AI technology|भाषेला वळण ’एआय’चं!

AI technology
AI technology|भाषेला वळण ’एआय’चं!Pudhari File Photo
Published on
Updated on

नीलेश बने

पाणी थांबलं, तुंबलं तर त्याचं डबकं होतं. इंग्रजी भाषेत नवनवे शब्द दरवर्षी येत असतात. गेल्या काही वर्षातले शब्द पाहिले, तर त्यातील कृत्रिम बुद्धिमता म्हणजे ‘एआय’चा ट्रेंड नीट लक्षात येतो. इंग्रजीचा प्रभाव जगातील सर्वच भाषांवर कमी-अधिक प्रमाणात पडतो. त्यामुळेच या भाषेचं हे ‘एआय’ वळण समजून घ्यायला हवं.

एखाद्यानं बोलताना एखादा नवा शब्द वापरला किंवा वाचताना नवा शब्द आला की, पूर्वी डिक्शनरी उघडून अर्थ समजून घेतला जायचा. 90 च्या दशकापर्यंत डिक्शनरी किंवा शब्दकोश हा प्रत्येक विद्यार्थ्याचा आयुष्यभराचा मित्र होता. आता ती जागा गुगलनं घेतलीय. नवा शब्द आता गुगलमध्ये शोधला जातो; पण फक्त शब्द शोधण्यापुरतंच नाही, तर नवे शब्द निर्माण करण्याचं कामही आता गुगलसारख्या टेक्नोजायंटस्कडून होतंय. पूर्वी शब्दकोश हे व्याकरणाचे आणि साहित्याचे रखवालदार मानले जात असत; पण आज ‘ऑक्सफर्ड’, ‘केंब्रिज’ आणि ‘कोलिन्स’सारखे शब्दकोश दरवर्षी जे ‘वर्ड ऑफ दी इयर’ निवडत आहेत, ते पाहता हे शब्दकोश आता मानववंशशास्त्राचे डिजिटल आरसे बनले आहेत. माणूस तंत्रज्ञानासोबत कसा जगतोय, कसा बदलतोय आणि कशावर विचार करतोय, याचं डॉक्युमेंटेशन किंवा दस्तावेजीकरण या शब्दांमधून होतंय.

यावर्षी वेगवेगळ्या शब्दकोशांनी निवडलेले Rage Bait (रेज बेट), Slop (स्लॉप) , 67 (सिक्स्टीसेवन), Parasocial (पॅरासोशियल), Vibe Coding (वाईब कोडिंग) हे शब्द पाहिले, तरी त्याची आपल्याला कल्पना येईल. या शब्दांचे अर्थ नीट समजून घेऊन मग आपण एआयच्या या प्रभावाबद्दलची मांडणी करू.

Rage Bait (रेज बेट) - सोशल मीडियावर जाणीवपूर्वक संताप आणणारा मजकूर पोस्ट करणे. सोशल मीडियाचे अल्गोरिदम नकारात्मक भावनेला विशेषतः रागाला जास्त ‘रीच’ देतात. यामुळे जास्तीत जास्त कमेंटस् मिळवण्यासाठी हे तंत्र वापरले जाते. त्यामुळे केंब्रिज आणि कोलिन्स डिक्शनरीनं हा शब्द शॉर्टलिस्ट केला.

Slop (स्लॉप) - स्लॉप म्हणजे एआयने तयार केलेला अत्यंत सुमार दर्जाचा, बिनकामाचा मजकूर किंवा प्रतिमा. ज्याप्रमाणे आपण नको असलेल्या मेलला Spam (स्पॅम) म्हणतो, तसेच एआयने इंटरनेटवर जो ‘डिजिटल कचरा’ निर्माण केला आहे, त्याला ‘Slop’ म्हणतात. म्हणूनच कोलिन्स डिक्शनरीनं हा शब्द निवडला.

67 (सिक्स्टीसेवन) - अत्यंत अगम्य आणि वरकरणी अर्थहीन वाटणारा हा शब्द तरुणाईच्या बोलण्या-लिहिण्याचा नेहमीचा शब्द आहे. ‘काहीही अर्थ नसणे’ हाच याचा अर्थ. साधारणतः आपण ज्याला स्लँग किंवा नाक्यावरची भाषा म्हणतो तशा पद्धतीनं हा शब्द वापरला जातो. हा शब्द म्हणजे अर्थापेक्षा ‘संदर्भ’ महत्त्वाचा ठरवणारा हा शब्द आहे. त्यामुळेच ऑक्सफर्डने यावर्षी त्याला डिक्शनरीत स्थान दिलं.

Parasocial (पॅरासोशियल) - आता माणसं माणसांशी कमी आणि एआय चॅटबॉटस्शी जास्त गप्पा मारतात. या एआय मित्रांसोबत (AI Companions) अक्षरशः तासन् तास बोलतात. चॅटबॉटस् इतके प्रगत झाले आहेत की, माणसांना त्यांच्याशी ‘मानवी’ नाते असल्याची भावना होते. यालाच पॅरासोशियल म्हटलं जातं. म्हणूनच यावर्षी डिक्शनरी डॉट कॉमनं हा शब्द स्वीकारला.

Vibe Coding (वाईब कोडिंग) - तांत्रिक भाषेत कोड न लिहिता केवळ साध्या भाषेत सूचना (Prompt) देऊन सॉफ्टवेअर बनवणं म्हणे वाईब कोडिंग. यात कोडिंगच्या व्याकरणापेक्षा एआयला दिलेली ‘कल्पना’ (Vibe) महत्त्वाची ठरते. ही कोडिंगच्या पारंपरिक पद्धतीचीच नव्यानं केलेली मांडणी आहे. यामुळे ऑक्सफर्डनं हा शब्द 2025 चा शब्द म्हणून निवडला.

