प्रसाद पाटील
कोरोनाच्या दुसर्या लाटेदरम्यान ईपीएफओने आपल्या सहा कोटी खातेदारांना दिलासा देत पीएफ खात्यातून दुसर्यांना आगावू रक्कम काढण्याची सुविधा दिली आहे. यानुसार कर्मचारी हे भविष्य निर्वाह निधीतून एकूण रकमेच्या 75 टक्के किंवा तीन महिन्यांचे मूळ वेतन किंवा महागाई भत्त्याच्या समकक्ष रक्कम (दोन्हीपैकी जी कमी असेल) ती काढू शकतो. तज्ज्ञांच्या मते, सरकारने कोरोना काळात खातेदारांना सवलत दिली असली तरी त्याचा वापर हा शेवटचा पर्याय म्हणून करायला हवा. पीएफ खात्यातून पैसे काढणे ही दीर्घकाळासाठी हानिकारक ठरू शकते.
पीएफ खात्यातून एक लाख रुपये काढले तर 8.5 व्याजदर गृहीत धरल्यास 30 वर्षांचा हिशोब केल्यास निवृत्तीच्या एकूण रकमेतून 21.55 लाख रुपये कमी होतील. जर निवृत्तीला 25 वर्षांचा कालावधी राहिला असेल, तर 7.68 लाख आणि वीस वर्षांचा काळ राहिला असेल, तर 5.11 लाख रुपयांचा फटका बसू शकतो.
असे समजून घ्या गणित
31 मार्च 2021 पर्यंत आपल्या खात्यात दहा लाख रुपये असेल आणि आपले मूळ वेतन 50 हजार रुपये असेल तर आपले तीन महिन्याच्या वेतनाबरोबरची रक्कम दीड लाख रुपये काढू शकतात. याशिवाय जर खात्यात एकूण दोन लाख रुपये असेल आणि आपले मासिक वेतन 51 हजार रुपये असेल तरीही आपण दीड लाखच काढू शकता.
दीर्घकाळासाठी नुकसानकारक
पीएफ खात्यातून पैसे काढणे हा शेवटचा पर्याय असला पाहिजे. अन्यथा दीर्घकाळासाठी मोठा फटका बसू शकता. त्याचा परिणाम हा निवृत्तीनंतरच्या मिळणार्या रकमेवर होईल. त्यामुळे आपली आर्थिक गरज भागवण्यासाठी अन्य आर्थिक स्रोताचा वापर करावा. जसे की पर्सनल लोन, गोल्ड लोन, क्रेडिट कार्ड लोन, टॉप अप होम होन आदी पर्यायांची निवड करून पीएफ खात्यातून पैसे काढण्यापासून दूर राहवे.
व्हॉलेंटरी योगदान करा
तज्ज्ञांच्या मते, पीएफमधून पैसे काढणे हा आर्थिकदृष्ट्या योग्य निर्णय नाही. परंतु शेवटचा पर्याय असेल आणि त्याची भरपाई करायची असेल तर पीएफमध्ये व्हॉलेंटरी योगदान करायला हवे. अशा कृतीने आपण थोड्या काळातच आपण आपत्कालीन स्थितीत काढलेल्या रकमेची भरपाई करू शकता.