

shani jayanti 2026 16 may favourite zodiac signs shani dev rashi golden time
पुढारी ऑनलाईन :
Shani Jayanti 2026 : आज शनि जयंती साजरी केली जात आहे. न्यायाचे देवता शनिदेवांना समर्पित असलेला हा विशेष दिवस मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी काही राशींवर शनिदेवांची विशेष कृपादृष्टी राहते, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होऊन सुवर्णकाळाची सुरुवात होऊ शकते.
हिंदू धर्मात शनि जयंतीला विशेष महत्त्व आहे. कर्मानुसार फळ देणारे आणि न्यायाचे देवता भगवान शनिदेव यांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येला शनि जयंती येते. यंदा शनि जयंती आज (१६ मे) साजरी होत आहे.
या दिवशी शनिदेवांची पूजा-अर्चा केल्याने शनि दोष कमी होतो, साडेसातीचा प्रभाव कमी होतो, जीवनातील अडथळे दूर होतात आणि वाईट कर्मांच्या परिणामांपासून दिलासा मिळतो. ज्योतिषांच्या मते, काही राशी शनिदेवांच्या विशेष प्रिय आहेत, ज्यांच्यावर त्यांची कृपादृष्टी कायम राहते. चला जाणून घेऊया त्या राशींबद्दल, ज्यांचा शनि जयंतीपासून सुवर्णकाळ सुरू होऊ शकतो.
तुळ रास : शनीचा प्रभाव अधिक मजबूत
तुळ राशीत शनी अत्यंत प्रभावशाली मानला जातो. या राशीत शनी उच्चस्थानी असल्यामुळे त्याचा प्रभाव अधिक गडद असतो. या राशीचे लोक विचारपूर्वक निर्णय घेतात आणि न्यायप्रिय स्वभावाचे असतात. यांना यश थोड्या उशिराने मिळते, पण ते टिकाऊ असते. कायदा, प्रशासन, व्यवस्थापन आणि व्यवसाय क्षेत्रात हे लोक चांगले नाव कमावू शकतात. शनी त्यांना योग्य मार्ग दाखवतो आणि आयुष्यात संतुलन राखण्यास मदत करतो.
मकर रास : मेहनतीने घडते भविष्य
मकर राशीचा स्वामी स्वतः शनी असल्यामुळे या राशीवर त्याचा विशेष प्रभाव असतो. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात विशेषतः ३० वर्षांपर्यंत संघर्ष आणि मेहनत अधिक करावी लागते. मात्र त्यानंतर जीवनात सकारात्मक बदल दिसू लागतात. मेहनतीचे फळ हळूहळू मिळू लागते आणि करिअरमध्ये स्थैर्य येते. या राशीचे लोक आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून विचारपूर्वक पावले टाकतात. कालांतराने हे लोक धन, मान-सन्मान आणि यश प्राप्त करतात.
कुंभ रास : शनीच्या मूल शक्तीचा प्रभाव
कुंभ राशीला शनीची मूल त्रिकोण राशी मानले जाते, त्यामुळे येथे शनीचा प्रभाव संतुलित आणि स्थिर राहतो. या राशीचे लोक नवीन विचारांचे आणि दूरदृष्टी असलेले असतात. तंत्रज्ञान, संशोधन, सामाजिक कार्य आणि मोठ्या संस्थांमध्ये हे लोक उत्तम कामगिरी करतात. कठीण परिस्थितीतही हे खचत नाहीत. काळानुसार त्यांची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होत जाते आणि जीवनात स्थैर्य निर्माण होते.
३० वर्षांनंतर आयुष्यात होतो मोठा बदल
ज्योतिषशास्त्रानुसार, शनीचा खरा प्रभाव साधारण ३० वर्षांच्या आसपास स्पष्टपणे दिसू लागतो. या तीन राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात या काळानंतर अधिक स्थैर्य येते. करिअर योग्य दिशेने पुढे सरकते आणि उत्पन्नही वाढू लागते. अनुभवाचा फायदा मिळतो आणि निर्णयक्षमताही अधिक चांगली होते. शनिदेवांची कृपा मिळवण्यासाठी प्रामाणिकपणा, शिस्त आणि सातत्यपूर्ण मेहनत हे सर्वात महत्त्वाचे उपाय मानले जातात.