पुढारी ऑनलाईन डेस्क : सोमवारच्या सत्रातील घसरणीतून सावरत मंगळवारी शेअर बाजाराने (Stock Market) तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ७०० हून अंकांनी वाढून ७७,९०० वर पोहोचला. तर निफ्टी ५० निर्देशांक २०० अंकांच्या वाढीसह २३,५७० वर व्यवहार करत आहे.
सेन्सेक्सवर एलटी, टाटा मोटर्स, इन्फोसिस, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, एम अँड एम, अदानी पोर्ट्स, इंडसइंड बँक, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांपर्यंत वाढले. तर आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, भारती एअरटेल हे शेअर्स घसरले आहेत.
निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस प्रत्येकी १ टक्के वाढले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोच्या उत्पादनांवर कर लागू करण्याची घोषणा केली होती. परिणामी ट्रेड वॉरच्या भीतीने सोमवारी आशियाई शेअर बाजारात घसरण दिसून आली होती. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवर २५ टक्के कर लागू करण्याचा निर्णय एका महिन्यासाठी पुढे ढकलला आहे. मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शीनबॉम आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ट्रम्प यांनी हा निर्णय तूर्त स्थगित केला आहे. यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.