

विवेक कुलकर्णी
फुटबॉल जगतात आजवर युरोप आणि दक्षिण अमेरिकन देशांचेच वर्चस्व राहिले आहे; पण यंदाच्या विश्वचषकात या परंपरेला छेद देत आफ्रिकन देशांनी खर्याअर्थाने फुटबॉलमध्ये क्रांती घडवली. आफ्रिकेतून विक्रमी १० देशांनी यंदा विश्वचषकासाठी पात्रता संपादन केली आणि त्यापैकी तब्बल ९ संघ शेवटच्या ३२ मध्येही पोहोचले. ही एक संख्या नाही, तर फुटबॉल प्रस्थापितांना दिलेले सणसणीत चोख प्रत्युत्तर आहे, हाच याचा मथितार्थ!
फुटबॉलच्या इतिहासात काही क्षण असे येतात, जे खेळाची जुनी समीकरणे पूर्णपणे बदलून टाकतात. यंदाचा विश्वचषकही अशाच अभूतपूर्व क्रांतीचा साक्षीदार ठरला आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी संघांची संख्या ४८ केल्यामुळे आफ्रिकेला मिळालेल्या अतिरिक्त जागांवर अनेक पाश्चात्त्य समीक्षकांनी टीका केली होती. यामुळे स्पर्धेचा दर्जा घसरेल अशी भीती वर्तवली जात होती; परंतु आफ्रिकन देशांनी या टीकेला आपल्या पायातील जादूने चोख उत्तर दिले. स्पर्धेत उतरलेल्या १० आफ्रिकन संघांपैकी तब्बल ९ संघांनी नॉकआऊट (राऊंड ऑफ ३२) फेरीत धडक मारत ९० टक्के यशाचा विक्रम रचला आणिे युरोप आणि दक्षिण अमेरिकेसारख्या फुटबॉलच्या पारंपारिक महासत्तांनाही मागे टाकले. वर्षानुवर्षांचा वर्णद्वेष, गरिबी, पायाभूत सुविधांचा अभाव आणि जागतिक फुटबॉलमधील उपेक्षेविरुद्ध आफ्रिकन सिंहांनी मैदानात मारलेली ही ऐतिहासिक डरकाळीच!
आफ्रिकन खेळाडू स्वतःसाठी नव्हे, तर देशासाठी खेळत असतात, हा यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा. युरोपियन क्लबमध्ये खेळणारे सदिओ माने किंवा मोहम्मद सलाहसारखे खेळाडू केवळ फुटबॉलच्या मैदानावरील स्टार्स नाहीत, तर ते त्यांच्या देशातील लाखो लोकांसाठी आशेचा किरण आहेत. हे खेळाडू आपल्या कमाईचा मोठा हिस्सा मायदेशात रुग्णालये, शाळा आणि गरिबांच्या कल्याणासाठी खर्च करतात. त्यांच्यासाठी देशाचे प्रतिनिधित्व करणे म्हणजे केवळ खेळणे नाही, तर आपल्या मातीचे ऋण फेडणे असते. अनेक आफ्रिकन देशांना राजकीय स्थैर्य, गरिबी आणि गृहयुद्धांचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत फुटबॉल हे संपूर्ण देशाला एकत्र आणणारे एकमेव माध्यम ठरते. जेव्हा संघ मैदानात जिंकतो, तेव्हा देशातील अंतर्गत संघर्ष विसरून संपूर्ण राष्ट्र एकत्र उत्सव साजरा करते. खेळाडूंना या जनभावनेची पूर्ण जाणीव असते. त्यांच्यासाठी एकप्रकारे फुटबॉलचा सामना ही आत्मसन्मानाचीही लढाई असते.
जागतिक फुटबॉलमध्ये बऱ्याचदा आफ्रिकन फुटबॉलला दुय्यम स्थान दिले गेले किंवा त्यांच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. त्यामुळे जेव्हा हे खेळाडू विश्वचषकाच्या मंचावर येतात, तेव्हा ते स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आणि आपल्या खंडाचा गौरव वाढवण्यासाठी रक्ताचे पाणी करतात. यंदाची स्पर्धाही त्याला अपवाद नाही. मोरोक्को, दक्षिण आफ्रिका, आयव्हरी कोस्ट, इजिप्त, केप व्हर्डे, सेनेगल, घाना, अल्जेरिया, प्रजासत्ताक काँगो हे नॉकआऊटमध्ये पोहोचणारे वाघ म्हणूनच प्रदीर्घ काळ संस्मरणात राहतील. २०२२ ची उपांत्य फेरी गाठणारा मोरोक्को आजही तितकाच बलाढ्य आहे, तर केप व्हर्डेने आपली अभिजात गुणवत्ता या सर्वोच्च व्यासपीठावर अधोरेखित करून दाखवली आहे. ट्युनिशिया हा एकमेव आफ्रिकन संघ ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला; मात्र या देशांना संघर्षातून मिळालेली ताकद आणि विश्वचषकातील त्यांची थरारक वाटचाल अर्थातच स्पृहणीय. युरोपियन देशांकडे असलेल्या अत्याधुनिक सोयी-सुविधा, अब्जावधी रुपयांचे इन्फ्रास्ट्रक्चर आणि उत्कृष्ट क्रीडा विज्ञान आफ्रिकेत सुरुवातीला नव्हते. अनेक खेळाडू हे गरिबी, कच्ची मैदाने आणि पायाभूत सुविधांच्या कमतरतेतून तयार झाले आहेत; मात्र या संघर्षानेच त्यांना मैदानावर न थकणारी ताकद आणि मानसिक कणखरता दिली.
कॉन्फडरेशन ऑफ आफ्रिकन फुटबॉलअंतर्गत झालेल्या संरचनात्मक सुधारणा आणि पाट्रिस मोत्सेपे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या गुंतवणुकीचे हे फलित आहे. प्रत्येक संघाने केवळ बचावात्मक खेळ न करता आधुनिक आणि आक्रमक फुटबॉलचे प्रदर्शन केले आहे. केप व्हर्डेसारखा संघ विश्वचषकातील साखळी फेरीत अपराजित राहत बाद फेरीत पोहोचतो, त्यावेळी त्यामागे तळागाळापर्यंत त्या देशात फुटबॉल कसा रुजला असेल, याचेच प्रतिबिंब उमटते. या आफ्रिकन संघांनी गट फेरीत ब्राझील, स्पेन आणि बेल्जियमसारख्या दिग्गज संघांना बरोबरीत रोखून किंवा पराभूत करून आपण कोणापेक्षाही कमी नाही, हे दाखवून दिले, हेही तितकेच महत्त्वाचे. यापूर्वी आफ्रिकन संघांचे उद्दिष्ट केवळ बाद फेरी गाठणे किंवा एखादा मोठा उलटफेर करणे एवढेच असायचे; परंतु या ९ देशांच्या एकत्रित ताकदीने आता आफ्रिकेच्या तरुण पिढीला एक नवीन स्वप्न दिले. कठीण संघर्ष, देशासाठी खेळण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कौशल्याच्या जोरावर या संघांनी केवळ सामने जिंकलेले नाहीत, तर जगभरातील करोडो क्रीडाप्रेमींची मने जिंकली आहेत. फुटबॉल जगताला या नव्या क्रांतीची प्राधान्याने दखल घ्यावी लागणार आहे.