पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील प्रमुख दही ब्रँड असलेल्या एपिगामियाचे (Epigamia) सह-संस्थापक रोहन मीरचंदानी यांचे शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने (Rohan Mirchandani death) निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. एपिगामियाची फ्लेव्हर्ड दही आणि ज्यूसचा प्रसिद्ध ब्रँड म्हणून ओळख आहे. ग्रीक दही ब्रँड एपिगामियाची पेरेंट कंपनी ड्रम्स फूड इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड आहे. यात अनेक दिग्गजांची गुंतवणूक आहे. रोहन मीरचंदानी यांनी त्यांच्या दोन सहकाऱ्यांसह २०१३ मध्ये ड्रम्स फूड इंटरनॅशनलची स्थापना केली होती.
ड्रम्स फूड इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडने जारी केलेल्या निवेदनात, या कठीण काळात मीरचंदानी यांच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करावा, अशी विनंती केली आहे. COO आणि संस्थापक सदस्य अंकुर गोयल आणि सह-संस्थापक आणि संचालक उदय ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली Epigamia चे नेतृत्व मिरचंदानी यांचे कुटुंब, राज मीरचंदानी, वर्लिनवेस्ट आणि डीसीजी कन्झ्यूमर पार्टनर्स आदी संचालक मंडळाच्या पूर्ण पाठिंब्याने कंपनीचे दैनंदिन कामकाज सांभाळले जात आहे, असेही निवेदनात पुढे म्हटले आहे.
"रोहन यांच्या जाण्याने एपिगामिया कुटुंबातील आम्हा सर्वांना खूप दुःख झाले आहे. रोहन हे आमचे मेंटर, मित्र आणि नेते होता. त्यांचे स्वप्न ताकदीने आणि जोमाने पुढे नेण्याचा आमचा निर्धार कायम राहील. रोहन यांचा उदात्त दृष्टीकोन आणि मूल्ये आम्हाला मार्गदर्शन करत राहतील," असे गोयल आणि ठक्कर यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे.
न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी आणि द व्हार्टन स्कूलमधून पदवी शिक्षण घेतलेल्या मीरचंदानी यांनी २०१३ मध्ये ड्रम्स फूड इंटरनॅशनलची स्थापना केली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली हा ब्रँड होकी पोकी आइस्क्रीमपासून एपिगामिया, दही आणि अन्य दुग्धजन्य पदार्थांच्या घरगुती नावापर्यंत विकसित झाला. त्यांची ३० शहरांमध्ये सुमारे २० हजार रिटेल टचपॉइंट्स आहेत. ही कंपनी २०२५-२६ पर्यंत मध्य पूर्वेत विस्तार करण्याची तयारी करत होती.
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची फ्लेवर्ड ग्रीक दही ब्रँड एपिगामियाच्या ड्रम फूड्स इंटरनॅशनल प्रायव्हेटमध्ये गुंतवणूक आहे. २०१९ मध्ये ती या कंपनीशी जोडली गेली होती.