कोणत्याही द़ृष्टीने चांगले नाही. शास्त्रज्ञांच्या मते हे प्राचीन संक्रामक जीव प्राण्यांच्या माध्यमातून नव्या महामारीचे कारण ठरू शकतात.

पृथ्वीच्या खोल थरांमध्ये कैद असलेल्या प्राचीन बर्फामध्ये छेडछाड करू नये, असे शस्त्रज्ञ सातत्याने सांगत आले आहेत. कारण, त्याचे परिणाम अत्यंत भयंकर असू शकतात. या बर्फाचे उत्खनन करू नये, तसेच हवामान बदलाच्या परिणामांमुळे ते स्वतःहूनही वितळू नयेत, यासाठी सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे. अलास्कामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली 350 फूट खोल असलेल्या परिसरातून घेतलेल्या नमुन्यांमध्ये 1960 च्या दशकात उत्खनन झाले होते. ‘पर्माफ्रॉस्ट टनेल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या जागी प्राचीन प्राण्यांचे सांगाडे अजूनही जसेच्या तसे आहेत. येथे सापडलेल्या जीवाणूंच्या नमुन्यांना पाण्यात ठेवून तापमान 39 ते 54 फॅरेनहाईटदरम्यान राखण्यात आले. सहा महिन्यांच्या या प्रयोगानंतर आढळले की, सुरुवातीला जीवाणूंची वाढ मंद होती; पण काही सूक्ष्मजीवांनी आपल्या आजूबाजूला एक चिकट पदार्थ तयार केला, ज्याला ‘बायोफिल्म’ म्हटले जाते. ही बायोफिल्म विषाणू व जीवाणूंना संरक्षण देते आणि त्यांना पसरण्यास मदत करते. यावरून शास्त्रज्ञांनी निष्कर्ष काढला की, उष्ण व ओलसर वातावरणात हजारो वर्षे गोठलेले सूक्ष्मजीव काही महिन्यांत पुन्हा सक्रिय होऊ शकतात.

हवामान बदलामुळे पृथ्वीच्या ध्रुवांवरील बर्फ जलद गतीने वितळत आहे. अशावेळी त्या बर्फात निद्रिस्तावस्थेत असणारे असंख्य जीवाणू आणि विषाणू पुन्हा मुक्त होऊन पृथ्वीवर पसरण्याचा धोका आहे. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधकांच्या मते, बर्फात दबलेले जीवाणू शेकडो वर्षे पोषक घटक, उष्णता वा प्रकाशाविना जिवंत राहू शकतात. त्यामुळे त्यांना मृत मानणे ही चूक ठरते. इतक्या दीर्घ काळानंतरही ते सजीव होऊन कार्बनिक पदार्थांपासून पुन्हा जीवन निर्माण करण्यास समर्थ असतात. सुमारे 55 लाख चौरस मैल क्षेत्रफळ असलेला अलास्का प्रदेश 1979 नंतर पृथ्वीवरील इतर कोणत्याही भागापेक्षा तीन ते चार पट वेगाने तापला आहे. युरोपियन स्पेस एजन्सीच्या अंदाजानुसार आर्क्टिकमधील पर्माफ्रॉस्टचा दोन तृतीयांश भाग 2100 पर्यंत वितळून नष्ट होऊ शकतो. पर्माफ्रॉस्टच्या वितळण्यामुळे कार्बन डायऑक्साईड आणि मिथेनसारख्या हरितगृह वायूंचे उत्सर्जन होते आणि त्यामुळे पृथ्वी अधिक तापते. एमआयटी विद्यापीठाच्या मते जगातील पर्माफ्रॉस्टमध्ये सुमारे 1500 अब्ज टन कार्बन असून तोे सध्या वातावरणात असलेल्या कार्बनच्या प्रमाणापेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. हा बर्फ वितळल्यास मानवसृष्टीच्या अस्तित्वावरील संकट अधिकच तीव्र होईल.

पर्माफ्रॉस्टमधून उघडणार्‍या विषाणूंच्या धोक्याबाबत संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या मुख्य वैज्ञानिक आंद्रिया हिनवुड यांनी नमूद केले की, अजून या घटनांबाबत निश्चित काही सांगता येत नाही; मात्र संभाव्य धोका नाकारता येत नाही. साऊथ कॅरोलिना मेडिकल युनिव्हर्सिटीचे संशोधक डग्लस जॉन्सन यांच्या मते एखादा प्राचीन विषाणू पुन्हा सक्रिय होऊन मानवाला संक्रमित करू शकतो. काही वर्षांपूर्वी ‘झोम्बी विषाणू’ म्हणून ओळखला गेलेला एक जुना प्रकार शास्त्रज्ञांनी पुनर्जीवित केला होता. बहुतेक प्रकरणांत हे विषाणू फक्त अमिबाला संक्रमित करतात. कारण, त्यांची संरचना अत्यंत नाजूक असते, तरीही काही उदाहरणे धोक्याची जाणीव करून देतात. 2016 मध्ये सायबेरियातील पर्माफ्रॉस्ट वितळल्यामुळे शतकांपूर्वी बर्फात गोठलेला बारहसिंगा बाहेर आला. त्या बारहसिंगाच्या शवात ‘अँथ्रॅक्स’ जीवाणू होते. यामुळे स्थानिक मानव आणि प्राणी पुन्हा संक्रमित झाले. 2019 मध्ये आर्क्टिक समुद्रातील बर्फ वितळल्याने ‘फोसीन डिस्टेंपर विषाणू’ समुद्री ऊदबिलावांमध्ये पसरला. 2022 मध्ये फ्रान्समधील शास्त्रज्ञांनी सायबेरियाच्या पर्माफ्रॉस्टमधून साडेअठ्ठेचाळीस हजार वर्षांपूर्वीचा विषाणू पुनर्जीवित केला, जो अमिबाला संक्रमित करू शकत होता.

