

सोनम परब
केरळमधील सुप्रसिद्ध अभिनेते मोहनलाल हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक बहुरंगी व्यक्तिमत्त्व आहे. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी रूपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाचा जादूई ठसा उमटवला आहे. ‘मल्याळी सिनेमातील अमिताभ’ अशी ओळख असणार्या या महान अभिनेत्याविषयी...
अलीकडेच दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले मल्याळम अभिनेते मोहनलाल यांनी चार दशकांच्या कारकिर्दीत अनेक भाषांतील चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. भारतीय सिनेमावर मोहनलाल यांचा प्रभाव अनुपम मानला जातो. पडद्यावर प्रभावी उपस्थितीमुळेच ते नेहमीच इतरांहून वेगळे भासतात. ते देशातील सर्वाधिक सन्मानित अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांना ‘मल्याळम चित्रपटसृष्टीतील अमिताभ बच्चन’ अशी उपाधी दिली गेली आहे. संवादफेक आणि भावनांचे चित्रण यात त्यांची खासियत दिसून येते. ते गायक आणि चित्रपट निर्मातेही आहेत. मलयालम सिनेमाला जागतिक प्रसिद्धी मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा हातभार आहे.
केरळ हे देशातील लहान राज्यांपैकी एक आहे आणि येथे बोलली जाणारी मल्याळम भाषा मर्यादित कक्षेतली आहे. या भाषेत चित्रपटही बनतात; परंतु जेव्हा मल्याळम चित्रपटांचा उल्लेख होतो तेव्हा चर्चा एका अभिनेत्यापासून सुरू होऊन त्यांच्याच नावावर संपते. हे म्हणजे सार्वकालिक लोकप्रिय अभिनेते मोहनलाल. मोहनलाल यांनी मलयालम सिनेमाला जागतिक पातळीवर ओळख दिली. अभिनयाच्या द़ृष्टीने या चित्रपटसृष्टीला त्यांनी समृद्ध केले, तर व्यावसायिक द़ृष्टिकोनातून मलयालम चित्रपट उद्योगाला बळकटी दिली. त्यांना मल्याळम चित्रपटसृष्टीचा अमिताभ बच्चन म्हटले जाते. या कलाकाराने चार दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत जवळपास 400 चित्रपटांत काम केले आहे. मल्याळम व्यतिरिक्त तेलुगु व तमिळ चित्रपटांतही त्यांनी आपली छाप उमटवली. त्यांचा सहज अभिनय हा देशातील श्रेष्ठ अभिनेत्यांच्या यादीत त्यांना स्थान मिळवून देतो.
भारतीय चित्रपटसृष्टीतही मोहनलाल यांचे योगदान मोलाचे आहे. ते केवळ अभिनेते नाहीत, तर चित्रपट निर्माते आणि पार्श्वगायकदेखील आहेत. त्यांच्या अभिनयातील असामान्य नैसर्गिकता आणि गहिरेपणा प्रेक्षकांना भारावून टाकतात. कथकली व भरतनाट्यमसारख्या शास्त्रीय नृत्यांचे सादरीकरण त्यांनी सहजतेने केले आहे. पडद्यावर कलारी या मार्शल आर्टमधील प्रावीण्य त्यांनी दाखवले आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि राज्य पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. मोहनलाल हे मलयालम सिनेमातील बहुविध कलाकारांपैकी एक आहेत. अभिनयासोबत सांस्कृतिक विविधतेचा आणि व्यावसायिक क्षमतेचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतो. त्यांचे हे वैशिष्ट्य त्यांना भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही खास बनवते.
सर्वोत्तम मल्याळम चित्रपट दिल्याबद्दल मोहनलाल यांना पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 1990 मध्ये ‘किरीदम’साठी विशेष ज्युरी पुरस्कार, 1992 मध्ये ‘भारतम’साठी सर्वोत्तम अभिनेता, 2000 मध्ये ‘वनप्रस्थानम’ या फिचर फिल्मसाठी त्याच वर्षी पुन्हा ‘वनप्रस्थानम’साठी सर्वोत्तम अभिनेता आणि 2017 मध्ये ‘जनता गैराज, मुन्थिरिवल्लिकल थलिर्ककुंभोल, पुलिमुरुगन’साठी विशेष ज्युरी पुरस्कार देण्यात आले. या मलयालम सुपरस्टारला 2001 मध्ये पद्मशी आणि 2019 मध्ये पद्मभूषण सन्मानाने गौरविण्यात आले. दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित होणारे मोहनलाल हे दुसरे मल्याळी स्टार ठरले आहेत. याआधी 2004 मध्ये मल्याळम चित्रपट दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन यांना हा सन्मान मिळाला होता. अदूर यांनी ‘एलिप्पथायम’, ‘मुखामुखम’, ‘मतिलुकल’ आणि ‘निजालकुथु’ यांसारख्या चित्रपटांनी मल्याळम सिनेमाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून दिली. योगायोग असा की, मोहनलाल आणि अदूर गोपालकृष्णन हे दोघेही केरळमधील पथानामथिट्टा जिल्ह्यातले आहेत. एका कलाकाराने अविस्मरणीय अभिनयातून आणि दुसर्याने वैशिष्ट्यपूर्ण दिग्दर्शनातून प्रेक्षकांची मने जिंकली.
अभिनयाच्या बाबतीत मोहनलाल यांची तुलना अनेकदा अमिताभ बच्चन यांच्याशी केली जाते आणि ती योग्यही आहे. अमिताभ बच्चन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील असे नाव आहे, ज्यांची अभिव्यक्ती, गांभीर्य आणि अभिनय शैली विलक्षण आहे. ते संवादफेक आणि भावनांचे प्रकटीकरण प्रभावीपणे करतात. त्याचप्रमाणे मोहनलाल यांच्यात मेथड अॅक्टिंगसोबतच स्टारडमचे विलक्षण मिश्रण आहे. ते शोकांतिका, विनोद, मेलोड्रामा किंवा प्रणय कोणतेही कथानक सहजतेने साकारतात. त्यांच्या भावनिक अभिव्यक्तीला नैसर्गिक व प्रेरणादायी असे वर्णन केले जाते. स्वतः अमिताभ बच्चन यांनी मोहनलाल यांच्या सहजतेची आणि गहन अभिनय क्षमतेची प्रशंसा केली आहे. जसे अमिताभ बच्चन यांनी हिंदी सिनेमाला नवे शिखर गाठून दिले, तसेच मोहनलाल यांचीही मलयालम चित्रपटसृष्टीत महानायकासारखी पूजा केली जाते.