मणिपूरमधलं अस्वस्थ वर्तमान

मणिपूरमधलं अस्वस्थ वर्तमान
मणिपूरमधलं अस्वस्थ वर्तमान
web
Published on
Updated on
कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

मणिपूरमधील हिंसाचाराचा वणवा थांबण्याचे नाव घेत नाहीये. रक्तपात आणि असुरक्षिततेच्या दुष्टचक्रात हे राज्य अडकले आहे. अलीकडेच तेथे कुकी बंडखोरांनी उत्तर इम्फाळमध्ये ड्रोन हल्ले केले आणि राजधानीच्या दक्षिणेकडील भागांवर रॉकेटचा वर्षाव केला. यावरून कुकी-मैतेई यांच्यातील सध्याचा संघर्ष आता केवळ जातीय राहिलेला नसून, ते राष्ट्रापुढील एक गंभीर आव्हान बनले आहे.

ईशान्येकडील एक महत्त्वाचे राज्य असणार्‍या मणिपूरमध्ये गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेला हिंसाचाराचा वणवा थांबण्याचे नाव घेत नाहीये. अलीकडेच तेथे कुकी अतिरेक्यांनी उत्तर इम्फाळमध्ये ड्रोन हल्ले केले आणि राजधानीच्या दक्षिणेकडील भागांवर रॉकेटचा वर्षाव केला. बिशनपूर, कौत्रुक, जिरीबाम, नुंगचप्पी आणि मोईरांग येथे ड्रोनचा वापर केला आहे. यामुळे राज्यात गोंधळ, भीती आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणताही व्यापक कृती आराखडा नसल्याने मणिपूरमधील सुरक्षिततेची स्थिती परत न येण्याच्या टप्प्यावर पोहोचली आहे. दहशतवादी हल्ले सुरूच आहेत, नागरिकांचा बळी जात आहे आणि प्रशासन कुचकामी आहे. रक्तपात आणि असुरक्षिततेच्या दुष्टचक्रात हे राज्य अडकले असून, यातून सुटकेची चिन्हे दिसत नाहीयेत.

भारतातील बंडखोरांकडून नागरिकांना लक्ष्य करण्यासाठी शस्त्रास्त्रयुक्त ड्रोन वापरल्याच्या पहिल्या ज्ञात घटनेत, मणिपूरमध्ये आतापर्यंत 11 लोक मारले गेले आहेत आणि 29 जखमी झाले आहेत. कुकी बंडखोरांनी पूर्व इम्फाळच्या मेखांग गावात तीन भारतीय राखीव बटालियन बंकरदेखील नष्ट केल्या आहेत. मे 2023 मध्ये सुरू झालेल्या कुकी आणि मैतेई संघर्षात ड्रोनचा वापर ही धोक्याची घंटा आहे. हे शस्त्रास्त्रयुक्त ड्रोन 500 मीटर ते 10 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर काम करण्यास सक्षम आहेत. पोलिस, सुरक्षा दले, नागरिकांवर हल्ला करण्यासाठी सशस्त्र ड्रोनचा वापर केल्याने मणिपूर बंडखोरीचा नवीन टप्पा सुरू झाला आहे. संयुक्त सुरक्षा दलाचे एक पथक अतिरेक्यांद्वारे ड्रोन बॉम्ब वापरण्याच्या परिणामाचा अभ्यास करत आहे.

माझ्या माहितीनुसार, या ड्रोनची बांधणी चीनकडून मिळालेल्या किटमधील साहित्याद्वारे स्थानिक पातळीवर केली गेली आहे. तसेच त्यात पोलिस शस्त्रागारांमधून लुटलेला दारूगोळा योग्य बदल केल्यानंतर वापरला गेला आहे. कुकी अतिरेक्यांनी ड्रोनला इम्पॅक्ट एक्सप्लोझिव्ह जोडून त्याचा वापर केला आहे. आसाम पोलिसांनी कुकी-झो आणि मैतेईंच्या पुरवठा एजंटस्कडून आणि सहकार्‍यांकडून इंटेलिजंट फ्लाईट बॅटरी आणि इतर ड्रोनचे भाग जप्त केले होते. उच्च प्रशिक्षित कुकी झोंना चिनी अतिरेक्यांनी इम्फाळ खोर्‍याच्या आजूबाजूच्या टेकड्यांमध्ये पुन्हा संघटित केले असून, त्यांचा विशेष पॅन एथनिक अजेंडा पुढे नेण्यासाठी पायथ्याशी असलेल्या असुरक्षित मैतेईबहुल गावांना काळजीपूर्वक लक्ष्य केले जात आहे. 24 जानेवारीपासून सुरक्षा दलांनी टेकड्यांवर आणि मणिपूरच्या खोर्‍यांमध्ये किमान 38 ड्रोन पाडले आहेत. त्यांचे मूळ जाणून घेण्यासाठी त्यांचे विलेषण करणे अत्यावश्यक आहे.

