वेध चंद्रावरल्या शेतीचे!

वेध चंद्रावरल्या शेतीचे!
वेध चंद्रावरल्या शेतीचे!
Published on
Updated on

हॉलीवूडच्या काही चित्रपटांमधील नायक अन्य ग्रहांवर जाऊन शेती करून उदरनिर्वाह करताना दाखविला गेला आहे. परंतु हे वास्तवात कधी येईल का? असा प्रश्‍न होता. चंद्रावरील मातीत रोप उगवून आल्यामुळे किमान तेथील माती सुपीक आहे, तेथे रोपे उगवून येऊ शकतात, या वास्तवावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. काही वर्षांपूर्वी ज्या चंद्राकडे लहान मुले आपला मामा म्हणून पाहत होती, त्याच चंद्रावर नंतर मानवाची पावले उमटली. नंतरची पिढी चंद्रावर वसाहत तयार करण्याचा विचार करू लागली. चंद्रावर पाणी आणि अन्य जीवनोपयोगी गोष्टींचा शोध घेऊ लागली. आता नवी पिढी चंद्रावर चक्‍क शेती करू पाहत आहे. होय! विश्‍वास बसणार नाही; पण हे खरे आहे.

चंद्रच नव्हे, तर मंगळासह पृथ्वीबाहेर वसाहती उभारण्याचे स्वप्न पाहणार्‍यांना चांदोमामाकडून खूप अपेक्षा आहेत. अंतराळवीरांचा असा विश्‍वास आहे, की अंतराळात दीर्घकाळ राहण्यासाठी चंद्रावर शेती करणे खूप महत्त्वाचे आहे. अन्‍नाचा साठा संपल्यावर अंतराळवीरांना पुन्हा पृथ्वीच्या दिशेने यावे लागते किंवा पृथ्वीवरून अंतराळ स्थानकावर अन्‍न मागवावे लागते. आता चंद्रावर शेती करण्याच्या द‍ृष्टीने एक छोटेसे पाऊल टाकत चंद्राच्या मातीत एक वनस्पती वाढविण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. ही माती नासा या अमेरिकी अंतराळ संस्थेच्या 'अपोलो' मोहिमेदरम्यान पृथ्वीवर आणण्यात आली होती. या घवघवीत यशामुळे आता अंतराळात वसाहती उभारण्याचे स्वप्न साकार होताना दिसत आहे.

अमेरिकेतील फ्लोरिडा विद्यापीठातील संशोधकांनी नासाच्या अपोलो 11, 12 आणि 17 या मोहिमेदरम्यान गोळा केलेल्या चंद्राच्या मातीत ही रोपे वाढविली आहेत. या यशामुळे आता भविष्यातील अंतराळ मोहिमांमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर वनस्पती वाढू शकतील, अशी आशा निर्माण झाली आहे. यासोबत चांदोमामाच्या घरीही एखादी व्यक्‍ती वस्ती स्थापन करू शकेल. या संशोधनाच्या लेखकांपैकी एक असलेले रॉब फेरेल म्हणाले, 'आम्ही चंद्राचा वापर भविष्यातील दीर्घकालीन अंतरिक्ष मोहिमांसाठी केंद्र किंवा प्रक्षेपण पॅड म्हणून करू शकतो.' रॉब म्हणाले, 'चंद्रावरील मातीचा वापर करून त्यात रोपे वाढविणे हे शहाणपणाचे ठरेल.' पूर्वीच्या संशोधनात चंद्राची माती सजीवांसाठी वापरली जायची. परंतु त्यावर वनस्पती उगविल्या जात नव्हत्या.

