

प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर
छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्लेवैभव असलेले 12 दुर्ग युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून त्यांचा आता समावेश करण्यात आला आहे. ही बाब महाराष्ट्राच्या समृद्ध, सांस्कृतिक वारसा अधिक सुसंपन्न करणारी आहे. त्याहीपलीकडे महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रामध्ये नवीन क्रांती घडवून आणणारी आहे. देशी, विदेशी पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे महाराष्ट्रात पर्यटन क्षेत्रात नव्या रोजगार संधींची उपलब्धी होणार आहे.
महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र. महाराष्ट्र हा शब्द ‘महारथिक’ या शब्दापासून बनला आहे. याचा अर्थ ‘महान योद्धे’ असा होतो. चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या कालखंडात महाराष्ट्राचे भूराजनयिक महत्त्व वृद्धिंगत होत गेले. पुढे अल्लाउद्दीन खिलजीने रामदेवराव यादवाचा 1294 मध्ये पराभव केला. त्यानंतर महाराष्ट्राला अस्मानी-सुलतानी आक्रमणांना तोंड द्यावे लागले. गुलबर्गा येथील बहामनी घराण्याची पाच शकले उडाली. त्यांच्यामध्ये आपापसात युद्धे होत, संघर्ष होत असत. या दक्षिणपथावरील पाच बहामनींच्या शकलांमध्ये होणार्या संघर्षात मराठा युद्धनीतीचा उदय झाला आणि अनेक शूर, पराक्रमी मराठा सरदार अहमदनगर, विजापूर, बिदर येथील शहांकडे सेवा करत असत. पुढे मुघलांनी जेव्हा दक्षिणेवर आक्रमण सुरू केले तेव्हा स्थानिक बहामनी राजवटीची शकले आणि मोघलांची होणारी आक्रमणे अशी दुहेरी संकटे ओढावत होती. या दुहेरी संकटांशी मुकाबला प्रथम केला तो आदिलशाहीच्या सेवेत असलेल्या छत्रपती शहाजी महाराजांनी. त्यांनी स्वराज्याची बैठक तयार केली. याच कालखंडात मुघलांच्या आक्रमणाला अधिक जोर चढला, तेव्हा शहाजीराजांचे सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी विजापूरच्या आदिलशाहीचा अनेक वेळा पराभव करून मावळ प्रांत जिंकून घेतला. 1646 मध्ये तोरणा जिंकला आणि स्वराज्याचे तोरण बांधले. त्यानंतर सिंधुदुर्ग, प्रतापगड अशा कितीतरी गडांवर शिवाजीराजांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. शिवाजी महाराजांनी 300 पेक्षा अधिक गडकोटांवर आपले प्रभुत्व निर्माण केले होते आणि विशेष म्हणजे त्यापैकी 200 गड स्वतः महाराजांनी उभारले आहेत. या गडकोटांचे वैशिष्ट्य असे की, महाराजांनी जसे अजिंक्य माणसे निर्माण केली तसेच हे गडकोटही अजिंक्य होते. मध्ययुगीन भूराजनैतिक परिद़ृश्यात मराठ्यांच्या अजोड, अतुलनीय संरक्षण व्यवस्थेला विशेष महत्त्व आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्लेवैभव असलेले 12 दुर्ग युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून त्यांचा आता समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील 11 किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे. खुद्द शिवाजी महाराजांचे पहिले चरित्रकार कृष्णाजी अनंत सभासद ‘शिवछत्रपतींचे चरित्र’ या ग्रंथामध्ये म्हणतात, गड बहुत चखोट, चारी बाजूंनी ताशीव दगड, यांसी राजधानी करावी। ऐसे महाराज बोलिले॥’ त्याप्रमाणे कोकणच्या किनारपट्टीवर असलेला रायगड हा स्वराज्याची राजधानी म्हणून उभा राहिला. महाराजांनी रायगडाच्या उभारणीचे काम हिरोजी इंदूलकर या आपल्या निष्ठावंत सरदाराकडे दिले होते. गडकोटांची उभारणी करण्याची एक प्रभावशाली अशी व्यवस्थाच महाराजांनी विकसित केली होती. मराठ्यांच्या आरमाराची उभारणी आणि गडकोटांची उभारणी यामध्ये एक समान सूत्र असे होते की, स्वराज्याच्या रक्षणासाठी करावयाच्या योजनेमध्ये आरमाराप्रमाणे जलदुर्गांचेही महत्त्व होते. त्यामुळे विजयदुर्ग, सिंधुदुर्ग हे सागर किनार्यावरील गड महाराजांनी स्वतः उभारल्याचे दिसून येते. साल्हेरचा किल्ला आणि जिंजीचा किल्ला हे महाराष्ट्र आणि तामिळनाडूत असले, तरी त्यांचे भूराजनैतिक महत्त्व विशेष होते. अशी दंतकथा आहे की, साल्हेरच्या किल्ल्यातून जिंजीमध्ये तेवत असलेला दिवा दिसणे त्याकाळी शक्य होते. याचा अर्थ असा की, भूराजनैतिक द़ृष्टीने टेहळणी आणि देशाच्या सीमांचे रक्षण या कार्यात या गडकोटांचे महत्त्व लक्षात घ्यावे लागते. इंग्रज व पोर्तुगीज यांच्या हालचाली टिपण्याचे व त्यांचा समर्थ प्रतिकार करण्याचे सामर्थ्य शिवकालीन सागरकिनारी असलेल्या दुर्गांवरून दिसून येते. मराठ्यांची सुसज्ज नौदलशक्ती चंद्रगुप्त मौर्यांनंतर मध्ययुगात प्रथमच अजिंक्य व अजोड ठरली. त्यामुळे परकीय सत्तांपासून स्वातंत्र्य व सार्वभौमत्वाचे रक्षण होऊ शकले.
इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी आणि मुघल या सर्वांशी सामना करताना महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीचे संरक्षण करणे यावर महाराजांनी विशेष लक्ष दिले होते. सबंध सह्याद्रीची पश्चिम किनारपट्टी तळकोकणापासून कर्नाटक, तामिळनाडू, केरळ इथपर्यंत मराठ्यांच्या आरमाराचे प्रभुत्व सिद्ध झालेले होते. अलीकडेच भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारने युनेस्कोला सादर केलेल्या 12 गडकोटांना विश्ववारसा नामांकनासाठी दिलेला प्रस्ताव मान्य झाला आहे. आतापर्यंत जगातील 168 देशांमध्ये 1199 संरक्षित वारसास्थळे आहेत. त्यात महाराष्ट्रातील 12 गडकोटांची भर पडली आहे. भारताच्या सांस्कृतिक महासत्तेमध्ये यशाचा आणखी एक शिरपेच रोवला गेला. शिवकालीन 12 गडकोट हे देशातील 44 वे वारसास्थळ बनले आहेत. खरे पाहता समृद्धसंपन्न असा सास्कृंतिक वारसा असूनही गेल्या 75 वर्षांत भारताने या सांस्कृतिक स्थळांच्या बाबतीत फारसे स्वारस्य दाखवलेले नाही. त्यामुळे कितीतरी संपन्न, समृद्ध सांस्कृतिक वारसास्थळे अजूनही अंधारातच चाचपडत आहेत. 1980 च्या दशकात भारतीय पुरातत्त्वाच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्रातील अंजिठा, वेरूळ यासारख्या जगद्विख्यात लेण्यांचा जागतिक वारसास्थळात समावेश करण्यात आला. वारसास्थळांच्या संख्येमध्ये जगात भारतापेक्षाही इटली, चीन इत्यादी राष्ट्रे पुढे आहेत. या द़ृष्टीने विचार करता महाराष्ट्राच्या दुर्गरत्नांना मिळालेला गौरव विशेष उल्लेखनीय आणि अभिमानास्पद ठरतो.
जागतिक वारसास्थळांची निवड करत असताना या स्थळांमागील ऐतिहासिक, सांस्कृतिक, परिसराचा वैशिष्ट्यपूर्ण वारसा लक्षात घेऊन प्रस्ताव सादर केले जातात. आजवरच्या आणि पुढे असलेल्या मानवजातीच्या विकासामध्ये या वारसास्थळांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांना एका विशिष्ट चौकटीत संरक्षणाचा दर्जा दिला जातो. प्राप्त झालेले नामांकन आपणास पुढे टिकवून ठेवावे लागते. त्यासाठी तरतुदी डोळ्यांत तेल घालून जपाव्या लागतात आणि सर्वप्रकारे या वारसास्थळांचे जतन व संरक्षण करावे लागते. पर्यटनशास्त्रामध्ये असे म्हणतात की, पर्यटन हा एक सांस्कृतिक अनुभव असतो. एखाद्या पर्यटनस्थळाला पर्यटकाने भेट दिल्यानंतर त्याला प्राप्त झालेला अनुभव हा अवर्णनीय असतो. त्याची पुनरावृत्ती करता येत नाही. शिवकालीन 12 गडकोटांचे हे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने मराठ्यांच्या या लष्करी संरक्षण परिद़ृश्याला विश्ववारसा म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
गडकोटांचे स्वराज्याच्या संरक्षणातील महत्त्व सांगताना असे म्हटले आहे की, गडकोट म्हणजे जणू स्वराज्याचे हृदयच. स्वराज्याच्या जीवनरेषा. लाईफलाईन. म्हणून या गडकोटांचे विशेष महत्त्व आहे. परकीय आक्रमकांनी सबंध देशात धुमाकूळ घातलेला असताना देशाचे सार्वभौमत्व आणि स्वत्व राखण्यासाठी मराठ्यांनी केलेल्या बलिदानाची साक्ष आपणास या गडकोटांच्या रूपाने दिसून येते. विश्व सांस्कृतिक वारसा म्हणून या गडकोटांचे महत्त्व दोन कारणांमुळे विशेषत्वाने जाणवते. पहिले कारण म्हणजे, महाराष्ट्रातील हे गडकोट स्वतंत्र स्थापत्यशैलीयुक्त आहेत. त्यामध्ये कोणाचेही अनुकरण करण्यात आलेले नाही.
