

मंगेश कश्यप
भारत हा शेतीप्रधान देश आहे, असे आपण लहानपणापासून ऐकत आलो; पण एक धक्कादायक सत्य माहीत आहे का? भारतात एकूण उपलब्ध पाण्यापैकी तब्बल ७०-८० टक्के पाणी शेतीसाठी वापरले जाते. म्हणजे आपण जे पाणी पितो, आंघोळ करतो, स्वयंपाक करतो ते सगळे मिळून फक्त २०-३० टक्के आहे. शेती हीच पाण्याची सर्वात मोठी ’ग्राहक’ आहे.
आता विचार करा, जर हंगामानुसार आणि पीकनिहाय त्या त्या पिकाला आवश्यक तेवढेच पाणी दिले, तर आपण खूप काही पाणी वाचवू शकतो किंवा हवामान निगडीत पीक नियोजन केले, तर नुकसानीचे प्रमाण कमी होईल आणि दुर्दैवाने पारंपरिक पद्धतीने शेती करताना ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी वाया जाते. हे थांबवण्यासाठी आणि कमी पाण्यात जास्त उत्पादन घेण्यासाठी सिंचनाच्या आधुनिक पद्धती आल्या.
सिंचनाचे प्रकार - पाणी देण्याच्या वेगवेगळ्या शैली
पारंपरिक पूर सिंचन (Flood Irrigation) ही सर्वात जुनी पद्धत. शेतात पाणी सोडायचे आणि ते जिथे जाईल तिथे जाऊ द्यायचे. यात पाण्याचा अपव्यय खूप होतो, तरीही महाराष्ट्रातील अनेक भागांत आजही हीच पद्धत वापरली जाते.
त्यापेक्षा चांगली पद्धत म्हणजे तुषार सिंचन (Sprinkler Irrigation). यात पाणी फवार्यासारखे शिंपडले जाते. अगदी पावसासारखे! यात पूर सिंचनापेक्षा ३०-४० टक्के पाणी वाचते.
आणि सर्वात कार्यक्षम पद्धत म्हणजे ठिबक सिंचन (Drip Irrigation). इस्रायलने या तंत्राचा विकास केला आणि महाराष्ट्राने ते उत्साहाने स्वीकारले. यात प्रत्येक झाडाच्या मुळाशी थेंब थेंब पाणी सोडले जाते. 90 टक्के पाणी कार्यक्षमतेने वापरले जाते.
वॉटर बजेट आणि शेती - थेट संबंध
एक शेतकरी वॉटर बजेट कसे तयार करतो? समजा सीताराम पाटील यांच्याकडे ५ एकर कपाशी आहे. त्यांना माहीत आहे की, कपाशीला एकरी ७०० मिमी पाणी लागते. म्हणजे ५ एकरासाठी ३५०० मि.मी. पाणी लागेल. पाऊस साधारण ५०० मि.मी. पडेल. म्हणजे उरलेले ३००० मि.मी. पाणी विहीर किंवा कालव्यातून द्यावे लागेल. हेच वॉटर बजेट!
मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे हे लातूर, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यांतून समजते. उसाला एकरी ३०,००० लिटर पाणी लागते. ज्या भागात पाण्याचीच कमतरता आहे, तिथे असे पीक घेणे म्हणजे पाण्याचे बजेट कोलमडून उद्ध्वस्त करणे आहे आणि इतरांच्या पिकाचे पाणी पळवणे असे वाटते.
रेन वॉटर हार्वेस्टिंग - शेतकर्याचे स्वतःचे धरण
हुशार शेतकर्यांनी आता ’शेततळे’ बांधायला सुरुवात केली आहे. पावसाचे पाणी शेतातच अडवायचे, साठवायचे आणि जरुरीनुसार वापरायचे. हे म्हणजे शेतकर्याचे स्वतःचे छोटे धरण! महाराष्ट्र शासनाच्या 'जलयुक्त शिवार' योजनेत हजारो शेततळी बांधली गेली.
कमी पाण्यात जास्त उत्पन्न - आधुनिक शेतीचे ध्येय
'More Crop Per Drop' हे आधुनिक शेतीचे घोषवाक्य आहे. इस्रायल या वाळवंटी देशाने हे सिद्ध केले आहे. जिथे पाऊसच पडत नाही, तिथे ते जगाला फळे आणि भाजीपाला निर्यात करतात. कारण, त्यांनी प्रत्येक थेंबाचे योग्य नियोजन केले.
महाराष्ट्रातही सांगली जिल्ह्यातील द्राक्ष शेती, नाशिकमधील टोमॅटो, पुण्याजवळील फुलशेती, या सगळ्यांनी आधुनिक सिंचन पद्धती स्वीकारून कमी पाण्यात जास्त उत्पादन सिद्ध केले आहे.
शेती आणि पाणी यांचे नाते अतूट आहे; पण हे नाते टिकवायचे असेल, तर पाण्याचा विवेकाने वापर करणे अत्यावश्यक आहे. वॉटर बजेट हे त्याचे उत्तर आहे. जेव्हा प्रत्येक शेतकरी आपल्या शेताचे वॉटर बजेट तयार करेल, तेव्हाच खर्याअर्थाने पाण्याचे संरक्षण होईल आणि शेती समृद्ध होईल.