Autumn leaf fall | पानगळ बदलाचा सुंदर प्रवास

Autumn leaf fall |
Autumn leaf fall | पानगळ बदलाचा सुंदर प्रवास
Published on
Updated on

कावेरी गिरी

पानगळ आपल्याला संयम शिकवते. ती एका दिवसात होत नाही. हळूहळू पाने वाळतात, गळतात आणि झाड नव्या ऋतूची वाट पाहते. बदलासाठी वेळ लागतो, हे ती शिकवते. त्यामुळे जीवनातही बदल घडवताना घाई न करता, सातत्याने आणि संयमाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. बदल स्वीकारणे म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे.

निसर्गात प्रत्येक घटनेमागे एक शहाणपण दडलेले असतं. त्यापैकीच एक महत्त्वाची घटना म्हणजे पानगळ. वसंत ऋतूत झाडांची जुनी, वाळलेली पाने गळून पडतात. ही प्रक्रिया नैसर्गिक असली, तरी तिच्यामागे खोल अर्थ दडलेला आहे. उष्णतेमुळे आणि पाणीटंचाईमुळे झाडे स्वतःवरील ताण कमी करण्यासाठी जुनी पाने गाळतात. पाने वाळलेली व थकलेली असतात. ती गळाल्यानंतर झाडाला पाणी वाचवता येते आणि नवीन कोवळ्या पालवीसाठी जागा निर्माण होते. माणसाचेदेखील असेच आहे. जुन्या विचारांना मागे टाकून नवा विचार करणे वा नवे बदल स्वीकारणे. निसर्गामध्ये प्रत्येक गोष्टीला एक निश्चित वेळ, लय आणि क्रम असतो. सूर्योदय-सूर्यास्त, भरती-ओहोटी, पावसाळा-हिवाळा-उन्हाळा या ऋतूंची अखंड चालणारी साखळी म्हणजेच ऋतुचक्र. या चक्रात बदल अपरिहार्य आहे. बदल हा निसर्गाचा श्वास आहे. या बदलांमधील एक अत्यंत अर्थपूर्ण आणि भावस्पर्शी घटना म्हणजे पानगळ. प्रथमदर्शनी साधी वाटणारी ही प्रक्रिया प्रत्यक्षात जीवनाचे मोठे तत्त्व सांगून जाते, जुनं गळल्याशिवाय नव्याला जागा मिळत नाही.

वसंत ऋतू सुरू झाला की, अनेक झाडांची पाने वाळू लागतात. तापमान वाढते, जमिनीतील ओल कमी होते आणि झाडांवरील पानांतून पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होऊ लागते. या तीव्र उष्णतेत स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी झाड एक महत्त्वाचा निर्णय घेते, ते आपली जुनी, थकलेली पाने गाळते. ही पानगळ झाडासाठी केवळ बाह्य बदल नसतो. तो त्याच्या अस्तित्वाशी निगडित असतो. पाने कमी झाली की, पाण्याची बचत होते, मुळांवरील ताण कमी होतो आणि झाड पुढील ऋतूसाठी स्वतःची तयारी करू शकते. म्हणूनच पानगळ ही केवळ क्षयाची नव्हे, तर संरक्षणाची आणि पुनर्निर्मितीची प्रक्रिया आहे. झाडांची ही शहाणीव माणसालाही लागू पडते. आपल्या आयुष्यातही अनेक गोष्टी अशा असतात ज्या कालबाह्य झालेल्या असतात; पण आपण त्यांना घट्ट पकडून ठेवतो. जुन्या सवयी, मनात साचलेले राग, भीती, अपयशाची आठवण, इतरांच्या अपेक्षांचे ओझे या सगळ्या गोष्टी मनावर दडपण आणतात. जशी वाळलेली पाने झाडाच्या वाढीला अडथळा ठरतात, तसेच जुनाट विचार आणि नकारात्मक मानसिकता आपल्या प्रगतीचा वेग मंदावतात. पानगळ आपल्याला शिकवते की, काही वेळा सोडून देणे हीच पुढे जाण्याची पहिली पायरी असते.

मानवी जीवनात नातेसंबंधांनाही पानगळ लागू पडते. काही नाती काळानुसार बदलतात, काही परिस्थिती आपल्याला मागे ओढू लागतात. अशावेळी त्याग करणे वेदनादायक वाटते; पण त्या वेदनेतूनच नव्या शक्यता जन्म घेतात. जसे झाड पाने गाळते तेव्हा क्षणभर ते ओसाड दिसते; परंतु त्या ओसाडपणातूनच पुढे कोवळी पालवी फुटते, तसेच आयुष्यातील रिकामेपण पुढील समृद्धीची चाहूल असते. त्यामुळे पानगळ ही अंताची नव्हे, तर नव्या आरंभाची खूण आहे. निसर्गाच्या या प्रक्रियेकडे भारतीय संस्कृतीने नेहमीच जीवनरूपक म्हणून पाहिले आहे. ऋतूंचे बदल आणि मानवी जीवन यांचा एक नाजूक संबंध मानला जातो. चैत्र महिन्यात साजरा होणारा गुढी पाडवा हा सण नव्या वर्षाची सुरुवात दर्शवतो. गुढी उभारणे म्हणजे विजय, आशा आणि नव्या आरंभाचे प्रतीक. वसंताच्या उंबरठ्यावर उभा असलेला हा सण जणू सांगतो, जुन्या आठवणी, दु:ख आणि अडथळे मागे ठेवा, नव्या वर्षात नवीन उमेद घेऊन प्रवेश करा. पानगळ आणि गुढी पाडवा यामागील संदेश समान आहे, त्यागातूनच नवजीवनाची निर्मिती होते.

