चीनच्या कुरघोड्या आणि भारत

चीनच्या कुरघोड्या आणि भारत
चीनच्या कुरघोड्या आणि भारत

गलवान खोर्‍यामध्ये भारत आणि चीन यांच्यात झालेल्या लष्करी संघर्षाला दोन वर्षे लोटली आहेत. आपल्या पारंपरिक रणनीतीनुसार चीन सातत्याने भारताला चर्चेत अडकवून ठेवत सीमाभागात पायाभूत सुविधांचा विकास आणि सामरिक सज्जता वाढवत आहे. भारतीय सीमेजवळ म्हणजेच पूर्व लडाखलगत होतान एअरबेसवर चीनने 25 फायटर जेट्स तैनात केली आहेत. तसेच पँगाँग त्सो भागात एक पूलही चीनने उभारला आहे. भारत या सर्वांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

भारत आणि चीन यांच्यामध्ये पूर्व लडाखच्या सीमेवर निर्माण झालेला तणाव दोन वर्षे उलटूनही अद्याप पूर्णतः निवळलेला नाही. उलटपक्षी गेल्या काही दिवसांमध्ये चीनकडून या भागात सामरिक सज्जता मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे समोर आले आहे. ताज्या वृत्तानुसार, भारतीय सीमेजवळ म्हणजेच पूर्व लडाखलगत असलेल्या होतान या एअरबेसवर चीनने 25 फायटर जेट्स तैनात केली आहेत. होतानपासून दिल्लीपर्यंतचे हवाई अंतर 1000 किलोमीटर आहे. म्हणजेच अवघ्या अर्ध्या तासामध्ये हे विमान दिल्लीपर्यंत पोहोचू शकते. चीनने या आधी या एअरबेसवर 12 विमानं तैनात केली होती. आता इथे 25 फायटर जेट्स तैनात करण्यात आली आहेत. अमेरिकन लष्कराने सॅटेलाईटच्या माध्यमातून ही माहिती उघड केली आहे. यामुळे पुन्हा एकदा भारत आणि चीनमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, होतानपासून जवळच शाकचे या भागातही नवा एअरबेस उभारण्याचे काम चीन वेगाने करत आहे.

'काशगर', 'होतान', 'गारीगुंसा', 'शिगात्झे', 'ल्हासा गोंकार', 'नीयिंगची', 'चाम्डो पांगटा' भागात हे एअरबेस चीनने उभारले आहेत. मध्यंतरी अमेरिकेतील जनरल चार्ल्स ए फ्लिन या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याने लडाख सीमेवरील चीनच्या सततच्या हालचाली ही धोक्याची घंटा असल्याचे म्हणत एक प्रकारे भारताला सजग राहण्याचा इशारा दिला होता. दोन वर्षांपूर्वी जून महिन्यातच गलवान खोर्‍यामध्ये भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमक झाली होती. या घटनेनंतर दोन्ही देशांमध्ये या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी 15 हून अधिक चर्चेच्या फेर्‍या झाल्या आहेत. लडाखमधील पँगाँग त्सो तलावावर चीनने एक पूल बांधल्याचे मध्यंतरी समोर आले होते. भारताच्या सीमेलगत चीनकडून सुरू असलेली विकासकामे, पूलनिर्मिती, हेलिपॅड, विमानतळांची उभारणी, रस्तेनिर्मिती ही सामरिक हेतूने आहेत, हे वास्तव आहे. कारण या सुविधांमुळे चीनला काही तासांत आपले लष्कर, युद्धसामग्री या भागात आणणे शक्य होणार आहे.

अर्थात याचा अर्थ, भारतीय सैन्य मुकाबला करू शकणार नाही, असा आजिबात नाही. पँगाँग त्सो तलावाच्या भागातच मागील काळात संघर्ष झाला होता आणि याच भागात काही किलोमीटर अंतरावर आता चीन दुसरा पूल बांधत आहे. या ठिकाणी बांधला जाणार्‍या पुलांचे आयुर्मान कमी असते. कारण समुद्रसपाटीपासून 13,800 मीटर उंचावर असल्यामुळे येथे अतिशीत वातावरण आहे. याशिवाय हा पूल एलओसी आणि एलएसीपासून जवळ असल्यामुळे आपण तोफांचा वापर करून केव्हाही उद्ध्वस्त करू शकतो. पँगाँग त्सो तलावाचा 40 टक्के भाग भारताच्या हद्दीत येतो. या तलावाचे उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग आहेत. चीनने याआधी बांधलेला पूल फिंगर 8 या ठिकाणी होता. हा पूल 500 मीटर लांब आणि 8 मीटर रुंद होता. या पुलावरून केवळ माणसांनाच जाता येत होते. रणगाडे आणि अन्य शस्त्रसामग्री वाहून नेता येत नव्हती. आताचा दुसरा पूल खुरनाक या ठिकाणी बांधला जात आहे.

चिनी सैन्य दीर्घकाळापासून या भागात तैनात आहे. चीनकडून सीमेवर काही गावे वसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे सैन्याच्या हालचाली करण्यासाठी किंवा एका भागातून दुसर्‍या भागात जाण्यासाठी या पुलाचा वापर केला जाईल. जिथे पँगाँग त्सो सरोवर सर्वात अरुंद आहे, त्या ठिकाणी हा पूल बांधला जात आहे. या पुलावरून रणगाडे, लष्करी सामग्री नेणे सोयीस्कर ठरेल, असे म्हटले जात आहे. पूर्वी या सरोवराच्या किनार्‍याच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकपर्यंत जाण्यासाठी 100 किलोमीटर अंतर पार करावे लागायचे; पण आता नव्या पुलामुळे या हालचाली अधिक वेगाने आणि कमी वेळात करता येणे शक्य होणार आहे. परंतु आधी म्हटल्यानुसार तोफा आणि रणगाड्यांच्या साहाय्याने आपल्याला तो पूल सहज उडवून देता येऊ शकतो.

