बदलती खेडी, बदलता भारत | पुढारी

बदलती खेडी, बदलता भारत

प्रा. रंगनाथ कोकणे

गुणवत्ताप्रधान शिक्षण, चांगली हमी आरोग्यसेवा तसेच सुरक्षित आणि अर्थकारणाला बळकटी देणारे रस्ते या तीन बाबींकडे आपण लक्ष दिले, तर ग्रामीण भारताचे चित्र झपाट्याने बदलू शकते. आज दूरध्वनी, मोबाईल या सेवा खेड्यात पोहोचल्या आहेत. पण खेड्यातील लोकांची राहणीमानाची पातळी उंचावेल, तेव्हा इंडिया आणि भारत यांच्यातील अंतर कमी होईल आणि देश खर्‍या अर्थाने सुजलाम सुफलाम होईल.

भारतामध्ये एकूण 60 लक्ष 49 हजार खेडी आहेत. यातील बरीचशी खेडी आजही स्वातंत्र्यसूर्याच्या प्रकाशापासून दूर आहेत. शहरे आणि खेडी यातील अंतर किती कमी झाले असा प्रश्न विचारला, तर त्याचे उत्तर देणे अवघड आहे. जोपर्यंत आपण महानगरे आणि खेडी यातील अंतर कमी करत नाही, तोपर्यंत इंडिया आणि भारत यातील अंतर वाढतच राहणार आहे. आज सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आपल्या समाजात किती रूजली आहे?

अभियंता झाल्यानंतर, डॉक्टरची पदवी मिळाल्यानंतर खेड्यात जाऊन तिथे काम करणे, तिथल्या लोकांना वैद्यकीय सेवा देणे, हे किती लोक करतात? माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम म्हणत, की माहितीचे स्वयंचलन हाच भारताच्या प्रगतीचा मार्ग व्हावा. माहितीचे संचलन जेवढ्या गतीने करू, तेवढ्याच गतीने आपला विकास होईल. तेव्हा प्रगत माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे आपणास शहरे आणि खेडे यातील अंतर कमी करणे शक्य होईल. आज त्याचा प्रत्यय येताना दिसत आहे; पण त्याचा वेग खूप कमी आहे.

इतिहासात डोकावल्यास, स्वातंत्र्यानंतर खरे चित्र बदलले ते 1977 नंतर. लोकांमध्ये जागृती होऊ लागली आणि विकासाच्या विषयीच्या आशा-आकांक्षांना धुमारे फुटू लागले. 1971 साली बांगला देशच्या युद्धातून मुक्त झाल्यानंतर अण्णा हजारे त्यांच्या राळेगणसिद्धी या गावी परतले. आपल्याजवळचा भविष्य निर्वाह निधी जमा करून त्यातून हिंद स्वराज्य संस्थेची स्थापना केली. या हिंद स्वराज्य संस्थेच्या वतीने राळेगणसिद्धी या गावात अनेक विकासाचे प्रकल्प सुरू करण्यात आले.

श्रमदानाने एक कोटीचा रस्ता तयार केला. गावात हजारो झाडे लावली. पण त्यांच्या असे लक्षात आले, की गावाचा विकास करायचा तर कळीचा प्रश्न आहे पाणी. जंगलतोड मोठ्या प्रमाणावर झाली, गावातील नदी, नाले, विहिरी आटू लागल्या, पाण्याचा वॉटर टेबल सातत्याने खाली चालला होता. अशावेळी पाणलोट क्षेत्र विकास हा विकासाचा आत्मा आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी छोट्या छोट्या पद्धतीने आपल्या क्षेत्रात पाणलोट क्षेत्राची कामे केली.

त्यातून लोकांच्या मनात विश्वास निर्माण झाला आणि गावाचे रूप पालटले. पाहता पाहता राळेगणसिद्धीला पाहण्यासाठी लोक देशाच्या कानाकोपर्‍यातून येऊ लागले. पुढे राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांनी आदर्श गाव योजना राबवली. पोपटराव पवार यांच्या हिवरेबाजार गावानेसुद्धा भारताच्या नकाशावर लक्ष वेधण्यास प्रारंभ केला आणि ग्रामविकासाचे आदर्श मॉडेल त्यांनी उभे केले.
माहिती आणि दारिद्य्राचा महत्त्वाचा आणि जवळचा संबंध आहे.

ज्यांना प्रगत माहितीच्या साधनांद्वारे विकासाच्या योजनांची माहिती होते, तिथे विकासाची नवी जाणीव होते. लोक दारिद्य्रावर मात करू शकतात. पण जिथे माहितीचा अभाव आहे, साधनांचा किंवा प्रसारमाध्यमांचा अभाव आहे, तिथे गरिबी, दैन्यावस्था असते. त्यामुळेच ग्रामीण भागातील लोकांनी ठरवले पाहिजे, की आपणास जर खर्‍या अर्थाने विकासाचे चित्र बदलायचे असेल, तर इंटरनेट, मोबाईल, टॅब्लेट यांचा चतुराईने वापर करता आला पाहिजे. हा वापर करण्यात ग्रामीण लोक जितके तत्पर होतील, तितकीच त्यांना अधिक माहिती मिळेल. ग्रामीण भागातील माहिती तंत्रज्ञानाच्या वापराबाबत शेती, लघुद्योग, शिक्षण या तीन क्षेत्रांवर लक्ष दिले पाहिजे.

