

भाद्रपद महिन्यातील शुद्ध तृतीया म्हणजेच हरतालिका तृतीया. महिलांसाठी अत्यंत पवित्र आणि श्रद्धेने साजरा होणारा व्रताचा दिवस. यंदा हरितालिका व्रत २०२५ मंगळवार, २६ ऑगस्ट २०२५ रोजी साजरे होणार आहे. या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अविवाहित मुली इच्छित वरासाठी उपवास करतात, पार्वतीमातेची पूजा करतात आणि सौभाग्याची प्रार्थना करतात.
हिंदू पंचांगानुसार, या वर्षी हरतालिका तीज दिवशी रवि योग, साध्य योग, शुभ योग आणि गजकेसरी योग असे चार शुभ योग तयार होत आहेत, ज्यामुळे व्रताचे महत्त्व अधिक वाढले आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजून ३४ मिनिटांनी सुरू होणार असून, ही तिथी २६ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजून ५४ मिनिटांपर्यंत असेल. यंदा हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त मंगळवारी २६ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजून ५६ मिनिटांपासून ते सकाळी ८ वाजून ३१ मिनिटांपर्यंत असेल. पूजेसाठी पहाटेपासून एकूण दोन तास ३५ मिनिटांचा शुभ मुहूर्त कालावधी असेल.
हरतालिका व्रताचे मूळ पार्वती मातेच्या कठोर तपस्येत आहे. ‘हरत’ म्हणजे अपहरण, ‘आलिका’ म्हणजे सखी. पार्वतीच्या सख्यांनी तिला वडिलांच्या इच्छेविरुद्ध विष्णूशी लग्न होऊ नये म्हणून जंगलात नेले, जिथे तिने शिवाच्या प्राप्तीसाठी तप केले. अखेर शिव प्रसन्न झाले आणि पार्वतीशी विवाह केला. म्हणून या दिवशी स्त्रिया पार्वतीसारखे कठोर व्रत करतात. म्हणूनच, या व्रताने सौभाग्य, प्रेम आणि वैवाहिक सौख्य लाभते असे मानले जाते.
निर्जला उपवास: या दिवशी स्त्रिया पाणीही न पिता उपवास करतात.
सकाळी स्नान: सूर्योदयापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावीत.
मातीच्या मूर्ती: शिव आणि पार्वतीच्या माती किंवा वाळूच्या मूर्ती तयार करून त्यांची पूजा केली जाते.
पूजेचे साहित्य: फुलं, बेलपत्र, धूप, दीप, नैवेद्य, लाल वस्त्र, सिंदूर, हळद, कुंकू, फळं, मिठाई, आणि पार्वतीसाठी साजशृंगार.
शिव-पार्वती पूजन: शिव-पार्वतीला जल, दूध, मध, फुलं, बेलपत्र अर्पण करावेत. पार्वतीला चुनरी, नथ, बांगड्या अर्पण कराव्यात.
कथा वाचन: हरतालिका व्रत कथा ऐकावी किंवा वाचावी.
गौरी मे प्रीयतां नित्यं अघनाशाय मंगला। सौभाग्यायास्तु ललिता भवानी सर्वसिद्धये या मंत्राचा जप करावा.
भजन-कीर्तन: काही ठिकाणी महिलांनी एकत्र येऊन भजन-कीर्तन केले जाते.
या दिवशी निर्जळी उपवास ठेवणे श्रेष्ठ मानले जाते, परंतु आरोग्यानुसार फलाहार करता येतो.
व्रताच्या दिवशी सत्य, संयम आणि सात्त्विकता पाळावी.
व्रताच्या समाप्तीनंतर गौरी आणि सखीच्या मूर्तींचे विसर्जन करावे.
गर्भवती, आजारी किंवा वृद्ध महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच वृत्त करावे.
हरतालिका व्रत हे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये आणि दक्षिण भारतात 'गौरी हब्बा' म्हणूनही साजरे केले जाते. या दिवशी महिलांनी हातावर मेहंदी काढणे, पारंपरिक अलंकार घालणे, आणि मंगल गीत गाणे हेही एक महत्त्वाचा भाग आहे. या व्रतामुळे वैवाहिक जीवनात प्रेम, समृद्धी आणि सौख्य लाभते, असा विश्वास आहे. हरितालिका व्रताच्या निमित्ताने सर्व महिलांना सौभाग्य, आरोग्य आणि आनंद लाभो, हीच मंगलकामना!