

vastu tips kitchen sink direction correct placement rules
पुढारी ऑनलाईन :
Vastu Tips : वास्तुशास्त्रात स्वयंपाक घराला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यावर घराची सुख, शांती, समृद्धीशी जोडलेले असते. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील प्रत्येक वस्तू आणि तिची दिशा घरातील ऊर्जेवर थेट परिणाम करते. किचनमधील सिंक हाही त्यातील एक महत्त्वाचा भाग आहे.
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर केवळ अन्न शिजवण्याची जागा नसून, घरातील ऊर्जा आणि आरोग्याचे केंद्र मानले जाते. किचनमधील प्रत्येक वस्तू योग्य ठिकाणी असणे घरातील सुख-शांती आणि आर्थिक स्थितीवर थेट परिणाम करते.
यामध्ये किचन सिंक अत्यंत महत्त्वाचा असून, तो योग्य दिशेला असणे आवश्यक मानले जाते. चला तर जाणून घेऊया, वास्तुनुसार सिंक कुठे असावा आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात.
किचन सिंकची शुभ दिशा
वास्तुशास्त्रात किचन सिंकसाठी ईशान्य दिशा (उत्तर-पूर्व) सर्वात शुभ मानली जाते. या दिशेला असलेला सिंक घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवतो आणि समृद्धीला चालना देतो. तसेच भांडी धुताना व्यक्तीचे तोंड उत्तर दिशेकडे असावे, याचीही काळजी घ्यावी. असे केल्याने मानसिक शांतता टिकून राहते आणि घरात सुख-समाधान नांदते.
सिंक लावण्याच्या अशुभ दिशा
वास्तुनुसार दक्षिण-पश्चिम दिशेला किचन सिंक असणे अशुभ मानले जाते. या दिशेला असलेला सिंक कौटुंबिक तणाव वाढवू शकतो आणि घरात मतभेद निर्माण होऊ शकतात. यामुळे आर्थिक अडचणीही उद्भवू शकतात आणि पैशांचे असंतुलन राहू शकते.
गॅस जवळ सिंक ठेवू नका
वास्तुशास्त्रानुसार अग्नी आणि जल हे दोन परस्परविरोधी तत्त्वे आहेत. गॅस चुल ही अग्नी तत्त्वाशी संबंधित आहे, तर किचन सिंक जल तत्त्वाचे प्रतीक मानले जाते. जर चुल आणि सिंक खूप जवळ असतील, तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि कुटुंबातील शांतता व आनंदावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वास्तुनुसार सिंक आणि चुल यांच्यात योग्य अंतर ठेवणे आवश्यक आहे.
सिंकच्या खाली डस्टबिन ठेवणे टाळा
किचन सिंकच्या खाली डस्टबिन ठेवणेही वास्तुच्या दृष्टीने योग्य मानले जात नाही. यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढू शकतो आणि आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे डस्टबिन किचनमधील वेगळ्या, झाकण असलेल्या जागी ठेवणे अधिक योग्य ठरते.