Stock Market | निफ्टी व सेन्सेक्स : 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

रुपया चलनाची डॉलरच्या तुलनेत सातत्याने घसरण
arthavarta
अर्थवार्ताPudhari File Photo
Published on
Updated on

* गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकांमध्ये एकूण अनुक्रमे 225.90 आणि 657.48 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशांक 23813.4 अंक तसेच 78699.07 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये 0.96 टक्के, तर सेन्सेक्समध्ये 0.84 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. सर्वाधिक वाढ होणार्‍या निफ्टी कंपन्यांमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा (4.9 टक्के), टे्रंट (4.2 टक्के), अदानी पोर्टस् (4.1 टक्के), टाटा मोटर्स (3.7 टक्के), डॉ. रेड्डीज लॅब (3.4 टक्के) या समभागांचा समावेश झाला. सर्वाधिक घट होणार्‍या समभागांमध्ये हिशे मोटोकॉर्प (-2.4 टक्के), पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन (-2.0 टक्के), स्टेट बँक (-1.5 टक्के), टायटन कंपनी (-1.4 टक्के), टाटा स्टील (-1.3 टक्के) या कंपन्यांचा समावेश झाला.

* रुपया चलनाची डॉलरच्या तुलनेत सातत्याने घसरण सुरूच. शुक्रवारच्या सत्रात रुपया डॉलरच्या तुलनेत 28 पैसे घसरून 85.54 रुपये प्रतिडॉलर किमतीवर बंद झाला. सत्रादरम्यान एक क्षणी तर रुपया तब्बल 55 पैसे घसरून 85.80 रुपये प्रतिडॉलर स्तरापर्यंत गडगडला होता; परंतु नंतर रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपामुळे अखेर 85.54 या आजपर्यंतच्या सर्वाधिक कमकुवत स्तरावर रुपयाने बंदभाव दिला. सप्टेंबरमध्ये अमेरिकेच्या फेडरल बँकेने व्याजदर कपातीचे सत्र सुरू केले. त्यामुळे गुंतवणूकदारांनी विकसनशील देशामधून पैसा काढण्यास सुरू केले. त्यामुळे रुपयासह बहुतांश सर्व विकसनशील देशांच्या चलनामध्ये पडझड पाहावयास मिळाली. सप्टेंबरपासून आतापर्यंत रुपया सुमारे 7 टक्के कुमकुवत झाला आहे. अमेरिकेचे होणारे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ हे धोरण राबवले जाणार असल्याचे स्पष्ट केले. यासाठी डॉलर मजबूत राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या सर्वाचा एकत्रित परिणाम भारताच्या रुपया चलनावर झाला. मध्यमवहीत लवकरच रुपया 86 रुपये प्रतिडॉलरचा स्तर गाठेल अशी अपेक्षा अर्थविश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

* चालू अर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत भारताची चालू खात्यातील तूट (करंट अकाऊंट डेफिसिट) ‘जीडीपी’च्या 1.2 टक्क्यांपर्यंत खाली आली. मागील वर्षी याच तिमाहीत ही तूट 1.3 टक्के होती. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार ही तूट मागील वर्षी दुसर्‍या तिमाहीत 11.3 अब्ज डॉलर्स इतकी होती. आता ती 11.2 अब्ज डॉलर्स आहे.

* आदित्य बिर्ला समूहाची सिमेंट उत्पादन क्षेत्रातील कंपनी ‘अल्ट्राटेक सिमेंट’ मेघालयामधील ‘स्टार सिमेंट’मध्ये 8.69 टक्के हिस्सा 851 कोटींना खरेदी करणार. स्टार सिमेंटचे प्रवर्तक (प्रमोटर्स) ‘चामरिया’ कुटुंबाकडून हिस्सा खरेदी केला जाणार. सध्या अदानी समूहाची अंबुजा सिमेंट विविध सिमेंट उद्योग खरेदी करून देशातील सर्वात मोठी सिमेंट उत्पादक कंपनी बनवण्याच्या प्रयत्नात आहे. अदिल्य बिर्ला समूहाची अल्ट्राटेक देशातील सर्वात मोठी सिमेंट उत्पादक म्हणून स्थान टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. नुकतेच अल्ट्राटेक कंपनीने दक्षिणेतील ‘इंडिया सिमेंट’ कंपनीचे अधिग्रहण केले.

