पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजारात (Stock Market) आज गुरुवारी (२ जानेवारी २०२५) नवीन वर्षाचा उत्साह दिसून आला. सेन्सेक्स आणि निफ्टीने आज प्रत्येकी १ टक्केहून अधिक वाढ नोंदवली. दुपारच्या व्यवहारात सेन्सेक्स (Sensex) १,१०० अंकांनी वाढून ७९,६०० पार झाला. तर निफ्टी ५० (Nifty 50) निर्देशांकाने ३०० अंकांच्या वाढीसह पुन्हा एकदा २४ हजारांच्या अंकाला स्पर्श केला. बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी, कंपन्यांच्या तिमाही कमाईबद्दल आशावाद आदी घटक शेअर बाजारातील तेजीसाठी महत्त्वाचे ठरले आहेत.
दरम्यान, आजच्या तेजीमुळे बीएसईवरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २ लाख कोटींनी वाढून ४४६.५२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी खरेदीचा मूड दिसून आला. मुख्यतः ऑटो शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत. निफ्टी ऑटो २.८ टक्के वाढला आहे. निफ्टी ऑटोवर आयशर मोटर्स, मारुती, अशोल लेलँड, एम अँड एम, टीव्हीएस मोटर्स हे शेअर्स ३ ते ७ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. आयशर मोटर्सचा शेअर्स तब्बल ७ टक्के वाढला आहे. रॉयल एनफिल्डच्या विक्रीतील वाढीच्या पार्श्वभूमीवर आयशर मोटर्सच्या शेअर्सने (Eicher Motors shares) रॉकेट भरारी घेतली आहे. मारुती सुझुकी शेअर्स ५ टक्के वाढला आहे.
निफ्टी ५० निर्देशांकावर बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, मारुती, एम अँड हे शेअर्स ४ ते ८ टक्क्यांपर्यंत वाढून टॉप गेनर्स ठरले आहेत. तर ब्रिटानिया, सन फार्मा, अदानी पोर्ट्स हे शेअर्स घसरले आहेत.