

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज, २९ मार्च २०२५ रोजी, चैत्र महिन्यातील अमावस्येला वर्षातील पहिले खंडग्रास सूर्यग्रहण होणार आहे. हे आंशिक सूर्यग्रहण असेल. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण दुपारी ०२ वाजून २० मिनीटांनी सुरु होणार आहे आणि संध्याकाळी ०६ वाजून १६ मिनीटांनी संपणार आहे.
आज (२९ मार्च) फाल्गुनी अमावास्येच्या दिवशी होणारे खंडग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्याने या ग्रहणाचे धार्मिक नियम भारतात पाळण्याची जरूरी नाही, असे आवाहन पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी केले. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण दुपारी ०२ वाजून २० मिनीटांनी सुरु होणार आहे आणि संध्याकाळी ०६ वाजून १६ मिनीटांनी संपणार आहे. ग्रहणाच्या ९ ते १२ तास आधीपासून सूतक काळ सुरु होतो. या दरम्यान पूजा-पाठ, आणि अन्न शिजवणं ही कामे करण्याबद्दल अनेक समज - गैरसमज जनमानसात आहे. त्यातच आजची अमावस्या ही शनि अमावस्या असल्याने अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. त्याबाबत विचारले असता, सोमण म्हणाले, हे खंडग्रास सूर्यग्रहण कॅनडा, ग्रीनलॅन्ड, यूरोप, आफ्रिकेचा उत्तर पश्चिम भाग, रशिया येथे दिसणार आहे. भारतात ग्रहण दिसणारच नसल्याने त्यासंबंधी वेध काळ वैगरे बाबी पाळण्याचा संबंध येत नाही. या कालावधीत धार्मिक विधीही करण्यास हरकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यावर्षी ७ सप्टेंबर रोजी होणारे चंद्रग्रहण भारतातून दिसणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सूर्यग्रहणाचा काळ ग्रहणाच्या अगदी १२ तास आधी सुरू होतो. शास्त्रांमध्ये सुतक काळ शुभ मानला जात नाही. सुतक काळाच्या सुरुवातीला मंदिराचे दरवाजे बंद केले जातात आणि पूजा करण्यास मनाई असते.
जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते, ज्यामुळे सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यापासून अंशतः किंवा पूर्णपणे रोखला जातो. यामुळे दिवसा काही काळ अंधार पडू शकतो.
२०२५ मध्ये दोन सूर्यग्रहणे होतील. पहिले सूर्यग्रहण आज म्हणजे २९ मार्च रोजी होत आहे. दुसरे २१ सप्टेंबर रोजी होणार आहे.
सूर्यग्रहणाचा सर्वात शुभ परिणाम मकर राशीच्या लोकांवर होईल. ग्रहणाच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांसाठी चांगला काळ सुरू होईल. आर्थिक परिस्थिती सुधारण्यास सुरुवात होईल.