

* एप्रिल महिन्यात मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकांसह प्रमुख निर्देशांकांनीही मजबूत परतावा नोंदवला. सेन्सेक्स 6.90% वाढून 76,913.50 वर बंद झाला, तर निफ्टी 7.46% वाढून 23,997.55 वर पोहोचला. बीएसई मिड कॅप निर्देशांक 13.81% वाढून 46,133.63 वर, तर स्मॉल कॅप निर्देशांक 19.61% उसळी घेत 51,692.70 वर गेला. मार्चमध्ये झालेल्या घसरणीनंतर एप्रिलमध्ये गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 50,88,162 कोटी रुपयांची भर पडली, तर मार्चमध्ये 51,09,499 कोटी रुपयांची घट झाली होती. फेब्रुवारीत 3,48,431 कोटी रुपयांची वाढ आणि जानेवारीत 15,76,998 कोटी रुपयांची घट नोंदवली गेली होती.
* एप्रिल महिन्यात वस्तू व सेवा कर (GST) महसूल 2.42 लाख कोटी रुपयांवर पोहोचत आतापर्यंतचा उच्चांक नोंदवला गेला असून, वार्षिक आधारावर 8.7% वाढ झाली. देशांतर्गत महसूल 1.85 लाख कोटी रुपये(4.3% वाढ) राहिला, तर आयातीतून मिळणारा महसूल 57,580 कोटी रुपये(25.8% वाढ) झाला. परतावे 31,793 कोटी रुपयांवर (19.3% वाढ) गेले असून, निव्वळ GST महसूल 2.10 लाख कोटी रुपये (7.3% वाढ) नोंदवला गेला.
* भांडवली बाजारात एप्रिलमध्ये प्रथमच बीएसईने एफ अँड ओ व्यवहारात एनएसईला मागे टाकले असून, बीएसईचा हिस्सा 55.4% वर गेला, तर एनएसईचा हिस्सा 44.6% वर आला. बीएसईचा सरासरी दैनंदिन व्यवहार 269.07 लाख कोटी रुपयांचा (सुमारे 20% वाढ) तर एनएसईचा 216 लाख कोटी रुपयांचा (26% घट) राहिला. दुसरीकडे, परदेशी गुंतवणूकदारांनी एप्रिलमध्ये 60,847 कोटी रुपयांची विक्री केली असून, 2026 मधील एकूण बाहेर पडलेली रक्कम 1.92 लाख कोटींवर पोहोचली आहे.
* संयुक्तअरब अमिरातीने (UAE) ओपेक (OPEC) संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने जागतिक तेल बाजारात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्तकेली जात आहे. या निर्णयामुळे दशकांपासून चालत आलेले उत्पादन कोटा आणि पुरवठा नियंत्रणाचे समीकरण बदलणार आहे. सध्या ओपेकचे एकूण उत्पादन सुमारे 28,880 हजार बॅरल प्रतिदिन असून, मार्चमध्ये ते 29,610 हजार बॅरलपर्यंत गेले होते. यूएईच्या बाहेर पडण्यामुळे उत्पादन लवचिकता वाढण्याची शक्यता असून, जागतिक बाजारात अतिरिक्तपुरवठा वाढू शकतो. यामुळे दीर्घकालीन अवधीमध्ये कच्च्या तेलाच्या किमतींवर दबाव येऊन त्या स्थिर किंवा कमी राहू शकतात. भारतासारख्या आयात-आधारित देशांना याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. कारण, कमी किमतींमुळे आयात खर्च कमी होईल. ओपेकमधील प्रमुख उत्पादक देशांमध्ये सौदी अरेबिया, इराण, इराक आणि नायजेरिया यांचा समावेश असून, यूएईचा वाटा देखील महत्त्वाचा होता.
* दूरसंचार क्षेत्रात व्होडाफोन आयडियाच्या समायोजित सकल महसूल (AGR Dues) देयकात सुमारे 27% कपात करून 64,046 कोटी रुपयांवर आणण्यात आले आहे. नव्या मसुद्यानुसार कंपनीकडून FY 32-35 दरम्यान दरवर्षी 100 कोटी आणि FY36-41 दरम्यान दरवर्षी 10,608 कोटी रुपयांचा भरणा अपेक्षित आहे. या पुनर्रचनेमुळे नाममात्र दिलासा मोठा दिसत असला, तरी प्रत्यक्ष (रिअल टर्म्स) लाभ सुमारे 10,000 कोटी रुपये इतकाच राहणार असून, सवलतीचा मोठा भाग पुढील कालावधीत ढकलण्यात आला आहे. कंपनीवर डिसेंबर 2025 पर्यंत सुमारे 1.25 लाख कोटी रुपयांचे कर्ज असून, पुढील तीन वर्षांत सुमारे 49,000 कोटी रुपयांचे स्पेक्ट्रम देयक भरायचे आहे. त्यामुळे दिलासा मिळूनही कंपनीवरील आर्थिक ताण कायम राहण्याची शक्यता व्यक्तकेली जात आहे.
