म्युच्युअल फंडांमध्ये मासिक उत्पन्न मिळवण्यासाठी एक चांगला पर्याय आहे, तो म्हणजे सिस्टिमॅटिक विड्रॉअल प्लॅन (SWP). जसे आपण दर महिन्याला नियमितपणे गुंतवणूक करतो, त्याच्या उलट मोठी रक्कम गुंतवणूक करून त्यामधून दर महिन्याला नियमितपणे म्युच्युअल फंडातून रक्कम काढून घेतो. याला म्हणतात SWP. दर महिन्याला तुमच्या खात्यामध्ये न चुकता कायमस्वरूपी उत्पन्न निर्माण करण्यासाठी एसडब्ल्यूपीमधील गुंतवणूक नियोजन योग्य ठरते.
गुंतवणुकीच्या माध्यमातून दर महिन्याला उत्पन्न निर्माण करताना किंवा निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाचे नियोजन करताना दूरद़ृष्टी ठेवायला हवी. बरेच लोक सुरक्षित गुंतवणुकीच्याद़ृष्टीने पारंपरिक पर्यायांचा विचार करतात. वास्तविक, महागाईमुळे पैशामधील क्रयशक्ती कमी होत असते. आपले उत्पन वाढती महागाई खात असते आणि वस्तूंच्या किमती वाढत राहतात. वस्तूंच्या किमती वाढल्याने उदरनिर्वाहासाठी पैसा कमी पडतो. माझे काही मित्र 2000 साली काही बँकेतून निवृत्त झाले. त्या वेळेस त्यांना ग्रॅच्युईटी, रजा, पगार, प्रॉव्हिडंट फंड वगैरे मिळून 25 ते 30 लाख रुपये मिळाले होते. सहकारी बँकेतील अधिकार्यांना निवृत्ती वेतन खूपच कमी मिळते. त्यांनी नियमित उत्पन्नासाठी सुरक्षित पर्याय म्हणून बँकेत आणि पोस्टात पैसे ठेवले. त्या काळी 12% व्याज मिळत होते, त्यामुळे सुरुवातीला खर्च भागवून पैसे शिल्लक राहत होते. कालांतराने व्याजाचे दर कमी होत गेले आणि महागाई वाढत गेली. तुटपुंज्या उत्पन्नावर कसे जगायचे, हा प्रश्न पडला. निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाचा विचार करताना महागाईचा विचार केला पाहिजे.
महागाई कशी वाढली आहे पाहा. 2000 साली पेट्रोल 26 रुपये प्रती लिटर होते, आज 106 रुपये आहे. गॅस सिलेंडर 196 रुपये होते, आज 1060 रुपये आहे. दूध 15 रुपये लिटर होते, आज 70 रुपये लिटर आहे. 2000 साली एमडी डॉक्टरची तपसणी फी 50 रुपये होती, आज 700 रुपये झाली आहे. या सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती पहिल्या असता, चार ते पाच पटीने वाढलेल्या दिसतात. म्हणजेच 2000 साली होणारा 20000 रुपयांचा घरखर्च आज 105000 रुपयांवर पोहोचला आहे. पारंपरिक गुंतवणुकीवरील 12% व्याजाने दरमहा मिळणारे उत्पन्न 25000 वरून कमी झालेल्या 7% व्याजाने 15000 रुपये इतके कमी झाले आहे. त्यामुळे अनेक लोकांची आजची आर्थिक परिस्थिती वेदनादायी झाली आहे. औषध मरू देत नाही, महागाई जगू देत नाही, अशी दयनीय अवस्था अनेक वृद्धांची दिसत आहे. त्यामुळेच आज चाळीशीत असलेल्या लोकानी निवृत्तीचा विचार करताना वाढत्या महागाईचा विचार करून गुंतवणूक केली पाहिजे.
