क्राईम : पंजाबी सिनेमाला गँगस्टरचा विळखा | पुढारी

क्राईम : पंजाबी सिनेमाला गँगस्टरचा विळखा

पंजाबमध्ये ‘आप’चे सरकार सत्तेवर आल्यानंतर एकीकडे खलिस्तानवाद्यांच्या कारवायांनी डोके वर काढले आहे, तर दुसरीकडे गुन्हेगारी टोळ्यांचा धुमाकूळ सुरू झाला आहे. प्रश्न असा आहे की, पंजाबी चित्रसृष्टीला विळखा घालणार्‍या गुन्हेगारी टोळ्यांचा नायनाट कसा करायचा? सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येने हा मुद्दा नव्याने ऐरणीवर आला आहे. एक काळ असा होता की, हिंदी चित्रपटसृष्टी म्हणजेच बॉलीवूडला गुन्हेगारी जगताने कराल विळखा घातला होता. त्यावेळी प्रामुख्याने डी गँग अर्थात दाऊद इब्राहिमच्या टोळ्यांची प्रचंड दहशत होती. अनेक तारे-तारका भय किंवा अन्य कारणाने या गँगस्टरच्या आदेशाबरहुकूम काम करत असल्याचे चित्र होते. आता तसाच प्रकार पॉलीवूडच्या म्हणजे पंजाब चित्रपटसृष्टीत पाहायला मिळतो आहे. त्यातही गायकांना खंडणीसाठी धमकावले जात आहे.

काही काळापूर्वी पंजाबी अभिनेते परमीश वर्मा यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. पाठोपाठ गिप्पी ग्रेवाल यांना धमकावण्यात आले. त्याचवेळी सिद्धू मुसेवाला यांनाही धमकावण्यात आले होते. अखेर 29 मे रोजी दिवसाढवळ्या त्यांची हत्या करण्यात आली आणि भय इथले संपणार नाही, याची दाहक प्रचिती आली. परमीश वर्मा यांच्यावर मोहालीत गोळीबार झाला आणि दैव बलवत्तर म्हणून ते थोडक्यात बचावले. या हल्ल्याचे एकमेव कारण म्हणजे खंडणी. याला गुन्हेगारी जगतात प्रोटेक्शन मनी असे गोंडस नाव देण्यात आले आहे. परमीश यांच्यावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी गँगस्टर दिलप्रीत बाबाने याने घेतली होती. पंजाबी गायक-अभिनेता गिप्पी अग्रवाल यांनाही धमकावण्यात आले होते. त्यांच्याकडूनही खंडणी वसूल करण्यात आल्याची वदंता आहे. तथापि, आपण आपला जीव वाचवण्यासाठी गँगस्टरना पैसे दिले, ही गोष्ट त्यांनी मान्यच केली नाही.

पंजाबी गायक मनकीरत औलख यांनाही काही दिवसांपूर्वी अशीच धमकी मिळाली होती. मनकीरत हे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मोहालीत खून झालेले युवा अकाली नेते विक्की मिड्डूखेडा यांचे निकटवर्तीय होते. विक्कीच्या हत्येची जबाबदारी गँगस्टर दविंदर बंबिहा टोळीने घेतली होती. ही टोळी आता लक्की पटियाल चालवीत आहे. बंबिहा टोळीने त्यावेळी दावा केला होता की, मनकीरत औलख 10 मिनिटे अगोदर निघून गेले; अन्यथा तेही वाचले नसते. आता सिध्दू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स गँगने घेतली आहे. लॉरेन्स सध्या तिहार तुरुंगात बंदिस्त आहे. लॉरेन्स गँगच्या कॅनडास्थित गोल्डी बरारने सोशल मीडियावर पोस्ट टाकली. त्यानंतर लॉरेन्स गँग व त्याचा साथीदार सचिन थापनने एका पोस्टद्वारे हा विक्की मिड्डूखेडाच्या हत्येचा बदला घेतला असल्याचा दावा केला.

पंजाबच्या चित्रसृष्टीत या घटना नव्याने घडलेल्या नाहीत. 1990 च्या दशकात प्रसिद्ध गायक अमरसिंग चमकीला व त्यांची पत्नी अमरज्योत यांचीही गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. 8 मार्च 1988 रोजी ते आपल्या पत्नीसह कारमधून जात होते, तेव्हा त्यांचा खून करण्यात आला. या खुनाचे रहस्य आजही कायम आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणारा गँगस्टर गोल्डी ब्रार याचे राजस्थानशीही संबंध आहेत. कॅनडात बसलेला गँगस्टर ब्रार हा राजस्थानची लेडी डॉन अनुराधाचा क्राईम पार्टनर होता. हा तोच गोल्डी ब्रार आहे, ज्याचा संबंध गँगस्टर लॉरेन्सशी आहे. लेडी डॉन अनुराधा ही राजस्थानमधील कुख्यात गुंड आनंदपालची खास मैत्रीण होती. जून 2017 मध्ये आनंदपालच्या एन्काऊंटरनंतर अनुराधा लॉरेन्सच्या टोळीत सामील झाली. तेव्हापासून ती काला जठेडीसह टोळी चालवू लागली.

