

डॉ. संजय वर्मा, ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ
क्रिप्टो चलननिर्मितीसाठी लागणार्या प्रचंड वीज आणि पाण्याच्या वापरामुळे वैज्ञानिक समुदाय आधीपासून चिंतेत होता. चॅटजीपीटीसारख्या तंत्रज्ञानाचा जन्म होऊन परिस्थिती आणखी कठीण झाली. किंबहुना, ही एक सुप्त आपत्ती ठरणार आहे. एआयचा प्रचंड वापर डिजिटल कंपन्यांना पाणी गिळणार्या राक्षसांमध्ये बदलत आहे. कारण, सर्व्हर थंड ठेवण्यासाठी ते दरवर्षी अब्जावधी गॅलन पाणी वापरत आहेत.
जागतिक स्तरावर प्रचंड वेगाने होणार्या तापमानवाढीमुळे आणि हवामान बदलांमुळे पाण्याचे संकट गडद होत चालले आहे. यामध्ये नव्याने भर टाकणारा घटक म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. इंटरनेट कंपन्या आणि विविध संशोधन संस्थांच्या अभ्यासानुसार एआयच्या वापरामुळे वॉटर फूटप्रिंटस् धोकादायक वेगाने वाढत आहे. डिजिटल कंपन्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता चालवण्यासाठी वापरत असलेल्या सर्व्हरना थंड ठेवण्यासाठी दरवर्षी अब्जावधी गॅलन पाण्याचा वापर करावा लागत आहेे. उदाहरणार्थ, चॅटजीपीटीला एक प्रश्न विचारल्यानंतर त्याचे उत्तर वापरकर्त्याला मिळण्यासाठी साधारण अर्धा लिटर पाणी खर्च होते, अशी गणना केली जाते. त्यामुळे भविष्यकाळात पाण्याचे भयावह संकट उभे राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याचाच अर्थ, कृत्रिम बुद्धिमत्ता पृथ्वीचे पाणी शोषत चालली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, एआयचा वापर करणार्या बहुतेकांना याची जाणीवसुद्धा होत नाही.
बिटकॉईनसारख्या क्रिप्टो चलनांच्या प्रचंड संगणकीय वापरामुळे आणि संगणकांच्या वाढत्या वापरामुळे मागील दोन दशकांपासून असेच अंदाज व्यक्त होत आले आहेत; परंतु एआयचा वेगानं वाढणारा विस्तार, चॅटजीपीटी अस्तित्वात आल्यानंतर अवघ्या तीन वर्षांतच रोजगारांवरील धोका किंवा मानवी विचारक्षमता कमी होण्याची भीती याबरोबरच आता पाण्याचा सार्वत्रिक तुटवडा प्रत्यक्ष संकट म्हणून दिसू लागला आहे. अशावेळी रहीमजींचा प्रसिद्ध दोहा आठवतो
रहिमन पानी राखिये, बिन पानी सब सून।
पानी गये न ऊबरे, मोती, मानुस, चून॥
हा दोहा जरी विनम्रता आणि पाण्याच्या महत्त्वाबद्दल सांगणारा असला, तरी एआयमुळे वाढणार्या पाणी बचतीच्या धोक्याशी जोडून पाहिल्यास आजच्या वास्तवाचे अत्यंत तीव्र चित्र समोर येते. चारही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या पृथ्वीवर आता पाण्याच्या नव्या आपत्तीची चाहूल लागली आहे.
पाण्याचे संकट आधीच अनेक कारणांनी गंभीर झाले आहे. भूजलाचा अतिउपसा व वापर, रासायनिक प्रदूषण, जल-वायू बदलामुळे जलस्रोतांचे कमी होणे आणि विस्कळीत होणे हे सारे प्रश्न मोठे होत आहेत. क्रिप्टो चलन निर्मितीसाठी लागणार्या प्रचंड वीज आणि पाण्याच्या वापरामुळे वैज्ञानिक समुदाय आधीपासून चिंतेत होता. दि. 30 नोव्हेंबर 2022 रोजी चॅटजीपीटीसारख्या तंत्रज्ञानाचा जन्म होऊन परिस्थिती आणखी कठीण झाली. मागील तीन वर्षांत अशा शेकडो एआय प्रणाली जन्माला आल्या आणि त्या विद्यार्थ्यांचे गृहपाठ, संशोधन प्रबंध, ई-मेल लेखन, चित्र-व्हिडीओनिर्मिती आणि असंख्य तांत्रिक कामे सांभाळत आहेत. या सर्व कामांमध्ये लागणारी इंटरनेट-ऊर्जा, विजेचा वापर याबद्दल लोकांना कल्पना असली, तरी या सर्व प्रक्रियांच्या मागे असणार्या डेटा सेंटर्समध्ये होणारा पाण्याचा प्रचंड वापर ही सुप्त आपत्ती ठरणार आहे. एआयचा प्रचंड वापर डिजिटल कंपन्यांना पाणी गिळणार्या राक्षसांमध्ये बदलत आहे. कारण, सर्व्हर थंड ठेवण्यासाठी ते दरवर्षी अब्जावधी गॅलन पाणी वापरत आहेत.
एआयची ही पाण्याची तहान किती मोठी आहे, हे काही तथ्यांवरून समजते. चॅटजीपीटीवर विचारलेला एक प्रश्न साधारण अर्धा लिटर पाण्याच्या वाफेत बदलला जातो. ग्रोक, जेमिनाय, परप्लेक्सिटी, सोरा, रनवे, मिडजर्नी यांसारख्या एआय साधनांवर दररोज विचारल्या जाणार्या अब्जावधी प्रश्नांची गणना धरली, तर पाण्याचा वापर कल्पनेपलीकडे जातो. मायक्रोसॉफ्टच्या स्टॅबिलिटी अहवालानुसार, गूगलच्या पर्यावरणीय आकडेवारीत आणि कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या अभ्यासात सांगितले आहे की, एआयमुळे पाण्याचा वापर स्फोटक गतीने वाढतो आहे. यातून पृथ्वी आता एका नवीन जलदुर्भिक्ष्याच्या संकटाकडे मार्गक्रमण करत आहे.