आता हे शब्द पाहिले की, एआय क्रांतीचा भाषेच्या प्रवासावर असेलेला प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. शब्दांची ही नवी रचना पाहिली की, तंत्रज्ञान फक्त आपलं जगणंच नाही, तर भाषाही बदलवतेय हे कळतं. 2023 मध्ये कोलिन्सने थेट ‘-I’ हा शब्द निवडला, तेव्हा ती केवळ एका तंत्रज्ञानाची घोषणा नव्हती, तर एका नव्या युगाची नांदी होती. केंब्रिजने ‘Hallucinate’ हा शब्द निवडला. याचा अर्थ एआयने दिलेली चुकीची माहिती आणि त्यातून होणारा भ्रम. या शब्दानं यंत्राच्या मर्यादा स्पष्ट केल्या, तर मेरियम-वेबस्टरने ‘Athentic’ हा शब्द निवडून एआयच्या गर्दीत ‘खरेपणा’ शोधण्याची मानवी धडपड अधोरेखित केली.

2024 मध्ये ऑक्सफर्डने ‘Brain Rot’ हा शब्द निवडला. सोशल मीडियावरील एआयनिर्मित निरर्थक मजकूर पाहून आपली विचारक्षमता कशी मंदावतेय, यावर हे भाष्य होते, तर कोलिन्सचा ‘Brat’ आणि केंब्रिजचा ‘Manifest’ हे शब्द डिजिटल संस्कृतीचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर होणारा परिणाम दाखवत होते. ‘Brat’ हा शब्द उर्मट, हट्टी किंवा खोडकर मुलांसाठी नकारात्मक अर्थाने वापरला जायचा; पण 2024 च्या कोलिन्स डिक्शनरीनुसार आता हा शब्द एका ‘आत्मविश्वासपूर्ण, स्वतंत्र आणि स्वतःच्या अटींवर जगणार्‍या’ व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक बनलाय. ‘Manifest’ हा शब्द एआयच्या युगात जिथे सर्व काही अल्गोरिदम ठरवत आहे, तिथे माणसाने स्वतःच्या विचारांच्या शक्तीवर विश्वास ठेवणे, हा एक मोठा मानसिक बदल या शब्दातून दिसतो.

गेल्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये वर्ड ऑफ द इयर ठरलेले शब्द आपण आधीच पाहिलेत. या शब्दांनी खर्‍या अर्थानं माणसाच्या नात्यांची व्याख्याही बदलली आहे. ‘Parasocial’ हा शब्द याचे उत्तम उदाहरण आहे. प्रत्यक्ष भेटीगाठींपेक्षा आभासी जगातील व्यक्तींशी किंवा चॅटबॉटस्शी जवळीक साधणारा आजचा माणूस हा डिजिटल उत्क्रांतीचा एक नवा टप्पा आहे. आपण यंत्रांशी बोलतोय की माणसांशी, हा फरक पुसट होत चालला आहे. एकेकाळी नवे शब्द कवी किंवा लेखकांच्या लेखणीतून येत. आज ते ‘टिकटॉक’च्या रीलमधून किंवा एआयच्या ‘प्रॉम्प्ट’मधून जन्माला येत आहेत. ‘67’ सारखे सांकेतिक शब्द असोत किंवा ‘Demure’ सारखे ट्रेंडस्, भाषा आता सर्वसामान्यांच्या आणि अल्गोरिदमच्या हातात खेळू लागली आहे. हे भाषेचे लोकशाहीकरण असले, तरी त्यासोबत ‘Slop’ (डिजिटल कचरा) वाढण्याचा धोकाही निर्माण झाला आहे.

इंग्रजी भाषेसाठी ‘वर्ड ऑफ दी इयर’ची अधिकृत आणि लोकप्रिय परंपरा 1990 मध्ये सुरू झाली. अमेरिकन डायलेक्ट सोसायटीचे अध्यक्ष आणि भाषातज्ज्ञ अ‍ॅलन मेटकाल्फ यांनी ही संकल्पना मांडली. त्यांनी निवडलेला पहिला शब्द होता ‘Bushlips’ म्हणजे राजकारण्यांनी दिलेली खोटी आश्वासने. तिथपासून हा खर्‍याखोट्या जगाचा शोध घेणारा हा नव्या शब्दांचा प्रवास आजपर्यंत सुरू आहे. 2015 मध्ये ऑक्सफर्डने एका शब्दाऐवजी स्मायलीचं चिन्ह हेच वर्ड ऑफ द इयर निवडलं होतं. आजपासून शंभर वर्षांनंतर जेव्हा हे शब्द पाहिले जातील, तेव्हा मानवी इतिहासाचा एक मोठा दस्तावेज त्याच्यापुढे उलगडेल.

शेवटी भाषा ही नदीसारखी प्रवाही आहे, हे खरंच आहे. आज या नदीत ‘एआय’चा प्रवाह वेगाने मिसळला आहे. हा प्रवाह भाषेला समृद्ध करेल की तिला प्रदूषित करेल, हे काळच ठरवेल; पण एक गोष्ट निश्चित, हे नवे शब्द आपल्याला आरसा दाखवत आहेत. आपण तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत की तंत्रज्ञान आपला वापर करतंय, या प्रश्नाचं उत्तर या ‘वर्ड ऑफ दी इयर’च्या प्रवासात दडलं आहे. नदी वाहत राहील; पण त्या प्रवाहात आपलं ‘माणूसपण’ आणि भाषेचं ‘अस्सलपण’ टिकवून ठेवण्याचं आव्हान आपल्यासमोर उभे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news