Stock Market | शेअर बाजारावर टॅरिफ वाढीचा आघात

FII Selling आणि DII Buying हे गेल्या कित्येक महिन्यांपासूनचे चित्र जुलै महिन्यातही दिसून आले
Tariff hike shock |
Tariff hike shock | टॅरिफ वाढीचा आघात(Pudhari File Photo)
Published on
Updated on

भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा. लि.

गुरुवार, दिनांक 31 जुलै 2025 रोजी जुलै महिन्याची अंतिम एक्स्पायरी होती. मासिक धर्तीवर जुलै महिन्यात निफ्टी आणि सेन्सेक्स पाऊण टक्क्यांच्या आसपास घसरले, तर बँक निफ्टी दोन टक्क्यांहून अधिक घसरला. याचे कारण जी घटना (टॅरिफ वाढ) घडणार आहे आणि घडली तर किंवा घडणार आहे, याच्या विवंचनेत बाजार गेला महिनाभरात संभ्रमित झाला होता. ती गोष्ट तर घडून चुकली आहे आणि तिचे प्रमाणही (25 टक्के+पेनल्टी) माहीत झाले आहे. शुक्रवारी म्हणजे नव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी बाजारात जो Sale off आला, ती बाजाराची खरीखुरी टॅरिफ वाढीला प्रतिक्रिया होती.

मग आता बाजार असाच खाली खाली जात राहील काय? इतिहास असे सांगतो की, अशा कित्येक घटनांना पचवून बाजार पुढे जात राहतो. कारण, कोणत्याही अर्थव्यवस्थेसाठी निर्यातीला महत्त्व असले, तरी आपल्या देशाची अंतर्गत बाजारपेठ प्रचंड मोठी आहे आणि भारताची Consumption Story ही अशा छोट्या-मोठ्या हेलकाव्यांना झेलून भारतीय अर्थव्यवस्थेला प्रगतिपथावर नेण्यासाठी सक्षम आहे.

रिझर्व्ह बँकेने 2025-26 साठी भारताच्या GDP वाढीचा जो 6.5 टक्के अंदाज वर्तवला आहे. त्यामध्ये पहिल्या तिमाहीत 6.5 टक्के GDP वाढेल, असे गृहीत धरले होते. नंतर रिझर्व्ह बँकेने हा पहिल्या तिमाहीसाठीचा 6.5 टक्के दर सुधारून 6.4 टक्के केला. परंतु, प्रत्यक्षात सर्व अर्थतज्ज्ञांना, बाजाराला आणि सरकारलाही आश्चर्याचा सुखद धक्का देत GDP वाढीचा दर 7.4 टक्के आला. आता अमेरिकेच्या वाढीव टॅरिफकडे दुसर्‍या तिमाहीसाठी आरबीआयचा जो 6.7 टक्के वाढीचा अंदाज आहे, तो कमी होऊन 6.1 ते 6.2 वर येईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

FII Selling आणि DII Buying हे गेल्या कित्येक महिन्यांपासूनचे चित्र जुलै महिन्यातही दिसून आले. जुलैमध्ये तर FIIs नी मागील चार महिन्यांत जेवढी एकत्रित विक्री केली होती, त्याच्या दुप्पट विक्री केली आणि DIIs नी पुन्हा एकदा भारतातील मध्यमवर्गाच्या वाढत्या अर्थजागृतीची शक्ती दाखवत FIIs च्या विक्रीपेक्षा कितीतरी अधिक खरेदी केली. FIIs ची विक्री होती रु. 47666.68 कोटी तर DIIs ची खरेदी होती रु. 60939.16 कोटी. आणि वैशिष्ट्य म्हणजे जुलै 2023 पासून आजअखेर म्हणजे मागील दोन वर्षांत प्रत्येक महिन्यात DIIs नी विक्रीपेक्षा अधिक खरेदी केली आहे.

जुलै महिन्याचे Auto Sales चे आकडे शुक्रवारी जाहीर झाले. चार चाकी वाहनांमध्ये महिंद्रा आणि महिंद्राने 26 टक्के अधिक विक्री वाढवून (Over all) कमाल केली आहे. Sports Utility Vehicles (SUV), Commercial Vehicles, LCVS, 3-Wheelers अशा सर्व सेगमेंटमध्ये कंपनीने प्रगती केली आहे. शिवाय त्यांची निर्यातही 83 टक्क्यांनी वाढली आहे. नुकतेच M & M ने पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल प्रसिद्ध केले.

बाजाराच्या अंदाजांपेक्षा अधिक चांगले निकाल प्रसिद्ध झाले आहेत. नेट प्रॉफिटमध्ये 32 टक्के वाढ तर रेव्हेन्यूमध्ये 26 टक्के वाढ झाली आहे. शेअरचा शुक्रवारचा भाव रु. 3165 आहे. पीई 25.82 आहे. तुम्हाला जर 15 ते 18 टक्के असा समाधानकारक परतावा देणारा शेअर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हवा असेल तर M & M चा विचार करण्यास हरकत नाही.

सन 2025-26 च्या पहिल्या तिमाहीच्या कंपन्यांच्या निकालाचा सध्या हंगाम आहे. आतापर्यंत प्रसिद्ध झालेले निकाल पाहिले, तर जवळपास सहाशे कंपन्यांचे निकाल आशादायक, तर चारशे कंपन्यांचे निकाल निराशाजनक सादर झाले आहेत. अ‍ॅग्रोकेमिकल्स कंपन्यांनी सर्वाधिक चांगले निकाल दिले आहेत. सरासरी 168 टक्के नेट प्रॉफिट ग्रोथ तर पन्नास टक्के ऑपरेटिंग प्रॉफिट ग्रोथ त्यांनी दाखवली आहे. सर्वोकृष्ट निकाल देणार्‍या खालील अ‍ॅग्रोकेमिकल्स कंपन्यांचा वाचकांनी जरूर अभ्यास करावा.

1) Meghmani Organics (MOL) - Rs. 95.70

2) NACL Industries - Rs. 307.15

3) Punjab Chemicals - Rs. 1396.90

4) Astec Life Sciences - Rs. 884

5) Sharda Crop - Rs.1102

6) Rallis- Rs. 365.80

यांच्या खालोखाल फर्टिलायझर कंपन्यांनी सर्वांगीण प्रगती दाखवली आहे. सरासरी 35 टक्के रेव्हेन्यू ग्रोथ, 88 टक्के नेट प्रॉफिट ग्रोथ आणि 43 टक्के ऑपरेटिंग प्रॉफिट ग्रोथ अशी फार चांगली आकडेवारी फर्टिलायझर कंपन्यांनी सादर केली आहे. त्यापैकी काही उत्कष्ट कंपन्या खालीलप्रमाणे ः-

1) Madhya Bharat Agro Products (MBAPL) - Rs. 437.85

2) Khaitan Chemical and Fertilizers - Rs. 109.25

3) The Phosphate Company - Rs. 172.25

4) Paradeep Phosphates - Rs. 217.60

5) Coromandel International - Rs. 2590

6) Krishana Phoschem - Rs. 537

7) Zuari Agro Chemicals - Rs. 307.25

असाधारण प्रगती दाखवणार्‍या अनेक कंपन्यांचे शेअर्स आपल्याला एरव्ही ठाऊकही नसतात. शेवटी शेअर बाजार हा एक महासागर आहे आणि अलीकडे माहितीचा मारा सगळीकडून इतका प्रचंड होतो की, सर्वसाधारण गुंतवणूकदार गोंधळून जातो. अशा परिस्थितीमध्येच दर्जेदार शेअर्सचा शोध घेणे, हे आपले काम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news