

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या सात सत्रांतील घसरणीनंतर आज मंगळवारी (दि.१९) भारतीय शेअर बाजार (Stock Market) सावरला. आज सेन्सेक्स आणि निफ्टीने तेजीत सुरुवात केली. आज दुपारी १२ च्या सुमारास सेन्सेक्स (Sensex) १ हजार अंकांनी म्हणजेच १.३ टक्के वाढून ७८,३५० पार झाला. तर निफ्टी (Nifty) ३०० अंकानी वाढून २३,७५० चा टप्पा ओलांडला. बाजारातील तेजीत आयटी, ऑटो आणि एनर्जी शेअर्स आघाडीवर आहेत.
बाजारातील आजच्या तेजीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ६ लाख कोटींनी वाढून ४३५.०८ लाख कोटींवर पोहोचले.
कार्पोरेट कंपन्यांची कमकुवत कमाई आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीच्या माऱ्यामुळे सोमवारी बीएसई सेन्सेक्सने करेक्शन मोडमध्ये प्रवेश केला होता. आज बाजारातील रिकव्हरी दिसून आली. बीएसई मिडकॅपमध्ये खरेदी दिसून येत आहे. हा निर्देशांक १.३ टक्क्यांनी वाढला आहे. तर स्मॉलकॅप १.६ टक्क्यांनी वाढला आहे.
सेन्सेक्सवर एम अँड एम, अदानी पोर्ट्स, टेक महिंद्रा, टायटन, टाटा मोटर्स, टीसीएस, इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट, इन्फोसिस, एचसीएल टेक, रिलायन्स, एनटीपीसी, पॉवर ग्रिड हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांनी वाढले आहेत. तर केवळ बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.
निफ्टी ऑटो निर्देशांक २ टक्के वाढला आहे. त्याचबरोबर निफ्टी एनर्जी १.७ टक्के, आयटी निर्देशांक १.८ टक्के, निफ्टी बँक १ टक्के वाढला आहे.
विदेशी संस्थागत गुंतवणूकदार (FIIs) यांच्याकडून विक्रीचा मारा कायम आहे. एक्सचेंज डेटानुसार, विदेशी गुंतवणूकदारांनी सोमवारी १,४०३.४० कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची विक्री केली, याउलट, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (DII) निव्वळ खरेदीदार म्हणून समोर आले आहेत. त्यांनी २,३३०.५६ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. याचाच अर्थ देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांची खरेदी ही परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीपेक्षा जास्त आहे. मजबूत देशांतर्गत सपोर्टमुळे बाजाराला घसरणीतून सावरण्यास मदत झाली असल्याचे बाजारातील विश्लेषकांचे म्हणणे आहे.
आशियाई बाजारातील तेजीमुळेही भारतीय शेअर बाजारात सकारात्मक वातावरण दिसून येत आहे.