एआय वापरातील प्रत्येक प्रक्रिया संगणकीय उष्णता निर्माण करते. मोठे भाषा मॉडेल (लार्ज लँग्वेज मॉडेल) प्रशिक्षणासाठी हजारो जीपीयू एकाच वेळी लाखो-कोटी गणनांचा मारा करतात. एक जीपीयू ज्या प्रमाणात उष्णता निर्माण करतो, ती एका छोट्या शहराच्या ऊर्जेइतकी असते. ही उष्णता डाटा सेंटर वितळवून टाकू नये म्हणून सतत कूलिंग आवश्यक असते आणि पाणी हे यासाठी सर्वात स्वस्त व परिणामकारक साधन आहे. गूगल, मेटा, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन यांच्या बहुतेक डाटा सेंटरमध्ये बाष्पीकरण कुलिंग टॉवर्सद्वारे सतत पाण्याची फवारणी केली जाते. यामुळे प्रचंड प्रमाणात पाण्याची वाफ होते.
ओलसर आणि थंड हवामान असलेल्या भागांत वाफ झालेला काही पाण्याचा अंश पावसाच्या रूपात परत जमिनीत जातो; पण कोरड्या प्रदेशांत हा पाण्याचा साठा कायमचा नष्ट होतो. 2021 मध्ये जागतिक डेटा सेंटर्सनी साधारण 550 अब्ज लिटर पाणी वापरले आणि 2027 पर्यंत हे प्रमाण 1.2 ट्रिलियन लिटरपर्यंत पोहोचेल, असा अंदाज यूसीआरच्या संशोधनात नोंदवला आहे. मायक्रोसॉफ्टच्या 2024 मधील अहवालात पाणी वापरात वर्षानुवर्षे 22 टक्क्यांनी वाढ झाल्याचे नमूद आहे. गूगलच्या अहवालातही 20 टक्के वाढ दिसते. काही ठिकाणी या पाणी वापरामुळे स्थानिक लोकांनी विरोधही दर्शवला आहे.
एआयद्वारे एखादे ई-मेल तयार करणे म्हणजे साधारण एक लिटर पाणी वाफेत बदलण्याइतकी ऊर्जा खर्च होते. टेक्स्ट लिहिणे तुलनेने कमी ऊर्जा निर्माण करत असले, तरी त्यांची संख्या प्रचंड असल्याने एकूण खर्च भयानक पातळीवर पोहोचतो. डालीसारख्या साधनांनी शंभर चित्रे तयार केली, तर साधारण 20-30 लिटर पाणी खर्च होते असे अभ्यास सांगतो. एका जागतिक अंदाजानुसार 2030 पर्यंत प्रमुख डेटा सेंटर जगातील उपलब्ध गोड्या पाण्याच्या चार ते सहा टक्के भागाचा वापर करतील.
एआयमुळे होणारा पाण्याचा तुटवडा सगळीकडे सारखा नसून तो स्थानिक परिस्थितीवर अवलंबून असतो. अमेरिकेतील सुमारे 40 टक्के डेटा सेंटर पाण्याअभावी त्रस्त असलेल्या दक्षिण-पश्चिम भागांत आहेत. चिली, उरुग्वे, कॅलिफोर्निया, चीन, भारत अशा अनेक देशांमध्ये एआयसंबंधित पाणी वापर स्थानिक जलसंकट वाढवतो आहे. भारतात मुंबई परिसरातील डेटा सेंटर्स 2030 पर्यंत शहरातील सुमारे 10 टक्के जलसाठा वापरू शकतील, असा अंदाज आहे. काही भागांत भूजल पातळी दोन मीटरपर्यंत खाली गेली आहे.
या धोकादायक परिस्थितीत काही तंत्रज्ञान कंपन्यांनी पाण्याचा वापर कमी करण्याची योजना सुरू केली आहे. मायक्रोसॉफ्टने 2030 पर्यंत वॉटर पॉझिटिव्ह बनण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गूगल क्लोज्ड लूप कुलिंग प्रणाली वापरत आहे. अमेझॉन हवेवर चालणार्या कुलिंग तंत्राचा वापर करते. मेटाने इमर्शन कुलिंग पद्धतीने साधारण 40 टक्के पाण्याची बचत केली आहे. युरोपियन महासंघानेही पाणी ऑडिटिंग अनिवार्य केले आहे. काही संशोधकांनी सौरऊर्जाआधारित मोठ्या डाटा सेंटरचे मॉडेल तयार करण्याचे प्रस्ताव मांडले आहेत. परंतु, जागतिक स्तरावर एआय रोज साधारण दीड अब्ज लिटर पाणी गिळत आहे. अशा परिस्थितीत मानवी संस्कृतीने या संकटाचे तातडीने उपाय शोधणे अत्यावश्यक झाले आहे. जल-वायू बदल, लोकसंख्या वाढ, संसाधनांवर ताबा मिळवण्याची स्पर्धा आणि परिसंस्थेतील असमतोल यांच्या पार्श्वभूमीवर एआयमुळे निर्माण झालेला पाण्याचा तुटवडा भविष्यातील सर्वात मोठे संकट ठरू शकतो. पाणी अनंत नाही; पण त्याचे संकट आता अनंत झाले आहे.