

विवेक कुलकर्णी
क्रिकेटसारखा खेळ भारतात लाखो तरूणांना स्वप्नं देतो; पण ती साकार करणार्या खेळाडूंच्या कथा मात्र थोड्याच. यापैकीच एक आश्वासक, दुर्दम्य जिद्दी खेळाडू म्हणजे आकाशदीप! ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर पहाडासारखे पाठीमागे उभे राहणारे वडील व पाठोपाठ भाऊ गेला. कॅन्सरनं आजारी असलेल्या बहिणीची शुश्रूषा आणि तिला आधार देणं... अन् या खडतर वाटेवर संघातलं स्थान अढळ ठेवण्यासाठी जीवघेणा संघर्ष... म्हणजे संघर्षाकडून संघर्षाकडे सुरू असलेल्या प्रवासाची ही खडतर वाट...
बिहारसारख्या क्रिकेटच्या परिघाबाहेर असलेल्या राज्यातून आलेला आकाश दीप हा अवघ्या तरुणाईचा आयकॉन बनला आहे. तो भारताचा महत्त्वाकांक्षी जलद गोलंदाज म्हणून नावारूपास आला आहेच, त्याही शिवाय डिहरी ते एजबॅस्टन या प्रवासात आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवण्यात त्याने अजिबात कसर सोडलेली नाही.
बिहारच्या सासाराम जिल्ह्यातील डिहरी या छोट्याशा गावात 15 डिसेंबर 1996 रोजी आकाशचा जन्म झाला. वडील रामजी सिंह हे शाळेत शिक्षक होते. घरात शिक्षणाला मोठं स्थान होतं; मात्र आकाशच्या मनात लहानपणापासूनच खोलवर रुजलं होतं आकर्षण ते क्रिकेटचं! मुळात आजही कित्येक ठिकाणी खेळाकडे करिअर म्हणून पाहण्याची द़ृष्टी इतकी प्रगल्भ झालेली नाही.
खेलोगे, कुदोगे, बनोगे खराब॥’ अशाच द़ृष्टीने आजही खेळाकडे पाहिले जाते; पण आकाश दीपची दुर्दम्य जिद्द अशा विचारांसमोर खूपच तोकडी पडली. त्याने आपली स्वप्नांची खुणगाठ अगदी पक्की बांधून ठेवली आणि त्याच द़ृष्टीने वाटचालही केली.
2015 हे वर्ष त्याच्या जीवनातील निर्णायक ठरलं. वडिलांचे अचानक निधन झाले. त्या धक्क्यातून सावरायच्या आधीच काही महिन्यांत त्याचा मोठा भाऊही कालवश झाला. या अपघातांनी घरावर संकट कोसळलं. आकाशवर आई आणि बहिणीची जबाबदारी येऊन पडली. अशा परिस्थितीत क्रिकेट सोडून त्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळून दिवसाला 600 रुपये मिळवत आपल्या संघर्षाला सुरुवात केली. त्यावेळी दिवसाकाठी मिळणारे 600 रुपये हाच त्याचा जगण्याचा आधार होता; मात्र या सगळ्यातही त्यानं क्रिकेटमधलं स्वप्न अग्रभागी ठेवलं.
तो 2016 मध्ये पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे गेला. तिथे एका स्थानिक क्रिकेट अकादमीत दाखल होऊन प्रशिक्षण घेऊ लागला. त्याची कामगिरी लक्ष वेधून घेणारी होती. त्यामुळे कोलकात्याच्या युनायटेड क्लबमध्ये त्याची निवड झाली. बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या ‘व्हिजन 2020’ उपक्रमात त्याला प्रशिक्षण मिळालं आणि प्रशिक्षक रणदेव बोस यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने आपली कौशल्ये आणखी परजतील याकडे लक्ष पुरवलं. 2019-20च्या रणजी चषकात त्याने बंगाल संघाकडून खेळताना 9 सामन्यांत 35 बळी घेतले. ही कामगिरी त्याच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉईंट ठरली. त्यानंतर त्याला आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघात प्रथम नेट गोलंदाज म्हणून संधी मिळाली आणि पुढे 2022 मध्ये अधिकृतपणे आरसीबीचा तो भाग बनला.