प्रा. रॉब यांच्या मते, जेव्हा तुम्ही चंद्राच्या पृष्ठभागावर वनस्पती वाढवण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा काय होईल हे पाहण्यासाठी त्यांच्या पथकाने चंद्राच्या मातीत थेले क्रेसच्या बिया टाकून त्याला पाणी, पोषक घटक आणि सूर्यप्रकाश दिला आणि नंतर त्या मातीत वनस्पती वाढीस लागली. या पथकाजवळ फक्‍त 12 ग्रॅम चंद्राची माती होती, जी नासाने दिलेली होती. इतकी कमी माती असल्यामुळे शास्त्रज्ञांना एका छोट्या भांड्यात रोप वाढवावे लागले. शास्त्रज्ञांनी थेले क्रेसचे बियाणे निवडले कारण त्याचा अनुवंशिक कोड पूर्णपणे मॅप केलेला आहे. तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांनी ते पृथ्वीवरून घेतलेल्या मातीतदेखील वाढविले. या प्रयोगामध्ये मंगळ ग्रहावरून आणलेल्या मातीसारखे गुणधर्म असलेली मातीही समाविष्ट आहे.

चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह पृथ्वीपासून 3 लाख 80 हजार किलोमीटर अंतरावर आहे. चंद्राचा स्वतःभोवती आणि पृथ्वीभोवती फिरण्याचा वेग एकसारखा असल्यामुळे चंद्राची एकच बाजू आपल्याला दिसते. तिला 'निअर साईड' असे म्हणतात, तर जी बाजू दिसत नाही तिला 'फार साईड' म्हणतात. चंद्राच्या फार साईडवर कोणत्याही देशाने आतापर्यंत यान उतरविले नव्हते; मात्र चीनने याही बाजूस यान उतरविण्याचा विक्रम केला. चांग ई-4 नावाच्या या यानातून चीनने विविध वर्गातील वनस्पती आणि भारतावरील माती पाठविली. माशीची अंडीही पाठवली होती आणि ती तेथे उबवतील, असा शास्त्रज्ञांचा अंदाज होता. वनस्पतीची बीजे तिथे रुजली तर त्यांचा बीजप्रसार या माश्या करतील, असेही त्यांना वाटत होते. परंतु हा प्रयोग यशस्वी झाला नाही. परंतु, ताज्या प्रयोगानंतर शास्त्रज्ञांना अशी आशा वाटू लागली आहे, की पुढील वेळी जेव्हा मानव चंद्रावर पाऊल ठेवेल तेव्हा तेथील जमिनीत रोपे उगवून आणण्यास तो सक्षम असेल.

कारण हा एक ऐतिहासिक प्रयोग ठरला आहे. चंद्रावरून यापूर्वीच्या मोहिमांमधून आणलेली माती ही सुपीक आहे का? त्यात वनस्पतींची वाढ होऊ शकेल का? याबाबत जगाला कुतूहल होते आणि किमान मातीच्या बाबतीत तरी आता हे कुतूहल शमले आहे. राहता राहिला विषय चंद्रावरील मातीव्यतिरिक्‍त अन्य परिस्थितीचा! ती सध्या तरी रोपे उगवून येण्यास पोषक नसल्याचे चीनने केलेल्या प्रयोगांमधून दिसून आले आहे. ताजे संशोधन 'जर्नल कम्युनिकेशन्स बायोलॉजी' या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. शास्त्रज्ञांना मिळालेली ताजी माहिती भविष्यात शास्त्रज्ञांना आणि अंतराळ प्रवाशांना उत्साह देणारी आहे. जर चंद्रावर राहायचे असेल, तर सॅलाडसारख्या वनस्पती तेथे उगवून आणणे आवश्यक आहे, असे मत अनेक शास्त्रज्ञांनी यापूर्वी व्यक्‍त केले होते. त्याचबरोबर अंतराळवीरांनी आपल्याबरोबर पुरेसे पाणी नेल्यास काही दिवस चंद्रावर राहता येऊ शकेल, असे मत व्यक्‍त होत होते.