* ‘जेएसडब्लू एनर्जी’ लवकरच ‘ओ-2 पॉवर’ कंपनी खरेदी करणार. जेएसडब्लू एनर्जी समूहाची उपकंपनी ‘जेएसडब्लू निओ एनर्जी’ हे अधिग्रहण पूर्ण करणार. एकूण 12468 कोटींना हा व्यवहार होणार. ‘ओ-2 पॉवर’ ही कंपनी अपारंपरिक हरित ऊर्जानिर्मिती क्षेत्रात (रिन्युएबल एनर्जी सेक्टर) कार्यरत असून 4.7 गिगावॉट ऊर्जानिर्मितीची क्षमता या कंपनीकडे आहे. सध्या जेएसडब्लू निओ एनर्जी या कंपनीकडे 20.02 गिगावॉट ऊर्जानिर्मितीची क्षमता आहे. या मध्ये अधिग्रहणपश्चात 23 टक्क्यांची भर पडून ही क्षमता 24.71 गिगावॉट पर्यंत पोहोचणार आहे.

* 2025 वर्षात गुंतवणूकदारांसाठी आयपीओच्या माध्यमातून अनेक संधी. आगामी वर्षात तब्बल 2 लाख कोटी रुपयांचे आयपीओ बाजारात येण्याचा अंदाज. सरलेल्या 2024 वर्षात आयपीओच्या माध्यमातून सुमारे 1.3 लाख कोटींची निधी उभारणी झाली; परंतु यावर्षी त्यामध्ये मोठी भर पडणार आहे. सध्या 34 कंपन्यांना एकूण 41,462 कोटींच्या आयपीओद्वारे भांडवल उभारणीची मान्यता बाजार नियामक सेबीने दिली आहे. तसेच 98,672 कोटींचे आणखी 55 आयपीओ मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. एकूण ‘आयपीओ’ची संख्या बघता अमेरिकेच्या दुप्पट आणि युरोपपेक्षा अडीचपट आयपीओ भारतातील भांडवल बाजारात येत आहेत. आगामी आयपीओमध्ये एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया, हेक्सावेअर टेक्नॉलॉजी, एनएसडीएल, झेप्टो, फ्लिपकार्ट, एथर एनर्जी, जेएसडब्लू एनर्जी, एचडीबी फायनान्शिअल सर्व्हिसेस, रिलायन्स जिओसारखे मोठे आयपीओ प्रतीक्षेत आहेत.

* वाढती महागाई आणि करबोजा यामध्ये पिचलेल्या मध्यमवर्गाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारच्या हालचाली. 15 लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असणार्‍या मध्यमवर्गाला आयकरातून (इन्कम टॅक्स) सूट देण्याचा सरकारचा विचार. आगामी फेबु्रवारीमध्ये पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. सध्या शहरी भागातील मध्यमवर्गावर कराचा बोजा वाढल्याने त्यांची क्रयशक्ती कमी झाल्याचे विविध पाहण्यांतून समोर आले. ब्रिटानिया, नेस्ले यासारख्या कंपन्यांच्या प्रमुखांनीदेखील यामुळे शहरी भागात व्यवसायावर परिणाम झाल्याचे निवेदन केले. त्यामुळे केंद्र सरकार यासंबंधी काही निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

* होंडा आणि निस्सान या जपानच्या दोन वाहन उत्पादक कंपन्या एकत्र येणार. यासाठी दोन्ही कंपन्यांनी करारनामा केला. या दोन्ही कंपन्या एकत्र करण्यावर जून 2025 पर्यंत सखोल चर्चा करून ऑगस्ट 2026 पर्यंत एकत्रित कंपनी चालू करण्याचे उद्दिष्ट. जुलै आणि ऑगस्ट 2026 पर्यंत होंडा आणि निस्सान दोन्ही कंपन्या भांडवल बाजारातून डिलिस्ट केल्या जाणार. यामुळे टोयोटा तसेच जर्मनीच्या फोक्सवॅगनसारख्या कंपन्यांकडून असणार्‍या स्पर्धेत टिकून राहण्यास या कंपन्यांना शक्य होईल. याचप्रमाणे नव्याने उदयास आलेल्या ईव्ही क्षेत्रातील टेस्ला तसेच चीनच्या कंपन्यांकडून असणार्‍या इलेक्ट्रिक व्हेईकल क्षेत्रात निभाव लागण्यास होंडा आणि निस्सानला मदत होईल.

* भारतात बनलेले स्मार्ट फोन परदेशी निर्यात करण्याचे मूल्य चालू आर्थिक वर्षात 31 टक्के वधारून 1 लाख 70 हजार कोटींवर पोहोचणार असा अंदाज. मागील संपूर्ण आर्थिक वर्षात मिळून 1 लाख 29 हजार कोटींच्या स्मार्ट फोनची निर्यात करण्यात आली होती. यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान 1 लाख 10 हजार कोटींच्या निर्यातीचा टप्पा ओलांडण्यात आला आहे.

* 20 डिसेंबर रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी मागील 7 महिन्यांच्या नीचांक स्तरावर. आठवडाभरात गंगाजळीमध्ये 8.478 अब्ज डॉलर्सची घट होऊन गंगाजळी 644.391 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news