* व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत जवळपास 50% वाढ झाली असून, 19 किलो सिलिंडरची किंमत 1 मे 2026 पासून 993 ने वाढून दिल्लीत 3,071.5 रु., मुंबईत 3,024 रु., चेन्नईत सर्वाधिक 3,237 रु. पर्यंत पोहोचली आहे. एकूण LPG वापरात पॅक्ड डोमेस्टिकचा वाटा 87.23%, नॉन-डोमेस्टिक 9.07%, बल्क 3.49% आणि ऑटो LPG 0.21% इतका आहे.
* एप्रिलमध्ये परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) 60,847 कोटी रुपयांची निव्वळ विक्री केली असून, 2026 मधील एकूण बाहेर पडलेली रक्कम 1.92 लाख कोटी रु.वर पोहोचली आहे. जानेवारीत 35,962 कोटी रु.ची विक्री, फेब्रुवारीत 22,615 कोटी रु.ची खरेदी, तर मार्चमध्ये 1.17 लाख कोटी रु.ची विक्री झाली होती.
* भारत सरकारने ‘Mythos’ या प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मॉडेलच्या चाचण्यांवर बँका आणि विमा कंपन्यांना बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या देशातील 4 ते 5 मोठ्या बँकांमध्ये हे मॉडेल ‘sandbox’ पद्धतीने मर्यादित वापरात ठेवण्यात आले आहे. अधिकृत परवानगी मिळेपर्यंत कोणतीही थेट तैनाती (deployment) करण्यास मनाई करण्यात आली आहे. या मॉडेलद्वारे सायबर हल्ल्यांची प्रक्रिया काही महिन्यांवरून काही तासांमध्ये संकुचित होऊ शकते, अशी शक्यता व्यक्तकरण्यात आली आहे. परंतु, उलटपक्षी ही यंत्रणा चुकीच्या हातात गेल्यास स्वयंचलित सायबर हल्ल्यांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, अशी भीती अधिकार्यांनी व्यक्तकेली आहे.
* रुपयावर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा दबाव वाढत असून, गुरुवारी रुपया डॉलरच्या तुलनेत 95 चा स्तर ओलांडत 95.33 या विक्रमी नीचांकी पातळीवर गेला. त्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपामुळे काहीशी सुधारणा होऊन रुपया 94.92 वर बंद झाला, जो मागील बंद 94.85 च्या तुलनेत 7 पैशांनी कमजोर होता. आठवडाभरात रुपया सुमारे 0.7% घसरला आहे. 2026 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत रुपयात एकूण 5.6% घसरण नोंदवली गेली आहे. दरम्यान, कच्च्या तेलाच्या किमतीत तीव्र वाढ होत ब्रेंट क्रूड 119.50 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले.
* केंद्र सरकारने इथेनॉल मिश्रण वाढवण्यासाठी पेट्रोलमध्ये E85 (85% इथेनॉल) आणि E100 (100% इथेनॉल) इंधनांचा प्रस्ताव मांडला आहे. सध्या देशात E20 (20% इथेनॉल) पेट्रोल टप्प्याटप्प्याने लागू करण्यात आले असून, तेच मुख्य इंधन म्हणून उपलब्ध आहे. नवीन प्रस्तावानुसार E85 आणि E100 इंधनांना अधिकृत मान्यता देण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन नियमांमध्ये बदल सुचवण्यात आले आहेत. या बदलामुळे फ्लेक्स-फ्यूएल वाहनांना चालना मिळणार असून, अशी वाहने E85 किंवा E100 वर चालू शकतील. उच्च इथेनॉल मिश्रणासाठी इंजिन आणि फ्यूएल सिस्टीममध्ये बदल आवश्यक असल्याने वाहनांची सुरुवातीची किंमत वाढण्याची शक्यता आहे. सरकारचा उद्देश कच्च्या तेलावरील आयात कमी करणे हा आहे.
* 24 एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात देशाची परकीय चलन गंगाजळी 4.82 अब्ज डॉलरनी घटून 698.49 अब्ज डॉलरवर आली. यामध्ये परकीय चलन मालमत्ता (FCA) 2.84 अब्ज डॉलरनी घटून 554.62 डॉलर अब्जांवर, तर सोन्याचा साठा 1.90 डॉलर अब्जांनी कमी होऊन 120.24 अब्ज डॉलरवर आला; तसेच विशेष आहरण हक्क(SDR) 67 दशलक्ष डॉलरनी घटून 18.77 अब्ज डॉलरवर पोहोचले.