रणांगणातील रणरागिणी...

NDA Female Cadets
रणांगणातील रणरागिणी...
Published on
Updated on
कर्नल अभय पटवर्धन, (निवृत्त)

शुक्रवार, 30 मे 2025 हा भारतीय लष्कर आणि त्याचे खडकवासलामधील मूलभूत गुरुकुल म्हणजेच एनडीए या दोघांसाठी एक ऐतिहासिक दिवस ठरला. या दिवशी एकूण 17 महिला कॅडेटस्च्या पहिल्या बॅचने 300 समकक्ष पुरुष कॅडेटस्बरोबर एनडीएच्या विस्तीर्ण परेड ग्राऊंडमधून मार्च करत आपला अंतिम पग मेन ब्लॉकमध्ये टाकला. एनडीएसाठी हा खूप अभिमानास्पद, ऐतिहासिक क्षण आहे. पाकिस्तानविरुद्धच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या मिशनची माहिती देण्यासाठी जेव्हा कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह या माध्यमांसमोर आल्या आणि त्यांनी ज्या आत्मविश्वासाने या ऐतिहासिक कारवाईची माहिती कथन केली तेव्हा अवघ्या देशाचा ऊर अभिमानाने भरून आला. भारतीय सैन्यदलातील त्या पहिल्या महिला नाहीत; परंतु त्यांच्यातील तडफदारपणाने पुन्हा एकदा भारतीय रणरागिणींचे कौशल्य, क्षमता आणि बाणेदारपणा अधोरेखित केला.

अलीकडेच असाच अभिमानाचा क्षण समस्त भारतासाठी घडून आला. शुक्रवार, 30 मे 2025 हा भारतीय लष्कर आणि त्याचे खडकवासलामधील मूलभूत गुरुकुल म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण संस्था (नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी : एनडीए) या दोघांसाठी एक ऐतिहासिक दिवस ठरला. या दिवशी एकूण 17 महिला कॅडेटस्च्या पहिल्या बॅचने 300 समकक्ष पुरुष कॅडेटस्बरोबर एनडीएच्या विस्तीर्ण परेड ग्राऊंडमधून मार्च करत आपला अंतिम पग मेन ब्लॉकमध्ये टाकला. इशिता शर्मा या एनडीएमधून पासआऊट होणार्‍या पहिल्या महिला कॅडेट ठरल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जून 2022 बॅचमध्ये पहिल्यांदा महिलांना प्रवेश देण्यात आला होता. इशिता ही लष्करी पार्श्वभूमीतून आलेली नाही. तिचे वडील कॉर्पोरेट क्षेत्रात आणि भाऊ आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. ज्यावेळी सरकारने महिलांना एनडीए जॉईन करण्याची परवानगी जाहीर केली तेव्हा इशिता, कला, अर्थशास्त्रातील पदवीसाठी अभ्यास करत होती. संधी आली आहे आता एनडीएचा फॉर्म भरायचाच, या विचारांनी झपाटलेल्या इशिताने तत्काळ अर्ज केला.

महिला कॅडेटस्चा हा पहिला ग्रुप धीर न खचता एकत्र, कठोर शारीरिक प्रशिक्षण, अवघड लष्करी दिनचर्या आणि एनडीएतील तीन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणाला हसत हसत सामोरा गेला. त्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रशिक्षणामधून त्यांच्यात एक मजबूत बंध (बाँडिंग) निर्माण झाला होता. एनडीए प्रशिक्षणाचा महत्त्वाचा पैलू म्हणजे कॅडेटस्चा वैयक्तिक विकास, ज्यामुळे त्याचं रूपांतर कॅडेटस्मधून कुशल लष्करी कर्मचार्‍यांमध्ये होते. तीन वर्षांच्या या प्रशिक्षणकाळात पुरुष कॅडेटस्प्रमाणेच महिला कॅडेटस्च्या व्यक्तिमत्त्वातही संपूर्ण बदल आणि परिवर्तन होते. या प्रशिक्षण काळात अनेक असाध्य गोष्टी साध्य केल्यानंतर इशिताला प्रशिक्षणाच्या सर्व क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल डिव्हिजन कॅडेट कॅप्टन : डीसीसी ही मानद नियुक्ती (रँक) मिळाली. तीन वर्षे घाम गाळल्यानंतर तुमचे नेतृत्वगुण नैसर्गिकरीत्या विकसित होतात आणि अ‍ॅकॅडमीतूनच लष्करी नेता तयार होतो.

पुरुष कॅडेटस्माणेच महिला कॅडेटस्नी देखील एनडीएमधील प्रशिक्षणाचा त्यांच्या आत्मविश्वासावर होणारा महत्त्वपूर्ण आणि परिवर्तनकारी परिणाम मान्य केला. प्रशिक्षण काळात हे कॅडेटस् आयुष्यभरासाठी अनेक मित्र बनवतात. तसं पाहिलं तर कोर्समेटस् हे शेवटी शेवटी स्वतःच्या कुटुंबासारखे वाटतात. जेव्हा रॉ किंवा कच्चा कॅडेट एनडीएमध्ये प्रवेश करतो, त्याने अशा परिवर्तनाची कल्पनाही केलेली नसते. तेथे एकमेकांमध्ये अतूट बंध तयार होतात आणि ते आयुष्यभरासाठी कायम टिकतात. या कोर्समधील महिला कॅडेटस्नी ठासून सांगितलं की, प्रशिक्षणादरम्यान कुठल्याही प्रकारच्या संधींसाठी त्यांना तेथील पुरुष समकक्षांसोबत कधीही, कुठल्याही प्रकारची स्पर्धा करावी लागली नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, समान संधी प्रत्येक व्यक्तीला नैसर्गिकरीत्या सक्षम बनवते आणि हेच एनडीएचे अद्वितीय वैशिष्ट्य आहे.