भारतीय आयुर्वेद परंपरेतही ऋतुचक्राला मोठे स्थान आहे. आयुर्वेदानुसार ग्रीष्म ऋतूत शरीरातील जलतत्त्व कमी होते आणि पित्त वाढते. त्यामुळे हलका, पचायला सोपा आहार, पन्हे, ताक, फळे यांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. यामागील तत्त्वही तेच-ऋतूनुसार स्वतःला बदलणे. निसर्ग जसा स्वतःचे संतुलन राखतो, तसाच माणसानेही आपल्या शरीर आणि मनाचा समतोल राखायला हवा. बदल स्वीकारणे म्हणजे स्वतःला नव्याने घडवणे. पानगळीतून आणखी एक सुंदर शिकवण मिळते, रिकामेपणाची भीती बाळगू नका. झाडांची पाने गळाल्यावर काही काळ ते विरळ, उघडे दिसते; परंतु त्या अवस्थेतही त्याच्या मुळांमध्ये जीवन सळसळत असते. ते आतून बळ गोळा करत असते. आपल्या आयुष्यातही काही टप्पे असे येतात, जेव्हा सर्व काही थांबलेले, शांत, कदाचित उदास वाटते; पण त्या शांततेतच आत्मपरीक्षणाची संधी दडलेली असते. जुन्या चुका ओळखणे, स्वतःच्या मर्यादा मान्य करणे आणि नव्या दिशेने पाऊल टाकण्याची तयारी करणे, ही अंतर्मुख प्रक्रिया म्हणजेच मानवी पानगळ.

आजच्या वेगवान जीवनशैलीत बदलांना स्वीकारणे अनेकांना कठीण जाते. तंत्रज्ञान बदलते, कामाच्या पद्धती बदलतात, नाती आणि मूल्ये बदलतात. या बदलांशी जुळवून घेताना अनेकदा अस्वस्थता निर्माण होते; पण निसर्ग आपल्याला धीर देतो. तो दाखवतो की, बदल हा विनाश नसून उत्क्रांतीचा मार्ग आहे. झाडाने जुनी पाने गाळली नसती, तर नवीन पालवीला जागा मिळाली नसती. तसेच, आपण जुन्या सवयी, नकारात्मक विचार किंवा अपयशाची भीती गाळली नाही, तर नवीन यश आणि आनंदाला स्थान मिळणार नाही. व्यावहारिक आयुष्यातही पानगळ लागू पडते. अनारोग्यदायी सवयी-जसे अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, अनियमित दिनचर्या या आपल्या शरीराला थकवतात. त्या गाळल्या तरच आरोग्य सुधारते. मानसिक स्तरावर चिंता, भीती, असुरक्षितता या भावना सोडल्या, तरच आत्मविश्वास वाढतो. सामाजिक स्तरावर जुने वाद मिटवून संवादाची नवी दारे उघडली, तरच नाती द़ृढ होतात. प्रत्येक स्तरावर पानगळ ही परिवर्तनाची पूर्वतयारी ठरते.

पानगळ आपल्याला संयम शिकवते. ती एका दिवसात होत नाही. हळूहळू पाने वाळतात, गळतात आणि झाड नव्या ऋतूची वाट पाहते. बदलासाठी वेळ लागतो, हे ती शिकवते. त्यामुळे जीवनातही बदल घडवताना घाई न करता, सातत्याने आणि संयमाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. बदल स्वीकारणे म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे. अखेरीस, पानगळ ही केवळ ऋतूजन्य घटना नाही. ती जीवनाचे तत्त्वज्ञान आहे. ती सांगते की, प्रत्येक अंतामध्ये नव्या आरंभाची बीजे असतात. त्यागाशिवाय पुनर्निर्मिती नाही आणि पुनर्निर्मिती शिवाय विकास नाही. निसर्गाच्या या शाश्वत चक्रातून आपण शिकू शकतो, जुने जाऊन मन मोकळे करा, आणि नव्या पालवीसाठी स्वतःला सज्ज ठेवा. कारण, शेवटी जीवन हे ऋतुचक्रासारखेच आहे. कधी पानगळ, कधी पालवी, कधी उन्हाची झळ, कधी पावसाची सर; पण प्रत्येक बदलात एक आशा दडलेली असते आणि ती आशा सांगते, जुन्या गोष्टी सोडल्याशिवाय नव्याला जागा मिळत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news