शेतीतील सिंचन व्यवस्थांचे प्रश्न असो, उद्योगातील गुणवत्तेचा प्रश्न असो, लघुउद्योगातील गुणवत्तेचा प्रश्न असो किंवा शिक्षणातील दर्जा वाढवण्याचे प्रयत्न असो, या तीनही बाबतीत प्रगत माहिती तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, याबाबत ग्रामीण जनतेला शिक्षित करण्याची गरज आहे.

आज मोदी सरकारच्या विविध योजनांमुळे ग्रामीण भागातील लोकांना संगणकाचे ज्ञान होते आहे. मुद्रा योजनेतून लघु उद्योग, लघु तंत्रज्ञ, कारागीर यांना विपुल वित्तसाहाय्य करून त्यांना स्वबळावर उभे करण्याचा प्रयत्न होतो आहे. खादी ग्रामोद्योगानंतर ग्रामीण भागात मुद्रा योजनेने दुसरी क्रांती घडवून आणली आहे. महिलांनी उभे केलेले छोटे-छोटे महिला बचत गट आणि त्यांचे स्वयंउद्योग ही आता स्वाभिमानाची गोष्ट ठरली आहे. खेड्यातील उद्योजक महिला मुंबईच्या मोठ्या-मोठ्या मार्गावर आपल्या वस्तूंची प्रदर्शने करून आपल्या कौशल्याची माहिती लोकांना करून देत आहेत. प्रगत माहिती तंत्रज्ञानाच्या वापराबाबत खेड्यामधील मनुष्य कमालीचा जागृत होत आहे. त्याला या सर्व साधनांच्या बाबतीत प्रशिक्षण आणि प्रबोधन यापासून दूर ठेवता कामा नये.

एक काळ असा होता, की पर्यावरण बदलांचा परिणाम केवळ महानगरांवर होईल, असे वाटत होते. मात्र, आता पर्यावरणीय बदलांचे परिणाम खेड्यांवरही होत आहेत. अचानक येणारे पूर, प्रचंड वाढणारी उष्णता, हवामानातील बदल या सर्व गोष्टी पाहता शेती, पिके, पिकांचे नियोजन या सर्व बाबतीत अनेक अडचणी निर्माण होत आहेत. तेव्हा वातावरण बदलामुळे ग्रामीण विकासात कोणते अडथळे निर्माण होत आहेत, याबाबत शेतकर्‍यांमध्ये, खेड्यातील ग्रामस्थांमध्ये जागृती घडवून आणली पाहिजे. खेड्यातील आर्थिक विकासाचा वेग पाहता आपणास आपल्या विकासाची व्यूहरचना केली पाहिजे.

नीती आयोगाने जे महत्त्वाचे घटक विकासाचे म्हणून काही मुद्दे समोर ठेवले आहेत, त्यामध्ये ग्रामीण विकासाचे काही पैलू आहेत, त्याकडे आपण विशेषत्वाने लक्ष दिले पाहिजे. ग्रामीण भागात सौरऊर्जा प्रकल्प राबवले पाहिजेत. शेतीतील उत्पन्न दुप्पट करण्यासाठीच्या योजना वेगाने आणल्या पाहिजेत. लघुउद्योजकांना प्रशिक्षण दिले पाहिजे. ग्रामोद्योग, खादीउद्योग यांना अधिक प्रमाणात साहाय्य केले पाहिजे. जेणेकरून खेड्यातील उद्योजक स्वतःच्या पायावर उभा राहील आणि मोठ्या बाजारपेठा काबीज करेल. त्यासाठी त्याला प्रशिक्षण आणि अर्थसाहाय्याची गरज आहे.

आपल्या देशात ग्रामीण भागात अर्थकारणाची जीवनरेषा म्हणजे आठवडी बाजार होय. खेड्याच्या अर्थव्यवस्थेत आठवडी बाजारांना खूप महत्त्व आहे. आपल्या भागात तयार झालेल्या वस्तू आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या बाजारपेठेतून होणारे व्यवहार हे खूप महत्त्वाचे आहेत. 2009, 2012 या काळात आलेल्या मंदीला भारत समर्थपणे तोंड देऊ शकला, त्याचे कारण म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांची बचत करण्याची प्रवृत्ती आणि स्वावलंबी ग्रामीण भारत यामुळे भारत चीनपेक्षा अधिक सुरक्षित राहू शकला. जागतिक अर्थव्यवस्थेत आपला पाठीचा कणा ताठ ठेवू शकला. त्यामुळे भारताच्या ग्रामीण अर्थकारणास एक भक्कम पाठबळ देणे आजच्या जागतिक आर्थिक परिस्थितीत अत्यंत गरजेचे आहे.