भारत अ संघासाठी इंग्लंड लायन्सविरुद्धच्या मालिकेत त्याने जबरदस्त मारा केला. एकाच सामन्यात 11 विकेट घेऊन त्याने निवडकर्त्यांचं लक्ष वेधून घेतलं. याच कामगिरीच्या जोरावर त्याची कसोटी संघात निवड झाली आणि फेब्रुवारी 2024 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या रांची येथील कसोटीत त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. पहिल्याच डावात त्याने तीन महत्त्वाचे बळी घेतले. विशेष म्हणजे, त्याला त्याची कसोटी कॅप राहुल द्रविड यांच्या हस्ते मिळाली आणि हा सोहळा त्याच्या आईसमोर पार पडला. तो क्षण अत्यंत भावनिक होता.
त्यानंतर आकाश दीपचा खरा उत्कर्ष झाला तो 2025 च्या जुलै महिन्यात. इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅमच्या एडगबस्टन मैदानावर झालेल्या कसोटीत त्याने एकूण 10 बळी घेत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या सामन्यात त्याने पहिल्या डावात 4 आणि दुसर्या डावात 6 बळी घेतले. भारताच्या कसोटी इतिहासात इंग्लंडच्या भूमीवर भारतीय वेगवान गोलंदाजाने अशी कामगिरी करणं दुर्मीळ मानलं जातं. या सामन्यानंतर आकाश दीपने आपल्या विजयाचं श्रेय आपल्या बहिणीला दिलं. त्यावेळी त्याच्या बहिणीवर तिसर्या टप्प्याचा कोलन कर्करोगाचा उपचार सुरू होता. आयपीएलदरम्यान तो अनेकदा रुग्णालयात तिच्यासोबत राहत होता आणि एकाचवेळी कुटुंब व खेळ यांच्यात समतोल साधत होता. मी प्रत्येक चेंडू तिच्यासाठी फेकत होतो, असं त्याने नम्रपणे सांगितलं. त्याच्या खेळातील शैली पाहता तो गोलंदाज म्हणून अत्यंत अचूक लाईन व लेंथ ठेवतो. त्याचे यॉर्कर्स, ‘स्किडी’ अॅक्शन आणि वेग यामुळे प्रतिस्पर्धी फलंदाज त्रस्त होतात. त्याच्या शैलीची तुलना अनेकदा मोहम्मद शमी किंवा सिराजसारख्या गोलंदाजांशी केली जाते; पण आकाशची खासियत म्हणजे परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची क्षमता.
आज आकाश दीप भारताच्या वेगवान गोलंदाजीतील नवा आधारस्तंभ म्हणून उदयास येतो आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज यांच्या जोडीला त्याने एक वेगळी धार दिली आहे. आगामी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका दौर्यांमध्ये तो महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असा विश्वास क्रिकेट क्षेत्रात व्यक्त केला जात आहे. आकाश दीपची ही यशोगाथा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित नाही. ती आहे एका सामान्य खेडूत मुलाच्या अतुलनीय जिद्दीची, संकटांशी दोन हात करत उभं राहण्याची आणि स्वप्न सत्यात उतरवण्याच्या प्रेरणेची! त्याच्या संघर्षाचा, मेहनतीचा आणि कुटुंबावरील प्रेमाचा हा प्रवास प्रत्येक तरुणाला दाखवतो की, परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी चिकाटी आणि संयमाच्या जोरावर यश नक्कीच मिळवता येते. आकाश दीप आजवर बराच संघर्ष करत आला आहे; पण संघर्ष संपलेला नाही. ‘जो थांबला, तो संपला’ याची आकाशलाही मनोमन जाणीव आहे. वडिलांना गमावले, भावाला गमावले. त्यातच आता बहीणही कर्करोगाशी झुंजते आहे. ‘संघर्षाकडून संघर्षाकडे’ हा प्रवासच आकाशचे वेगळेपण दर्शवतो. ‘जो थांबतो, तो संपतो’ या कटू सत्याची जणू त्यालाही पूर्णपणे जाणीव आहे.