खेलो इंडिया : ऑलिम्पिकसाठी पायाभरणी | पुढारी

खेलो इंडिया : ऑलिम्पिकसाठी पायाभरणी

आयपीएलमधून भारताला क्रिकेटमध्ये नवनवे खेळाडू मिळाले, तसेच खेलो इंडियाबाबत व्हायला हवे. भविष्यातील ऑलिम्पिकवीर घडवण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा, असेच या स्पर्धेचे स्वरूप उत्तरोत्तर विकसित झाले पाहिजे. एखादाच नीरज चोप्रा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकतो, हे चित्र बदलण्याची वेळ आता आली आहे. आपल्या देशात सर्वार्थाने क्रीडा संस्कृती रुजावी या हेतूने सुरू करण्यात आलेली ‘खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धे’चा चौथा हंगाम नुकताच हरियाणात पार पडला. अपेक्षेप्रमाणे त्यात यजमान संघाने बाजी मारली आणि महाराष्ट्राला दुसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. यात कोणी कोणता क्रमांक पटकावला यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकणारे खेळाडू अशा स्पर्धांच्या माध्यमातून तयार करणे.

17 आणि 21 वर्षांखालील युवाशक्तीला आपले क्रीडाविषयक कसब दाखवण्यासाठी एक दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा एक कल्पक उपक्रम म्हणता येईल. एक प्रकारे ही क्रीडा क्षेत्रातील प्रज्ञाशोध परीक्षाच आहे. नेटके आयोजन, विविधांगी क्रीडा प्रकारांचे थेट प्रक्षेपण यामुळे या स्पर्धेची एक वेगळी ओळख क्रीडाजगतात तयार होत चालली आहे. गेल्या चार वर्षांत या स्पर्धेत महाराष्ट्राने दमदार कामगिरी करत भरघोस पदकांची कमाई केली आहे. यावेळी हरियाणातील पंचकुला क्रीडा संकुलात पार पडलेल्या स्पर्धेत महाराष्ट्राने खो-खोमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले. ठाण्याच्या संयुक्ता काळेने तब्बल पाच सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले. सांगलीतील चहावाल्याची कन्या काजोल हिने वेटलिफ्टिंगमध्ये सोनेरी कामगिरी करून दाखवली. तिचे सर्वत्र खूप कौतुकही झाले.

आता खरा प्रश्न असा आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर ही मुले चमकण्यासाठी त्यांच्यावर आणखी पैलू कसे पाडायचे? या स्पर्धेतील कामगिरीनंतर पुढील वाटचालीत खेळाडूंना किती फायदा झाला, त्यांच्या कामगिरीत सुधारणा झाली काय, यातील किती खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले, तिथे त्यांची कामगिरी कशी झाली या सगळ्यांचा लेखाजोखा सातत्याने घेतला पाहिजे कारण ती खरोखरच काळाची गरज आहे. हे केवळ महाराष्ट्रापुरते नाही. कारण ‘खेलो इंडिया’ ही देशातील एक महत्त्वाची स्पर्धा असल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर खेळल्यानंतर या खेळाडूंच्या प्रगतीचा आलेख कसा उंचावत जाईल, त्या प्रगतीची नोंद कशी ठेवता येईल, हे पाहायला हवे.

शिष्यवृत्तीचा विनियोग

केंद्र सरकारच्या वतीने या स्पर्धेतील 1 हजार खेळाडूंना सलग आठ वर्षे वार्षिक आठ लाख रुपये शिष्यवृत्तीच्या रूपाने दिले जातात. मात्र, फक्त पैसे आहेत म्हणून लगेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पदकांची रास जमा झाली असे होत नाही. हे खेळाडू या पैशांचा विनियोग कशा प्रकारे करत आहेत याच्यावर लक्ष ठेवले पाहिजे. सरकार, पालक आणि खेळाडूंचे प्रशिक्षक अशा तीन घटकांना हे काम निग्रहाने करावे लागले. सरकारने या शिष्यवृत्ती संपादलेल्या खेळाडूंची अद्ययावत माहिती ठेवून त्यांच्या कामगिरीचा आढावा नियमितपणे घेणे गरजेचे आहे. या खेळातील कामगिरी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी खेळाडूंना किती साह्यभूत ठरणारी आहे, याचीही नोंद ठेवायला हवी. ही स्पर्धा विविधांगी खेळांनी सजलेली आहे. त्यामुळे तिला स्पर्धेचे स्वरूप ऑलिम्पिकसारखेच आहे. जागतिक पातळीवरील स्पर्धांच्या तुलनेत या खेळाडूंची कामगिरी कशी आहे, याची पडताळणी व्हायला हवी. आशियाई, राष्ट्रकूल आणि मग जागतिक स्पर्धांत खेळण्यासाठी आणखी किती मेहनत खेळाडूंना घ्यावी लागेल, ते कुठे कमी पडत आहेत, त्यांची दिशा काय असली पाहिजे यावर गंभीरपणे विचार करून तशी कृती झाली पाहिजे.

