सानिया मिर्झा : एक वादळ शांत होतंय!

सानिया मिर्झा : एक वादळ शांत होतंय!
Published on
Updated on

आंतरराष्ट्रीय स्तरावर काही खेळाडू असे असतात, की मैदानावरील त्यांच्या कामगिरीबरोबरच मैदानाबाहेरील त्यांच्याशी संबंधित घटनांमुळे ते सदैव चर्चेत असतात. भारताची अव्वल दर्जाची टेनिसपटू सानिया मिर्झा ही अशाच खेळाडूंपैकी एक मानली जाते. तिने स्पर्धात्मक टेनिसमधून यंदाच्या मोसमानंतर निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताची सर्वात यशस्वी महिला टेनिसपटू म्हणून लोकप्रिय असलेल्या 35 वर्षीय सानियाने ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धां- मधील महिलांच्या दुहेरीत तीनवेळा, तर मिश्र दुहेरीत तीनवेळा अजिंक्यपद पटकाविले आहे. दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत दिनांक 13 एप्रिल, 2015 रोजी तिने अव्वल स्थानावर झेप घेतली होती आणि 91 आठवडे तिने हे स्थान राखले होते. आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्ण, तीन रौप्य व तीन कांस्य पदके, फ्रो-आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्ण, महिलांच्या जागतिक मालिकेतील दुहेरीच्या अंतिम स्पर्धेत दोनवेळा विजेतेपद अशी तिची भरीव कामगिरी झाली आहे. त्याखेरीज राष्ट्रीय पातळीवरील राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन पुरस्कार, पद्मभूषण व पद्मश्री असे अनेक सन्मान तिने मिळवले आहेत. एवढी देदीप्यमान कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला टेनिसपटू आहे. मात्र पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानच्या शोएब मलिक याच्याबरोबर तिने थाटलेला संसार, तिची वादग्रस्त वेशभूषा, अखिल भारतीय टेनिस संघटनेवर तिने केलेली टीका आदी अनेक कारणांमुळे ती सतत वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे.

सानिया मिर्झाचे वडील इम्रान मिर्झा हे स्वतः टेनिसपटू आणि पत्रकार आहेत. ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या सामन्यांमधील रंगत पाहून त्यांनी सानियाला टेनिसमध्येच करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिले. सहाव्या वर्षीच सानियाने हातात टेनिसची रॅकेट घेतली आणि गेल्या जवळजवळ तीस वर्षांच्या कारकिर्दीत तिने अनेक स्पर्धांमध्ये वर्चस्व गाजविले. आशियाई क्रीडा, राष्ट्रकुल क्रीडा व फ्रो-आशियाई क्रीडा स्पर्धा या तीन स्पर्धांमध्ये तिने सहा सुवर्ण पदकांसह 14 पदकांची कमाई केली आहे. महिलांच्या टेनिस संघटनेमार्फत आयोजित केल्या जाणार्‍या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये दुहेरीत चाळीसहून अधिक विजेतेपद तिने मिळविले आहे. या स्पर्धांमध्ये तिने मार्टिना हिंगीस हिच्या साथीत दुहेरीचे सलग 44 सामने जिंकण्याचा आगळा वेगळा पराक्रमही केला आहे.

लिएंडर पेस याने ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत मिळवलेले कांस्यपदक वगळता भारतीय टेनिसपटूंना ग्रँड स्लॅम व ऑलिम्पिक स्पर्धेतील एकेरीत विजेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही. सानियाबाबत हेच पाहावयास मिळाले आहे. खरं तर जमिनीलगत व क्रॉस कोर्ट परतीचे फटके, प्रतिस्पर्धी खेळाडूच्या सर्व्हिस व परतीच्या फटाक्यांना बिनतोड परतीचे फटके मारण्याची तिची क्षमता व शैली या खेळाबाबत तिची तुलना श्रेष्ठ टेनिसपटू इली नास्तासे यांच्यासह अनेक मातब्बर खेळाडूंशी केली जाते. तिने कारकिर्दीत व्हिक्टोरिया अझारेन्का, व्हेरा झ्वोनारेवा, मरियन बार्टोली, मार्टिना हिंगीस दिनारा सफिना स्वेटलाना कुझ्नेत्सोवा आदी अव्वल दर्जाच्या खेळाडूंवर तिने एकेरीत विजय मिळविला आहे. मात्र ग्रँड स्लॅमच्या एकेरीत किंवा ऑलिम्पिक स्पर्धेत अपेक्षेइतकी श्रेष्ठ कामगिरी करता आलेली नाही. इझ्रायलची खेळाडू शहार पीर या खेळाडू विरुद्ध सामना खेळण्यास तिने नकार दिल्याचे वृत्त 2006 मध्ये प्रसारित करण्यात आले होते.