हे विषाणू मानवासाठी घातक ठरू शकतात. कारण, हजारो वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या या सूक्ष्मजीवांशी मानवी प्रतिकारशक्तीचा कोणताही संपर्क राहिलेला नाही. त्यामुळे आपल्या शरीराने त्याविरुद्ध कोणतीही इम्युनिटी विकसित केलेली नाही. शिवाय हवामान बदलाशिवाय आर्क्टिकमधील खनिज उत्खनन, जहाज वाहतूक आणि औद्योगिक हालचालींमुळेही लोक हे सूक्ष्मजीवांच्या संपर्कात येतात. यासोबतच पर्माफ्रॉस्टच्या वितळण्यामुळे शीतयुद्ध काळात साठवलेल्या रासायनिक पदार्थांची गळती, रेडिओधर्मी कचर्‍याचा प्रसार आणि जड धातूंचे प्रदूषण अशा पर्यावरणीय अडचणी निर्माण होतात. तसेच विविध प्रजातींच्या परस्पर संबंधात बदल झाल्याने ‘जुनोसिस’ म्हणजेच प्राण्यांपासून मानवाकडे पसरणार्‍या रोगांचे प्रमाण वाढू शकते. शास्त्रज्ञांनी अनेक वर्षांपासून सावध केले आहे की, पर्माफ्रॉस्टमध्ये अज्ञात जीवाणू आणि विषाणू दडलेले असून तेे मानवासाठी गंभीर परिणाम घडवू शकतात. स्वीडनमधील उमेओ विद्यापीठातील मायक्रोबायॉलॉजिस्ट बिरगिट्टा इवेनगार्ड यांनी 2016 मध्ये सांगितले होते की, या बर्फात काय दडले आहे, याचा पूर्ण अंदाज आपल्याला नाही; परंतु ते ‘मृत्यूचे पेटारे’ ठरू शकतात. काही जीवाणूंनी कठोर परिस्थितीशी जुळवून घेतल्यामुळे त्यांच्यात औषध प्रतिरोधकता विकसित झाली असू शकते. काही तर पूर्णपणे नवीन प्रजातींचे असू शकतात. म्हणून त्यांना जागवण्याचा प्रयत्न धोकादायक आहे. तथापि, यामधून काही सकारात्मक दिशाही दिसतात. या सूक्ष्मजीवांच्या अभ्यासातून प्राचीन जीवशास्त्रीय संरचनांची समज वाढते. काही जीवाणूंच्या माध्यमातून नवीन प्रतिजैविक औषधे तयार करण्यास मदत होऊ शकते.

जुने विषाणू पुन्हा सक्रिय होणे, उत्परिवर्तनाच्या प्रक्रियेतून नवीन विषाणू उदयास येणे आणि अज्ञात रोगजनकांचा अचानक प्रादुर्भाव या तिन्ही स्थिती विज्ञानजगतासमोर नव्या संकटासारख्या उभ्या आहेत. प्रश्न असा उपस्थित होत आहे की, वैद्यकशास्त्र जसजसे प्रत्येक आजाराच्या अचूक उपचाराकडे वाटचाल करत आहे, तसतशी नवीन विषाणूंची संख्या का वाढत चालली आहे? हा निसर्गाचा प्रतिहल्ला आहे का? की हवामान बदलामुळे दडलेले विषाणू आता मुक्तहोत आहेत? अमेरिकेतील ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी आणि लॉरेन्स बर्कले नॅशनल लॅबोरेटरीच्या संशोधकांनी तिबेटच्या पठारी प्रदेशातील ग्लेशियरांमध्ये 15 हजार वर्षांपूर्वीचे विषाणू आढळल्याचा दावा केला आहे. 2020 मध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात सांगितले गेले की, सुमारे 50 मीटर खोलीपर्यंत ड्रिल केल्यानंतर तेथे 33 विषाणू गट सापडले असून यापैकी 28 गट अगोदर कधीच पाहिले गेले नव्हते. शास्त्रज्ञांच्या मते जागतिक तापमानवाढीमुळे हे विषाणू पुन्हा बाहेर आले, तर ते हजारो वर्षांपूर्वीच्या महामारी पुन्हा निर्माण करू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news