वयचोरी आणि उत्तेजकांचा धोका

अशा स्पर्धांत चमकल्यानंतर जर घसघशीत पैसे मिळणार असतील, तर वय आणि उत्तेजक चाचणी या दोन्ही गोष्टींवर प्रकर्षाने लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकवेळा काही खेळाडू 17 किंवा 21 वर्षांखालील खरोखरच आहेत काय, असा प्रश्न पडतो. त्यांची शरीरयष्टी, चाल, क्षमता आदींचे निरीक्षण केले तर काही खेळाडू जास्त वयाचे असल्याचे जाणवते. यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. स्पर्धेला मिळत असलेली प्रसिद्धी, शिष्यवृत्ती यामुळे खेळाडूंना वयचोरी करून खेळवण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण अशीच सवय लागली तर पुढे जाऊन खेळाडूंसाठी आणि खेळासाठीही असले प्रकार मारक ठरू शकतात. त्यासाठी जे खेळाडू खेलो इंडियात भाग घेतील, त्यांचे वयाचे दाखले तर तपासले पाहिजेतच; पण त्यांच्या वय निश्चित करणार्‍या विविध चाचण्या करून त्याचेही अहवाल मागवले गेले पाहिजेत. त्यामुळे वयचोरीला आळा घालता येईल. याला प्रामुख्याने प्रशिक्षक आणि पालकही बर्‍याचअंशी जबाबदार असतात.

आपला पाल्य किंवा शिष्य जास्त वयाचा आहे, हे माहीत असतानाही त्याला भाग घेऊ दिला जातो. तो खेळाडू स्पर्धेत जिंकतही असला तरी ते त्याचे यश काळवंडलेले असते. मग पुढे हे खेळाडू मुख्य प्रवाहात येतात तेव्हा त्यांचे बिंग फुटते. मग त्यांची पीछेहाट होऊ लागले. म्हणूनच वयचोरीवर लक्ष ठेवणे हे सरकारचे काम असेल तेवढेच पालक आणि प्रशिक्षकांचेही. अर्थात, गेल्या काही वर्षांपासून यासंदर्भात कमालीची जागरूकता आल्यामुळे, त्याची तपासणी वेळोवेळी केली जात आहे. साहजिकच या प्रकारांना वेगाने आळा बसत चालला आहे. दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे उत्तेजकांचे सेवन. आजकाल याविषयी मोठ्या प्रमाणावर प्रबोधन होऊ लागले आहे. अनेक खेळाडूंना त्यासाठी शिक्षाही झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोणत्याही स्थितीत उत्तेजकांचा वापर खपवून घेतला जाणार नाही, असे खेळाडू सापडल्यास त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय नियमांनुसार कठोर कारवाई केली जाईल, हा संदेश सर्वदूर गेला पाहिजे. उत्तेजक चाचणीबरोबरच स्पर्धेच्या ठिकाणीही उत्तेजकांचे दुष्परिणाम, त्याविषयीचे कायदे-नियम, कारवाई याविषयीची मूलभूत माहितीही खेळाडू, पालक, प्रशिक्षकांपर्यंत पोहोचवणे सहज शक्य आहे.

सहभागी राज्यांची कामगिरी

‘खेलो इंडिया’ स्पर्धेतला एक महत्त्वाचा भाग म्हणजे या स्पर्धेत महाराष्ट्र आणि हरियाणा यांचाच वरचष्मा दिसला आहे. कर्नाटक आणि दिल्ली यांचाही कामगिरी चांगली झाली आहे. इतर राज्ये त्या तुलनेत खूपच मागे आहेत. ही राज्ये या स्पर्धेत पूर्ण ताकदीने सहभागी होतात काय, कोणत्या खेळांत त्यांचा सहभाग असतो, कोणत्या खेळांत सगळी राज्ये भाग घेतात, त्यांची या क्रीडा प्रकारातील कामगिरी काय, या सगळ्यांचा अभ्यास होणे गरजेचे आहे. त्यातून आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवण्यासाठी कोणत्या क्रीडा प्रकारांवर आपण विशेष मेहनत घेऊ शकतो, हे ठरवणे सहज शक्य होईल. गुवाहाटी येथे 2020 साली झालेल्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेमुळे ईशान्येकडील राज्यांत क्रीडा संस्कृती बाळसे धरू लागल्याचे दिसून येते. सध्या 17 आणि 21 हे वयोगट ‘खेलो इंडिया’साठी निश्चित करण्यात आले आहेत. ‘कॅच देम यंग’ या उक्तीनुसार यामध्ये नजीकच्या काळात 14 वर्षांखालील वयोगट आणता येईल का, या दिशेने विचार व्हायला हवा. त्यातून क्रीडाक्षेत्राचा पाया रचण्यात महत्त्वाची भूमिका बजावता येईल का, याचा विचार नक्कीच करता येईल.

शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन दरवर्षी केले जात असले तरी या स्पर्धांचा दर्जा फारसा उच्च नसतो. त्या स्पर्धांतील अव्वल आठ खेळाडूंना ‘खेलो इंडिया’त स्थान मिळते. त्यापेक्षा विविध ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धा आणि शालेय क्रीडा स्पर्धांतील खेळाडूंचा एकत्रित विचार केला, तर खेलो इंडिया स्पर्धेचा दर्जा आणखी उंचावता येईल. या स्पर्धेची वाटचाल चांगल्या प्रकारे होऊ लागली आहे. जसे आयपीएलमधून भारताला क्रिकेटमध्ये नवनवे खेळाडू गवसले तसेच ‘खेलो इंडिया’बाबत म्हणता येईल. सुदैवाने मोदी सरकारने या स्पर्धेसाठी 974 कोटी रुपयांची भक्कम तरतूद केली आहे. त्यामुळेभविष्यातील ऑलिम्पिकवीर घडवण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा असेच या स्पर्धेचे स्वरूप उत्तरोत्तर विकसित झाले पाहिजे. एखादाच नीरज चोप्रा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकतो आणि मग त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी अनेकांची झुंबड उडते. हे चित्र बदलण्याची वेळ आता आली आहे. ‘खेलो इंडिया’सारखी स्पर्धा त्याद़ृष्टीने प्रेरणादायी ठरावी.

  • सुनील डोळे

Back to top button