

why are not smartphones square 4 key reasons
पुढारी ऑनलाईन :
Why Smartphones Not Square: कोणताही स्मार्टफोन नेहमी आयताकृतीच का असतो? तो चौकोनी डिझाइनमध्ये का बनवला जात नाही?
क्वोरा आणि रेडिटवरील तज्ज्ञांच्या मते यामागे अनेक कारणे आहेत. आयताकृती फोन हातात पकडायला सोपा असतो. त्यातून मीडिया अनुभवही अधिक चांगला मिळतो. चला तर जाणून घेऊया, स्मार्टफोन चौकोनी न बनण्यामागची 4 प्रमुख कारणे.
स्मार्टफोन डिझाईन
तुमच्या मनात कधी प्रश्न आला आहे का की सर्व स्मार्टफोन जवळपास एकसारखेच का दिसतात? ते नेहमी आयताकृतीच का असतात? चौकोनी किंवा गोलाकार स्मार्टफोन का नसतात?
रेडिट आणि क्वोरावरील तज्ज्ञ सांगतात की, स्मार्टफोन आयताकृती असण्यामागचे मुख्य कारण म्हणजे आपण स्वतः. कारण फोन असा बनवला जातो की तो हातात सहज पकडता यावा, खिशात व्यवस्थित बसेल आणि वापरायला सोपा ठरेल.
याशिवाय, व्हिडिओ पाहण्याच्या दृष्टीनेही आयताकृती डिस्प्ले अधिक योग्य असतो. म्हणूनच आपले टीव्ही आणि सिनेमागृहातील पडदेही आयताकृती असतात. चला जाणून घेऊया ती 4 कारणे, ज्यामुळे स्मार्टफोन चौकोनी बनवत नाहीत.
1) पकडायला सोयीस्कर
स्वतः विचार करा, हातात कोणते उपकरण अधिक चांगले पकडता येईल—आयताकृती की चौकोनी?
आपल्या हाताच्या तळहाताचा आकार लांबट आणि आयताकृती असल्यामुळे आयताकृती स्मार्टफोन हातात अधिक चांगली पकड (ग्रिप) देतो.
अलीकडच्या काळात फोल्डेबल फोनने हा नियम मोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात आयताकृती आणि चौकोर अशा दोन्ही प्रकारांचा मिलाफ दिसतो. त्यामुळेच फोल्डेबल फोन वापरण्यासाठी अनेकदा दोन्ही हात वापरावे लागतात.
तज्ज्ञांच्या मते आयताकृती डिझाइनमुळे फोन हातात पकडायला सोपा असतो आणि खिशात ठेवायलाही अधिक सोयीस्कर ठरतो.
2) मीडिया अनुभव
सिनेमागृहाचा पडदा आयताकृती असतो. आपल्या घरातील स्मार्ट टीव्हीही आयताकृती असतात. त्यामुळे जर स्मार्टफोन चौकोनी असेल, तर त्यावर चित्रपट किंवा व्हिडिओ पाहण्याचा आनंद कमी होईल.
तज्ज्ञ सांगतात की बहुतांश चित्रपट, व्हिडिओ आणि गेम्स हे 16:9 किंवा 20:9 या रेशोमध्ये तयार केले जातात, जे आयताकृती स्क्रीनवरच सर्वोत्तम दिसतात.
जर डिस्प्ले चौकोनी असेल, तर वर-खाली काळी जागा (ब्लॅक स्पेस) दिसेल.
पूर्वी CRT म्हणजेच डब्बा टीव्हीच्या काळात काही चित्रपट टीव्हीवर मधोमध आयताकृती स्वरूपात दिसायचे. तेव्हा आपल्याला वाटायचे की तो नवीन चित्रपट आहे म्हणून असा दिसतोय. प्रत्यक्षात त्याचा अॅस्पेक्ट रेशो वेगळा असल्यामुळे तो पूर्ण स्क्रीनमध्ये बसत नसे.
3) डिव्हाइसची सुरक्षितता
तज्ज्ञांच्या मते आयताकृती डिझाइन आणि डिस्प्ले डिव्हाइसला अधिक सुरक्षितता देतात. स्मार्टफोनच्या बाबतीतही हेच लागू होते.
जर स्मार्टफोन चौकोनी डिझाइनचा असेल, तर पडल्यावर त्याचा डिस्प्ले सहज तुटू शकतो. पण आयताकृती फोनमध्ये कोपरे (कॉर्नर्स) गोलाकार केलेले असतात, ज्यामुळे फोनचा टिकाऊपणा (ड्युरेबिलिटी) वाढते.
4) लुक आणि वापरातील आराम
चौकोनी डिव्हाइसचा लुक बहुतांश वेळा आकर्षक वाटत नाही. फोल्डेबल फोन फारसे यशस्वी न होण्यामागे त्यांची जास्त किंमत आणि अनफोल्ड केल्यावर दिसणारे वेगळे डिझाइन हेही एक कारण आहे.
आयताकृती गॅजेट हातात अधिक फिट बसते, खिशात ठेवायला सोयीचे असते आणि एका हाताने वापरणेही सोपे जाते.
हीच ती चार प्रमुख कारणे आहेत, ज्यामुळे आजवर सर्व स्मार्टफोन कंपन्या आयताकृती फोनच बनवत आल्या आहेत आणि या मूलभूत डिझाइनमध्ये बदल करण्याची हिंमत कुणीही केलेली नाही.