पंजाब, राजस्थान आणि काश्मीरमधील सीमा ओलांडून ड्रग्ज तसेच शस्त्रास्त्रे वाहून नेण्यासाठी पाकिस्तान वापरत असलेल्या ड्रोनपेक्षा कुकींनी वापरलेले ड्रोन तांत्रिकद़ृष्ट्या खूप प्रगत आणि श्रेष्ठ आहेत. त्यांची उड्डाणक्षमता आणि उंची वाढवण्याची क्षमता पाकिस्तानद्वारे वापरल्या जाणार्‍या ड्रोनपेक्षा स्पष्टपणे श्रेष्ठ आहे. बहुधा कुकी अतिरेक्यांनी वापरलेली स्फोटके इम्पॅक्ट फ्यूजसह घरी बनवलेली आहेत. या प्रकारचा फ्यूज लक्ष्यावर आदळल्यावर सक्रिय होतो आणि बॉम्बचा स्फोट होतो. कुकी अतिरेक्यांकडून डिजिटल डिटोनेटर्सचा वापर केला जाणे शक्य नाही कारण त्यांच्याकडे असे प्रगत तंत्रज्ञान असण्याची शक्यता नाही. दुसरी शक्यता म्हणजे, कुकी बंडखोरांनी टाइमरसह प्रॉक्सिमिटी फ्यूज वापरला असू शकतो; पण कुकी बंडखोरांनी लाँच केलेले ड्रोन मोठ्या उंचीवर उड्डाण करत असल्याने हेदेखील संभवत नाही. प्रॉक्सिमिटी फ्यूज सक्रिय होण्यासाठी सुमारे 30-45 सेकंद लागतात. उंच उडणार्‍या ड्रोनला जोडलेल्या आणि टार्गेटच्या वर सोडलेल्या आयईडीला लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी 45 सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागतो, त्यामुळे हवेत असताना मध्यभागीच त्यांचा स्फोट होतो.

1 सप्टेंबर 2024 पर्यंत कुकी आणि मैतेई हे दोन्ही बंडखोर केवळ परस्पर आणि सुरक्षा दलांच्या निगराणीसाठी ड्रोन वापरत होते. सुरक्षा दलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याद्वारे पाडलेल्या 38 ड्रोन्सपैकी काही ड्रोन खूपच महाग आहेत. हे विशिष्ट ड्रोन हवेत जमिनीच्या पातळीपासून 400 फुटांपेक्षा जास्त उंच उडत होते. सहसा भारत-पाक सीमेवर प्रतिबंधित वस्तू वाहून नेणारे ड्रोन 25-35 फुटांवर उडतात. रिमोट कंट्रोलवरील बटणावर क्लिक करून सामान्यतः प्रतिबंधित पेलोडस् धारण करणारा लीव्हर हलविला जातो. मैतेईंवर हल्ला करणार्‍या कुकींनी त्यांचे आयईडी टाकण्यासाठी हे साधे तंत्रज्ञान वापरलेले नाही. त्यांनी काय वापरले आहे, याचा तपास सुरू आहे. जून 2021 मध्ये जम्मू हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान पाकिस्तानी अतिरेक्यांनीदेखील फक्त एकदाच ड्रोनचा वापर केला होता. या पार्श्वभूमीवर, भारतीय सैन्यासाठी त्यांच्या बंडखोरांविरुद्धच्या युद्धात ही एक पूर्णपणे नवीन संकल्पना आहे.

मणिपूरमध्ये अतिरेक्यांनी वापरलेल्या ड्रोनची उड्डाणांची क्षमता एका तासांपेक्षा जास्त असून, ती जवळपास 10-15 किमी प्रवास करू शकतात. म्हणूनच ते महाग आहेत. पाकिस्तानमधून प्रतिबंधित वस्तू घेऊन येणार्‍या ड्रोनला 15-20 फूट उंच असलेल्या सीमेवरील कुंपणावर आणि पाकिस्तान-भारतातील गावांमधील कमाल दोन किमी अंतरावर उड्डाण करावे लागते. मणिपूरमधील सुरक्षा दलांनी म्यानमार व बांगला देशमधून चीनकडून ड्रोन खरेदीसाठी वित्तपुरवठा करण्याबाबतची अनेक संभाषणे नोंदवली आहेत. हे ड्रोन खरेदी करण्यासाठी कुकी आणि मैतेई हे दोन्ही बंडखोर क्राऊड फंडिंगची मागणी करतात व स्वीकारतात. दोन्ही जमाती फक्त चिनी ड्रोन खरेदी करतात. हा सर्व तपशील गंभीर आहे. त्यामुळेच मणिपूरमधील अराजकावर मार्ग काढण्यासाठी 57 माऊंटन डिव्हिजनचे कमांडिंग जनरल ऑफिसर, मणिपूर पोलिसांचे अतिरिक्त महासंचालक, आसाम रायफल्सचे उपमहासंचालक आणि केंद्रीय राखीव पोलिस दल आणि सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक, पोलिस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