विद्यमान सरकारने ग्रामसडक योजना, रोजगार हमी योजना, कृषी योजना, पंतप्रधान आवास योजना यासारख्या योजनांच्या माध्यमातून हे प्रयत्न चालवले आहेत. या जोडीला नजीकच्या काळात शहरात आरोग्याच्या सुविधा प्राप्त होतात, तशाच सुविधा प्रत्येक खेडुताला मिळाल्या पाहिजेत. दर हजारी लोकसंख्येमागे ज्याप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्रे स्थापन केली आहेत, त्याहीपेक्षा उत्तम अशी मोबाईल रुग्णवाहिका आपण तयार केली पाहिजे. नॉर्वेसारख्या देशात रुग्णाला ज्या पद्धतीची रुग्णसेवा दिली जाते, तशीच रुग्णसेवा भारतात ग्रामीण भागात उपलब्ध करून दिली पाहिजे.

त्यामुळे गुणवत्ताप्रधान शिक्षण, चांगली हमी देणारी आरोग्यसेवा तसेच सुरक्षित आणि अर्थकारणाला बळकटी देणारे रस्ते या तीन बाबींकडे आपण लक्ष दिले, तर ग्रामीण भारताचे चित्र झपाट्याने बदलू शकते.

मागील काळात जनधन खात्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना बँकेची खाते उघडण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले, त्यांचा आधार मजबूत होत आहे. सौरऊर्जा प्रकल्पाची माहिती, ग्रामपंचायतीतून उपलब्ध होणारी इंटरनेट सेवा, शेतीचे ज्ञान, 7-12 ची माहिती हे सर्व संगणकाद्वारे उपलब्ध होत आहे. भविष्यकाळात आपणास आपल्या शेतकर्‍याला अधिक सामर्थ्य द्यायचे आहे. ‘जय जवान, जय किसान’ ला जोडून ‘जय विज्ञान, तंत्रज्ञान’ अशीही घोषणा करण्यात आली आहे.

विज्ञान आणि संशोधन यांची फळे ग्रामीण लहानलहान आणि मध्यम शेतकर्‍यांपर्यंतही पोहोचले पाहिजेत. आपल्या खेड्यांमध्ये नवचैतन्य आणण्यासाठी दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेल्या विविध योजनांचा परामर्श घेऊन ‘ग्रामोदय ते भारत उदय’ असा एक अभिनव प्रकल्प आखला आहे. तो प्रकल्प खरोखर प्रत्येक भारतीयाने कृतीत आणला पाहिजे. त्यातून ग्रामीण भागाचा भाग्योदय होईल आणि त्यातून नवभारत उभा राहू शकेल.

भविष्यकाळात भारताला अधिक सुजलाम सुफलाम, सुखी बनवायचे आहे. महात्मा गांधींची हिंद स्वराज्याची कल्पना कृतीत आणावयाची आहे. महात्मा गांधी म्हणत असत, की माझा लोकशाही भारत तो असेल ज्यामध्ये गरिबातील गरीब माणसाला श्रीमंत, बलिष्ठ माणसाएवढी विकासाची संधी प्राप्त होईल. कृषी विकासाची संधी खेड्यात राहणार्‍या माणसाला सुद्धा प्राप्त करून दिली पाहिजे.

आचार्य विनोबा भावे यांनी त्यास साम्ययुगाची जोड दिली. लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी सर्वोदयातून सामुदायिक विकासाचा विचार मांडला. या सर्व कल्पनांचा पाठपुरावा करून 21 व्या शतकात आपल्याला समर्थ व बलशाली भारत उभा करायचा आहे. स्वातंत्र्यसूर्याचा प्रकाश खेड्यात राहणार्‍या माणसांच्या अंगणात पडला, तर ते खर्‍या अर्थाने मुक्त, स्वतंत्र आणि निर्भय होऊ शकतील.

अमेरिकेत पहिल्यांदा गेल्यानंतर माझ्या अशा लक्षात आले, की न्यूयॉर्क, वॉशिंग्टनमध्ये ज्या सुविधा आहेत, त्या पीटसबर्गसारख्या छोट्या छोट्या गावांतूनसुद्धा आहेत. आपल्या देशात आज दूरध्वनी, मोबाईल या सेवा खेड्यात पोहोचल्या आहेत. पण शहरांतील लोकांची सुरक्षित, सुखी, संपन्न जीवनाची पातळी उंचावली आहे, तशीच जीवनपातळी आणि राहणीमानाची पातळी खेड्यातील लोकांची सुद्धा उंचावेल, तेव्हा इंडिया आणि भारत यांच्यातील अंतर कमी होईल आणि देश खर्‍या अर्थाने सुजलाम सुफलाम होईल.

Back to top button