

विधिषा देशपांडे
मिडकॅप विभागातील दीर्घकालीन गुंतवणूक ही वेळेच्या कसोटीवर टिकणारी, संपत्ती निर्माण करणारी रणनीती ठरू शकते. जरी या विभागात अस्थिरता जास्त असली, तरी वेळ जसजसा पुढे जातो, तसतशी ती अस्थिरता सरासरी होते आणि कंपाऊंडिंगचा फायदा गुंतवणुकीला मिळतो. दीर्घकाळात मिडकॅप कंपन्या मोठ्या वाढीची क्षमता दाखवतात; पण संयम आणि कालबद्धता आवश्यक आहे.
बहुतेकदा नवगुंतवणूकदार चंचल असतात. कधी लार्जकॅपचा मोह, कधी स्मॉलकॅपची झोकदार चढ-उतारांची मजा, तर कधी थीमॅटिक फंडांच्या झगमगाटाकडे ओढा या हिंदोळ्यांवर ते स्वार होतात. त्यातून वर्षागणिक हॉट श्रेणी बदलण्याची प्रवृत्ती अनेकांमध्ये दिसते. मात्र व्हाईटओक कॅपिटल म्युच्युअल फंडाच्या ताज्या एसआयपी विश्लेषण अहवालानुसार, गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत मिडकॅप फंड हे इक्विटी विभागातील सर्वात यशस्वी आणि स्थिर परफॉर्मन्स देणारे सेगमेंट ठरले आहेत. मिडकॅप फंडांनी सरासरी 17.4 टक्के वार्षिक परतावा दिला, तर मीडियन रिटर्न 17.9 टक्के इतका नोंदवला गेला. सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे गेल्या जवळपास तीन दशकांच्या डेटामध्ये प्रत्येक एसआयपी कालावधीत सकारात्मक परतावा दिसून आला आहे.
अहवालात नमूद केलं आहे की, लार्ज कॅपच्या शेअर्समध्ये सामान्यतः अस्थिरता कमी असते आणि पोर्टफोलिओला स्थैर्य मिळतं; मात्र निफ्टी मिडकॅप 150 टीआरआयने गेल्या काळात ठळक आणि सातत्यपूर्ण कामगिरी दाखवली आहे. सरासरी व मध्यमपरतावे अनुक्रमे 17.4% आणि 17.9% राहिले आहेत. तज्ज्ञांच्या मते, एसआयपीमार्फत दीर्घकालीन गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांनी वारंवार फंड बदलण्याची सवय टाळावी. गुंतवणुकीला वेळ द्यावा, म्हणजे तीच गुंतवणूक कालांतराने संचित (कंपाऊंडिंग) शक्तीने आपले उत्पन्न वाढवते.
अहवालात 1996 ते 2025 या कालावधीत 10 वर्षांच्या रोलिंग एसआयपी रिटर्नचे विश्लेषण करण्यात आले. यासाठी लार्ज, मिड आणि स्मॉलकॅप निर्देशांकांची तुलना केली गेली. याचा निष्कर्ष स्पष्ट होता-निफ्टी मिडकॅप 150 टोटल रिटर्न इंडेक्सने सर्वाधिक आणि सातत्यपूर्ण परतावे दिले आहेत.
या काळात
* मिडकॅप एसआयपीचा सरासरी एक्सआयआरआर (अनियमित गुंतवणुकीचा खरा वार्षिक परतावा दर) 17.4% राहिला.
* प्रत्येक एसआयपी कालावधीत 100% सकारात्मक परतावे मिळाले.
* 98% प्रकरणांत 10% पेक्षा जास्त, 95% प्रकरणांत 12% पेक्षा जास्त परतावा दिसून आला आणि तब्बल 79% वेळा 15 टक्क्यांहून जास्त परतावा मिळाला.
हा डेटा एकच गोष्ट सांगतो, मिडकॅप विभागातील दीर्घकालीन गुंतवणूक ही वेळेच्या कसोटीवर टिकणारी, संपत्ती निर्माण करणारी रणनीती ठरू शकते. जरी या विभागात अस्थिरता जास्त असली, तरी वेळ जसजसा पुढे जातो, तसतशी ती अस्थिरता सरासरी होते आणि कंपाऊंडिंगचा फायदा गुंतवणुकीला मिळतो.
समजा एखाद्या गुंतवणूकदाराने प्रत्येक वर्षी आपली एसआयपी मागील वर्षी सर्वाधिक परफॉर्मन्स देणार्या निर्देशांकात स्विच केली असती, तर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत त्याचा एक्सआयआरआर 15.24% इतकाच राहिला असता. पण, जर त्याने एकाच मिडकॅप निर्देशांकात एसआयपी सुरू ठेवली असती, तर त्याच कालावधीत एक्सआयआरआर तब्बल 17.30% झाला असता. ही दोन आकडेवारी एक मोठा गुंतवणूक धडा देऊन जाते, तो म्हणजे धीर हीच दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याची गुरुकिल्ली आहे.
व्हाईटओकच्या 29 वर्षांच्या सेन्सेक्स आणि निफ्टी डेटानुसार, सात ते दहा वर्षे सातत्याने गुंतवणूक केल्यावर बाजारातील अस्थिरता आपोआप कमी होते. दीर्घकालीन एसआयपी रिटर्न नंतर जवळजवळ समांतर होतात, मग गुंतवणूक कोणत्या वेळी सुरू केली याचं महत्त्व कमी होतं. म्हणजेच, मार्केट टाइमिंगपेक्षा मार्केटमध्ये राहणं हे अधिक महत्त्वाचं आहे.
मूल्यमापनाच्या काळात जरी गुंतवणूक सुरू केली, तरी 10 वर्षांचा एसआयपी कालावधी सरासरी खर्च (अॅव्हरेज कॉस्ट) संतुलित करतो आणि दीर्घकाळात समाधानकारक परतावा देतो.
अखेरीस सातत्य आणि शिस्त या दोन गोष्टीच परताव्याचं सूत्र ठरवतात.
1. प्रत्येक वर्षी सर्वोत्तम फंडाच्या मागे धावण्यापेक्षा, निवडलेल्या फंडात सातत्य ठेवा.
2. 7 ते 10 वर्षांच्या एसआयपीमध्ये अस्थिरता नैसर्गिकरीत्या कमी होते आणि कंपाऊंडिंगचा प्रभाव वाढतो.
3. वेळोवेळी बाजार खाली-वर होतो; पण नियमित गुंतवणुकीतून मिळणारी मानसिक स्थिरता आणि आर्थिक वाढ दोन्ही टिकाऊ असतात.
4. दीर्घकाळात मिडकॅप कंपन्या मोठ्या वाढीची क्षमता दाखवतात; पण संयम आणि कालबद्धता आवश्यक आहे.
शेवटी योग्य वेळ शोधण्यात आयुष्य निघून जाऊ शकतं; पण योग्य पद्धतीने गुंतवणूक सुरू ठेवणं हेच खरं शहाणपण आहे. या आकडेवारीनं हे अधोरेखित केलं आहे की, एसआयपी ही केवळ योजना नाही, तर दीर्घकालीन संपत्ती निर्मितीची शिस्तबद्ध जीवनशैली आहे.