बीजिंग येथे 2008 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात तिने भारतीय पथकासाठी जी वेशभूषा ठरविण्यात आली होती ती न करता वेगळाच पोशाख घातला होता, त्यामुळे तिच्यावर कडाडून टीका करण्यात आली होती. सततच्या टीकेमुळे भारतात एकाही स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा नाही, असे तिने 2008 मध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांनंतर जाहीर केले होते. बरेच महिने ती या निर्णयाशी ठाम राहिली होती.

2010 मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मात्र ती सहभागी झाली. पाकिस्तान हा भारताचा राजकीय शत्रू मानला जातो. असे असूनही तिने शोएब मलिक या पाकिस्तानी क्रिकेटपटू बरोबर प्रेमविवाह केला. त्यावेळीदेखील ती टीकेच्या लक्ष्यस्थानी होती. टेनिस खेळताना ती मिनी स्कर्ट व बिनबाह्यांचा जर्सी घालत असते, त्यावरूनही काही धार्मिक नेत्यांनी तिच्यावर आणि तिच्या कुटुंबीयांवर टीका केली होती. मात्र अशा अनेक टीकांना तिने बिनतोड सर्व्हिस किंवा परतीचे खणखणीत फटके मारावेत अशाच पद्धतीने सडेतोड उत्तर दिले आहे.

व्यावसायिक टेनिस स्पर्धांमध्ये खेळाडूंना लागोपाठ अनेक स्पर्धांमध्ये खेळावे लागते. सानियासारख्या खेळाडूला एकेरी व दुहेरी या दोन्ही सामन्यांमध्ये सतत भाग घ्यावा लागत असे. सतत स्पर्धांमधील सहभागामुळे टेनिसपटूंना गुडघे, मनगट, खांदे, पायाचे घोटे, पाठीतील स्नायू अशा अनेक स्वरूपाच्या दुखापतींना सामोरे जावे लागते. सानियादेखील त्यास अपवाद नाही. मुलगा झाल्यानंतर टेनिसमध्ये तिने पुनरागमन केले खरे, मात्र म्हणावे तसे यशस्वी पुनरागमन तिला करता आलेले नाही.

किम क्लायस्टर्ससारख्या मोजक्याच खेळाडूंना अपत्य झाल्यानंतरही ग्रँड स्लॅमचे विजेतेपद मिळवता आलेले आहे. तिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवीत विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न सानियाने पाहिले. पण कोरोनाच्या महामारीमुळे सराव असलेल्या मर्यादा व लहान मुलाचे संगोपन यामुळे यशस्वी पुनरागमनाचे स्वप्न साकारता येणार नाही हे सानियाच्या लक्षात आले. आणि म्हणूनच तिने स्पर्धात्मक टेनिसमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. व्यावसायिक स्पर्धांमधील चढाओढ, युवा खेळाडूंचा आक्रमक खेळ, पस्तिशी ओलांडल्यानंतर शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी असलेल्या मर्यादा याचा विचार केला तर सानियाचा निर्णय अतिशय योग्यच आहे. यंदा आशियाई क्रीडा व राष्ट्रकुल क्रीडा या दोन महत्त्वाच्या स्पर्धा होणार आहेत. कदाचित देशासाठी ती या दोन स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.

त्यानंतर ती खर्‍या अर्थाने खेळाडूच्या भूमिकेतून निवृत्त होईल आणि प्रशिक्षकाच्या नव्या कारकिर्दीस सुरुवात करील. तिने हैदराबाद येथे यापूर्वीच टेनिस प्रशिक्षण अकादमी सुरू केली आहे आणि तेथील प्रशिक्षणाच्या आधारे भारताचे काही युवा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकही दाखवू लागले आहेत. यशस्वी खेळाडूप्रमाणेच प्रशिक्षक म्हणूनही तिची ही दुसरी कारकिर्द नक्कीच यशस्वी होईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news