

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईवर महालक्ष्मीचा (Mahalakshmi temple) वरदहस्त आहे. वरळीच्या बांधकामामुळे मुंबईत 'महालक्ष्मी' मंदिराची स्थापना झाली. हीच महालक्ष्मी मुंबईकरांची श्रद्धास्थान असून नवरात्रौत्सवात लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात.
महालक्ष्मी परिसरातील भुलाभाई देसाई मार्गावरील मुंबईतील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक महालक्ष्मी मंदिर आहे. हे मंदिर १८३१ मध्ये घाकजी दादाजी (१७६०-१८४६) हिंदू व्यापारी यांनी बांधले आहे. या मंदिरामध्ये महालक्ष्मीसह महाकाली आणि महासरस्वती यांची प्रतिमा आहे. मुंबईचा ब्रिटीश गव्हर्नर जॉन हॉर्नबी याने मुंबई आणि वरळी ही दोन बेट समुद्रात भरणी करून बांधणार होता. मुंबई बेटाचे दक्षिण टोक म्हणजे सध्या आपल्या महालक्ष्मीचे देऊळ आहे, ते आणि समोरचे वरळी गाव, म्हणजे सध्या मुंबई महापालिकेचे 'लव्ह-ग्रोव्ह उदंचन केंद्र' किंवा 'अत्रीया मॉल' आहे, तिथपर्यंत समुद्राचे पाणी पसरलेले होते. भरतीच्या वेळेस हे समुद्राचे पाणी पार भायखळ्यापर्यंत पोहोचते. त्यामुळे मुंबई बेटातून वरळीकडे जायचे तर होडीशिवाय पर्याय नसायचा. यासाठी हॉर्नबीने ही खाडी भरण्याचे ठरवले. या कामासाठी इंग्लंडच्या कार्यालयाची परवानगी घेतलीच नाही. बांधकामाचे कंत्राट रामजी शिवजी नावाच्या या तरुण इंजिनिअरकडे सोपवले, बांध घालण्याचे काम सुरू झाले. दगडाच्या राशी खाडीत टाकून भरणी सुरू झाली. बांधकामात थोडी प्रगती झाली की, समुद्राच्या पाण्यामुळे बांधलेला बांध कोसळू लागला.
या कालावधीत एका रात्री रामजी शिवजीला महालक्ष्मीने स्वप्नात दृष्टांत दिला आणि सांगितले, 'मी माझ्या बहिणींसोबत महासागराच्या तळाशी आहे. तू मला बाहेर काढ आणि मगच तुझा बांध पूर्ण होईल. रामजी शिवजीने ही घटना हॉर्नबीला सांगितली आणि समुद्रात देवीच्या मूर्तीचा शोध घेण्यासाठी परवानगी मागितली. पण होर्नबी ब्रिटीश असल्याने दिली नाही. बांध पुन्हा पुन्हा कोसळत होता, म्हणून त्याने काहीही न बोलता हाही प्रयत्न करून बघू म्हणून रामजी शिवजीला देवीच्या मूर्तीचा शोध घेण्याची परवानगी दिली. रामजी शिवजी यांनी स्थानिक मच्छिमारांची मदत घेतली. समुद्रात जाळी टाकण्यात आली आणि एक दिवस जाळी वर काढताना हाताला जड लागली. त्या जाळ्यात खरोखरच महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली अशा तीन महादेवींच्या मूर्ती सापडल्या. रामजी शिवजीने हॉर्नबीला त्या मूर्ती दाखवून त्याचा दृष्टांत खरा झाल्याचे सांगितले, पुढे या मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली.