

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेच्या शेअर बाजारात हाहाकार उडाला आहे. याला कारण ठरले आहे ते म्हणजे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील शेअर बाजार निर्देशांकांमध्ये सोमवारी मोठी घसरण झाली. येथील एस अँड पी ५०० निर्देशांक २.७० टक्केने घसरला. डाऊ जोन्स (Dow Jones) ८९० पेक्षा जास्त अंकांनी घसरला. तर नॅस्डॅक (Nasdaq) निर्देशांक ४ टक्केने गडगडला. अलिकडील आठवड्यांतील ही सर्वात मोठ्या घसरणींपैकी एक मानली जात आहे.
अमेरिकेतील आर्थिक मंदीची भीती वाढत आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या भावनांना धक्का बसला आहे. महागाई, दरवाढ आणि भू-राजकीय तणाव यांसारख्या घटकांचा आधीच बाजारांवर परिणाम दिसून येत आहे. त्यात आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या जशास तसे म्हणजे प्रस्तावित परस्पर शुल्क लागू करण्याच्या (रेसिप्रोकल) घोषणांमुळे बाजारात अनिश्चितता वाढली असल्याचे बाजारातील विश्लेषकांचे म्हणणे आहे.
विशेषतः याचा फटका अमेरिकेच्या शेअर बाजारातील तेजीचा कणा असलेल्या मोठ्या टेक कंपन्यांच्या शेअर्संना बसलाय. टेस्लाचा शेअर्स १५ टक्क्यांनी घसरला. एनव्हीडियाचे शेअर्स सुमारे ५ टक्के खाली आले. तसेच मेटा, ॲमेझॉन आणि ॲमेझॉन आदी कंपन्यांच्या शेअर्संनाही विक्रीच्या तीव्र दबावाचा सामना करावा लागला. यामुळे बाजार भांडवलाचे अब्जावधींचे नुकसान झाले.
दरम्यान, फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, ट्रम्प यांनी त्यांच्या व्यापार धोरणांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी म्हटले की, “हा संक्रमणाचा काळ आहे. आम्ही अमेरिकेत संपत्ती परत आणतोय." पण, वाढत्या शुल्कामुळे महागाई वाढू शकते आणि विकास मंदावू शकतो, अशी भीती अर्थज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, अमेरिकेतील घसरणीचे पडसाद आज मंगळवारी भारतीय शेअर बाजारातही दिसून आले. सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स ३५० हून अधिक अंकांनी खाली आला. तर निफ्टी ५० निर्देशांकानेही १०० हून अधिक अंकांच्या घसरणीसह सुरुवात केली. सेन्सेक्सवर इंडसइंड बँकेचा शेअर्स तब्बल २२ टक्क्यांनी घसरला. झोमॅटोचा शेअर्स ४ टक्के, इन्फोसिस सुमारे ३ टक्के, एम अँड एम २ टक्के, टेक महिंद्राचा शेअर्स १.८ टक्के घसरला. यामुळे बीएसईवरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३.८ लाख कोटी रुपयांनी कमी होऊन ते ३९०.०६ लाख कोटी रुपयांवर आले.
दरम्यान, जागतिक कमकुवत संकेतांदरम्यान आशियाई बाजारातही घसरण दिसून आली आहे.