हे संशोधन आणखीही एका कारणामुळे महत्त्वाचे ठरते. ते म्हणजे, माणसाला चंद्रावर जाण्याची ओढ पूर्वीपासूनच आहे; परंतु तो चंद्रावर फार काळ राहू शकत नाही. परंतु या संशोधनात निष्पन्‍न झालेल्या बाबी आणि पुढील संशोधन योग्य दिशेने राहिले, तर चंद्र हे सूर्यमालेतील पर्यटनाचे आवडते ठिकाण बनण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकेल. सध्या सातपेक्षा अधिक देशांचा चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात भारत, जपान, रशिया, दक्षिण कोरिया, संयुक्‍त अरब अमिराती आणि अमेरिकेचा समावेश आहे. नासाचा 83 अब्ज डॉलर खर्चाचा आर्टेमिस कार्यक्रम या वर्षापासूनच सुरू होईल. त्यानंतर चंद्रावर सहज भटकणारा माणूस दिसून येऊ शकेल. सर्व काही ठरल्याप्रमाणे झाल्यास पुढील वर्ष हे चंद्राविषयी संशोधनाचे सुवर्णवर्ष ठरेल.

खासगी कंपन्यांनी याबाबत जो उत्साह दाखविला आहे, त्यामुळे हा विषय केवळ शास्त्रीय राहिलेला नसून तो व्यापाराशी जोडला गेला आहे. लोकांकडे पैसा वाढत आहे. त्यांची इच्छाशक्‍तीही त्याबरोबरच वाढत आहे. कितीही पैसे मोजून चंद्रावर जाऊन येण्याची इच्छा बाळगणारे अनेक लोक आहेत. खासगी कंपन्यांचा असा प्रयत्न आहे, की अंतरिक्ष विज्ञान अशा प्रकारे विकसित केले जावे, जेणेकरून चंद्रावर जाणे सोपे आणि परवडण्याजोगे होईल. चंद्राच्या बाबतीत रशियाच्याही अनेक योजना आहेत. परंतु येणार्‍या काळात रशिया या योजना साकार करू शकेल का? असा प्रश्‍न सद्यःस्थितीमुळे निर्माण होत आहे. भारताने 'चांद्रयान-3' मोहिमेवर आता लक्ष केंद्रित करायला हवे. मागील मोहीम चंद्राच्या जवळ पोहोचून अयशस्वी ठरली. पुढील मोहीम एक ऑगस्टला लाँच होऊ शकली नाही, तरी जेव्हा केव्हा ती लाँच होईल तेव्हा त्याला यश मिळावे, अशीच प्रत्येक भारतीयाची अपेक्षा आहे. यावेळी मोहिमेत कोणतीही चूक होता कामा नये, त्रुटी राहता कामा नये. ज्यावेळी आपण आपला लँडर आणि रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरवू शकू, तेव्हा कोणताही भारतीय चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी रवाना होऊ शकतो.

संपूर्ण मानवजातीला पृथ्वीव्यतिरिक्‍त अन्य ग्रहांवर वसाहत स्थापन करण्याची दुर्दम्य इच्छा आहे. हॉलीवूडच्या काही चित्रपटांमधील नायक अन्य ग्रहांवर जाऊन शेती करून उदरनिर्वाह करताना दाखविला गेला आहे. परंतु हे वास्तवात कधी येईल का? असा प्रश्‍न होता. चंद्रावरील मातीत रोप उगवून आल्यामुळे किमान तेथील माती सुपीक आहे, तेथे रोपे उगवून येऊ शकतात, या वास्तवावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. मंगळावर काही रोपे उगवून यावीत यासाठी प्रयोग सुरू आहेत. मंगळावरील तापमान, विविध वायूंचेे प्रमाण आणि अन्य भौगोलिक घटक लक्षात घेऊन बंदिस्त बायोस्फियर निर्माण करण्याचा आणि त्यात पिके घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. त्याचे परिणामही सकारात्मक असल्याचे दिसून आले आहे. मंगळावर बंदिस्त केलेल्या वातावरणात बटाट्याला कोंब फुटल्याचे दिसून आले असून, त्यापाठोपाठ चंद्रावरून आणलेल्या मातीत रोप उगवून आल्यामुळे संपूर्ण जगाच्या आशा उंचावल्या आहेत.

-श्रीनिवास औंधकर,ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news