सीमेवरील चीनच्या हालचालींकडे भारतीय लष्कर आणि शासन अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहे. याबाबतची रणनीती योग्य प्रकारे आखली जात आहे. सर्वसामान्यांना याबाबत उत्सुकता असणे स्वाभाविक असते. परंतु अशा प्रकारची रणनीती ही गोपनीयच ठेवायची असते. ती जाहीरपणाने सांगितली गेल्यास शत्रूला त्याचा फायदा होतो. त्यामुळे चीनच्या या कुरघोडीच्या कारवायांकडे भारताचे लष्कर नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल. गेल्या सहा-सात वर्षांत चीनच्या सीमेलगतच्या भूक्षेत्रामध्ये पायाभूत सुविधांचा विकास झपाट्याने केला जात आहे. 2021 मध्ये अशा प्रकारचे 100 प्रकल्प पूर्ण करण्यात आले होते. रस्तेनिर्मिती झाल्यामुळे आपल्या सैन्यातील जवानांच्या हालचाली करण्याबरोबरच शस्त्रास्त्रांची, तोफा-रणगाड्यांची वाहतूकही जलदगतीने करता येते. याखेरीज गस्तही चांगल्या पद्धतीने घालता येते. इतकेच नव्हे, तर प्रसंगी हेलिकॉप्टरही तेथे उतरवता येतात.

गलवान संघर्षामध्ये भारतीय शूर, जांबाज जवानांनी आक्रमकता दाखवल्यानंतर चिनी सैन्य या भागातून माघारी फिरले आहे. परंतु पँगाँग त्सो भागात विशेषतः पेट्रोलिंग पॉईंट नं. 10 आणि 13 या ठिकाणी भारतीय सैन्याला गस्त घालता येत नाही. गलवान संघर्षानंतर भारतीय सैन्याने राष्ट्रीय रायफल दलाची एक तुकडी तेथे तैनात केली होती. याशिवाय पाकिस्तान सीमेवरच्या दोन तुकड्या इथे तैनात केल्या होत्या. तसेच लढाऊ हेलिकॉप्टर्स, रडार, हवाई दलाची विमाने, तोफा, क्षेपणास्त्रे इ. सर्व प्रकारची तैनाती केली होती. या भागात रस्तेनिर्मिती चांगली झाल्यामुळे आपल्याला खूप मोठी मदत झाली आहे. लडाखला जाण्यासाठीचा एक रस्ता श्रीनगरच्या बाजूने येतो आणि तो जोझिला खिंडेवर बर्फ पडल्यामुळे सहा महिने बंद असतो. हे लक्षात घेऊन जोझिला खिंडीच्या खालच्या बाजूला एक बोगदा तयार केला जात आहे. त्यामुळे बाराही महिने हा रस्ता वाहतुकीसाठी खुला राहणार आहे. याशिवाय हिमाचल प्रदेशच्या बाजूनेही दोन नवीन रस्ते तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे 9-10 महिने त्या बाजूनेही हा रस्ता खुला राहील.

चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल मनोज पांडे यांनी मध्यंतरी घेतलेल्या निर्णयानुसार, आपल्या सहा तुकड्या या भागात तैनात केल्या जात आहेत. भारतीय सैन्य एक पुनर्रचना करत आहे. आपले पुष्कळसे सैन्य पाकिस्तान सीमेवर तैनात असायचे. पण तेथून त्यांना हलवून या भागात आणले जात आहे. थोडक्यात, दोन प्रकारच्या सैन्याकडून सध्या चीनच्या आगामी घुसखोरीचा बंदोबस्त केला जात आहे. एक म्हणजे चिनी सैन्याला सीमेवरून आत घुसू न देण्यासाठी मोठी बलदंड जवानांची तुकडी तयार करण्यात आली आहे; तर लडाखच्या भागासाठी एक आक्रमक कोअरही तैनात करण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेशच्या बाजूलाही अशीच आक्रमक कोअर तैनात आहे. ईशान्य भारतामध्ये दोन ते तीन तुकड्या चिनी सैनिकांचा प्रतिबंध करण्यासाठी तैनात आहेत.

सारांशाने सांगायचे झाल्यास, भारताच्या बाजूने चीनच्या संभाव्य आक्रमकतेचा सामना करण्यासाठी पूर्ण तयारी झाली आहे. अलीकडील काळात चीन आशिया प्रशांत क्षेत्रात आपली आक्रमकता वाढवत आहे. या क्षेत्रात अमेरिकेचा हस्तक्षेप चीनला खुपला आहे. क्वाड गटामध्ये भारताचा झालेला सहभाग आणि या गटाची सक्रियता चीनला डाचते आहे. तसेच कोव्हिडनंतरच्या गेल्या दोन-अडीच वर्षांत भारताचा जागतिक पातळीवर जो प्रभाव वाढला आहे, त्यामुळे चीन अस्वस्थ आहे. यामुळेच भारताला पुन्हा एकदा दक्षिण आशिया खंडामध्येच गुंतवून ठेवण्यासाठी चीन वारंवार तणावनिर्मिेती करत राहणार असे दिसते.

-ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news