अनुराधाने लॉरेन्सच्या मदतीने गोल्डीसोबत आंतरराष्ट्रीय गुन्हे सिंडिकेट स्थापन केले होते. अनुराधाने तिचा नवरा गँगस्टर काला जठेडीसोबत भागीदारीत तिच्या 20 विरोधकांनाही संपवल्याचे मानले जाते. 31 जुलै 2021 रोजी अनुराधा आणि काला जठेडी यांना पकडले तेव्हा दिल्ली पोलिसांनी याची पोलखोल केली होती. दिल्ली पोलिसांनी अनुराधा आणि काला जठेडी यांची चौकशी केली तेव्हा त्यातून गोल्डी ब्रारचे नाव समोर आले. या टोळीत वीरेंद्र प्रताप उर्फ काला राणा हा (मूळचा हरियाणातील कर्नालचा रहिवासी) थायलंडमधून, सतेंद्रजीत सिंग उर्फ गोल्डी ब्रार (रा. मुक्तसर, पंजाब) कॅनडातून आणि माँटी (रा. पंजाब) ब्रिटनमधून टोळी चालवत होते.

या आंतरराष्ट्रीय टोळीला गँगस्टर लॉरेन्स आणि सुबे गुर्जरही मदत करत होते. लेडी डॉन अनुराधाच्या नेतृत्वाखाली काला जठेडी, कॅनडात बसलेले गोल्डी ब्रार, थायलंडमध्ये बसलेले वीरेंद्र प्रताप आणि पंजाबचे माँटी हे सगळे दिल्ली, राजस्थान, पंजाब आणि हरियाणामध्ये गुन्हेगारी कारवायात गुंतले होते. अनुराधाच्या इशार्‍यावरून या सर्वांनी अवघ्या दोन वर्षांत विरोधकांना संपवले. हाय प्रोफाईल खंडणी, आंतरराज्य दारू तस्करी, अवैध शस्त्रास्त्रांची तस्करी आणि जमीन बळकावणे ही या टोळक्याची कमाईची साधने होती. लेडी डॉन अनुराधाला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने गँगस्टर काला जठेडीसह उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून अटक केली. सध्या अनुराधा राजस्थानच्या अजमेर तुरुंगात बंदिस्त आहे.

अनुराधा ही आनंदपालच्या संपर्कात आली व नंतर तिने आनंदपालचा पेहराव बदलल्याचे सांगितले जाते. त्याला इंग्रजी बोलायलाही शिकवले जात होते. या बदल्यात आनंदपालने अनुराधाला एके-47 चालवायला शिकवले. अनुराधा बेकायदा शस्त्रास्त्रांच्या हेराफेरीत आनंदपालला सहकार्य करत असे. आनंदपालच्या एन्काऊंटरनंतर ती पळून गेली होती. यादरम्यान, अनुराधा लॉरेन्सच्या मदतीने काला जठेडीला भेटली. त्यानंतर ती त्याची संपूर्ण टोळी चालवू लागली. राजस्थानमध्ये अनुराधावर हत्या आणि अपहरणाचे 12 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. यामध्ये दरोडा, अपहरण, खंडणीची मागणी यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील बहुतांश घटना या अपहरणाच्या आहेत. अनुराधाचे घरचे नाव मिंटू असून, ती राजस्थानातील सिकरची रहिवासी आहे. लहानपणीच आई गेल्यानंतर मिंटू(अनुराधा)वर फक्त वडिलांची सावली उरली होती.

अनुराधा अभ्यासात हुशार होती. तिने बीसीएसारखी व्यावसायिक पदवी घेतली. सामान्य नोकरी ही तिची महत्त्वाकांक्षा नव्हती. लग्नानंतर अनुराधा आणि तिचा पती फेलिक्स दीपक मिंज यांनी सिकरमध्ये शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय सुरू केला. दोघांनी मिळून लोकांचे लाखो रुपये ट्रेडिंगमध्ये गुंतवले. अचानक त्यांचा व्यवसाय कोलमडून कोट्यवधींच्या कर्जात बुडाला. कर्ज फेडण्यासाठी तिने गुन्हेगारीचा मार्ग निवडला आणि पतीलाही टाटा केला. आता मुसेवालाच्या हत्येनंतर दिल्लीच्या नीरज बवाना गँगने सांगितले की, आम्ही सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा बदला घेणार आहोत. यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून धमक्या देण्यात आल्या आहेत. टिल्लू तेजपुरिया, कौशल गुडगाव आणि दविंदर बंबिहा टोळीचाही बवाना गँगशी संबंध आहे.

अशा स्थितीत आगामी काळात पंजाबमध्ये गँगवॉर भडकण्याची शक्यता बळावली आहे. नीरज बवाना हा दिल्लीचा रहिवासी आहे. त्याच्यावर खून, दरोडा, खंडणीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो तिहार तुरुंगात आहे. तेथून ही गँग कार्यरत आहे. नीरजच्या गँगमध्ये हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील बदमाशांचा समावेश आहे. आता प्रश्न असा आहे की, या पंजाबी चित्रपटसृष्टीला भीतीच्या टाचेखाली आणलेल्या गुन्हेगारी टोळ्यांचा नायनाट कसा करायचा? कारण सिद्धू मुसेवाला यांची हत्या झाल्यानंतर हा मुद्दा नव्याने ऐरणीवर आला आहे.

पंजाबमध्ये प्रामुख्याने आम आदमी पार्टीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर एकीकडे खलिस्तानवाद्यांच्या कारवायांनी डोके वर काढले आहे आणि दुसरीकडे या गुन्हेगारी टोळ्यांचा धुमाकूळ सुरू झाला आहे. मुख्यमंत्री भगवान मान यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पंजाबमधील गुन्हेगारीचा कठोरपणे बीमोड करण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन पंजाबी चित्रपटसृष्टी भयमुक्त करणे, ही आता काळाची गरज बनली आहे.

  • सुनील डोळे

Back to top button