

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिका आणि भारतातील अपेक्षेपेक्षा कमी महागाईच्या आकडेवारीने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराने (Stock Market) गुरुवारी (दि.१३) तेजीत सुरुवात केली. सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स २५० अंकांनी वाढून ७४,३०० वर पोहोचला. तर निफ्टी ५० निर्देशांक ६६ अंकांच्या वाढीसह २२,५३० वर व्यवहार करत आहे. बँकिंग शेअर्स तेजीत आहेत.
सेन्सेक्सवर टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी हे शेअर्स प्रत्येकी १ टक्के वाढले. तर टाटा मोटर्स, कोटक बँक, एशियन पेंट्स हे शेअर्स घसरले आहेत. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप प्रत्येकी ०.४ टक्के वाढले आहेत.
दरम्यान, परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा सपाटा सुरुच आहे. १२ मार्च रोजी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) १,६२७ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. तर याच दिवशी देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) १,५१० कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.
फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेतील महागाई कमी झाली असली तरी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्क धोरणांचा महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या संभाव्य परिणामाबद्दल अनिश्चितता कायम आहे. काल बुधवारी अमेरिकेच्या शेअर बाजारातील डाऊ जोन्स निर्देशाक ८२.५५ अंकांनी म्हणजे ०.२० टक्के घसरून ४१,३५० वर आला.