

प्रीतम मांडके (मांडके फिनकॉर्प)
* गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकांमध्ये अनुक्रमे एकूण 311.15 अंक आणि 932.42 अंकांची घसरण होऊन दोन्ही निर्देशांक 25149.85 अंक तसेच 82500.47 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये 1.22 टक्के आणि सेन्सेक्समध्ये 1.12 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. या सप्ताहात भारत आणि अमेरिकेदरम्यान दीर्घकाळापासून प्रलंबित व्यापार करार चर्चेचे सावट भांडवल बाजारावर होते. अमेरिकेने कॅनडा, ब्राझील, लिबिया, इराक यासारख्या राष्ट्रांवर वाढीव आयातकर लादण्याचे जाहीर केले. ट्रम्प यांच्या एकतर्फी कर लादण्याच्या धोरणाचे नकारात्मक परिणाम अनेक राष्ट्रांना सहन करावे लागणार आहेत. जगातील 20 देशांना वाढीव आयातकर लावला गेल्याची पत्रे अमेरिकेकडून धाडण्यात आली आहेत तसेच इतर देशांसोबत व्यापारकरार निश्चित करण्याची मुदत आता 9 जुलै ऐवजी 1 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवण्यात आली. या सप्ताहात वाणिज्य आणि उद्योग सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गट अमेरिकेशी व्यापार चर्चा करण्यासाठी अमेरिकेत जाणार आहे. प्रामुख्याने पशु व दुग्ध उद्योग आणि वाहन उद्योगासंबंधीच्या करांमध्ये दोन्ही देशांमध्ये काही मतभेदाचे मुद्दे असल्याचे सांगितले जाते. पशु-दुग्ध उद्योगासंबंधी तसेच कृषी क्षेत्र यासारख्या संवेदनशील क्षेत्रामध्ये भारताला अमेरिकेच्या जाचक अटी मान्य नसून, यामुळे व्यापार करार प्रलंबित आहे. अमेरिकेमध्ये बहुतांश कृषीचे यांत्रिकीकरण झाले असून, त्यांच्या दुग्ध व कृषी उत्पादनांना भारतीय बाजारपेठ खुणावते आहे. याउलट भारतातील शेतकरी हा अल्पभूधारक असून, आजदेखील पारंपरिक पद्धतीने कृषी व संबंधित व्यवसाय करत आहे. यामुळे व्यापार करारात आपल्या कृषी हितसंबंधाचे हितरक्षण होणे गरजेचे असल्याने व्यापार कराराला विलंब होत असल्याचे समजते. सप्ताहभरात सर्वाधिक वाढ होणार्या समभागांमध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर (7.7 टक्के), कोटक महिंद्रा बँक (4.3 टक्के), एनटीपीसी (2.2 टक्के), एसबीआय लाईफ (2 टक्के), पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन (1.6 टक्के) या समभागांचा समावेश झाला. सप्ताहात सर्वाधिक घट होणार्या समभागांमध्ये टायटन कंपनी (-8.8 टक्के), एचसीएल टेक (-5.1 टक्के), अपोलो हॉस्पिटल्स सर्व्हिसेस (-4.5 टक्के) यांचा समावेश झाला. या आठवड्यात बीएसईचे भांडवल बाजारमूल्य एकूण 4.54 लाख कोटींनी घटले. यापैकी शुक्रवारच्या एका सत्रात बाजारमूल्य तब्बल 3.56 लाख कोटी रुपये खाली आले.
* देशातील सर्वात मोठी कंपनी ‘टीसीएस’चे आर्थिक वर्ष 2026 चे पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर. कंपनीचा महसूल मागील तिमाहीच्या तुलनेत 1.6 टक्के घटून 64,479 कोटींच्या तुलनेत 63,437 कोटींवर खाली आला. कंपनीचा निव्वळ नफा 12,224 कोटींवरून 4.4 टक्के वधारून 12,760 कोटींवर गेला. या तिमाहीत कंपनीने 5,090 नवीन कर्मचारी जोडले. यामुळे कंपनीमध्ये काम करणार्या कर्मचार्यांची संख्या 6,13,069 झाली. यावर्षी एकूण 40 हजार कर्मचारी जोडण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. भूराजकीय युद्धे आणि आर्थिक व्यापारयुद्धे यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्यांकडून कामाच्या निविदा (ऑफशोअर कॉन्ट्रॅक्ट) येणे कमी झाले. त्याचप्रमाणे कंपनीमध्ये अंतर्गत कार्य पुनर्रचना (रिस्ट्रक्चर) चालू असल्याने नफावृद्धी मंदावली असल्याचे कंपनीकडून स्पष्टीकरण. साल 2021 नंतरचा हा सर्वात कमी महसूल वृद्धीदर आहे.
* आयसीआयसीआय बँकेची उपकंपनी आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने ‘आयपीओ’साठी सेबीकडे अर्ज केला. एकूण 10 हजार कोटींची उभारणी आयपीओद्वारे होणार. यामध्ये कंपनीचे प्रवर्तक, ब्रिटिश कंपनी प्रुडेन्शिअलतर्फे 17.7 दशलक्ष समभागांचा ‘ओएफएस’ असेल. सध्या या कंपनीमध्ये आयसीआयसीआय बँकेचा 51 टक्के तर 49 टक्के प्रुडेन्शिअल या ब्रिटिश कंपनीचा हिस्सा आहे. म्युच्युअल फंड क्षेत्रातील भांडवल बाजारात आयपीओद्वारे उतरणारी ही देशातील सहावी कंपनी ठरेल तर आयसीआयसीआय उद्योग समूहातील भांडवल बाजारात उतरणारी ही पाचवी कंपनी ठरेल.