पारंपरिक योजनांमध्ये पोस्ट योजना, एलआयसी पेन्शन प्लान, बँक मुदतठेवी यांचा विचार करतो. अशा योजनेतून सरासरी सात टक्के व्याज मिळते. मिळालेल्या व्याजाच्या रकमेवर आयकर भरावा लागतो. 10%, 20%, 30% असे आयकराचे स्लॅब आहेत. तुमच्या 25 लाखांच्या गुंतवणुकीवर बँक व्याज 7.50% प्रमाणे दरमहा 15625 रुपये मिळतील. व्याजाच्या उत्पन्नातून आयकर द्यावा लागतो. उच्चस्तर कर 33% प्रमाणे 5156 वजा केले करमुक्त फक्त 5% दराने 10468/- प्रमाणे व्याज मिळते. 20% आयकर टप्पा, तर करमुक्त 3281 कर वजा केले, तर 6% दराने 12343 करमुक्त उत्पन्न मिळते. 10% ने 6.67% दराने 13906 करमुक्त मिळते. मिळालेल्या उत्पन्नातून महागाई दर 7% ने वजा केला, तर आपले उत्पन्न घटत असल्याचे दिसते.
म्युच्युअल फंडांमध्ये मासिक उत्पन्न मिळवण्यासाठी एक चांगला पर्याय आहे, तो म्हणजे सिस्टिमॅटिक विड्रॉअल प्लॅन (SWP). जसे आपण दर महिन्याला नियमितपणे गुंतवणूक करतो, त्याच्या उलट मोठी रक्कम गुंतवणूक करून त्यामधून दर महिन्याला नियमितपणे म्युच्युअल फंडातून रक्कम काढून घेतो. याला म्हणतात SWP. दर महिन्याला तुमच्या खात्यामध्ये न चुकता कायमस्वरूपी उत्पन्न निर्माण करण्यासाठी एसडब्ल्यूपीमधील गुंतवणूक नियोजन हे फार फायदेशीर ठरते. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहे.
आपण नियमित उत्पन्नासाठी पारंपरिक गुंतवणूक पोस्ट बँक एफडी एलआयसी पेन्शन प्लॅनमध्ये करत असतो. इथे केलेल्या गुंतवणुकीवरील व्याजाची रक्कम प्रत्येक महिन्याला घेत असल्यामुळे, आपण केलेली मूळ गुंतवणूक रक्कम कधीही वाढत नाही; परंतु म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही असा पोर्टफोलिओ निर्माण करू शकता की, दर महिन्याला ठरावीक रक्कम काढल्यानंतरसुद्धा जसे मार्केट वाढेल तसे आपल्या गुंतवणुकीमध्ये वाढ झालेली दिसेल. उदाहरणार्थ 25 लाख रुपये गुंतवणूक केल्यानंतर दर महिन्याला मी 7% टक्केप्रमाणे सिस्टिमॅटिक विड्रॉअल करत राहिलो आणि उर्वरित पोर्टफोलिओ 9 ते 12% ने परतावा मिळाला तर दहा वर्षांनंतर खालीलप्रमाणे तुम्हाला चित्र दिसेल.
एकूण गुंतवणूक 25 लाख 7% प्रमाणे दरमहा 14500/- रु. (SWP) ने खात्यामध्ये जमा घेतलेस वार्षिक 17,40,00 रुपये मिळतात. दहा वर्षांत एकूण रक्कम 17,40,000/-रु. नियमित उत्पन्न मिळाल्यानंतर याच कालावधीत सदर गुंतवणूक पोर्टफोलिओ 9% वाढला तर 31.45 लाख होतील. पोर्टफोलिओ 10% वाढला तर 35.61 लाख होतील. 12% वाढला तर 45.12 लाख होतील. म्हणजेच दहा वर्षांनंतर माझे आणखी उत्पन्न वाढवू शकते. 10% पोर्टफोलिओ वाढले तर दहा वर्षांनी दरमहा 21000/- उत्पन्न वाढवून घेऊ शकतो. म्हणजेच नियमित उत्पन्न घेऊन दर दहा वर्षांनी आपले उत्पन्न वाढविता येते. ही खूप मोठी फायद्याची गोष्ट म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून मिळू शकते. मात्र, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक फार सावधपणे करणे गरजेचे आहे. मार्केटमधील जोखीम कशी असते, ती समजावून घेतली पाहिजे. आपण किती गुंतवणूक जोखीम घेऊ शकतो? गुंतवणूक केल्यानंतर मार्केट खाली गेले, तर आपल्याला गुंतवणुकीपेक्षाही रक्कम कमी झालेली पाहावयास मिळते. ही जोखीम समजावून घेऊन गुंतवणूक केली पाहिजे.