दुसरे म्हणजे, हे गडकोट डोंगरी किल्ले असोत, सागरी किल्ले असोत अथवा जमिनीवरचे भुईकोट किल्ले असोत. या तिन्ही प्रकारांचा विचार करता त्यातील संरक्षणद़ृष्टीने योजकता विशेष आहे. गडकोटांना असणारे बुरूज, त्यातील अंतर्गत सुरक्षाव्यवस्था, श्रेष्ठ बालेकिल्ला म्हणजेच गडाचे हृदयस्थळ यातील परस्परसंबंध लक्षात घेता असे दिसते की, शत्रूला या गडकोटामध्ये चंचूप्रवेशही करता येणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली होती. गडकोटांच्या रक्षणात आणि व्यवस्थापनात महाराजांचे लष्करी आणि संघटन चातुर्य व त्यांची संरक्षणसिद्धता अतिशय दूरगामी असल्याचे लक्षात येते.
शिवकालीन 12 गडकोटांचे वारसास्थळ म्हणून जतन करत असताना काही गोष्टींवर आपण विशेषत्वाने लक्ष दिले पाहिजे. गडकोटांच्या सुरक्षा आणि वैभवाच्या सुवर्णकडा पुन्हा प्रकाशमान होण्यासाठी त्यांच्या संवर्धनावर विशेष लक्ष केंद्रित करावे लागेल. ही वारसास्थळे भूमार्गाने, हवाई मार्गाने आणि रेल्वे मार्गाने जोडली गेली पाहिजेत. तसेच गडकोटांचे पावित्र्य राखण्यासाठी, तेथील जिवंत इतिहास बोलका करण्यासाठी सांस्कृतिक इतिहासाचे पट लोकभाषेमध्ये उलगडले पाहिजेत. या गडकोटांची प्रसिद्धी आणि त्यांच्याविषयीच्या रोमांचकारी कथा प्रकाशित झाल्या पाहिजेत. या प्रत्येक गडावर 100 ते 200 पानांचे सचित्र, इंग्रजी भाषेतील ग्रंथ प्रकाशित झाले पाहिजेत. असे ग्रंथ नामांकित इतिहासकार, संरक्षणतज्ज्ञ यांनी प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन संदर्भचिकित्सा करून केले पाहिजेत.
सध्याच्या इंटरनेटयुगात या गडकोटांबाबत इंग्रजीमध्ये संकेतस्थळे, अॅप्स विकसित केली गेली पाहिजेत. प्रत्येक गडकोटाच्या व्हिडीओ डॉक्युमेंटरी तयार असल्या पाहिजेत. एका क्लिकवर या गडकोटांची समस्त आणि रिअल टाईम माहिती पर्यटकांना उपलब्ध झाली पाहिजे. भारत पर्यटन निगम आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ या दोघांनी पर्यटकांच्या निवासासाठी स्वतंत्र पर्यटक निवासस्थळे विकसित केली पाहिजेत. ती आंतरराष्ट्रीय दर्जाची असली पाहिजेत आणि किफायतशीर दरात उपलब्ध झाली पाहिजेत. गडकोटांच्या सांस्कृतिक इतिहासातील मर्मभेदक अशा अंत:प्रवाहाचे नव्याने आकलन करणे. उदाहरणार्थ, वॉर टुरिझम किंवा युद्ध पर्यटन याद़ृष्टीने विचार करता 1646 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेला तोरणा, 1795 मध्ये मराठ्यांनी निजामाला धूळ चारत जिंकलेली खर्ड्याची लढाई यांसारख्या थरारक कथा तितक्याच समर्पकपणाने इंग्रजी भाषेतून जागतिक स्तरावर प्रसारित व्हायला हव्यात.
युद्धनौकांची उभारणी, त्यांची प्रगत रचना, त्यांचा पोर्तुगिजांविरुद्ध मराठ्यांनी केलेला उपयोग पाहता मराठ्यांचे नौदल किती सामर्थ्यवान होते यांची प्रचिती येते. तात्पर्य असे की, शिवाजीराजांनी उभे केलेले गडकोट ही महाराष्ट्राची शान आहे. महाराष्ट्राच्या जाज्वल्य इतिहासाचे खंदे साक्षीदार आहेत. आज परदेशांमध्ये जाऊन तेथील टोलेजंग इमारतींच्या स्थापत्यकलेचे गोडवे गाताना आपल्या मायभूमीमध्ये उभारण्यात आलेल्या शिवकालीन गड-किल्ल्यांचा विसर पडता कामा नये. उलटपक्षी जगभरातील भ्रमंतीतून या गड-किल्ल्यांच्या अभूतपूर्व स्थापत्यकलेची माहिती आपण प्रसृत केली पाहिजे.