* ‘डी मार्ट’ चालवणारी कंपनी ‘अॅव्हेन्यू सुपरमार्ट’चा चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीतील निव्वळ नफा मागील वर्षीच्या तुलनेत 774 कोटींवरून 1 कोटीनी कमी होऊन 773 कोटी झाला. कंपनीची विक्री 16.3 टक्के वाढून 14,069 कोटींवरून 16,360 कोटी झाली. यावर्षी नफ्याचे मार्जिन 5.5 टक्क्यांवरून 4.7 टक्क्यांवर खाली आले. त्यामुळे विक्री वाढूनदेखील नफा या प्रमाणात वाढला नाही. क्विक कॉमर्स क्षेत्रातील झेप्टो, ब्लिंकइट सारख्या नव्या युगातील कंपन्यांकडून वाढणार्या स्पर्धेची झळ डी मार्टसारख्या कंपन्यांना बसत असल्याचे विश्लेषकांचे मत.
* एसआयपी (सिप) द्वारे भांडवल बाजारात होणार्या गुंतवणुकीने नवा उच्चांक गाठला. जून महिन्यात सिपद्वारे तब्बल 27,269 कोटींची गुंतवणूक. सिप खात्यांची संख्या 86.4 दशलक्षांवर पोहोचली. जून 2025 अखेर म्युच्युअल फंड उद्योगाचे व्यवस्थापन अंतर्गत भांडवल मूल्य 74.41 लाख कोटींवर पोहोचले. यापैकी सिपद्वारे असलेल्या गुंतवणुकीचे भांडवल मूल्य 15.3 लाख कोटी इतके झाले. देशातील डिमॅट खात्यांची संख्यादेखील विक्रमी आकडा म्हणजे सुमारे 20 कोटींजवळ पोहोचली. सीडीएसएल व एनएसडीएल यांच्याकडे असणार्या एकत्रित डिमॅट खात्यांची संख्या जूनअखेर 19.94 कोटी इतकी झाली.
* टेस्ला कंपनी या आठवड्यात अधिकृतरीत्या भारतीय बाजारपेठेत उतरणार. यासाठी मुंबईत बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये कंपनीचे शोरूम 15 जुलै रोजी खुले. महिनाअखेर मुंबईनंतर दिल्लीमध्येदेखील टेस्लाचे शोरूम सुरू होणार. साधारण या गाडीची किंमत 60 लाखांपर्यंत असण्याची शक्यता आहे.
* केंद्र सरकार ‘एलआयसी’मधील आपला हिस्सा लवकरच कमी करणार. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत सुमारे 3 टक्का हिस्सा विक्रीद्वारे 20 ते 30 हजार कोटींचा निधी उभारण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. सध्या केंद्र सरकारचा एलआयसीमध्ये 96.5 टक्के हिस्सा असून, 16 मे 2027 अखेर पर्यंत 6.5 टक्के हिस्सा विक्रीचे उद्दिष्ट आहे.
* नागपूरचा बुटीबोरी या ठिकाणचा विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड (व्हीआयपीएल) प्रकल्प अदानी पॉवर कंपनीकडे. यापूर्वी या प्रकल्पाची मालकी अनिल अंबानींकडे होती. 18 जून 2025 रोजी दिवाळखोरीसंबंधी प्रकरणे हाताळणार्या एनसीएलटी न्यायाधिकरणाने या दिवाळखोर प्रकल्पाच्या हस्तांतरणास मान्यता दिली. अदानी समूहाने यासाठी 4 हजार कोटी रुपये मोजले. एकूण 600 मेगावॅट ऊर्जानिर्मिती करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे. या अधिग्रहणाने अदानी पॉवर कंपनीची एकूण वीजनिर्मिती क्षमता 18,150 कोटींवर पोहोचेल.
* जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांच्या स्टार लिंक कंपनीला भारतात उपग्रह आधारित इंटरनेट सेवा सुरू करण्यास मान्यता दिली गेली. स्टारलिंकचे एकूण 4,408 उपग्रहांचे एक विशाल जाळे आहे. साधारण 540 ते 570 किलोमीटर उंचीवर या कंपनीचे उपग्रह फिरतात. दुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी इंटरनेटचे फायबर केबलचे जाळे पोहोचू शकत नाही, त्या ठिकाणी हे उपग्रह आधारित इंटरनेट पोहोचू शकेल. 2030 सालापर्यंतचा परवाना स्टारलिंकला मिळाला आहे. एअरटेल आणि जिओ या भारतीय कंपन्यांसोबत स्पेसएक्स कंपनीने भागीदारीदेखील केली आहे. सध्या स्टारलिंक 100 पेक्षा अधिक देशांमध्ये आपली इंटरनेटची सेवा देत आहे.
* 4 जुलैअखेर संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी 3,049 अब्ज डॉलर्सनी घटून पुन्हा विक्रमी 700 अब्ज डॉलर्सखाली 699.736 अब्ज डॉलर्सवर आली. यापूर्वी गंगाजळी सप्टेंबर 2024 मधील 704.885 अब्ज डॉलर्सच्या सर्वकालीन उच्चांकाजवळ पोहोचली होती. परंतु, हा उच्चांक पार करण्यासाठी सध्यातरी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे समजते.