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना आपण युनिटस् खरेदी करतो आणि ज्यावेळी सिस्टिमॅटिक विड्रॉअल प्लॅनद्वारे रक्कम काढतो, त्या वेळेस त्या युनिटची विक्री होते. मग खरेदी आणि विक्रीमधील जो फरक असतो, त्या फरकावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन भरणे गरजेचे असते. खरेदी केलेल्या आणि विक्री केलेल्या युनिटस्मधील फरक हा फार कमी असतो. त्यामुळे इथे नगण्य स्वरूपात कर भरावा लागतो. इतर पारंपरिक योजनांपेक्षा कमी कर बसतो. पोस्ट, बँक एफडीमध्ये गुंतवणूक करून उत्पन्न घेतो, त्या वेळी मिळालेल्या उत्पन्नावर आपल्या आयकर नियमानुसार कर द्यावा लागतो.
आयुर्विमा पेन्शन प्लॅन किंवा पोस्टाच्या मासिक उत्पन्न योजनांमध्ये जेव्हा गुंतवणूक करतो, तेव्हा हवी तेवढी हवी तेव्हा रक्कम, संपूर्ण रक्कम काढता येत नाही. काही ठरावीक कारणांनुसारच रक्कम काढता येते किंवा त्यावर कर्ज घेता येते; मात्र म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत असताना इथे गुंतवणूक केलेली संपूर्ण रक्कम कधीही काढता येते. पारंपरिक योजनेपेक्षा इथे तरलता अधिक तीव्र आहे.
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना बाजाराची विविध जोखीम असते, तिचा अभ्यास करून सावधपणे गुंतवणूक करणे आवश्यक आहे. देशात म्युच्युअल फंडाच्या मनी मार्केट, डेट मार्केट, इक्विटी मार्केट, कमोडिटी मार्केट, विविध मालमत्तेमधील 2500 योजना आहेत. त्यापैकी तुमच्यासाठी कोणत्या चांगल्या आहेत, हे पाहणे फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपले वय किती? जोखीम घेण्याची क्षमता किती? आपल्याकडे गुंतवणूक कालावधी किती आहे? आर्थिक परिस्थिती कशी आहे? कुटुंबात येणारे स्थिर उत्पन्न आणि अस्थिर उत्पन्न किती आहे? भविष्यात किती वर्षे उत्पन्न हवे? याचा विचार करून वाढत्या महागाईनुसार आपल्याला नियमित उत्पन्न निर्माण करण्यासाठी महत्त्व दिले पाहिजे. या सर्व घटकांचा विचार करून गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ तयार केला पाहिजे. चांगल्या निवडक योजना घेऊन, मार्केटमधील परिस्थितीचा विचार करून सेबी रजिस्टर गुंतवणूक सल्लागाराकडून गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ तयार करून घेतला पाहिजे. आणि बाजारातील बदलत्या परिस्थितीनुसार आपला पोर्टफोलिओमध्ये बदल केला पाहिजे. येणारा काळ गुंतवणुकीसाठी खूपच चांगला आहे. त्याचा फायदा करून घेण्यासाठी भांडवली बाजारात उतरले पाहिजे. चांगल्या सल्लगार सोबत राहिल्यास म्युच्युअल फंड सही आहे.