बंडखोरांनी वापरलेल्या ड्रोनच्या प्रकाराचा गंभीरपणे अभ्यास आणि परीक्षण करणे, वापरलेल्या ड्रोनचे तपशील निश्चित करण्यासाठी पुरावे गोळा करणे, अशा ड्रोनचा प्रभावीपणे प्रतिकार करण्याचे मार्ग सुचवणे, या जबाबदार्‍या सदर समितीकडे सोपवण्यात आल्या आहेत. या टीमला नॅशनल सिक्युरिटी गार्डस् आणि आयआयटी दिल्लीचे तज्ज्ञ मदत करणार आहेत. त्यांना ड्रोनमध्ये स्फोटके टाकण्यासाठी वापरल्या जाणार्‍या प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी आणि या नवीन आव्हानाला सामोरे जाण्याचे मार्ग शोधण्यासाठी मणिपूरला पाठवण्यात आले आहे.

कुकी आणि मैतेई यांच्यातील सध्याचा संघर्ष सुरुवातीला जातीय समजला जात होता; पण तो खूप भयंकर बनला आहे. नागरिकांवर दोन किलोपेक्षा जास्त पेलोडसह स्फोटके टाकण्यासाठी ड्रोनचा वापर आणि पाच ते आठ किमी अंतरावर रॉकेट व प्रोजेक्टाईल बॉम्ब फेकण्यासाठी वापरले जाणारे शस्त्रास्त्रयुक्त ड्रोन हे जातीय संघर्ष नसून, एक प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा आव्हान आहे. अशी मोडस ऑपरेंडी सामान्यतः मध्यपूर्वेत किंवा युक्रेनमधील दहशतवादी गटांद्वारे वापरली जाते. मणिपूरमधील सुरक्षा परिस्थिती आणखी बिघडण्यापासून रोखण्यासाठी या संकटावर मात करण्यासाठी चौकटीबाहेरचे उपाय त्वरित शोधले पाहिजेत. ड्रोन गन टॅक्टिकल हे मानवरहित हवाई यंत्रणेशी लढण्यासाठी असेच एक शस्त्र आहे. अँटी ड्रोन गनचे वजन 7.3 किलो असते. ड्रोन नियंत्रित करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या 433 मेगाहर्टझ्, 915 मेगाहर्टझ्, मेगाहर्टझ् आणि 5.8 मेगाहर्टझ्च्या फ्रिक्वेन्सीमध्ये हस्तक्षेप करून 2 किमीपर्यंतच्या अंतरावर ड्रोनच्या ऑपरेशनला दडपण्याची परवानगी देता येऊ शकते.

सुरक्षा दलांनी अँटी ड्रोन यंत्रणा तैनात केल्या आहेत. कोम्बिंग ऑपरेशन्स तीव्र करण्यात आली आहेत. सोशल मीडियाचा वापर वातावरण भडकावणार्‍यांवर नजर ठेवण्यासाठी आणि ओळखण्यासाठी केला जात आहे. हिल्स आणि व्हॅली या दोन्ही ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन्स सुरू आहेत. विशेषतः ज्या भागातून लांब पल्ल्याचे रॉकेट डागले गेले आणि ड्रोन लाँच केले गेले, त्या भागांवर अधिक लक्ष केंद्रित केले गेले आहे. लष्कराच्या हेलिकॉप्टरने हवाई गस्त सुरू केली असून, अतिसंवेदनशील भागात सुरक्षा दलांना तैनात करण्यात आले आहे; पण मणिपूरला लष्करी उपायाची आवश्यकता नाहीये. सुरक्षा दलांनी कुकींनी वेढलेले डोंगरमाथे लवकरात लवकर साफ केले पाहिजेत. कुकी आणि मैतेई यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सर्व राजकीय पक्षांनी वैयक्तिक सूडभावना, पक्ष पातळीवरील हेवेदावे, वैयक्तिक अहंकार बाजूला सारत मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करावा लागेल. ‘ज्वेल ऑफ इंडिया’ची वाताहात थांबवण्यासाठी सर्व संंबंधित घटकांनी ‘नेशन फर्स्ट’चा विचार करण्याची वेळ आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news