एका महिला कॅडेटच्या म्हणण्यानुसार सुरुवातीचा काळ आणि प्रारंभी दोन टर्म्सच्या लष्करी प्रशिक्षणादरम्यान सर्व महिला व पुरुष कॅडेटस्ना अनेक कल्पनातीत आव्हानांचा सामना करावा लागतो, जो या प्रचंड आव्हानात्मक काळात टिकू शकतो तोच तरून जातो. अन्यथा बुडून जाणे ठरलेले आहे किंवा रेलीगेशनचे गोते खावे लागतात. एनडीएमधील अभ्यासक्रमाच्या दोन टर्म्समध्ये महिला कॅडेटस्ना शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक अडथळ्यांवर (मेंटल ब्लॉक्स) मात करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागले आहेत. तेथील प्रशिक्षकांनी कितीही मृदू भाषा वापरण्याचा प्रयत्न केला, तरी फौजी भाषा आणि कृती ही नेहमी वेगळीच व कठोरच असते. मानसिक द़ृष्ट्या अशी रफ ट्रिटमेंट सहन न करू शकणारे कॅडेटस् विड्रॉवल मागून, पहिल्या किंवा फार फार तर दुसर्‍या टर्ममध्ये एनडीएतून बाहेर पडतात.

डीसीसी इशिता शर्मा सांगतात की, एकदा का तुम्ही तो मानसिक अडथळा तोडला किंवा पार केला की, तुम्ही प्रत्येक वेळी तुमच्या शारीरिक व मानसिक सहनशक्तीच्या मर्यादा (फिजिकल अँड मेंटल एन्ड्युरन्स लिमिट) पुढील स्तरावर नेता. एका वेळी किती पुशअप्स करता येतील, यापेक्षाही हे महत्त्वाचे आहे.सुरुवातीच्या आठवड्यात जवळपास सर्वच महिला कॅडेटस्ना लष्करी प्रशिक्षणाच्या वास्तविकतेची तीव्र जाणीव झाली आणि लष्करी प्रशिक्षणाचा खरा अनुभव कसा असतो, हे प्रत्यक्षात समजलं. महिला कॅडेटस्मध्ये काही मिलिटरी बॅकग्राऊंडच्या होत्या. त्यांच्या म्हणण्यानुसार, लष्करात जाण्याशिवाय त्यांचं दुसरं कोणतंही स्वप्न किंवा योजना नव्हती. त्यांच्यासाठी एनडीएत एन्ट्री हा आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा होता. कॅडेट श्रुती, एक्स एनडीएमधून पासआऊट झालेल्या निवृत्त विंग कमांडरची मुलगी आहे. ती सांगते की, माझ्या वडिलांनी मला अ‍ॅकॅडमीत आणून सोडलं. तो माझ्यासाठी एक खास दिवस व खास क्षण होता. वडिलांसाठी तो जुन्या आठवणी आणि माझ्याबद्दलच्या अभिमानाची सरमिसळ होती. काही दिवसांतच मला ही त्यांनी अनुभवलेल्या त्या सर्वोच्च क्षणाचा अनुभव घेता आला. ते माझ्या पासिंग आऊट परेडला आले तेव्हा मी तो क्षण त्यांच्या बरोबर शेअर केला. या सर्व महिला कॅडेटस्ना त्यांच्या जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे. आम्ही फक्त प्रशिक्षणच पूर्ण करणार नाही, तर भविष्यातील लष्करी नेतृत्वासाठी मार्ग मोकळा करून, एनडीएत येण्यासाठी उत्सुक असणार्‍या मुला-मुलींसाठी प्रेरणा स्रोत बनणार आहोत, ही बहुतांश महिला कॅडेटस्ची प्रतिक्रिया होती.

भारताच्या अनेक भागांमध्ये लष्करात काम करणं प्रचंड कठीण आणि थकवणारं असतं. एनडीएतून निघालेल्या या महिला शत्रूंपासून देशाचं रक्षण करतील. एनडीएसाठी हा खूप अभिमानास्पद, ऐतिहासिक क्षण आहे. या महिला कॅडेटस्नी एनडीएचा झेंडा उंच फडकवला आहे. हे अभिमानास्पद तर आहेच; पण महिला सक्षमीकरणाच्या द़ृष्टीनं टाकलेलं महत्त्वाचं पाऊलही आहे. या महिला कॅडेटस्च्या पालकांसाठी प्रचंड आनंद व अभिमानाची ही बाब आहे. एनडीएतील या यशवंत मुली, भविष्यात लाखो भारतीय तरुण, तरुणींच प्रेरणा स्थान बनतील, यात शंकाच नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news