

बाजारातील (Stock market) चढ-उतार पुढील काही आठवडे किंवा महिने टिकू शकतात. अशा वेळी गुंतवणूकदारांनी भारताच्या आर्थिक क्षमतेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. एसआयपीद्वारे नियमितपणे गुंतवणूक करणे, हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे बाजारातील चढ-उतारांचा फायदा घेतला जाऊ शकतो.
अमेरिकेतील बेरोजगारीच्या वाढत्या आकड्यांमुळे आणि अर्थव्यवस्थेच्या कमकुवत स्थितीमुळे तेथे आर्थिक मंदीची चिंता वाढली आहे. याशिवाय, येन चलनाशी संबंधित व्यापारामुळेही चिंता निर्माण झाल्या आहेत. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर अनिश्चितता वाढली आहे. जपानने व्याजदरात वाढ करून चिंतेत भर घातली आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे, सोमवारी, 5 ऑगस्ट रोजी भारतीय शेअर बाजारात खूप मोठी घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी 50 दोन्ही निर्देशांक सुमारे तीन टक्क्यांहून अधिक घसरण दर्शवत बंद झाले. गेल्या काही आठवड्यांमध्ये आलेल्या तेजीचा फायदा घेत अस्थिरतेची परिस्थिती पाहून, काही गुंतवणूकदारांनी आपला नफा काढून घेण्यास सुरुवात केल्यामुळे बाजारातील घसरणीला वेग आला. अर्थात, बाजारात बरीच घसरण झाली असली, तरी ही घसरण फार काळ टिकणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे होणारी घसरण ही दीर्घकालीन गुंतवणुकीची संधी मानली पाहिजे. तसेच यामुळे घाबरून जाऊन गुंतवणूक थांबवणे चुकीचे ठरेल. बाजारातील चढ-उतार पुढील काही आठवडे किंवा महिने टिकू शकतात. अशा वेळी गुंतवणूकदारांनी भारताच्या आर्थिक क्षमतेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. एसआयपीद्वारे नियमितपणे गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे बाजारातील चढ-उतारांचा फायदा घेतला जाऊ शकतो.
गेल्या 5, 10 किंवा 15 वर्षांत बाजारात अनेक वेळा चढ-उतार झाले आहेत. मात्र, ज्यांनी या चढ-उतारानंतरही गुंतवणूक सुरू ठेवली, त्यांची संपत्ती वाढली आहे. म्हणूनच अर्थव्यवस्था चांगली दिसत असल्यास अशा घसरणीच्या काळात आपल्याकडील सर्व समभाग विकून बाजारापासून दूर जाणे योग्य ठरणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. आपली जोखीम क्षमता कमी असेल, तर नफावसुली करून ही जोखीम नक्कीच कमी करता येईल. पण, दीर्घकाळासाठी गुंतवणूक केली असेल तर अशा घसरणींमुळे घाबरण्याचे जराही कारण नाही. तथापि, या चढ-उतारांचा विचार करून आपली गुंतवणूक हुशारीने करणे गरजेचे आहे. बहुतेक गुंतवणूकदार त्यांचे सर्व पैसे एकाच ठिकाणी न गुंतवता अनेक फंडांमध्ये गुंतवतात. व्हॅल्यू रिसर्चनुसार, तुमच्याकडे जास्तीत जास्त 4-5 फंड असावेत. तुमच्या गुंतवणुकीचा मुख्य भाग एक किंवा दोन फ्लेक्सी कॅप फंडांमध्ये असावा. याशिवाय कर वाचवण्यासाठी तुम्ही ईएलएसएस फंडांमध्येही गुंतवणूक करू शकता.
मिड आणि स्मॉल कॅप फंड चांगला परतावा देणारे असले, तरी त्यात जोखीमही अधिक आहे. त्यामुळे तुमच्या एकूण गुंतवणुकीच्या 20-25 टक्केपेक्षा जास्त गुंतवणूक त्यामध्ये नसावी, असे मानले जाते. बाजारातील घसरणीचा फायदा घेण्यासाठी काही पैसे रोख स्वरूपात ठेवणे देखील महत्त्वाचे आहे; जेणेकरून जेव्हा बाजार सुधारण्याची सुरुवात होऊन चांगली संधी दिसेल तेव्हा तुम्ही गुंतवणूक करू शकता. यासाठी मार्केट स्थिर होण्याची वाट पाहावी. त्यानंतरच नवीन गुंतवणूक करावी. जेव्हा बाजार सावरतो, तेव्हा तुम्ही मोठ्या कंपन्यांचे चांगल्या किमतीचे समभाग तुलनेने कमी किमतीत खरेदी करू शकता. दीर्घकाळ गुंतवणूक करणार असाल, तर ज्या दिग्गज कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती फार वाढल्या नाहीत, अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करा. यामुळे तुम्हाला मिळणारा परतावा अधिक राहील. अल्प मुदतीत जास्त नफ्याची अपेक्षा करण्याऐवजी मध्यम मुदतीत सातत्याने गुंतवणूक करत राहा, जेणेकरून तुम्हाला दीर्घकाळात चांगला परतावा मिळू शकेल. शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, अस्थिरतेच्या कारणांमुळे बाजारात घसरण झाली असेल, तर ट्रेडिंगपासून काही दिवस दूर राहणे हिताचे ठरते. त्यामुळे उगाचच साहस करून आपले हात भाजून घेऊ नका.