

premanand maharaj on changing name wearing ring and destiny
पुढारी ऑनलाईन :
वृंदावनमधील प्रसिद्ध महराज प्रेमानंद महाराज हे त्यांच्या मनुष्याला दिशा दाखवणाऱ्या संदेशामुळे प्रसिद्ध आहेत. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघे नेहमीच प्रेमानंद महाराजांची भेट घेत असल्याचे फोटो समोर येत असतात.
अलीकडे एका भक्ताने प्रेमानंद महाराजांना प्रश्न विचारला की, आजकाल अनेक लोक आपलं नाव बदलतात किंवा नावात अंक, अक्षरं किंवा स्पेलिंगमध्ये बदल करतात. खरंच यामुळे नशीब बदलतं का?
प्रेमानंद महाराजांचं उत्तर
या प्रश्नाचं उत्तर देताना प्रेमानंद महाराजांनी अतिशय सोप्या शब्दांत आपलं मत मांडलं. ते म्हणाले की, जर नाव बदलल्याने किंवा त्यात थोडाफार बदल केल्याने नशीब बदलत असतं, तर आज प्रत्येक व्यक्तीने हे केव्हाच केलं असतं.
महाराजांनी भक्तांना सांगितलं, “तुम्ही स्वतः करून पाहा आणि मग अनुभव सांगा.”
ते स्पष्टपणे म्हणाले की, अशा प्रकारच्या उपायांवर विश्वास ठेवणारे लोक भ्रमात असतात आणि प्रत्यक्षात मूर्खपणा करत असतात. फक्त अंगठी घालणे, छल्ला धारण करणे किंवा जंतर-मंतर बांधून घेतल्याने आयुष्यात काहीही बदल होत नाही.
हे केवळ संयोग आहे – प्रेमानंद महाराज
महाराजांनी समजावून सांगितलं की, जर खरंच नशीब बदलायचं असेल तर त्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे ईश्वराचं नामस्मरण आणि मेहनत.
नामस्मरणामुळे मन शुद्ध होतं, विचार सकारात्मक होतात आणि कर्म योग्य दिशेने वाटचाल करतात. ते पुढे म्हणाले की, अनेक वेळा लोकांना वाटतं की एखाद्या उपायामुळे अचानक फायदा झाला, पण प्रत्यक्षात तो आधी केलेल्या पुण्यकर्मांचा फलित असतो. अशा घटना फक्त योगायोग किंवा संयोग म्हणूनच समजाव्यात.
नामस्मरण हाच खरा उपाय
प्रेमानंद महाराजांनी पुढे स्पष्ट केलं की, नाव बदलल्याने किंवा त्याच्या स्पेलिंगमध्ये बदल केल्याने ना स्वप्न पूर्ण होतात, ना जीवनातील अडचणी संपतात.
स्वप्न साकार करण्यासाठी मेहनत, प्रामाणिकपणा आणि सातत्यपूर्ण प्रयत्न अत्यावश्यक असतात. त्याचबरोबर, ईश्वराचं नामस्मरण मनाला बळ देतं आणि कठीण काळात शक्ती बनून साथ देतं.